आत्ममुग्ध मार्क्‍सवादी व नकली आंबेडकरवाद्यांच्या नावे…

आत्ममुग्ध मार्क्‍सवादी व नकली आंबेडकरवाद्यांच्या नावे…

आनंद तेलतुंबडे

Anand teltumbdeस्पष्टच बोलायचं झालं तर चंदिगढला जाण्याबद्दल मी स्वत:ला दोष देतो. महाराष्ट्रातील काही नकली आंबेडकऱ्यांनी सुरू केलेल्या अंतहीन वादामुळे मी लज्जित झालो आहे हे त्याचे कारण नाही, तर काही जडमती व गर्विष्ठ लोकांचे टोळके स्वत:ला मार्क्‍सवादी म्हणून सादर करताना पाहून मला अतीव दु:ख झाले आहे. जातीव्यवस्थेची सद्यकालीन स्थिती व जातीच्या उच्चाटनाच्या उपायांबद्दल तेथे गंभीर चर्चा होईल अशी माझी अपेक्षा होती. पंरतु तेथील काही तासांच्या माझ्या उपस्थितीत मला हे कळून चुकले की आपल्या अप्रोच पेपरमधील दृष्टिकोन बाहेरच्या लोकांच्या सहयोगाद्वारे अधिक समृद्ध बनविणे हा त्यांचा हेतू नसून आपण तेवढे बरोबर आहोत आणि बाकी सगळे चूक हेच त्यांना सिद्ध करायचे होते.

आपल्याला सतावणाऱ्या काही मुद्द्यांबद्दल प्रगल्भ जाणीव विकसित करण्यासाठी खुली चर्चा घडवून आणणे हा अशा संमेलनांचा हेतू असतो. ही संमेलने म्हणजे सार्वजकिन सभा नसतात आणि म्हणूनच एकतर्फी आणि निष्कर्षहीन चर्चा आयोजक सार्वजनिक करू शकत नाही. हे एवढ्याचसाठी की व्यापक जनता जाणिवेच्या त्याच पातळीवर असत नाही ज्या पातळीवर संमेलनाचे प्रतिनिधी असतात ज्यांना संबोधून तेथे बोलले जाते. म्हणूनच आयोजकांनी संमेलनातील कच्चे (मूळ इंग्रजीतील शब्द ‘रॉ’, परंतु येथे त्याचा अर्थ ‘असंकलित’- संपादक) रेकॉर्डिंग आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी आणि आपण जिंकलो आहोत हे दाखविण्यासाठी सार्वजनिक केले ही त्यांची मूलभूत चूक होती. जर त्यांना जबाबदारीचे थोडेदेखील भान असते तर त्यांनी असे केले नसते. भारतातील जातवास्तवाच्या आकलनापासून ते किती दूर आहेत व अशा नाजुक विषयाला हाताळण्यास किती अपिरपक्व आहेत, हे सिद्ध करण्यासाठी ही चूक पुरेशी आहे.

मिडियाला सनसनाटी असे काहीतरी हवे असते व म्हणूनच माझे म्हणणे संदर्भांपासून वेगळे करून, त्यांतील इकडून तिकडून काही गोष्टी निवडून ते त्यावर तुटून पडले. बाबासाहेब आंबेडकरांनी दलित मुक्तीसाठी केलेल्या सर्व प्रयत्नांना मी महान विफलता असे संबोधले, असे ते सांगू लागले. खरी गोष्ट म्हणजे अप्रोच पेपरमध्येच हे मत माझ्या नावावर खपविण्यात आलेले होते व म्हणूनच, मी पहिल्यांदाच असा धमाकेदार खुलासा करीत होतो असे नाही. असे मत मी वेगवेगळ्या संदर्भांत कित्येक वर्षांपासून व्यक्त करीत आलो आहे व त्याकडे कधीच बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान म्हणून पाहिले गेलेले नाही. हिंदी वर्तमानपत्रांमध्ये ही गोष्ट ‘लिक’ केल्याचे अभिनव सिन्हा नाकारत आहेत परंतु त्यांची या जबाबदारीतून सुटका होऊ शकते का? कारण माझ्या दुसऱ्या वक्तव्यातील ‘कोलांटी’वर ते ज्या प्रकारे अडून बसले आहेत त्यावरून हे दिसून येते की मी ज्या संदर्भात तेथे उभा होतो आणि माझे म्हणणे मी तेथे मांडले त्याबद्दल त्यांच्यामध्ये केवढे अज्ञान आहे, मग ते खरे असो वा दिखाऊ. मी सुरुवातीलाच माझ्या बोलण्याचा संदर्भ स्पष्ट केला होता की ज्या भयानक मोेडतोडीसह ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि पेरियार यांसारख्या महान व्यक्तींच्या नेतृत्त्वाखालील जातिविरोधी आंदोलनांची माहिती देताना त्यांना जवळजवळ समूळ नाकारण्यात आले होते त्याशिवाय त्या अप्रोच पेपरमध्ये मला काहीच नवीन गवसलेले नव्हते. या आंदोलनांचे सुविख्यात रॅडिकल टिकाकार गेल ओमवेट, सुभाष गाताडे यांच्यासह मलासुद्धा नाकारण्यात आले होते. जातीसंबंधी मार्क्‍सवादी इतिहास लेखनाबदद्दल नेहमीच जे काही लिहिले जाते त्याशिवाय या एकूणच पेपरला गैर मार्क्‍सवादी आंदोलने, सिद्धांत आणि विचारांविरोधातील खोल पूर्वग्रहांचा दर्प येत होता. (भारताच्या संदर्भात अधिक परिचित असलेल्या ‘जातीयवादी’ आणि ‘ब्राह्मण्यवादी’ या संज्ञांपासून या अप्रोचला वेगळा करणारी रेषा फारच धूसर होती). म्हणूनच अशा प्रकारच्या जातियवादी भूमिकेसह ते जातीच्या प्रश्नावर चर्चा करण्यास लायक नाहीत अशी चपराक देण्याच्या विचाराने मी माझ्या भाषणात केवळ ही मोडतोड उघड करण्याचा निर्णय घेतला. मी अप्रोच पेपरमधील केवळ एक पॅरेग्राफ निवडला ज्यामध्ये माझ्या जातीसंबंधी तथाकथित मतांबद्दल बोलले गेले होते. मी हे एवढ्यासाठीच केले कारण मी निश्चित केलेल्या हेतूच्या पूर्ततेसाठी हेच सर्वाधिक योग्य होते. तो पॅरेग्राफ हिंदीमध्ये असा होता: (पॅरेग्राफचा मराठी अनुवाद- संपादक)

‘‘मार्क्‍सवाद आणि आंबेडकरवादाच्या समन्वयाचे आणखी एक प्रमुख प्रस्तुतकर्ते आनंद तेलतुंबडे एकीकडे तर असे मानतात की जातीच्या उन्मूलनासाठीच्या आंबेडकरांच्या साऱ्या योजना निष्फळ सिद्ध झाल्या परंतु दुसरीकडे, कां कुणास ठाऊक, आंबेडकरांचे पुस्तक ‘जातीचे उच्चाटन’ (ज्याचे विश्लेषण आम्ही वर केलेले आहे) भारतात ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’इतकेच महत्त्वपूर्ण आहे, असेही ते मानतात. तेलतुंबडे आरक्षण म्हणजे एक भोवरा असल्याचे सांगतात आणि निरंतर घटत जाणाऱ्या नोकऱ्यांच्या या काळात ते निरर्थक असल्याचे मानतात. अस्मितेच्या राजकारणाचेदेखील ते एक कटू टिकाकार आहेत. परंतु मूलाधार-अधिरचनेच्या रूपकाच्या प्रेâमवर्कमध्ये जात समजून घेण्याऐवजी ते या प्रेâमवर्कलाच जाती आणि वर्गामधील संबंधांना समजून घेण्याच्या मार्गातील एक बाधा समजतात आणि भारतीय क्रांतीसाठी जातीला वर्गसंघर्षाशी न जोडू शकणे ही भारतीय कम्युनिस्टांची अक्षम्य चूक असल्याचे मानतात. मूलाधार अधिरचनेच्या प्रश्नावर आम्ही आमचे म्हणणे वर मांडलेले आहे. तेलतुंबडेंकडूनसुद्धा आपल्याला जातींच्या उच्चाटनाची कोणतीच दिशा मिळत नाही, व हेही कळत नाही की जातीला वर्गसंघर्षाच्या रणनीतीशी जोडण्यासाठी आंबेडकरांकडून मार्क्‍सवादाला काय योगदान प्राप्त होऊ शकते.’’

याच्या अगोदर माझ्या संदर्भात एक वाक्य दिले गेले होते. ते पुढीलप्रमाणे:

‘‘हां, असे बहुतेक ‘माले’ ग्रुप, गेल ओमवेत, आनंद तेलतुंबडे, सुभाष गाताडे वगैरे वगैरे जातिव्यवस्था केवळ श्रम विभाजन नाही तर श्रमिकांचेही विभाजन आहे व ही बाब म्हणजे भारताचे वैशिष्ट्य आहे या आंबेडकरांच्या मौलिक सैद्धांतिक योगदानाबाबत स्तंभित होऊन जातात. अज्ञान आपल्याला सामान्य गोष्टींनादेखील मौलिक मानण्यासाठी भाग पाडते.’’

जातींच्या विभाजनाला कमी लेखतानाच त्याला उत्पादन व्यवस्थेतील एखाद्याचे स्थान निश्चित करणाऱ्या अन्य विभजनांच्या (उदारहणादाखल मानसिक व शारिरिक श्रम, कुशल व अकुशल श्रमिक, स्थायी आणि अस्थायी कामगार, ब्रिटनमधील ब्रिटिश आणि आयरिश कामगार व अमेरिकेतील गोऱ्या व काळ्या कामगारांमधील विभाजन- ही उदाहरणे त्यांनीच दिलेली आहेत) स्तरावर आणण्याच्या महान अज्ञानाबरोबरच जरा या वाक्याच्या अपमानास्पद रचनेकडे लक्ष द्या. ही निराधार (मूळ इंग्रजीतील शब्द ‘मिसफाऊंडेड’) घमेंड जातीविरोधी आंदोलने, त्यांचे नेते आणि त्यासंबंधी लिहिणाऱ्यांबद्दलच्या एकूण चर्चेच सर्वत्र पसरलेली होती.

