वाढत्या महिलाविरोधी अपराधांचे मूळ आणि त्यावरील उपाय

वाढत्या महिलाविरोधी अपराधांचे मूळ आणि त्यावरील उपाय

विराट

Crime-against-women-2गेल्या काही वर्षांमध्ये महिलाविरोधी निर्घृण अपराधांचा जणू पूर आलेला आहे. हे अपराध दिवसागणिक अधिकाधिक क्रूर होत आहेत. महिलांना मोकळा श्वास घेणे मुश्कील बनले आहे अशीच परिस्थिती समाजामध्ये निर्माण झालेली पदोपदी दिसते आहे. नृशंस बलात्कार, महिलांवर अ‍ॅसिड फेकण्याच्या घटना, बलात्कार करून खून करण्याचे प्रसंग म्हणजे अगदी सामान्य बाब झालेली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये लखनौ, बदायू, भगाणा इत्यादी ठिकाणी झालेल्या घटना याचीच उदाहरणे होत. अशा अमानुष घटना दररोज वाढत चालल्या आहेत यामागचे कारण काय असावे? हा प्रश्न नीट समजून घेणे अगत्याचे आहे कारण समस्येचे समग्र आकलन करून घेतल्याशिवाय तिच्यावरचा उपाय शोधला जाऊ शकत नाही. महिलाविरोधी अपराधांच्या मुळाशी न जाण्याची प्रवृत्ती लोकांमध्ये सर्रास पाहावयास मिळते. या अपराधांच्या मुळाशी न जाऊ शकल्यामुळेच ते अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाय देण्यास असमर्थ ठरत आहेत. याच भांडवली व्यवस्थेच्या चौकटीत काही कडक कायदे, गुन्हेगारांना क्रूर मृत्युदंड आदी उपाय या समस्येवरच्या तोडग्याच्या रूपात पाहिले जातात. ही एकंदर समस्या समजून घेण्यासाठी आपण तिच्या आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक आदी सर्व कारणांची चिकित्सा केली पाहिजे, तेव्हाच आपण या समस्येची सोडवणूक करण्यास समर्थ होऊ.

जर आकड्यांवर लक्ष दिले तर आपल्या लक्षात येईल की या निर्घृण घटना प्रामुख्याने गेल्या दोन दशकांमध्ये अभूतपूर्वरित्या वाढल्या आहेत. याचे कारण म्हणजे १९९१ मध्ये आलेल्या नव्या आर्थिक धोरणांमुळे भारतात एक असा नवधनाढ्य परजीवी वर्ग तयार झालेला आहे जो आर्थिक व राजकीयदृष्ट्या दिवसेंदिवस अत्यंत बळकट होत आहे. गावांतील श्रीमंत कुलक आणि शेतकरी व शहरांमधील प्रॉपर्टी डिलर, शेअर बाजार दलाल, लहान उद्योगपती, तऱ्हेतऱ्हेचे कमिशनखोर व सट्टेबाजांचा एक संपूर्णपणे परजीवी वर्ग तयार झालेला आहे जो बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात पैसे लुटत आहे. हा वर्ग अशा तऱ्हेची भयंकर कृत्ये उघडपणे करीत आहे कारण कायदा, सरकार यांना त्यांने आपल्या खिशात टाकले आहे व बेडरपणे तो महिलाविरोधी गुन्हे करीत आहे. एक दुसरा वर्गसुद्धा आहे जो या नवधनाढ्य वर्गाने फेकलेल्या तुकड्यांवर जगतो आहे. हा वर्ग आहे लंपट निम्नभांडवली व लंपट सर्वहारा वर्ग जो तऱ्हेतऱ्हेच्या छोट्या उद्योगधंद्यांमध्ये, दुकानांमध्ये काम करतो किंवा ट्रान्सपोर्टर अथवा प्रॉपर्टी डिलर्सचा चमचा असतो. हा वर्गदेखील अशी पाशवी कृत्ये करीत आहे. हा वर्ग आपल्या सर्वहारा चेतनेपासून पूर्णपणे तुटलेला आहे. लोक बऱ्याचदा असा विचार करतात वा बोलूनही दाखवतात की अशा कृत्यांना गरीब कामगार कारणीभूत असतात. हे पूर्णपणे चुकीचे आहे. वास्तविक ज्या घटनांचा संदर्भ यासंबंधी दिला जातो त्या घटनांमध्ये गरीब कामगार नाही तर लंपट सर्वहारा आणि लंपट निम्नभांडवली तत्त्वेच जबाबदार असल्याचे दिसते जे आपल्या वर्गापासून पूर्णपणे तुटलेले आहेत. यावरून हे स्पष्ट होते की अशा पाशवी घटनांना प्रामुख्याने हा नवधनाढ्य वर्ग व त्याचे तळवे चाटणारा लंपट निम्नभांडवली वर्ग जबाबदार आहे. ते माणूस असण्याच्या सर्व खुणा हरवून बसले असून आत्यंतिक अमानुष बनून समाजात राहण्यास लायक राहिलेले नाहीत. या घटनांसाठी संपूर्ण पुरुष समाजाला जबाबदार धरणे चुकीचे आहे, त्यांच्यातील बहुतेकांवर पितृसत्ताक मूल्यांचा प्रभाव असला तरी.

