युद्धखोर साम्राज्यवादाचे सिंहावलोकन
आज पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे लोटल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या कारणांचे विवेचन- विश्लेषण करणे म्हणजे काही अॅकॅडमिक कसरत नाही. आजसुद्धा आपण साम्राज्यवादाच्या युगातच जगतो आहोत आणि आजसुद्धा साम्राज्यवादाद्वारे सामान्य कष्टकरी जनतेवर अनेक युद्धे लादली जात आहेत. म्हणून, साम्राज्यवाद कशा प्रकारे युद्धांना जन्म देतो, हे समजून घेणे आजही गरजेचे आहे. तसे पाहता पहिल्या महायुद्धाबद्दल जवळपास सर्वांनीच वाचलेले आहे, ऐकलेले आहे. परंतु त्याची ऐतिहासिक कारणे काय होती याबाबत अनेक भ्रम दिसून येतात, किंवा अधिक स्पष्ट शब्दांत सांगावयाचे झाले तर, अनेक भ्रम पसरविले गेले आहेत. अनेक भाडोत्री इतिहासकार हे युद्ध काही शासकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि इच्छेमुळे घडले, असेच सांगत असतात. बहुतेक या युद्धाची एकूण ऐतिहासिक पृष्ठभूमी गायब करतात आणि ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांज फर्डिनांडची साराजेवोमध्ये हत्या झाल्यामुळे या युद्धाचा भडका उडाल्याचे सांगतात. शालेय पुस्तकांमध्येसुद्धा अशा प्रकारच्या तात्कालिक कारणांवरच जोर दिला जातो आणि त्याच्या मूळ कारणांकडे डोळेझाक केली जाते. जर ऑस्ट्रियाच्या राजकुमाराची हत्या झाली नसती तर पहिले महायुद्ध झालेच नसते का? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणताही गंभीर वाचक अशा मूर्ख विश्लेषणावर विश्वास ठेवणार नाही.