जे लोक माझ्या लेखनाशी परिचित आहेत त्यांना माझ्या लेखनात मी आंबेडकरवाद आणि मार्क्‍सवाद यांच्या समन्वयाचा प्रस्ताव ठेवल्याचे कधीच आढळणार नाही. खरे तर मी कधी आंबेडकरवाद हा शब्ददेखील वापरलेला नाही जो माझ्या नावाशी जोडण्यात आला आहे. ‘जातीचे उच्चाटन’ला ‘कम्युनिस्ट मॅनिफेस्टो’इतकेच महत्त्वपूर्ण मानल्याबद्दल माझ्यावर ज्या प्रकारे आरोप करण्यात आला आहे त्यावरून असे सूचित होते की ‘जातीचे उच्चाटन’ चे आता काही महत्त्व राहिलेले नाही. अप्रोच पेपरमध्ये इतरांच्या दृष्टिकोनाची टवाळी करणे वा तो नाकरण्याबरोबरच आपला दृष्टिकोनच बरोबर असल्याचे सांगण्याची बरीच उदाहरणे आहेत. स्पष्टच आहे, आयोजकांनी माझ्या बाबतीत हे मत मी ‘जेएनयू’मध्ये ‘एसएफआर’द्वारे ‘एनिहिलिएशन ऑफ कास्ट’ च्या पुनप्रकाशनाच्या वेळी लिहिलेल्या प्रस्तावनेच्या व इंटरनेटवर उपलब्ध काही अलिकडच्या मुलखतींच्या आधारे बनविण्यात आले आहे. मी गेल्या ३० वर्षांपासून या मुद्द्यांवर लिहित आहे आणि माझी मते कार्यकर्ते आणि या विषयाशी बांधिलकी बाळगणाऱ्या विद्वानांमध्ये सुपरिचित झालेली आहेत. स्पष्टच आहे की आयोजकांनी माझी पुस्तके लक्षपूर्वक वाचलेली नाहीत, जेथे मी समकालीन जातीप्रश्नावर माझे म्हणणे मांडले आहे आणि जातीच्या उच्चाटनासंबंधी माझी रूपरेखा सादर केली आहे. एवढेच नाही तर त्यांनी ज्या स्रोतांचा संदर्भ दिलेला आहे तेथेदेखील अशा चुकीच्या व्याख्यांची शक्यता नाही व त्यामुळे त्यांनी जाणूनबुजून इतरांच्या विचारांचे महत्त्व कमी करण्याचा प्रयत्न केलेला होता, असे मला वाटले. यातून जातीय पूर्वग्रहांची दुर्गंधी येत होती. त्याही पुढे जाऊन, ‘‘एक तर तुम्ही आमच्या सोबत आहात किंवा आमच्या विरुद्ध’’, असा जॉर्ज बुशछाप उद्धटपणा त्यांच्यात दिसून येत होता. पारंपरिक मार्क्‍सवादी वर्तुळात उत्पीडित जनतेच्या वाढत्या लोकसंख्येच्या व्यापक संघटनाबद्दल असा शत्रुत्वपूर्ण अप्रोच नवीन नाही. मी त्याचा समाचार घेण्याचा निर्णय घेतला.

माझी एकूण टिप्पणी त्यांच्या अप्रोचच्या स्तरावर दिसणाऱ्या उणेपणावर प्रकाश पाडण्यापुरती मर्यादित होती. हा गुण त्यांच्या पेपरमध्ये सर्वांत आक्षेपार्ह रूपात निम्न जातींच्या, विशेषत: दलितांच्या जातिविरोधी संघर्षांबद्दलच्या पूर्वग्रहांच्या रूपात दिसून येत होता. मी योग्य पद्धतीने श्रोत्यांसमोर त्याचे संदर्भ आणि हेतू स्पष्ट केले. मी हे दाखविण्याचा प्रयत्न केला की कशा प्रकारे ही मोडतोड जाणूनबुजून आणि समजूनउमजून केली गेली होती व म्हणूनच त्यातून जातीय पूर्वग्रहांचा दर्प येत होता. जर कोणी हे संदर्भ समजून घेईल तर माझी एकूण टिप्पणी योग्य दृष्टिकोनातून समजून घेतली जाऊ शकते. मार्क्‍स किंवा आंबेडकर यांच्या समर्थनाशी अथवा विरोधाशी त्याला काहीही देणेघेणे नव्हते. त्यांचे तत्त्वज्ञान आणि पद्धतींच्या तुलनेशीदेखील, जे करणे मला तिरस्करणीय वाटते, त्याला काहीच देणेघेणे नव्हते. त्यांना खोडून काढणे सोडूनच द्या, या किंवा त्या आंदोलनाला विरोध करण्याशीदेखील त्याचा संबंध नव्हता. उदाहरणासाठी घोषणापत्राचा मुद्दा घेऊ. त्यांनी माझ्यावर हा आरोप केला आहे की मी बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘जातीचे उच्चाटन’ला मार्क्‍सच्या ‘कम्युनिस्ट पक्षाचा जाहीरनामा’इतके महत्त्वपूर्ण मानतो. अशा प्रकारचे अपरिपक्व लेखनच विचारधारा आणि आंदोलनांना उच्चनीचतेच्या क्रमाने (हायरार्कि) सादर करण्याचा त्यांचा ब्राह्मण्यवादी हव्यास स्पष्ट करतात. ज्या प्रकारे भांडवलशाही प्रत्येक गोष्टीस विकाऊ वस्तूमध्ये रूपांतरित करते त्याचप्रकारे ब्राह्मण्यवाद प्रत्येक गोष्ट उच्चनीचतेच्या क्रमाने मांडतो. माझ्यासाठी ही सौभाग्याची बाब होती की ‘सीडीआरओ’चे असित दास, ज्यांनी माझ्या अगोदर आपले म्हणणे मांडले होते, यांनी माझे हे मूळ वाक्य वाचलेले होते: ‘‘भांडवली जगासाठी ‘कम्युनिस्ट जाहीरनामा’ जे आहे तेच जातीय भारतासाठी ‘जातीचे उच्चाटन’ आहे,’’ (“What Communist Manifesto is to the capitalist world, Annihilation of Caste is to caste India”) व त्यांनीदेखील हे मत व्यक्त केलेले होते की अप्रोच पेपरमध्ये ते तशाच प्रकारे व्यक्त झालेले नव्हते. त्यांची क्षेत्रे (डोमेन्स) भिन्न आहेत. जोवर ‘जातीचे उच्चाटना’चा प्रश्न आहे, त्यांनी ज्या प्रस्तावनेचा संदर्भ दिलेला आहे, तिच्यातदेखील समकालीन जातींना ते लागू होण्याबद्दलच्या माझ्या शंकांची झलक दिसून येते. घोषणापत्रे त्यांचा काळ आणि स्थळाच्या संघर्षांची अभिव्यक्ती असतात. ती शून्यातून निर्माण होत नाहीत. त्यांचे अचूक असणे किंवा चुकीचे असणे अपरिहार्यपणे त्या संघर्षांशी जोडलेले असते ज्यांचे ते प्रतिनिधित्व करतात. केवळ काळच याच्या बाबतीत निर्णय देऊ शकतो.

विशेष बाब म्हणजे एकीकडे अभिनव सिन्हा यांनी माझ्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ काढत त्याला आंबेडकरांना बरोबर ठरविणाऱ्या विधानाच्या रूपात पाहिले आहे तर दुसरीकडे दलितांमध्ये चुकीच्या बातम्यांनी आणि छुपे स्वार्थ बाळगणाऱ्या नकली आंबेडकऱ्यांनी ही विधाने म्हणजे आंबेडकरांच्या अपमानाच्या रूपात सादर केली आहेत. खरे तर मी या दोहोंपैकी काहीच केलेले नाही. माझा बिलकुल असा काही हेतू नव्हता. ‘‘आंबेडकरवाद’’ शब्दाच्या संदर्भात मी माझ्या पूर्वीच्याच भूमिकेचा पुनरुच्चार केला की अशी कोणतीही गोष्ट आहे असे मी मानीत नाही. मी आबेडकरांचे संघर्ष आणि चर्चा-विवादांमागील दर्शन किंवा पद्धतींच्या संदर्भात माझे पुरावे सादर केले. अनेक विद्वानांनी यासंबंधी लिहिलेले आहे की बाबासाहेब आंबेडकर कोलंबियातील त्यांचे प्राध्यापक जॉन ड्युर्इंपासून किती प्रभावित होते. त्यांनी स्वत:च १९५२ मध्ये बौद्धिक ऋण मान्य करताना असे म्हटले होते की आपल्या एकूण बौद्धिक अस्तित्त्वासाठी ते जॉन ड्यूई यांचे ऋणी आहेत. ड्यूई ज्या प्रगतिशील व्यवहारवाद किंवा उपकरणवाद (इंस्ट्रुमेंटलिझम) च्या दर्शनाशी जोडलेले होते ते मानीत होते की ज्ञान अस्थायी आहे, एक समृद्ध सिद्धान्त आणि प्रबुद्ध व्यवहारापर्यंत पोहोचण्याच्या क्रमात कोणत्याही सिद्धांताच्या मान्यतेची पारख व्यवहारात होणे गरजेचे आहे. मी केवळ याचा उल्लेख केला, जसे की ड्यूर्इंवर लिहिणाऱ्या अनेक लोकांनी केले आहे, की या पद्धतीला वैज्ञानिक पद्धती मानले जाऊ शकते कारण वैज्ञानिक आपल्या प्रयोगशाळांमध्ये हेच करतात. सिन्हा यांनी याचा चुकीचा अर्थ काढताना याला माझ्यातर्फे ड्यूई यांना योग्य ठरविण्याच्या व आंबेडकरवादाच्या समर्थनाच्या रूपात पाहिले. काय मूर्खपणा आहे! माझ्या म्हणण्याचा अर्थ या दर्शनाच्या सत्यतेवर जोर देणे होता की त्याला असेच नाकारता येणार नाही. मी कोणालाच बरोबर ठरवीत नव्हतो किंवा कोणाचे समर्थन अथवा विरोधही करीत नव्हतो. याच क्रमात मी जगभरात होणाऱ्या बदलांच्या प्रकाशात अनेक मार्क्‍सवादी सूत्रांचा फेरविचार करण्याची गरज प्रतिपादिली होती. मी असे म्हणालो की मार्क्‍सवादी पद्धतीने विचार करण्यासाठी उद्युक्त करणाऱ्या गोष्टींची एक लांबलचक यादी माझ्यापाशी आहे. तर मग मी मार्क्‍सची आलोचना करीत होतो की त्यांना खोडून काढत होतो? फक्त मूर्खच असं म्हणू शकतात. माझा केवळ असा प्रयत्न होता की मी या किंवा त्या वादाच्या नशेत धुंद झालेल्या लोकांना संवेदनशील बनवावे व विश्व प्रस्तुत करीत असलेले वास्तव त्यांच्या समोर ठेवावे. याचे कारण एवढेच की क्रांत्या या जगात होणार आहेत, त्यांच्या मेंदूमध्ये किंवा ज्या पुस्तकांवर त्यांची एवढी श्रद्धा आहे त्या पुस्तकांमध्ये नाही.

