कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या बलिदानानंतर…
कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या बलिदानानंतर…
कोल्हापूरमध्ये फॅसिस्ट गुंडांकडून झालेल्या गोळीबारामध्ये जखमी झालेल्या कॉम्रेड गोविंद पानसरेंचा २० फेब्रुवारी, २०१५ ला मुंबईमध्ये मृत्यू झाला. पानसरेंचा मृत्यू म्हणजे एकूण लोकशाही आंदोलनाचे जबर नुकसान आहे. मात्र अशा हौतात्म्यामुळे समाजाची जेवढी हानी होते तेवढीच परिवर्तनाचा लढा बळकट करण्याची ऊर्जाही त्यामध्ये सामावलेली असते! कॉ. पानसरे यांच्याशी राजकीय मतभेद बाळगूनही परिवर्तनाच्या लढ्यातील ते अत्यंत आदरणीय व अनुकरणीय सैनिक होते, हे कोणालाही नाकारता येणार नाही. त्यांच्यातील अक्षय ऊर्जा, अखंड काम करण्याची क्षमता, वैचारिक लढा आणि रस्त्यावरचा वास्तविक संघर्ष यांची सांगड घालण्याची दुर्मीळ हातोटी आणि संघटनशक्ती परिवर्तनाच्या लढ्यातील नव्या फळीने आत्मसात केली पाहिजे. दीड वर्षापूर्वी अगदी ह्याच पद्धतीने अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नरेंद्र दाभोलकरांची हत्या करण्यात आली होती. चौकशीच्या सगळ्या फार्सनंतरही त्यांचे खुनी अद्याप मोकाट आहेत. कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या खुनाचा तपास ज्या दिशेने जात आहे त्यातून फार काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही, हे स्पष्ट झालेले आहे. विधानसभा अधिवेशनात त्यांच्या निधनाचा शोकप्रस्ताव आणण्याची मागणी झिडकारून महाराष्ट्र सरकारने आपली ‘‘वैचारिक बांधिलकी’’ जपलेली असली तरी येणाऱ्या पिढ्या पुरोगामी महाराष्ट्राच्या जडणघडणीत कॉ. पानसरेंच्या भरीव योगदानाची दखल घेतल्यावाचून राहणार नाहीत!
आपल्या राजकारणासाठी शिवाजीचा विकृत इतिहास लोकांसमोर उभा करू पाहणाऱ्यांच्या प्रयत्नांना ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तिकेद्वारे पानसरेंनी सुरुंग लावला. ‘मुस्लिमांचे लाड?’ या पुस्तिकेतून मुसलमान समाजाचे वास्तव मांडून जनतेमध्ये द्वेषाचे विष पसरवणाऱ्यांचा त्यांनी बुरखा फाडला. २६/११ च्या मुंबई हल्ल्यात बळी गेलेले पोलिस अधिकारी हेमंत करकरेंच्या मृत्यूचे प्रस्थापित मिथक तोडणाऱ्या एस.एम. मुश्रीफ लिखित ‘Who killed karakare?’ या पुस्तकावर, समस्त प्रतिक्रियावादी शक्तींचा विरोध मोडून काढत, त्यांनी काही महिन्यांपूर्वी कोल्हापूरात परिसंवाद घडवून आणला. तथाकथित राष्ट्रवाद्यांचे सत्यस्वरूप समाजासमोर आणण्यासाठी ह्या विषयावर मार्च, २०१५ पासून सबंध महाराष्ट्रामध्ये १५० परिसंवाद घडवून आणण्याचा त्यांचा मानस होता. तत्पूर्वीच त्यांच्या झालेल्या हत्येमागे कोणत्या शक्ती आहेत हे ओळखणे कठीण नाही.
या हत्येच्या विरोधात कायदेशीर लढाई लढलीच पाहिजे, हल्लेखोर शक्तींच्या विरोधात वैचारिक लढाही चालवला पाहिजे, परंतु फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी तेवढे पुरेसे नाही, त्यांचा प्रतिकार रस्त्यावर करावाच लागतो, हे इतिहासाने दाखवून दिलेले आहे. देशातील कष्टकऱ्यांनी, कामगारांनी, विद्यार्थ्यांनी ही जबाबदारी
आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. संवैधानिक चौकटीमध्ये उपलब्ध लोकशाही ‘स्पेस’ आपण अधिकाधिक उपयोगात आणायलाच हवा, पण त्याच वेळी त्याच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्या. आज दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्येबद्दल केवळ शोक करत बसणे पुरेसे नाही तर त्यांच्या जुंझार जीवनापासून प्रेरणा, शक्ती घेऊन आणि त्यांच्या बलिदानापासून योग्य धडा घेऊन आपणास फॅसिस्ट शक्तींच्या विरोधातील दीर्घ लढाईची तयारी करावी लागणार आहे. कॉ. पानसरेंना ‘स्फुलिंग’ची श्रद्धांजली.
स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५