कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या बलिदानानंतर…
या हत्येच्या विरोधात कायदेशीर लढाई लढलीच पाहिजे, हल्लेखोर शक्तींच्या विरोधात वैचारिक लढाही चालवला पाहिजे, परंतु फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी तेवढे पुरेसे नाही, त्यांचा प्रतिकार रस्त्यावर करावाच लागतो, हे इतिहासाने दाखवून दिलेले आहे. देशातील कष्टकऱ्यांनी, कामगारांनी, विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. संवैधानिक चौकटीमध्ये उपलब्ध लोकशाही ‘स्पेस’ आपण अधिकाधिक उपयोगात आणायलाच हवा, पण त्याच वेळी त्याच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्या. आज दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्येबद्दल केवळ शोक करत बसणे पुरेसे नाही तर त्यांच्या जुंझार जीवनापासून प्रेरणा, शक्ती घेऊन आणि त्यांच्या बलिदानापासून योग्य धडा घेऊन आपणास फॅसिस्ट शक्तींच्या विरोधातील दीर्घ लढाईची तयारी करावी लागणार आहे. कॉ. पानसरेंना ‘स्फुलिंग’ची श्रद्धांजली.