अशा घटनांसाठी प्रामुख्याने कोण जबाबदार आहे हे जाणण्याबरोबरच या गोष्टीचीदेखील चिकित्सा झाली पाहिजे की अशा प्रकारच्या महिलाविरोधी मानसिकतेला खतपाणी कुठून मिळते आहे. भारत एक असा देश आहे जेथे भांडवली विकास मंथर गतीने व क्रमिक प्रक्रियेद्वारे झालेला आहे. येथे भांडवलशाही प्रबोधन किंवा पुनर्जागरणाच्या वारशाशिवाय व कोणत्याही क्रांतिशिवाय अवतरली. यामुळे येथील जनमानसात लोकशाही मूल्यांचा अभाव दिसून येतो. अधिकांश युरोपीय देशांमध्ये भांडवलशाही सरंजामी मूल्यांपासून निर्णायक विच्छेद करून विकसित झाली व तिने लोकशाहीसाठी एक पाश्र्वभूमी तयार केलेली होती. परंतु भारतात भांडवलशाही तशा पद्धतीने विकसित झाली नाही. येथे भांडवलशाही आली परंतु ती तिच्यासोबत तिचा कोणताही चांगुलपणा घेऊन आली नाही. भांडवशाहीच्या सर्व अपप्रवृत्ती अवश्य भारतात आल्या. अशा प्रकारे येथे एक अशी भांडवली व्यवस्था पुढे आली जिने सरंजामी मूल्यांपासून निर्णा़यक विच्छेद केलेला नाही. भारतीय समजात पतनशील भांडवली संस्कृतीसोबतच सरंजामी मूल्यांचादेखील प्रभाव आहे. एकीकडे खाप पंचायती व फतवे काढणाऱ्या शक्ती आहेत तर दुसरीकडे भांडवली मिडियावर पोसलेली रोगट मानसिकतादेखील आहे. एकीकडे घोर महिलाविरोधी पाखंडी बाबांची जमात आहे जी घृणास्पद महिलाविरोधी अपराध करीत आहे आणि दुसरीकडे हनी सिंगसारखे घृणित कलाकारदेखील आहेत ज्यांनी तरुणांमध्ये महिलाविरोधी मानसिकता निर्माण करण्याचा जणू ठेका घेतलेला आहे.