मी म्हणालो की मार्क्‍सच्या विपरित बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्याही महान सिद्धांताचा दावा केला नाही. उलट मार्क्‍सबद्दल त्यांचा मूलभूत संदेह त्याच्या महान सिद्धांतावरील गहिऱ्या अविश्वासातून निर्माण झाला होता. आपल्या जेमतेम संसाधनांसह बाबासाहेबांनी व्यवहारवादी पद्धती अनुसरली आणि या क्रमात त्यांनी कित्येकदा आपल्या रणनीती आणि कार्यनीती बदलल्या. उदाहरणादाखल, अगोदर ते अस्पृश्यांच्या समस्या दूर करण्यासाठी हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याबाबत विश्वास बाळगून होते. लवकरच त्यांचा हा विश्वास महाडमध्ये सवर्ण हिंदूंनी दाखविलेले शत्रुत्व आणि एकूण समाजाने या मुद्द्यावर पाळलेल्या मौनामुळे मोडून पडला, जसे आजसुद्धा होते. यानंतर ते त्या राजकीय संधींकडे वळाले ज्या सांप्रदायिक राजकारणासह समोर येत होत्या. त्यांनी अस्पृश्यांसाठी वेगळ्या राजकीय ओळखीवर जोर देण्यास सुरुवात केली व लवकरच गोलमेज परिषदेत गांधींच्या कडक विरोधाच्या विरुद्ध अस्पृश्यांसाठी वेगळे निवडणूक क्षेत्र मिळविले. परंतु लागू होण्याअगोदरच या योजनेचा गळा आवळण्यात आला. गांधींच्या प्रसिद्ध उपवासाने आंबेडकरांना ब्लॅकमेल केले आणि वेगळे निवडणूक क्षेत्र सोडून देण्यास आणि आरक्षित जागांसह संयुक्त मतदारसंघ आणि अन्य लाभांच्या हमीसह पुणे करारावर सही करण्यास भाग पाडले. ही एकूणच योजना म्हणजे एक कारस्थान सिद्ध झाली आणि आंबेडकरांना जाणीव झाली की आरक्षित जागा वास्तवात दलितांच्या हितांचे प्रामाणिक प्रतिनिधित्व संपविण्यासाठी शासक वर्गीय पक्षांच्या हातातील एक हत्यार बनले आहे. त्यांनी इंडिपेंडंट लेबर पार्टी (आईएलपी) चा प्रयोग केला आणि वर्गीय आधारावर राजकारणाला सुरुवात केली, कम्युनिस्टांसोबतही हातमिळवणी केली परंतु त्यांना लवकरच त्यांच्या ‘‘ब्राह्मण्यवादा’’चा अनुभव आला. वासाहतिक शक्ती ज्या प्रकारे सांप्रदायिक राजकारणाला उत्तेजन देत होत्या त्यासमोर हा प्रयोगदेखील फार दिवस टिकू शकला नाही. फेब्रुवारी १९४२ च्या क्रिप्स कमिशनचा रिपोर्ट त्यासाठी शेवटचा धक्का सिद्ध झाला व त्यांनी आयएलपी संपवून शेड्यूल्ड कास्ट फेडरेशनची सुरुवात केली. याच वेळी ते वायसरॉयच्या कॅबिनेटमध्ये मंत्री झाले व सुरुवातीची प्राधान्य-व्यवस्था आरक्षणाच्या कोटा सिस्टममध्ये बदलून अनेक श्रमकायदे आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. जेव्हा वायसरॉयची कार्यकारी परिषद भंग करण्यात आली तेव्हा तीन वर्षांच्या दीर्घ काळात सत्ता परिवर्तनाच्या साऱ्या चर्चेदरम्यान त्यांना जाणवले की त्यांना बाजूला पाडण्यात आले आहे. शेवटी त्यांना गांधींच्या रणनीतीनुसार सर्वदलीय कॅबिनेटमध्ये सामील करण्यात आले. घटनासभा बनण्याच्या काळात त्यांनी भारताच्या भावी घटनेचा मसुदा तयार केला आणि ‘‘राजकीय समाजवादा’’ची एक योजना सादर केली. स्वाभाविक अडथळे असूनही ते घटनासभेत पोहोचण्यात यशस्वी झाले परंतु हे यश फार दिवस टिकून राहू शकले नाही कारण जेथून ते निवडून आले होते त्या पूर्व बंगालला पाकिस्तान म्हणून घोषित करण्यात आले. गांधींच्या सांगण्यावरून काँगे्रस पुन्हा त्यांना घटनासभेत घेऊन आली आणि त्यांना त्याची सर्वांत महत्त्वाची समिती – मसुदा समिती – चे अध्यक्ष बनविण्यात आले. सुरुवातीला त्यांनी घटनेत आस्था दाखविली परंतु लवकरच त्यांचा याबाबत भ्रमनिरास झाला व त्यांनी ती पूर्णपणे नाकारली. आपल्या आयुष्याच्या अखेरच्या काळात बौद्ध धर्माच्या ‘‘आमूलगामी’’ संस्करणात धर्मांतरण करून त्यांनी १९३५ मधील आपली प्रतिज्ञा पूर्ण केली.

या संक्षिप्त जीवनचित्राकडे वस्तुनिष्ठपणे पाहणाऱ्या कोणाच्याही हे लक्षात येईल की बाबासाहेब आंबेडकर दलित मुक्तीच्या एकमेव हेतूने परिस्थितीनुसार आपल्या रणनीती आणि कार्यनीती बदलत राहिले. व्यवहारवाद वगळता त्यांनी ना कोणताही दूरगामी सिद्धांत शोधून काढला, ना कोणतेही सैद्धांतिक प्रतिपादन सादर केले जे त्यांचे प्रतिनिधित्व करू शकेल. ते आपली उदार प्रतिबद्धता, स्थापित प्रतिमेला तोडण्याची वृत्ती, बौद्धिक इमानदारपणा, अपार कष्ट, खरेपणा आणि निष्कपटतेच्या दृष्टीने एक आदर्श, एक रोल मॉडेल होऊ शकतात. परंतु कदाचित त्यांना ओढूनताणून भविष्याचा सामना करण्यासाठी उभे केले जाऊ शकत नाही. जर ते आपल्या एकूण आयुष्यात निरंतर विकास करीत राहिले व स्वत:ला बदलत राहिले तर कोणी त्यांना भविष्यात कसा विस्तार देऊ शकेल? अत्यंत विचारपूर्वक केलेल्या अध्ययनाच्या संदर्भात मी लिहितो आहे की आंबेडकरवाद म्हणून काही असू शकत नाही ज्याला विद्वानांचा एक गट असाच वापरात आणत असतो व आंबेडकरी दलितांद्वारे त्याला भावनात्मक रूपात प्रतिष्ठित करण्यात आले आहे. मी या सगळ्याचा सारांश संमेलनात मांडला. मी असे म्हणालो की मार्क्‍सवादाशी माझी ओळख बालपणापासून झाली आणि प्रतिबद्धतेच्या स्तरावर मी मार्क्‍सवादी पद्धतीवर चालतो परंतु मी स्वत:ला मार्क्‍सवादी म्हणत नाही. पहिले कारण हे की मार्क्‍सवादी लोक ज्या प्रकारचे जडत्व दाखवितात ते मला मान्य नाही आणि दुसरे कारण म्हणजे मी या साऱ्याच वादांपासून दूर राहतो कारण ते नकळत अस्मितांच्या रूपात काम करतात आणि अखेरीस लोकांमध्ये फूट पाडतात. भौतिक विज्ञानांद्वारे नाकारले जाईपर्यंत द्वंद्वात्मक भौतिकवादाचे केंद्र, या रूपात मी मार्क्‍सवादाची माझी व्याख्या सादर केली. यापुढे या (द्वंद्वात्मक भौतिकवादाच्या) केंद्रातून जन्मलेल्या मार्क्‍सवादाच्या बहुतेक भागांत चुका असणे संभव आहे आणि म्हणूनच त्याला स्वत:ला बरोबर सिद्ध करण्यासाठी तयार राहिले पाहिजे. महान सिद्धांताच्या दावेदारांना बदलत्या परिस्थितीच्या संदर्भात त्याच्या वैधतेबाबत जागरुक राहावे लागेल. परंतु दुर्दैवाने तथाकथित मार्क्‍सवाद्यांनी मार्क्‍सवाद म्हणजे एक धर्म बनविला आहे, तो एक आस्थेचा मुद्दा बनविला आहे की मार्क्‍सने अंतिम सत्य सांगितले आहे. या भूमिकेनेच मार्क्‍सला ‘‘देवाचे आभार की मी एक मार्क्‍सवादी नाही’’, असे म्हणावयास भाग पाडले होते व माझ्यावरही असेच काहीतरी म्हणावयाची पाळी आली आहे.

