कात्यायनी यांच्या निवडक कविता

आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (८ मार्च) कात्यायनी यांच्या निवडक कविता

 

१. या स्त्रीला घाबरून असा…

ही स्त्री सारे काही जाणतेprotest-155927_640
पिंजऱ्याबद्दल
जाळ्याबद्दल
यातनागृहांबद्दल
तिला विचारा.
पिंजऱ्याबद्दल विचारा
ती सांगते
निळ्या अनंत विस्तारात
उडण्याच्या रोमांचाबद्दल.
जाळ्याबद्दल विचारताच
खोल खोल समुद्रात
हरवून जाण्याच्या
स्वप्नाबद्दल
बोलू लागते.
यातनागृहांचा विषय काढताच
गाऊ लागते
प्रेमाबद्दलचे एक गाणे.
रहस्यमय आहे या स्त्रीचा असंगतपणा.
तो समजून घ्या.
या स्त्रीला घाबरून असा.

 

२. देह न होणे

एक दिवस
स्त्री
देह होत नाही
आणि
उलथेपालथे होऊत जाते
सारे विश्व
अचानक
३. स्त्रीचे भाषेत लपणे…

न जाणे काय सुचलं
एक दिवस
स्त्रीला
खेळता खेळता पळत जाऊन
भाषेमध्ये सामावून गेली.
लपून बसली.
त्या दिवशी
हुकुमशहांना
झोप आली नाही रात्रभर.
त्या दिवशी
खेळू शकले नाहीत कविगण
अग्निकुंडातील सन्मान्य ज्वलंत शब्दांशी.
भाषा सारी रात्र मूक राहिली.
रुद्रविणेवर कुठलासा प्रचंड राग वाजत राहिला.
फक्त मुलं
निर्भय
गल्लिबोळांतून खेळत राहिली…

 

४. स्त्रीचे एकांतात विचार करणे

एक मोकळा श्वास घेण्यासाठी
स्त्री आपल्या एकांताला बोलावते.
स्त्री एकांताला स्पर्श करते,
संवाद साधते त्याच्याशी.
जगते,
पान करते त्याचं मूकपणे.
एक दिवस
ती काहीच सांगत नाही आपल्या एकांताला,
कोणताच प्रयत्न करत नाही दुःख वाटून घेण्याचा,
फक्त विचार करते.
जशी ती विचार करू लागते
एकांतात,
निर्णयापर्यंत पोहोचण्याआधीच
धोकादायक घोषित केली जाते.

स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५