भांडवलशाहीचे हे वैशिष्ट्य असते की ती प्रत्येक गोष्टीला एक ‘माल’ बनवून टाकते व नफा कमावण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते. भांडवलशाहीमुळे निर्माण झालेला ऐंद्रिय सुखोपभोगवाद, रोगट आणि हिंसक लैंगिकता आणि महिलांकडे एक वस्तू म्हणून पाहण्याची प्रवृत्ती या सगळ्याला भांडवलदारांनी नफा कमावण्यासाठी जागतिक सेक्स बाजारपेठेच्या संभावनेच्या रूपात पाहिले आहे. पोर्न फिल्म्स, सेक्स टॉयस्, बाल वेश्यावृत्ती, विकृत सेक्स, जाहिरातबाजी आदींची काही हजार अब्ज डॉलर्सची जागतिक बाजारपेठ तयार झालेली आहे. नफा कमविण्यासाठी भांडवलदार वर्ग सामान्य मध्यमवर्गीय किशोर-युवकांमध्ये व गरीब कष्टकरी जनतेमध्येदेखील वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांद्वारे रोगट मानसिकता पसरवतो आहे. हा प्रकार एकीकडे भांडवलदारांना जबरदस्त नफा कमावून देतो आणि दुसऱ्या बाजूने क्रांतिकारी शक्यता नष्ट करण्यासाठी कामगार वस्त्यांना व सामान्य तरुणांना लक्ष्य बनविण्याच्या हत्याराच्या रूपातही भांडवलदारांनी याच्याकडे पाहिलेले आहे. अगोदरपासून समाजात अस्तित्त्वात असलेल्या पितृसत्तेला भांडवलशाहीने नव्याने खतपाणी देऊन अधिक बळकट केले आहे. महिलांना मालाच्या रूपात सादर करून भांडवलशाहीने महिलाविरोधी पाशवी अपराधांसाठी पाश्र्वभूमी तयार केलेली आहे. विकसित भांडवली देशसुद्धा महिलाविरोधी अपराधांपासून मुक्त नाहीत. तेथे सरंजामी मानसिकतेतून होणारे ऑनर किलिंगचे प्रकार होत नाहीत परंतु भांडवली संस्कृतीने जे भयंकर तुटलेपण, व्यक्तिवाद आणि रोगट मानसिकता तयार केलेली आहे त्यामुळे ते देशदेखील महिलाविरोधी अपराधांच्या बाबतीत मागे राहिलेले नाहीत. स्वीडनसारख्या विकसित भांडवलशाही देशाने वर्ष २०१२ मध्ये लैंगिक हिंसा आणि बलात्कारांच्या बाबतीत नवा विक्रम प्रस्थापित केला! लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केल्यास स्वीडनमध्ये भारतापेक्षा तीस टक्के जास्त महिलाविरोधी अपराध होत आहेत. ब्रिटन, जर्मनी आणि अमेरिकादेखील लैंगिक हिंसेच्या बाबतीत पिछाडीवर नाहीत. अमेरिकेत दर वर्षी तीन लाखांहून अधिक महिला लैंगिक हिंसेच्या बळी ठरत आहेत. एकूणच, भांडवलशाहीने वैश्विक पातळीवर महिलाविरोधी अपराधांमध्ये वाढ करण्यात घृणित भूमिका पार पाडलेली आहे.

अशा वेळी, भांडवलशाहीच्या चौकटीमध्येच महिलाविरोधी अपराधांना पायबंद घालणे व महिलाविरोधी अपराधांपासून सुटका करून घेणे शक्य आहे का? यावर विचार होणे गरजेचे आहे. आमच्या मते हे बिलकूल शक्य नाही. अशा घटना कडक कायदे पास करून किंवा पोलिस व्यवस्था अधिक मजबूत करून रोखल्या जाऊ शकतात असे ज्यांना वाटते ते ही समस्या पूर्णपणे समजू शकेलेल नाहीत. प्रत्यक्ष पोलिस चौकीत होणाऱ्या बलात्काराच्या घटना आपल्या सर्वांनाच परिचयाच्या आहेत, न्यायाधिशांद्वारे दिल्या गेलेल्या महिलाविरोधी निवाड्यांबद्दलही आपण जाणून आहोत. ज्या शक्ती अशा अपराधांना कारणीभूत आहेत त्या पोलिस आणि न्यायव्यवस्था खिशात घेऊन फिरत असतात. म्हणूनच ७४ टक्के महिलाविरोधी गुन्ह्यांच्या खटल्यांमध्ये आरोपी खुलेआम निर्दोष सुटतात. (याचा अर्थ असा होत नाही की सांप्रतची व्यवस्था समूळ नष्ट होईपर्यंत आपण महिला अधिकारांसाठीची सर्वच्या सर्व आंदोलने स्थगित केली पाहिजेत. आपण नक्कीच कडक कायद्याची मागणी केली पाहिजे.) भांडवली स्त्रीवादसुद्धा या समस्येवर उपाय देण्यास असमर्थ आहे. ज्या संघटना किंवा व्यक्ती व्यवस्थेच्या चौकटीत राहून स्त्रीमुक्तीचे स्वप्न पाहतात त्या लैंगिक असमानता आणि महिलांच्या गुलामीला प्रोत्साहन देणाऱ्या भांडवलशाहीच्या पैलूंकडे डोळेझाक करतात. ते कधीच महिला कामगारांसोबत कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या विरोधात आवाज उठवत नाहीत. महिला कामगारांना पुरुषांबरोबर काम करूनसुद्धा पुरुषांपेक्षा कमी मजुरी दिली जाते व त्यांना सर्वांत खालच्या स्तरावरील पगारी गुलामांच्या रूपात राबविले जाते. या असमानतेच्या विरोधातही ते कधी आवाज उठवत नाहीत. अशा प्रकारे ते केवळ ‘एलिट’ वर्गाच्या महिलांच्या मुक्तीचा आपल्या अजेंड्यात समावेश करतात. अर्थात, त्यांची मुक्तीदेखील या व्यवस्थेच्या चौकटीत शक्य नाही.