आंबेडकरांच्या जीवनावर फिरवलेली एक ओझरती नजरदेखील असे दाखविते की त्यांनी प्रत्येक टप्प्यावर अपयशाला तोंड दिले. त्यांनी ज्या गोष्टींची आशा केली होती त्या साकार झाल्या नाहीत. दलितांच्या ज्या राजकीय प्रतिनिधित्वासाठी त्यांनी एवढी मेहनत केली ते अभिशाप सिद्ध झाले. ते आरक्षित जागेवर राजकीयदृष्ट्या ठेंगू उमेदवारांच्या विरोधातही कधी जिंकू शकले नाहीत. त्यांनी दलितांसाठी उच्च शिक्षणावर जोर दिला आणि महाविद्यालये उघडली परंतु लवकरच याबद्दल त्यांनी पश्चात्ताप व्यक्त केला की शिक्षित लोकांनी त्यांचा विश्वासघात केला आहे. त्यांनी जातीच्या उच्चाटनाचा मंत्र दिला परंतु आधुनिक भारतात जातींना मिळणारी घटनात्मक वैधताच त्यांच्या हाती लागली. आपण अशा अवांछित परिणामांची यादीच देऊ शकतो जे त्यांना संपूर्ण जीवनातील प्रयत्नांचे परिणाम म्हणून प्राप्त झाले. जर कोणी दलितांच्या सांप्रतच्या परिस्थितीकडे लक्ष देईल तर आपल्याला याच्याशी मिळतेजुळते चित्र दिसून येईल. एकीकडे मूठभर दलितांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रगती केलेली आहे तर दुसरीकडे व्यापक दलित बहुसंख्य गैलदलितांच्या तुलनेत स्थितीशीलतेचे बळी ठरले आहेत किंवा मागे घसरले आहेत. व्यापक रूपात बोलायचे झाले तर अस्पृश्यता, घटनेद्वारे बंदी असली तरीही, अलीकडच्या सर्वेक्षणांतून मिळालेल्या संकेतांनुसार सर्रास आचरणात आणली जात आहे. जात एका आधुनिक संस्थेच्या रूपात आक्रमक बनलेली आहे. अगदी दलितदेखील, आणि विचित्र विडंबन म्हणजे आंबेडकरी असल्याचा दावा करणारे दलितदेखील, जातीय ओळखीचा अभिमान प्रदर्शित करतात. उत्पीडनाच्या घटनांच्या आधारे मापन करायचे झाल्यास, ज्याला मी जातिवादाचे सर्वोत्तम प्रातिनिधिक रूप मानतो, जाती नक्कीच अधिक कठोर झाल्या आहेत. आंबेडकरांनी दलितांसाठी ज्या संस्था सुरू केल्या – पिपल्स एज्युकेशन सोसायटी, बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, समता सैनिक दल – त्या सर्वांची दुरावस्था झालेली आहे. आंबेडकरी राजकारणाबाबत जेवढे कमी बोलावे तेवढेच बरे आहे.

या गोष्टींचा अर्थ अपयश नसेल तर त्यांना काय म्हटले जाऊ शकते? ही बाब सूर्यप्रकाशाएवढी स्वच्छ आहे, परंतु काही दलितांना हा आघात वाटतो आणि ते भडकतात. ते जाणत नाहीत की आपल्या व्यवहाराने ते आंबेडकरांना आणखीच विफल करीत आहेत. आंबेडकर दलितांनी अधिक प्रबुद्ध व्हावे अशी अपेक्षा करीत होते परंतु वास्तवाकडे पाहण्यास नकार देऊन ते अभिमानाने स्वत:ला निर्बुद्ध म्हणून सादर करतात. ते कधी आपल्या आत डोकावून हे समजून घेतील का की आंबेडकरांशी प्रामाणिक राहण्याचा दावा करणारे त्यांचे प्रत्येक आचरण आंबेडकरविरोधी आहे आणि खरे तर आंबेडकरांसाठी अपमानजनक आहे? एकटे बाबासाहेब आंबेडकरच नाहीत तर इतिहासात मानव मुक्तीच्या सार्वभौम हेतूचे स्वप्न पाहणाऱ्या प्रत्येक महान व्यक्तीला महान विफलतेचा सामना करावा लागलेला आहे. परंतु हे तथ्य टिकून आहे की मानवता आपल्या अस्तित्वासाठी त्यांची ऋणी आहे, त्यांच्या यशापेक्षाही त्यांच्या अपयशाची ऋणी आहे. आपले जीवन अधिक चांगले बनविण्याच्या त्यांच्या योगदानांना आपण नाकारू शकत नाही. या सत्याची कठोर जाणीवच दलितांना त्यांनी स्वत:वर लादलेल्या निद्रेतून जागे करील. त्यांच्या अपयशाच्या जााणीवेद्वारेच बाबासाहेबांच्या यातना आणि त्यांची यात्रा आपण समजून घेऊ शकतो, त्यांचे योगदान समजू शकतो आणि त्यांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी पेलू शकतो. त्यांनी याचे स्मरण करायला नको का की आपल्या अखेरच्या दिवसांमध्ये मागे वळून आपल्या जीवनाचे विश्लेषण करताना बाबासाहेबांना अचानक रडू कोसळले होते व त्यांनी म्हटले होते की त्यांनी जे काही केले त्यामुळे मूठभर शहरी लोकांचा फायदा झाला, व ते गावात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांसाठी काहीच करू शकले नाहीत? या जाणीवेमुळेच त्यांनी त्यांना भेटण्यास आलेल्या मराठवाड्याच्या एका एससीएफ टीममध्ये सामील बी. एस. वाघमारे यांना भूमीचा संघर्ष सुरू करण्यास सांगितले होते. १९६४ चा देशव्यापी सत्याग्रह म्हणजे एकूण इतिहासात दलितांच्या खऱ्या समस्येसाठी झालेला एकमेव महत्त्वपूर्ण संघर्ष होता, आणि त्याचे बीज आंबेडकरांनी आपल्या शेवटच्या वर्षांमध्ये पेरले होते असे माझे मत आहे. जणू काही मी ही गोष्ट पहिल्यांदाच सांगतो आहे अशा प्रकारे माझ्या विरोधात खोट्या अफवा पसरविणाऱ्या सर्व तथाकथित आंबेडकऱ्यांना मला एवढेच सांगायचे आहे.

बहुतेक महान लोकांकडे महान विफलता म्हणूून पाहिले जाऊ शकते कारण त्यांनी स्वत:साठी जे हेतू निश्चित केलेले होते ते कधीच त्यांना प्राप्त करता आले नाहीत. प्रत्येक युगात संघर्ष आणि अगणित महान लोकांचे प्रयत्न खर्ची पडूनही मानवी मुक्तीचा हेतू, जो वेगवेगळ्या बोली आणि पद्धतींद्वारे व्यक्त झाला आहे, फार पूर्वीच्या काळापासून आजतागायत तसाच आहे. बाबासाहेब आंबेडकरांचा हेतू काय होता? त्यांनी स्वत:च तो एका आदर्श समाजाच्या चारित्र्याच्या रूपात सांगितला होता – स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. तो पूर्ण झाला का? इतकेच काय तर दलितांच्या मुक्तीचा त्यांचा साहाय्यक हेतूदेखील अपूर्ण राहिला. मी अगोदरच त्या बाबींचा उल्लेख केलेला आहे ज्या ते प्राप्त करू इच्छित होते परंतु त्याच्या विपरित त्यांना प्राप्त झाले. त्यांनी कल्पना केली होती की ते संपूर्ण भारताला बौद्ध बनवतील. परंतु वास्तव हे आहे की बौद्ध धर्मदेखील दलितांमधील केवळ त्यांच्या जातीच्या लोकांपुरता मर्यादित राहिलेला आहे. बाबासाहेबांनी नायकपूजेचा धिक्कार केला, परंतु त्याच्या विपरित त्यांना एक असाधारण नायक व पूज्य व्यक्ती बनविण्यात आले. त्यांनी निर्दयपणे देवदेवतांची चिरफाड केली, परंतु हे दुःखदायक वास्तव आहे की त्यांनाच कोणत्याही देवापेक्षा मोठे देवता बनविण्यात आले. त्यांनी अतर्कसंगतता आणि कट-कपटाचा तिरस्कार केला, परंतु त्यांच्या अनुयायांच्या कृपेमुळे त्यांना त्यात ओढण्यात आले. त्यांनी बौद्धिक बेईमानीचा तिरस्कार केला, त्यांच्या अनुयायांनी हा एक गुण बनवून टाकला. त्यांना मूर्तिभंजक असण्याबाबत अभिमान होता, त्यांना स्वत:लाच आतापर्यंतची सर्वांत मोठी मूर्ती बनविण्यात आले. त्यांनी आपल्या अनुयायांकडून अपेक्षा केलेली होती की ते प्रबुद्ध बनतील व त्यांचा रथ पुढे घेऊन जातील. त्यांच्या अनुयायांनी स्वत:ला जगापासून तोडले व त्यांचे अंधभक्त बनून गेले, एक भक्तिपंथ निर्माण झाला. याला त्यांचे अनुयायी कारणीभूत असतील किंवा परिस्थिती, परंतु हे सत्य तसेच अबाधित आहे की ते आपल्या हेतूपासून खूपच मागे राहिले.

माझा दुसरा मुद्दा जो मांडायचा राहून गेला (व ज्यामुळे सिन्हा यांना या संधीचा एका मर्यादेपर्यंत लाभ उठविण्याची संधी मिळाली), परंतु जो बहुतांश ‘ग्रँड थिअरी’ व पुनर्विचाराच्या माझ्या टिप्पणीच्या संदर्भातच निहित होता, तो म्हणजे कॉम्रेडांना इतिहासातील दुसऱ्या कोणत्याही विफलतेहून अधिक विपदाकारी असलेल्या मार्क्‍सच्या विफलतेबाबत संवेदनशील बनविण्याचा. आंबेडकरांची विफलता त्यांची पद्धती आणि प्रगतिशील व्यवहारवादात निहित होती. सिन्हा यांनी ड्यूईच्या दर्शनासंबंधी दीर्घ व्याख्यानात अत्यंत विस्तारपूर्वक केलेली व्याख्या -जिच्याबद्दल मी मान्य करतो की मला ती आवडली व मी तसे माझ्या दुसऱ्या वक्तव्यात बोलूनही दाखविले – अनावश्यक होती. यासंबंधी मी पहिल्या भाषणातच निर्देश केलेला होता. मी मार्क्‍सवादी दर्शकांना हे स्मरण करून देण्याचा प्रयत्न केला की मार्क्‍सवाद म्हणजे एखादा जीवाश्म झालेला सिद्धांत नाही तसेच मार्क्‍सशी इमान प्रदर्शित करणे म्हणजेसुद्धा मार्क्‍सवाद नाही. उलट मार्क्‍सवाद म्हणजे मानवतेला अधिक चांगले रूप देण्याकरिता आपल्या अवतिभवतीचे गतिशील वास्तव समजून घेण्याची पद्धती आहे. आपण सहजच अशा अपयशांची यादी देऊ शकतो जसे मी बाबासाहेब आंबेडकरांच्या अपयशांच्या बाबतीत केले किंवा इतिहासातील कोणत्याही महान व्यक्तीच्या अपयशांच्या बाबतीत होते व मार्क्‍सदेखील त्यांत समाविष्ट आहे. परंतु मार्क्‍सची विफलता अधिक विराट झाली कारण त्याचा सिद्धांत म्हणजे एक ‘ग्रँड थिअरी’ होती. जर आपण आस्था बाजूस सारल्या तर म्हणावे लागेल की मार्क्‍सचे सूत्रीकरण वास्तवाची पुष्टी करण्यातही असफल ठरले, व त्यात बदल करण्यात तर अधिकच असमर्थ ठरले. भांडवलशाही, तिचे आपले अंतर्निहित संकट असूनही, त्यावर मात करण्यात यशस्वी झाली व इतकेच नाही तर काही प्रमाणात तिने मार्क्‍सवादाला बाजूस लोटले. मार्क्‍सवाद्यांनी याची चिंता करायला नको का? जर मी असे म्हटले तर मी मार्क्‍सला कमी लेखतो असे अजिबात नाही. ते माझ्या सर्वाधिक प्रशंसनीय विचारवंतांपैकी एक आहेत. म्हणूनच मार्क्‍सने अंतिम सत्य सांगितलेले आहे आणि म्हणूनच सिद्धांताचा अंत झाला आहे असे समजून मार्क्‍सवाद्यांनी स्वत:ला भुलवू नये. त्यांनी आपल्या विचारधारेतील अशुद्धता लपविण्यासाठी एक जास्त विस्तृत शब्दावली विकसित केलेली आहे. आजीवन कॉम्रेड राहिलेली एक व्यक्ती अचानक एक गद्दार, प्रतिक्रियावादी किंवा जनशत्रू ठरू शकते!

