Category Archives: फासीवाद

कर्नाटक विधानसभा निवडणुक निकाल: भांडवली लोकशाहीच्या दिखाव्याचं नग्न प्रहसन

सर्व सत्ताप्रणाली मोठमोठ्या भांडवलदारांच्या हितासाठीच काम करते.  ज्या पक्षाच्या मागे भांडवली शक्ती उभ्या आहेत, त्यालाच मोठ्या प्रमाणात निवडणुकीमध्ये पैसा पुरवला जातो आणि प्रचंड जाहिरातबाजीच्या जोरावर त्या पक्षासाठी वातावरणनिर्मिती केली जाते. निवडणुकीचा निकाल आल्यानंतरही धनबळाचा पूर्ण जोर लावून लोकप्रतिनिधींच्या घोडे बाजारासाठी पैसा पुरवतात ते मोठमोठे भांडवलदारच. त्यामुळे सत्ता येते ती दिसायला एखाद्या पक्षाची असते, पण वास्तवात ती राबवतात ते भांडवलदारच.

सांप्रदायिक फासीवाद्यांचे जनतेत फूट पाडण्याचे प्रयत्न हाणून पाडा

महान क्रांतिकारी शहिदे आजम भगतसिंह यांनी म्हटले होते की सामान्य गरीब कष्टकरी जनतेचा एकच धर्म असतो – वर्गीय एकजूट! आपल्याला सर्व प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना नाकारावे लागेल आणि त्यांच्या विरोधात लढावे लागेल. आपल्याला शपथ घ्यावी लागेल की आपण आपल्या गल्लीबोळात, मोहल्ल्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या धार्मिक कट्टरपंथियांना सांप्रदायिक उन्माद भडकवू देणार नाही आणि त्यांना पिटाळून लावू! आपल्याला मागणी करावी लागेल की केंद्र सरकार आणि सर्व राज्य सरकारांनी धर्माला राजकारण आणि सामाजिक जीवनापासून वेगळे करण्यासाठी कडक कायदा बनवावा. धर्म भारतीयांची खाजगी बाब असली पाहिजे व कोणत्याही पक्ष, दल, संघटना किंवा नेत्याला धर्म किंवा धार्मिक संप्रदायाच्या नावाखाली राजकारण केल्यास, वक्तव्ये केल्यास व उन्माद भडकविण्याचा प्रयत्न केल्यास कडक शिक्षा दिली गेली पाहिजे व त्यांच्यावर प्रतिबंध घालण्यात आला पाहिजे.

कॉम्रेड गोविंद पानसरेंच्या बलिदानानंतर…

या हत्येच्या विरोधात कायदेशीर लढाई लढलीच पाहिजे, हल्लेखोर शक्तींच्या विरोधात वैचारिक लढाही चालवला पाहिजे, परंतु फॅसिस्ट शक्तींना रोखण्यासाठी तेवढे पुरेसे नाही, त्यांचा प्रतिकार रस्त्यावर करावाच लागतो, हे इतिहासाने दाखवून दिलेले आहे. देशातील कष्टकऱ्यांनी, कामगारांनी, विद्यार्थ्‍यांनी ही जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली पाहिजे. संवैधानिक चौकटीमध्ये उपलब्ध लोकशाही ‘स्पेस’ आपण अधिकाधिक उपयोगात आणायलाच हवा, पण त्याच वेळी त्याच्या मर्यादाही लक्षात घ्यायला हव्या. आज दाभोलकर आणि कॉम्रेड पानसरेंच्या हत्येबद्दल केवळ शोक करत बसणे पुरेसे नाही तर त्यांच्या जुंझार जीवनापासून प्रेरणा, शक्ती घेऊन आणि त्यांच्या बलिदानापासून योग्य धडा घेऊन आपणास फॅसिस्ट शक्तींच्या विरोधातील दीर्घ लढाईची तयारी करावी लागणार आहे. कॉ. पानसरेंना ‘स्‍फुलिंग’ची श्रद्धांजली.

भारतीय विज्ञान परिषद – वैज्ञानिक तर्कपद्धतीचे श्राद्ध घालण्याची तयारी

आपण विसरता कामा नये की फॅसिस्ट शक्तींचा पहिला हल्ला जनतेची तर्कशक्ती आणि इतिहासबोध यांवरच असतो. तर्कशक्ती आणि इतिहासबोध ह्यांनी रिक्त समाजमानस फॅसिस्ट अजेंड्यावर संघटित करणे नेहमीच सोपे असते. जर्मनीमध्ये हिटलरने पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन करावयास लावले होते, हा निव्वळ योगायोग नाही. त्याने जर्मन समाजाचे हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते आणि जर्मनीला जगातील सर्वात शक्तिशाली देश बनवण्याचे स्वप्न दाखवले होते. आज आपणसुद्धा चहूबाजूंनी अश्या असंख्य घटना घडताना बघत आहोत.

‘‘महान संस्कृती’’च्या पुनर्स्‍थापनेसाठी!

‘‘महान हिंदू संस्कृती’’ची पुनर्स्‍थापना करून हिंदू संस्कृतीच्या अलौकिक आत्मिक तेजाने सारे विश्व उजळून टाकण्याची अदम्य इच्छा बाळगणाऱ्या परंपरेच्या पाईकांमध्ये सध्या विलक्षण उत्साह संचारलेला आहे. गुजरातमध्ये आपली धर्मनिष्ठा पुरेपूर आणि वारंवार सिद्ध केलेला सच्चा हिंदू आता दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाल्याने असे होणे स्वाभाविकच आहे. अर्थात, जेव्हा सत्ता हाती नव्हती तेव्हा ही रामाची वानरसेना अगदीच शांत आणि निष्क्रिय होती असे समजण्याचे कारण नाही. परंतु प्रतिकूल परिस्थितीत गनिमी डावपेच लढविणारी वानरसेना आता खुल्या मैदानात उतरून उघड युद्ध छेडण्याची तयारी करीत आहे. १९९८ ते २००४ या काळात अपुरे राहिलेले कार्यभार झपाट्याने पूर्ण करण्याची मोहीम आता धडाक्यात सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

नरेंद्र मोदींच्या विजयाचे संदर्भ

कोणतेही आर्थिक संकट दोन शक्यतांना जन्म देते- प्रगतिशील आणि प्रतिक्रियावादी. ज्या देशांमध्ये कामगार वर्गाची क्रांतिकारी पार्टी अस्तित्त्वात होती त्या देशांमध्ये फासीवादी उभार ‘‘न थांबवता येण्याजोगा’’ अथवा अपरिहार्य होऊ शकला नाही. परंतु ज्या देशांमध्ये कामगार वर्गाची कोणतीच अग्रणी क्रांतिकारी पार्टी अस्तित्त्वात नव्हती, किंवा जेथे अशा पार्ट्या कमकुवत होत्या त्या देशांमध्ये फासीवादी उभार एक ‘‘न थांबवता येण्याजोगे’’ वादळ बनून अवतरला. याच्याशी जोडलेली आणखी एक गोष्ट म्हणजे फासीवाद आणि उदार भांडवली (कल्याणकारी) राज्य परस्परांना ‘‘अँटीथिसीस’’ नाहीत, उलट परस्परपूरक आहेत. ज्या देशांमध्ये विसाव्या शतकात फासीवादी उभार झाले तेथे ते कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या उदार भांडवली राज्य किंवा संशोधनवादी सामाजिक लोकशाहीवादी कल्याणकारी सत्तेच्या अनिवार्य विफलतेची निष्पत्ती होते.