मग प्रश्न असा येतो की अशा परिस्थितीत जेथे अनेक लोकप्रतिनिधी महिलाविरोधी विधाने करताना थकत नाहीत (जसे महिला स्वत:च या अपराधांसाठी कारणीभूत आहेत!) व आपले गैरलोकशाही सल्ले देण्यात मागे पडत नाहीत (जसे की महिलांनी स्कर्ट वापरू नये, संध्याकाळी घराबाहरे पडू नये, मोबाईल फोन वापरू नये) तेथे खरोखरच या समस्येवरचा उपाय काय असू शकतो व या समस्येच्या प्रतिरोधाचा मार्ग काय असू शकतो? वर आपण पाहिलेलेच आहे की या भांडवली व्यवस्थेच्या चौकटीत या समस्येचा परिपूर्ण तोडगा असू शकत नाही परंतु याचा अर्थ हा नाही की जोपर्यंत भांडवलशाहीचा नाश होत नाही तोपर्यंत महिलांवर  होणाऱ्या अत्याचारांच्या विरोधात आवाजच उठवायचा नाही. आपण पितृसत्तेच्या विरोधात संघर्ष केलाच पाहिजे. आपण हे समजून घेतले पाहिजे की पितृसत्ता एखादी अपरिवर्तनीय अशी बाब नाही. पण त्याचबरोबर आज जेव्हा आपण पितृसत्तेबद्दल बोलतो त्यावेळी आपण हेही समजून घेतले पाहिजे की आजच्या समाजातील पितृसत्ता ही भांडवली पितृसत्ता आहे कारण तिचे स्वरूप सरंजामी पितृसत्तेहून भिन्न आहे. सरंजामी समाजात स्त्री ही भोगाची वस्तू होती परंतु आजच्या भांडवली समाजात स्त्री ही उपभोगाची वस्तू बनलेली आहे. महिलांना भांडवलशाहीने एक ‘माल’ बनविले आहे आणि म्हणूनच जेव्हा आपण पितृसत्तेशी लढा देण्याबद्दल बोलतो त्यावेळी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की तिचा समूळ नाश भांडवलशाहीच्या नाशाबरोबरच होऊ शकतो. तोपर्यंत आपल्याला भांडवलशाही अवकाशामध्येदेखील महिलांच्या अधिकारांसाठी सतत संघर्ष सुरू ठेवावा लागेल. आणि हेदेखील तेवढेच खरे आहे की भांडवलशाहीचा नाश स्त्रियांना सोबत घेतल्याशिवाय होऊ शकत नाही कारण महिला म्हणजे एकंदर क्रांतिकारी शक्तीची अर्धी लोकसंख्या आहे आणि महिला सर्वाधिक उत्पीडित असल्यामुळे आज आपण महिलांना क्रांतिकारी शक्तीच्या अवतीभवती एकत्रित करण्यासाठी पूर्ण जोर लावला पहिजे. आज तरुण, महिला, कष्टकरी, विद्यार्थी यांनी एकत्र येऊन भांडवलाच्या संघटित शक्तीला आव्हान दिले पाहिजे. भांडवलशाहीच्या नाशाबरोबरच स्त्रीमुक्तीचे स्वप्न साकार होऊ शकते.

स्फुलिंग १ सप्‍टेंबर २०१४