मार्क्‍सवादी भूमिकेतून विश्लेषणाची मागणी करणारे जगभरातील काही नवीन बदल मी समोर ठेवले आणि माझ्यापाशी अशा गोष्टींची एक दीर्घ यादी असल्याचे सांगितले. मी कधीच मार्क्‍सच्या विफलतेचा उल्लेख न केल्याबद्दल सिन्हा यांना आनंदाचे भरते येते. मी एक लिखित भाषण दिले नव्हते. मी कोणत्याही तयारीविना एका अशा भाषेत (हिंदी) बोलत होतो जिची सवय मला नाही आणि अशा एका समूहासमोर बोलत होतो जो बहुधा मी जे काही बोलत होतो त्याबाबत अनभिज्ञ होता व म्हणूनच माझे बोलणे तेवढे सुसंगत होऊ शकत नव्हते. परंतु मला वाटते की या कारणांमुळे माझे ते म्हणणे लोकांपर्यंत पोहोचविण्यात मी कुठेही कमी पडलो नाहीr जे रिपब्लिकन पँथर्सने आपल्या परीने मांडले आहे. माझ्या एकूणच म्हणण्याचा जोर त्यांना या गोष्टीबद्दल संवेदनशील बनविण्यावर होता की केवळ आपल्या कबिल्याशी संबंधित नसल्यामुळे कोणत्याही ऐतिहासिक आंदोलनांना व लोकनायकांना अहंकारपूर्वक नाकारून चालणार नाही. भारतातील मार्क्‍सवाद्यांसमोर सर्वात मोठे आव्हान दलितांमध्ये अस्तित्त्वात असलेली परात्मता पार करणे व त्यांचा विश्वास संपादन करणे हे आहे.

आंबेडकर मार्क्‍सवादी नव्हते. मी म्हटल्याप्रमाणे त्यांना ड्यूई यांच्याकडून मार्क्‍सवादाची टीका वारशादाखल मिळाली होती. या तथ्याकडे कोणीही अगदी सहज पाहू शकतो. त्यांनी ड्यूईकडून फेबियनवाद प्राप्त केला होता, जो तेव्हा अधिक मजबूत होत होता जेव्हा ते लंडन स्वूâल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये दाखल झाले. ही एक अशी संस्था होती जी फेबियन सोसायटीने स्थापन केली होती व जेथे फेबियनवादाचे संस्थापक सिडनी आणि बियाट्रिस वेबसारखे लोक अजूनही शिकवत होते. फेबियनवाद मार्क्‍सवादाचा विरोध करीत होता व समाजवादाच्या बाबतीत त्याचा दृष्टिकोन ‘खिचडी’सदृश होता. फेबियनवादी समजत होते की क्रांतिकारी साधनांऐवजी समाजवाद आस्ते आस्ते व सुधारांच्या मार्गाने आणला जाऊ शकतो व त्याला सर्वहारा वर्गाऐवजी प्रबुद्ध मध्यमवर्गाद्वारे प्राप्त करता येईल. नंतर फेबियनांना कामगारांना संघटित करण्याची गरज जाणवली व त्यांनी इंडिपेंडेंट लेबर पार्टी (आईएलपी) ची स्थापना केली. याच फेबियन ‘आईएलपी’च्या धर्तीवर आंबेडकरांनी आपली ‘आईएलपी’ बनविली होती. हा गहिरा प्रभाव असूनदेखील ते दुर्दशाग्रस्त जनतेमध्ये मार्क्‍सवादाबद्दल असलेल्या संभाव्य आकर्षणाबद्दल सकुतुहल परिचित होते व नेहमीच आपल्या पद्धतींना मार्क्‍सवाद्यांच्या पद्धतींपेक्षा श्रेष्ठ, बहुधा अनिवार्य पद्धतींच्या रूपात सादर करत राहिले. ते मार्क्‍सवादाचे विरोधक नव्हते हे त्यांच्या मराठी लेखनातील रशियन राज्यक्रांती व क्रांतीच्या नायकांच्या वेळोवेळी आलेल्या उल्लेखांवरून दिसून येते. केवळ नंतरच मुंबईच्या कम्युनिस्टांच्या कटू अनुभवांपासून त्यांच्यामध्ये त्यांच्याबद्दल एक प्रकारचा विद्वेष निर्माण झाला. मी त्यांना मार्क्‍सवादाला एका मापदंडाच्या रूपात वापरताना पाहतो, एक अशी गोष्ट जी त्यांच्या पद्धतींनंतर सर्वांत चांगली पद्धत होती. १९५३ मध्ये त्यांनी आपले प्रतिनिधी दादासाहेब गायकवाड यांना लिहिले की त्यांनी पाहिलेले आहे की त्यांची पद्धती काम करीत नाहीये व म्हणूनच त्यांचे लोक हवे असल्यास कम्युनिस्ट होऊ शकतात. असे असूनही, असे म्हटले जाऊ शकते की मार्क्‍सवादाची त्यांची समज योग्य नव्हती. त्यांनी कधीच मार्क्‍सवादाच्या मूलभूत सिद्धांतांचा संदर्भ दिला नाही व त्यांना स्पर्शदेखील केला नाही. त्यांनी एकदा म्हटले होते की मार्क्‍सवादाबद्दल एकूण सगळ्या मार्क्‍सवाद्यांपेक्षा आपण जास्त पुस्तके वाचली आहेत. हे खरे असले तरी त्यांतील एकही पुस्तक ‘क्लासिकल’ नसावे. काठमांडूमध्ये आपल्या अखेरच्या व्याख्यानातदेखील, जेथे त्यांनी बौद्ध धर्म आणि मार्क्‍सवादाचे तुलनात्मक चित्रण सादर केले, त्यांनी मार्क्‍सवादासंबंधी अशा गोष्टींचे संदर्भ दिले ज्यांच्याकडे मार्क्‍सचा कोणताही समजूतदार वाचक गंभीरपणे पाहणार नाही. अशा अनुमानांमुळे आंबेडकऱ्यांनादेखील अपमानित कां वाटले पाहिजे? त्यांचा व्यवहार अतार्किक नाही का? हे आंबेडकरांचा सच्चा अनुयायी बनणे आहे का?

भारतीय समाजासाठी आंबेडकरांच्या योगदानाचे मूल्यांकन करताना ही बाब अजिबात महत्त्वाची नाही की त्यांनी मार्क्‍सवादाची पर्वा केली नाही. ते निम्नतम स्तरांतील लोकांची चेतना मानवाधिकारांपर्यंत उन्नत करणारे एकमेव व्यक्ती होते. ते जातीच्या प्रश्नाला राष्ट्रीय स्तरावर प्रमुखता प्राप्त करून देणारे व जातीच्या उच्चाटनाची घोषणा देणारे पहिले व्यक्ती होते. कम्युनिस्टांचे योगदान कोणीच नाकारू शकत नाही व हे बहुतांशी सत्य आहे की गावांमध्ये त्यांनी चालविलेल्या वर्गसंघर्षांनी जातींना कमकुवत केले. पण शेवटी हे कबूल करावे लागेल की आंबेडकरांचा प्रभाव त्यांच्या प्रभावापेक्षा जास्त आहे. कोणी त्या चेतनेच्या गुणवत्तेची चिकित्सा करू शकतो परंतु हा एक वेगळा मुद्दा आहे. भारताच्या लोकशाहीकरणाच्या प्रक्रियेतील एक आवश्यक पाऊल म्हणून त्याच्याकडे पाहिले जाऊ शकते. या अर्थानेच मी म्हटले की भारताच्या लोकशाहीकरणात त्यांचे योगदान एकूण सर्व कम्युनिस्टांच्या योगदानापेक्षा मोठे आहे. हे भाषणाच्या दरम्यान जाणूनबुजून केलेले विधान होते कारण आपण कोणकोणत्या संधी वाया दवडल्या व त्या चुकांचे काय परिणाम झाले याबद्दल कम्युनिस्टांनी विचार करावा अशी माझी इच्छा होती.

