तेलतुंबडे या ठिकाणी, त्यांनी मार्क्सवाद आणि आंबेडकरवादाचे मिश्रण किंवा समन्वयाची गोष्ट कधी केलीच नाही किंवा त्याला अवांछित मानले आहे, असे सांगताना असत्याचा आधार घेत आहेत. १९९७ साली त्यांनी पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागात एक प्रबंध सादर केला होता – ‘आंबेडकर इन अॅण्ड फॉर दि पोस्ट आंबेडकर दलित मूव्हमेंट’. यात दलित पँथर्सची चर्चा करताना ते लिहितात, ‘‘जातिवादाचा प्रभाव, जो दलित अनुभवासोबत अंतर्भूत आहे, अनिवार्यपणे आंबेडकरांना घेऊन येतो, कारण त्यांचा फ्रेमवर्क हा असा एकमेव फ्रेमवर्क होता ज्यात याची जाणीव होती. परंतु वंचनांच्या अन्य समकालीन समस्यांसाठी मार्क्सवाद क्रांतिकारी परिवर्तनाचा एक वैज्ञानिक फ्रेमवर्क सादर करीत होता. दलित व गैर दलितांमधील वंचित लोक एका पायाभूत बदलाची आकांक्षा बाळगत होते, मात्र यांतील पहिल्यांनी सामाजिक राजकीय परिवर्तनाच्या त्या पद्धतीचे अनुसरण केले जी आंबेडकरीय दिसत होती, तर दुसऱ्यांनी मार्क्सीय म्हणविली जाणारी पद्धत स्वीकारली जी प्रत्येक सामाजिक प्रक्रियेला केवळ भौतिक यथार्थाचे प्रतिबिंब मानीत होती. या दोघांनीही चुकीच्या व्याख्यांना जन्म दिला. या दोन्ही विचारधारांच्या मिश्रणाचा देशातील पहिला प्रयत्न करण्याचे श्रेय पँथर्सना जाते, परंतु दुर्दैवाने या दोन्ही विचारधारांना अस्पष्ट प्रभावांपासून मुक्त करण्याचे प्रयत्न व त्यांतील अविसंवादी (नॉन काँट्रॅडिक्टरी) सारतत्त्वावर जोर देण्याच्या प्रयत्नांच्या अनुपस्थितीमुळे हा प्रयत्न मध्येच अवरुद्ध झाला. या दोन्ही विचारधारांना समेकित करण्याचा ना कोणताही सैद्धांतिक प्रयत्न झाला, ना जातीच्या सामाजिक पैलूंना ग्रामीण परिवेशात भूमीच्या प्रश्नाशी जोडण्याचा कोणताही व्यावहारिक प्रयत्न केला गेला.’’ आता वाचकांनीच सांगावे की तेलतुंबडे जो दावा करीत आहेत त्याला खोटेपणाच्या श्रेणीत ठेवले जाऊ नये का? या ठिकाणी ‘आंबेडकरीय’ आणि ‘मार्क्सीय’ म्हणजेच ‘आंबेडकरवाद’ आणि ‘मार्क्सवाद’ या अर्थांत ‘दोन विचारधारां’’च्या अर्थाने त्यांचा प्रयोग झालेला नाही का? मग आपण आंबेडकरवाद असा शब्दप्रयोग कधी केलाच नाही, कारण तशी कोणतीही विचारधारा आहे असे आपण मानीत नाही, असा निराधार आणि खोटा दावा ते करतात तो कशासाठी? या ठिकाणी ते आंबेडकरांची विचारधारा आणि मार्क्सची विचारधारा आणि त्यांच्या मिश्रणाच्या आवश्यकतेविषयी बोलत नाहीत का? तेलतुंबडेंसारख्या लोकपक्षधर बुद्धिजीवीने बौद्धिक नैतिकतेचे पालन केले पाहिजे आणि अशा प्रकारे शुद्ध खोटारडेपणा करू नये, असा सल्ला आम्ही त्यांना देऊ इच्छितो.