भारताच्या वर्ग विश्लेषणासाठी युरोपीय संरचनांची आयात करण्याबद्दल मी सुरुवातीच्या मार्क्‍सवाद्यांना दोषी मानतो. लेनिनने वर्गांची परिभाषा अशी दिलेली होती: ‘‘वर्ग लोकांचे ते मोठे समूह आहेत ज्यांच्यामधील भेद ऐतिहासिक रूपात निश्चित एका उत्पादन व्यवस्थेत प्राप्त त्यांच्या स्थानाद्वारे, उत्पादनाच्या साधनांशी त्यांच्या संबंधांद्वारे (बहुतेक प्रसंगी कायद्याद्वारे निर्धारित आणि सूत्रबद्ध), श्रमाच्या सामाजिक संघटनेत त्यांच्या भूमिकेद्वारे व याच्या परिणामादाखल सामाजिक संपदेतील त्यांना मिळणारा हिस्सा व तो प्राप्त करण्याच्या पद्धतीद्वारे ठरत असतात.’’ (व्लादिमिर आई. लेनिन: ‘ए ग्रेट बिगनिंग: हिरोईझम ऑफ द वर्कर्स इन द रियर : कम्युनिस्ट सुब्बोत्रिक्स’: ‘कलेक्टेड वर्क्‍स’ मध्ये, इंग्रजी संस्करण, खंड २९, मॉस्को १९६५ पृ. ४२१)

माझा दावा आहे की जर सुरुवातीच्या कम्युनिस्टांनी लेनिनची ही परिभाषा आपल्यात मुरवली असती तर जातींना बाहेर ठेवून वर्ग आणि जातींमध्ये मूर्खतापूर्ण द्वंद्व निर्माण झाले नसते. इतकेच काय तर आजदेखील ते ‘आधार आणि अधिरचने’च्या मार्क्‍सवादी उपमेचा जोरकसपणे पुनरुच्चार करीत असतात. सिन्हा आतादेखील माझ्या विधानातील या बाबीकडे एका समस्येच्या रूपात पाहतात की ही उपमा भारतीय क्रांतीच्या मार्गातील एक सगळ्यात मोठी बाधा आहे. कोणत्याही दलित मार्क्‍सवाद्याला विचारा आणि तो ही उपमा नाकारील. कारण काय? हेच भारत आणि येथील जातीय विभाजनाचे वास्तव आहे. आता असे म्हणू नका की केवळ गैरदलितांनीच ‘‘शुद्ध’’ मार्क्‍सवाद ग्रहण केलेला आहे. या उपमेभवती एक मोठा विवाद राहिलेला आहे ज्याने सांस्कृतिक मार्क्‍सवादाच्या क्षेत्रात सैद्धांतिक विकासाची सुरुवात केली होती. परंतु आपण त्या विषयात शिरण्यार नाही. काळाबरोबर भारतीय मार्क्‍सवाद्यांनी ही बाब समजून घेतली की जाती म्हणजे केवळ वरवरच्या संरचनेतील एक पैलू मात्र नाहीत तर उत्पादनाच्या आधारापर्यंत त्यांचा विस्तार आहे. १९२० च्या दशकातील जाती निदान व्यापक अर्थात तरी लोकांचे जीवन परिभाषित करीत होत्या व अशा प्रकारे जर त्यांना वर्ग विश्लेषणात सामावून घेतले गेले असते तर जातीविरोधी संघर्ष वर्गसंघर्षाचा एक अभिन्न भाग बनला असता व त्याने वेगळ्या जातीविरोधी संघर्षांची गरज नष्ट केली असती ज्याला एका वेगळ्याच मार्गाने जायचे होते व तो गेलादेखील. मी याला कम्युनिस्टांचे सर्वांत मोठे पाप म्हटले आहे. या बाबतीतसुद्धा आयोजकांकडून एक बऱ्यापैकी मोडतोड केली गेली. १९२० मध्ये जे शक्य होते तेच २०१३ मध्ये करण्याचा प्रयत्न खचितच गेला जाऊ शकत नाही. परंतु ही गोष्ट समजून घेतली पाहिजे की त्या वेळी एक मोठी चूक करण्यात आली होती. आश्चर्याची बाब म्हणजे मार्क्‍सवाद्यांनी ही चूक कधी कबूलदेखील केली नाही. जातीच्या प्रश्नावर त्यांच्या अचूक दाव्यांसह, की हे पूर्वीपेक्षा अधिक चांगले आहेत, हर तऱ्हेची विद्वत्ता प्रदर्शित करतेवेळी तुम्ही त्यांच्या समोर हा साधासा मुद्दा मांडा आणि तुम्ही पाहाल की ते या उपमेशी असे काही चिकटून बसतात जणू ही मार्क्‍सवादाची केंद्रिय विषयवस्तू आहे.

मी अनेक वेळा असे म्हणालो आहे की जातीचे केंद्रिय चारित्र्य अमिबासारखे आहे. तिला केवळ विभाजित होणे माहित आहे. जातींना मूलभूतपणे उच्चनीचतेच्या क्रमाची आवश्यकता असते. ती अशा कोणत्याही स्थळी जिवंतच राहू शकत नाही जेथे उच्चनीचतेचा क्रम असत नाही. बाह्य दबावामुळे तिच्यात आवुंâचन पावण्याची प्रवृत्ती दिसते परंतु हा बाह्य दबाव दूर करताच ती पुन्हा विभाजित होऊ लागते. सर्वच जातीविरोधी आंदोलनांनी हा अनुभव घेतलेला आहे परंतु ते जातींच्या या केंद्रिय चारित्र्याकडे लक्ष देण्यात अपयशी ठरले. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व अस्पृश्यांना एका वर्गाच्या रूपात संघटित करून जातीविरोधी संघर्ष वर्गीय आधारावर चालविण्याचा प्रयत्न केला. त्यांचा जातींच्या जागी ‘वर्गा’चा उपयोग करण्याकडे कल होता. जातीवरील आपल्या पहिल्याच निबंधात, जेव्हा ते कोलंबियामध्ये केवळ एक विद्यार्थी होते, त्यांनी जातीच्या चारित्र्यावर बळकट अनुमान सादर केले. (मला ठाऊक आहे की सिन्हा आणि त्यांच्या कंपूतील कॉम्रेडांना हे रुचणार नाही.) हे सांगावयाची गरज नाही की वर्गाची त्यांची अवधारणा मार्क्‍सवादी नव्हती तर ते वेबरवादी अर्थाशी अधिक जवळ होते. परंतु पुढे जाऊन, परिस्थितीमुळे त्यांना वारंवार जातींवर यावे लागले. परिणामत: अनेकांना हे ऐकणे आवडत नाही की त्यांचा संघर्ष जातीवर आधारित संघर्ष नव्हता. त्यांच्या आंदोलनातून ज्या ‘दलिता’ने आकार प्राप्त केला व चकवा देत जो व्यावहारिक रूपात समोर आला, ज्यात सर्वच उपजातींना एकत्र बांधण्यात आले आहे, तो आज ६० वर्षांनंतर उपजातींच्या उभारासह आपल्या अस्तित्वाच्या खात्म्याचा सामना करीत आहे. दलितांनी हा तर्कसंगत परिणाम समजून घेणे गरजेचे आहे की जाती कोणत्याही प्रकारच्या क्रांतिकारी बदलासाठी कोणताही संघर्ष उभारण्यासाठी आधार बनू शकत नाहीत. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ हा आहे की त्यांना जातीय वाक्प्रचारांपासून सावध राहावे लागेल व वर्गीय आधाराच्या दिशेने जावे लागेल. हे समजून घेण्यासाठी आजची परिस्थिती पूर्वीच्या कोणत्याही काळापेक्षा अधिक अनुकूल आहे कारण प्रत्येक जातीने आपल्यामध्ये एक वर्गसंस्तर बनविलेला आहे जो इतरांसोबत ओळखला जाण्याचे नाटक करतो परंतु वास्तवात त्यांचा शत्रू आहे. दलितांसाठी मार्क्‍सवादाला शुद्ध बनविण्याची गरज नाही कारण त्यांच्यासाठी आंबेडकरांच्या उपयुक्ततेच्या शक्यता अजून संपुष्टात आलेल्या नाहीत. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना जातीच्या उच्चाटनाचे स्वप्न दिले होते. पूर्ण करण्यासाठी हे एक चांगले स्वप्न आहे. याच्या मार्गात अडथळा बनून येणारी प्रत्येक गोष्ट आंबेडकरविरोधी म्हणून बाजूस सारली पाहिजे. जाती केवळ दलितांद्वारे नष्ट केल्या जाऊ शकत नाहीत, याचे साधे सरळ कारण हेच आहे की त्या दलितांनी बनविलेल्या नाहीत. जोवर व्यापक समाज हे कार्य आपल्या हाती घेत नाही तोपर्यंत ते पूर्ण होऊ शकत नाही. म्हणूनच दलितांना आपल्या मित्रांची आणि शत्रूंची ओळख ‘प्रमाणपत्रां’च्या आधारे करून चालणार नाही तर ती जीवनावस्था, म्हणजेच वर्गात त्यांचे काय स्थान आहे त्याच्या आधारावर करावी लागेल. मी वामपंथियांनादेखील एक याच्या उलट सल्ला देत आलो आहे की त्यांनी रुढीवाद सोडून दिला पाहिजे व जातींना क्रांतीच्या मार्गातील प्रमुख अडथळ्याच्या दृष्टीने पाहिले पाहिजे व ते आपल्या व्यवहारातदेखील दाखवून दिले पाहिजे. केवळ बोलून काम होणार नाही – बोलताना ते फार हुशारीच्या गोष्टी बोलतील आणि जुन्या उपमांना चिकटून राहतील. त्यांचे सिद्धांत आणि व्यवहारामध्ये ही प्रतिबद्धता दिसली पाहिजे की ते खरेच बदलले आहेत. या दोन्ही आंदोलनांच्या – ‘वादां’च्या नाही – क्रमिक मिलनातूनच एक नवे क्रांतिकारी आंदोलन जन्मास येईल जे भारतीय क्रांतीला गती देईल. मी दोन्ही पक्षांना अनेक वर्षांपासून चेतावनी देत आलो आहे की क्रांतिशिवाय दलितांची मुक्ती होणार नाही व दलितांच्या भागिदारीशिवाय क्रांती होणार नाही. यात काही आंबेडकरविरोधी आहे काय? की मी तीच बाब मांडत आहे जी सिन्हा यांनी मांडली होती?

आणखी एक मुद्दा आहे, जो नकली आंबेडकऱ्यांनी उचलला आणि जो आरक्षणाच्या धोरणाशी जोडलेला आहे. मी ‘कोटा’ आधारित सध्याच्या आरक्षण व्यवस्थेच्या उत्पत्तीकडे लक्ष वेधले जी वाईसरॉयच्या कार्यकारी परिषदेचे लेबर मेंबरच्या नात्याने बाबासाहेब आंबेडकरांनी जारी केलेल्या एका साध्या मेमोरँडमद्वारे सुरू झाली होती. हेच धोरण स्वातंत्र्यानंतरही सुरू राहिले, केवळ त्यामध्ये आदिवाशांसाठी एक अनुसूची जोडण्यात आली. घटनेतील यासंबंधीचा अनुच्छेद अनुसूचित जाती (एससी), जमाती (एसटी) व मागास वर्गांच्या (बीसी)मागासलेपणाचा तर्क आरक्षणासाठी सादर करतो. भारतासारख्या मागास देशात मागासलेपणाला समानतेच्या एका साधारण तत्त्वाच्या अपवादाच्या रूपात सादर करणे एक मजबूत आधार वाटत नाही. याच्या मागे जात अधारित बहिष्कार हा आधार असायला हवा होता. या बहिष्काराची यातना केवळ अनुसूचित जातींनी भोगली होती, आदिवासींनी नाही जे जातींच्या चौकटीबाहेर होते व मागास वर्गांनी तर निश्चितच नाही. अनुसूचित जातींसाठी आरक्षण या तत्त्वावर असायला हवे होते की अक्षमता (मागासलेपण) त्यांची नाही तर त्यांच्याशी समान सदस्यांच्या रूपात व्यवहार न करण्याची समाजाची अक्षमता आहे जिने राज्याच्या समतोल साधणाऱ्या शक्तीच्या रूपात आरक्षणाला आवश्यक बनविले आहे. जर अनुसूचित जाती मागासलेल्या नसत्या तरीही समाजाने जातीच्या खोलपर्यंत रूजलेल्या आपल्या धारणेमुळे त्यांना कधीच त्यांचा वाटा दिला नसता. यातील त्यानंतरच पहिला सुधार याच्या प्रभावाच्या कक्षेच्या संदर्भात झाला असता. हे केवळ छोट्याश्या सार्वजनिक क्षेत्रापुरते मर्यादित राहिले नसते तर सामाजिक क्षेत्रालाही आपल्या कक्षेत घेतले असते, उदाहरणासाठी सार्वजनिक, खाजगी व प्रत्येक बाब. अशा सूत्रीकरणाने सांप्रतच्या अनेक धोरणगत उणिवा दूर केल्या असत्या : आपोआप संपणाऱ्या विशेषतेचा अभाव, व्यापक समाजात स्वीकृतीचा अभाव, याचा लाभ घेणाऱ्या लोकांवर होणाऱ्या मानसिक सांस्कृतिक प्रभावासंबंधीच्या चिंतेचा अभाव वगैरे. मागासलेपणाच्या विरुद्ध अनुसूचित जातींचा जातीय बहिष्कार विवादास्पद नाही तर एक ठोस वास्तव होते. तेव्हा जातीच्या उच्चाटनाची जबाबदारी व्यापक समाजावर येऊन पडली असती, ज्याच्यावर ती जबाबदारी असलीच पाहिजे, आणि व्यापकपणे हे धोरण संवविण्याच्या प्रक्रियेत जातीच्या उच्चाटनाचा हेतू पूर्ण केला गेला असता. कलंक समाजावर आल्यामुळे लाभान्वित लोकांची त्यातून सुटका झाली असती आणि त्यांना खालच्या जातीची ओळख तशीच टिकवणे आवडले नसते. आज अनुसूचित जाती मानसिक दबावाच्या रूपात भारी किंमत मोजत आहेत, जो प्रत्येक ठिकाणी त्यांचे मागासलेपण कायम ठेवतो आहे. मी जेव्हा असे म्हणतो तेव्हा मी आदिवासी आणि मागास जातींच्या विरोधात नसतो. मी स्वीकार करतो की मागासलेपणाच्या आधारावर त्यांच्यातही तेवढेच मागसलेले लोक आहेत जेवढे अनुसूचित जातींमध्ये आहेत, व त्यांच्या बाबतीत ती राज्याची जबाबदारी आहे. परंतु आरक्षण एक कडू गोळी आहे व तिला जपून वापरले पाहिजे. जाती पुन्हा जिवंत न करता मागासलेपण दूर करण्याची इतरही धोरणगत उपकरणे आहेत. शासक वर्ग कधीच ही सोन्याची कोंबडी हातून जाऊ देणार नाही, परंतु जनतेच्या बाजूने उभ्या असलेल्या बुद्धिजीवींनी डोळे झाकून त्यांनी सांगितलेल्या वाटेने चालून उपयोग नाही.

अनुसूचित जातींच्या आरक्षणालादेखील सामाजिक वास्तवाचा विचार करून सावधपणे लागू केले गेले जाण्याची गरज आहे. अनुसूचित जाती एक प्रशासनिक श्रेणी आहे जी अगणित जाती व विभिन्न परिवेशांमध्ये (ग्रामीण विरुद्ध शहरी) व त्यांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या सामाजिक आर्थिक स्तराच्या सामाजिक वास्तवाशी मेळ खात नाही. अपेक्षाकृत अधिक चांगली सामाजिक-आर्थिक परिस्थितीवाल्या शहरांमध्ये व महानगरांमध्ये राहणाऱ्या लोकांच्या छोट्या हिश्श्याद्वारे अन्य लोकांच्या तुलनेत आरक्षणाचा मोठा वाटा बळकावला जाणे अटळ आहे. यापुढे जाऊन आरक्षण त्यांची स्थिती अधिक मजबूत करणार व व्यापक बहुसंख्येला नुकसान पोहोचविणार. म्हणूनच वर दिल्या गेलेल्या तर्कांच्या आधारावर अस्पृश्यांना दिले गेलेले आरक्षण योग्य व न्याय्य होते, लाभ घेणाऱ्या समूहांमध्ये ते कौटुंबिक ‘युनिट्स’च्या आधारावर लागू केले गेले पाहिजे होते. जी कुटुंबे उन्नत परिस्थितीत होती ती आरक्षणाच्या पहिल्या टप्प्याचा लाभ घेणार होती परंतु ती त्या लोकसंख्येतून बाहेर गेली असती ज्यांना पुढे लाभ मिळणार होते. या साध्या तत्त्वाने दलितांमध्ये जातीय वाक्प्रचारांना निष्प्रभावी केले असते व अनुसूचित जातींतील लोकांमध्ये लाभाचे समान वाटप सुनिश्चित केले असते. सांप्रतच्या आरक्षण धोरणाचा सर्वांत उघड दोषसुद्धा दूर झाला असता की लाभ एका व्यक्तीला मिळतो परंतु किंमत एकूण जातीला मोजावी लागते. मी या योजनेचा प्रस्ताव अनेक वर्षांपूर्वी मांडला होता व याबद्दल कुणाला काही संदेह असल्यास तो लागू करण्याबाबत मदतीचा प्रस्तावही ठेवला होता. शासक वर्ग, ज्याच्यासाठी आरक्षणाचे सांप्रतचे धोरण म्हणजे लोकांना विभाजित करण्यासाठी सर्वांत प्रभावी शस्त्र सिद्ध झाले आहे तो नक्कीच याच्याकडे दुर्लक्ष करणार. परंतु जातींना दुबळे करणाऱ्या या योजनेने दलितांमध्येदेखील कोणतीही प्रतिक्रिया निर्माण झाली नाही. हे वास्तव तसेच टिकून आहे की प्रत्येक व्यक्ती आपल्या जातीवर प्रेम करते, तुम्ही जेवढे खाली जाल तेवढेच तुम्ही तुमच्या जातीवर जास्त प्रेम कराल. असो. कॉमे्रड सिन्हा, आरक्षणाच्या धोरणावर हे माझे स्थायी मत आहे. तुमच्या रेकॉर्डमध्ये माझे शब्द शोधू नका कारण अशा जटिल बाबींची व्याख्या अशा लोकांसमोर केली जाऊ शकत नाही जे स्वत:चा आवाज सोडून अन्य काहीच ऐकायला तयार नसतात. आणि नकली आंबेडकऱ्यांनो, धोरणाच्या अशा विश्लेषणात बाबासाहेब आंबेडकरांचा काही अपमान आहे का? जर आपल्याला असे वाटत असेल तर देश ज्या गैर प्रवृत्तींच्या यातना भोगत आहे, त्या सर्वांसाठी तुम्ही नक्कीच बाबासाहेबांनाच जबाबदार धरत आहात.

शेवटी, ५५ पानांच्या या दस्तावेजाच्या शेवटच्या दोन पानांमध्ये ज्या कार्ययोजनेसह अप्रोच पेपर संपतो तेथे डोंगर पोखरून उंदीर हाती लागल्याचा भास होतो. ऐकायला फार चांगली वाटणारी ती सारी विधाने येथे मुबलक प्रमाणात आहेत जी कोणत्याही कम्युनिस्ट दस्तावेजामध्ये सापडू शकतील. मी म्हणेन की तामिलनाडूसारख्या राज्यामध्ये जातिविरोधी आघाड्यांद्वारे ठोस जातीय मुद्दे घेऊन सीपीएम खूप पुढे निघून गेली आहे. असे म्हणणे की जनतेमध्ये जातीविरोधी प्रचार करणारे हजारो प्रचारक आपल्यापाशी असले पाहिजेत, आपल्याला मागण्यांच्या साधारण घोषणापत्रांमध्ये दलित मागण्यांना प्राथमिकता दिली पाहिजे, जातीवर आधारित वैवाहिक जाहिराती, खाप व अन्य जातीवर आधारित संघटना यांच्यावर प्रतिबंध घालण्याची मागणी केली पाहिजे, कम्युनिस्टांनी जातीचे पालन करू नये वगैरे वगैरे. या सगळ्या गोष्टी म्हणजे साध्या इच्छांची एक यादी आहे व त्यातून मार्क्‍सवादी सैद्धांतिक कौशल्य दिसून येत नाही. जाती व्यवस्थेच्या विरोधात बोलताना कोणीही सहजपणे अशा पावलांबद्दल बोलू शकतो, भले तो मार्क्‍सवादी असेल वा गैर मार्क्‍सवादी. यातून कोणते सैद्धांतिक सूत्रिकरण दिसून येते? हे सारे उदार भांडवली अप्रोचशी संबंधित आहे. वादविवादासाठीच मी आंबेडकरांची पाठराखण करत नाहीये. आपल्या ‘स्टेट्स अ‍ॅण्ड माइनॉरिटिज’मध्ये १९४७ मध्ये त्यांनी जी पाउले सुचविली आहेत त्यांच्याकडे लक्ष द्यावे. जातींना तोंड देण्यासाठी ती पाउले या झिजलेल्या उपायांपेक्षा कितीतरी जास्त क्रांतिकारी नाहीत का?

आता ऐका, मी माझे पुस्तक ‘साम्राज्यवाद विरोध आणि जातींचे उच्चाटन’ मध्ये जातींच्या उच्चाटनाचा एक मार्ग प्रस्तुत केला आहे. तो व्यापक सैद्धांतिक विश्लेषण आणि ‘साइबरनेटिक्स’मधील माझ्या शोधांवर आधारित आहे. एक, माझ्या लक्षात आले की वासाहतिक काळापासून १९६० च्या दशकापर्यंत भांडवली हल्ल्यांमुळे कर्मकांडी जाती मोठ्या प्रमाणात कमकुवत झाल्या व अशा प्रकारे परंपरागत उच्चनीचतेच्या अर्थाने जातींबद्दल बोलणे अर्थशून्य आहे. समकालीन जाती दलित आणि गैर-दलित यांच्यामध्ये मर्यादित होऊन राहिलेल्या आहेत. दुसरे, ग्रामीण भागात जातीय विरोध श्रीमंत शेतकरी वर्ग आणि ग्रामीण सर्वहारा वर्गामध्ये समोर येतो, जो प्रामुख्याने दलितांमधून येतो. हे विरोध प्रामुख्याने आर्थिक हितांवर आधारित असतात परंतु गैर-आर्थिक (सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय) कारणांवर जोर देतात. श्रीमंत शेतकरी आपल्या जातीतील लोकांशी असलेल्या जातीय संबंधांचा वापर करून याला सहज दलित व मागास जातींतील संघर्षामध्ये बदलू शकतात. तिसरे, अंदाधुंद उत्पीडनाचे कारण दलितांची स्वत:ची कमजोरी आहे (आंबेडकरांनी खूप पूर्वी म्हणजे १९३६ साली याचे निदान केले होते). राज्य व त्याच्या उपकरणांशी श्रीमंत शेतकऱ्यांची युती दलित व गैर दलितांमधील शक्ती असंतुलनाला उत्तेजन देते. हा मोठ्या प्रमाणात एक प्रभावशाली कारक आहे. चौथे, साधारणपणे समाजात प्रगती केलेल्या लोकांनी राजकीय अर्थव्यवस्थेद्वारे जातीच्या अवगुणाविरोधात लोकांना शिक्षित केले पाहिजे, सांस्कृतिक किंवा नैतिक पद्धतीने नाही. यात अशी अपेक्षा असते की हे श्रीमंत शेतकरी आणि त्यांच्या जातींतील लोकांमधील जातीय संबंध कमकुवत करील जे दलितांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये त्यांचे साहाय्यक असतात. पाचवे, या सारे करूनदेखील अशी तत्त्वे असतील जी या गोष्टी समजू शकणार नाहीत व उत्पीडनात सहभागी होतील. त्यांच्याशी शारिरीक पद्धतीने निपटावे लागले. येथे वामपंथासाठी हस्तक्षेप करण्याची संधी आणि भूमिका समोर येईल. या प्रक्रियेचा परिणाम हाच होईल की वामपंथ दलितांचा विश्वास संपादन करील आणि अशा प्रकारे जातींच्या उच्चाटनासाठी प्रयत्न करणाऱ्या शक्ती उन्नती करून मजबून होतील. मी यात माझ्या रूपरेषेसाठी बनविलेला बारीकसारीक तपशील भरत नाहीये. तुम्ही एवढंच करा आणि तुम्ही स्वत:ला जातींच्या उच्चाटनाच्या जवळ गेलेले पाहाल.

शेवटी, स्वत:वरच मुग्ध असलेल्या मार्क्‍सवाद्यांना मला एवढंच सांगायचं आहे की शब्दांच्या बळावर मिरवणे आणि त्यांचे सार नजरेआड करणे म्हणजे बालिशपणा आहे. रिपब्लिकन पँथर्सना दिलेले तुमचे उत्तर माझ्या दुसऱ्या विधानावर उभे आहे की मी तुमच्याशी सहमत असून मी अगोदर जे काही बोललो होतो ते रद्द करीत आहे. महदाश्चर्य! माझ्या दुसऱ्या विधानाची पहिली ओळच ही आहे की मी असे काहीही म्हटलेले नाही जे खोडून काढण्यासाठी तुम्ही एवढी धडपड केली व तुम्ही पुन्हा गोष्टींची मोडतोड करू लागलात. कोणी काय म्हटले याचा आपल्या मनाने अंदाज लावून नंतर त्याचे म्हणणे उत्साहापूर्वक खोडून काढण्याची धडपड करण्यासारखेच ते आहे. जेव्हा मी असे म्हटले की तुम्ही जे काही म्हटलेले आहे त्यांतील बहुतेक गोष्टींशी मी सहमत आहे तेव्हा माझा अर्थ आपल्या अप्रोच पेपरच्या सारांशाशी (मी कधीच असे म्हटले नाही की मी तो पूर्णपणे नाकारतो. मी असे म्हणालो की हे सगळे वाचताना मला असे वाटले की मी हे यापूर्वीसुद्धा वाचलेले आहे) व त्याचबरोबर ड्यूईच्या दर्शनावरील तुमच्या दीर्घ वक्तव्याशी होता (जे मी लक्षपूर्वक ऐकले होते). ‘‘बहुतेक’’ मध्ये ‘‘सारे काही’’ खचितच येत नाही. मला माझा शब्द पाळण्यासाठी जालंधरला जाणे भाग होते व म्हणूनच मी घाईत होतो. मी गडबडीत बोललो (याचा अर्थ असा होत नाही की मी जे काही बोललो तो माझा इरादा नव्हता व आता मी माझ्या म्हणण्यापासून कोलांटी मारतो आहे) व तेथून निघालो, ज्याचा अर्थ मी तुमच्या मुख्य बिंदूंशी सहमत आहे असा लावला जाऊ शकत नाही. जेव्हा मी सिन्हा यांना म्हणालो की त्यांनी माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला तेव्हा ते म्हणाले की माझा असा समज झाला (ऐसा मुझे ध्वनित हुआ). जे बोलले गेले नाही ते ऐकणे हा मतिभ्रम म्हणवला जातो व जर हे वारंवार होत असेल तर एका मार्क्‍सवाद्यासाठी ती एक गंभीर बाब आहे कारण तेव्हा तो वास्तव पाहू शकत नाही. एका वरिष्ठ कार्यकत्र्याच्या नात्याने, माझ्या सोबत आलेल्या कार्यकर्त्‍यांबाबत तुम्ही दाखविलेल्या घमेंडी औद्धत्याविरोधात मी आपल्याला सल्ला दिला. कृपया त्याकडे लक्ष द्यावे.

आता नकली आंबेडकऱ्यांशी चार शब्द. मी असे म्हणेन की तुम्ही इकडूनतिकडून उचललेल्या माझ्या वाक्यांचा वापर करून साध्याभोळ्या दलित जनतेमध्ये माझ्या विरोधात खोट्या अफवा पसरवल्या की मी आंबेडकरांचा अपमान केला व असे करून तुम्ही आपल्या अज्ञानाचा परिचय दिलात. असे तुम्ही माझ्या त्या मताच्या आधारावर केलेत जे ३० वर्षांहून अधिक कालावधीच्या अध्ययनानंतर मी पुस्तके, लेख व भाषणांतून व्यक्त करीत आलो आहे. मी नाही तर तुम्हीच एका अशा व्यक्तीच्या विरोधात लोकांच्या भावनांचा वापर करून आंबेडकरांचा अपमान केला आहे जो शासक वर्गाच्या गटापासून त्यांना दूर ठेवण्यासाठी एकटा काम करतो आहे. बाबासाहेबांचा अपमान करणारे तुम्ही आहात. आताच नाही तर गेल्या ५७ वर्षांमध्ये तुम्ही त्यांचा अपमान केला आहे जेव्हा तुम्ही त्यांच्या विचारांना जड अस्मितापरक मूर्तीमध्ये कैद करता, जेव्हा व्यवस्थित पद्धतीने दलित जनतेला या मूर्तीबद्दल श्रद्धावान बनवता व त्यांना त्यांच्या जीवनमरणाच्या प्रश्नांपासून विचलित करता, जेव्हा राजकीय सवलती, पदांवर नामांकने, निवडणुकीची तिकिटे मिळविण्यासाठी, मंत्री बनण्यासाठी शासक वर्गाच्या दृष्टीने ‘चांगले’ बनण्यासाठी आंबेडकरांच्या प्रतिमेचा व्यापार करता, राज्यापासून या व अशाच अन्य गोष्टी तुमच्या स्वार्थी लाभांच्या रूपात मिळतात व तुम्ही शासक वर्गाच्या अशा धोरणांची पाठराखण करता ज्यांनी दलित जनतेचे व्यवस्थित शोषण केले जाते. जेव्हा तुम्ही आंबेडकरांच्या विचारांचा व्यवस्थित रूपात विपर्यास करता जेणेकरून तुम्ही तुमचे काळे कारनामे न्याय्य ठरवू शकता व जेव्हा तुम्ही दलित हितांचे दलाल बनता तेव्हा तुम्ही आंबेडकरांचा अपमान करीत असता. तुम्ही केवळ त्यांचा अपमान केलेला नाही तर त्यांची हत्या केली आहे. तो मी आहे ज्याने आंबेडकरांबद्दल जरासुद्धा भक्ती व्यक्त केलेली नाही, तुमचे टोळके करते त्याच्या उलट मी जे काही केले ते ते अधिक चांगले बनविण्यासाठी त्यांच्या आदर्शांचे अनुसरण केले, उत्पीडित जनतेच्या बाजूने खंबीरपणे उभा राहिलो, त्यांच्या बाजूने आजूबाजूच्या जगाचे विश्लेषण करण्याच्या क्षमता माझ्यात टिकवून ठेवल्या व माझ्या पूर्ण क्षमतेसह बाबासाहेब आंबेडकरांचे ‘‘स्वातंत्र्य, समता आणि बंधुते’’चे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो आहे. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला, माझा अपमान केला आणि त्या समग्र पवित्र वारशाचा अपमान केला ज्याने मानवी मुक्तीसाठी कष्ट उपसले.

 

स्फुलिंग १ सप्‍टेंबर २०१४