प्रेम आणि मुक्तीचे गीतकार: जनकवी फैज

(फैज अहमद फैज यांच्या 13 फेब्रुवारी या जन्मदिनानिमित्त )

लेखक: अमन

“क़त्ल-गाहों से चुन कर हमारे अलम

र निकलेंगे उश्शाक़ के क़ाफ़िले..”


[न्याय आणि समतेच्या या संग्रामात कत्तलखान्यांतून आमची कत्तल जरी करण्यात आली तरी आमच्या खाली पडलेल्या ध्वजा उचलण्यासाठी अजून कित्येक प्रेमी त्यांचे लष्कर घेऊन येतील.]

उर्दू कवितेच्या इतिहासात जे स्थान फैज अहमद फैजना जनतेने आपल्या हृदयांत दिले ते कदाचितच इतर कोणाला मिळाले असेल. “हम देखेंगे” हे गीत तर सांप्रदायिक नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात जनतेचे युद्धगीतच बनले होते. 13 फेब्रुवारी रोजी त्यांचा 111वा जन्मदिवस होता.

13 फेब्रुवारी 1911 रोजी जन्मलेल्या फैज चे वडील अफगाणिस्तानात एका उच्च शासकीय पदावर स्थित असल्याने त्यांचे बालपण एखाद्या राजपुत्राला साजेलसे होते. स्कॉच ब्रिटिश स्कूल मधून पास होऊन ते सियालकोट मधील मरे कॉलेज व त्यानंतर लाहोरच्या गव्हर्मेंट कॉलेज मध्ये दाखल झाले. त्यांच्या साथींनी मुलाखतींमध्ये फैजने शैली आणि किट्स सारख्या इंग्लिश कवींना किशोरवयातच चाळून टाकल्याच्या आठवणी सांगतात. मानवी सारतत्वाचा वेध घेण्याचे हे वेड, या वेडाची मार्क्सवादाच्या विज्ञानाच्या अभ्यासामध्ये पुढे झालेली परिणती आणि या प्रवासात फैजच्या कलेने गाठलेले शिखर हे सगळे एकमेकांत अखंडपणे गुंफलेले प्रवाह म्हणूनच अभ्यासले जातील.

कवितेच्या सुरुवातीला प्रेमिकेच्या विरह वेदनेने व्याकूळ आणि विव्हळ झालेल्या प्रियकराला अंत येताना पाशवी आणि मनुष्यद्रोही समाज व्यवस्थेवर बोलू लावणाऱ्या फैजचे सामर्थ्यच यात आहे की रचनेत प्रेमाच्या रंगात आकंठ बुडालेले असताना क्रांतीच्या गोष्टी करू लागतात आणि जाणवतही नाही. शेवटी प्रेम आणि क्रांतीचा रंगही एकच! क्रांतिकारकांच्या विश्वातील प्रेमी आणि प्रेमींच्या जगातील क्रांतिकारक अशी ओळख असणाऱ्या रित्सोस, लोर्का, नेरुदा आणि हिकमत यांसारख्या मातब्बर व्यक्तीमत्त्वांच्या यादीतील तितकेच मातब्बर नाव म्हणजे फैज!

रशीद जहाँ सोबत झालेल्या भेटीत प्रेमात नैराश्य आल्याने हताश झालेल्या एका कविमध्ये फैज नावाच्या तुफानाचा संचार होतो. या वैफल्यग्रस्ततेच्या अवस्थेत त्यांच्या शिक्षिका असलेल्या रशीद नी त्यांच्या सोबत शेत, कारखाने व खाणींत हाडतोड मेहनत करणाऱ्या आणि तरीही भुकेने तडफडणाऱ्या मजूर, शेतमजूर व त्यांच्या लहानग्यांच्या गोष्टी केल्या. एकीकडे संपत्तीचा डोंगर रचणाऱ्या पण स्वतः त्या डोंगरात गाडून गेलेल्या देशबांधवांच्या गोष्टी केल्या. समुद्राच्या शेजारी तहानलेल्या पाखरांच्या गोष्टी केल्या. आजवर प्रेमिकेच्या केसांत हरवण्याच्या आणि नेत्रांत सामावण्याच्या पलीकडे कवितेचा आवाका न गेलेल्या फैजना एकाएकी क्रूर आणि हिंस्र जगाच्या मधोमध सापडल्यासारखे झाले होते. जमीनीवर आल्यासारखे झाले होते. रशीदनी त्यांच्या हातांत एका पुस्तिकेची प्रत ठेवली. वाच म्हणाल्या. जग हलवलेला कम्युनिस्ट मॅनिफेस्टो होता तो. भांडवलशाही आणि एकंदरीत वर्ग समाजाच्या सर्वशक्तिमान पाशवी संरचनेसोबत समाजातल्या सर्वात शेवटच्या व्यक्तीच्या स्वप्नांचे खुलेआम केलेले तडजोडरहित युद्धाचे निर्णायक ऐलान होते ते.

यानंतर फैजच्या जीवन व लेखनाला वेगळेच वळण लाभले. त्यांच्या कवितांचे विषय बदलू लागले होते. आता कवितेत व्यक्त होणारे प्रेम फक्त एका व्यक्तीच्या चौकटीला तोडू पाहत होते. प्रत्येक दुखिताच्या डोळ्यातील अश्रू होऊ पाहत होते. वैश्विक होऊ पाहत होते. प्रेमाने फैज च्या अंतरंगात मुक्तियुद्ध छेडले होते.

या नंतर पहिल्याच कवितेत फैज चा रंगच पालटलेला दिसून येतो:

अनगिनत सदियों के तारीक बहीमाना तिलिस्म

रेशम ओ अतलस ओ कमख़ाब में बुनवाए हुए

जाजा बिकते हुए कूचाबाज़ार में जिस्म

ख़ाक में लुथड़े हुए ख़ून में नहलाए हुए

जिस्म निकले हुए अमराज़ के तन्नूरों से

पीप बहती हुई गलते हुए नासूरों से

लौट जाती है उधर को भी नज़र क्या कीजे

अब भी दिलकश है तिरा हुस्न मगर क्या कीजे

और भी दुख हैं ज़माने में मोहब्बत के सिवा

राहतें और भी हैं वस्ल की राहत के सिवा

मुझसे पहली सी मोहब्बत मिरी महबूब न माँग

[प्रेयसीला: आजवरचा मानवी इतिहास हा मानवी दासतेच्या बेड्यांचा परिष्कार करणारा आणि अंधाराचे साम्राज्य असणारा राहिलेला आहे. धुळीने माखलेल्या आणि रक्ताने न्हालेल्या अमानवी अवस्थेत शोषित मानवाची रोज बोली लावली जाते. या रोगट समाजरचनेच्या भट्टीतून निघणाऱ्या प्रत्येक शरीराच्या प्रत्येक जखमेतून वेदनेचा पू वाहतो आहे. तुझे सौंदर्य न्याहाळताना माझी दृष्टी या यथार्थाकडे देखील वळते आहे. प्रिये, आज देखील तुझे रूप तितकेच चित्ताकर्षक आहे.. पण काय करू! प्रेमाशिवाय इतर दुःख ही जगात व्याप्त आहेत आणि मिलनाच्या शिवाय इतर सुख सुद्धा..]

हळूहळू फैजच्या सामाजिक राजकीय भूमिका बनू लागल्या. एक वर्ग दृष्टिकोन बनू लागला ज्यातून नागड्या वास्तवाचे नर्तन दिसू शकत होते. ”इतिहास आणि समाज नेहमीच गतिमान राहिलेले आहेत” “तर्काच्या व सत्याच्या धारेला सहन करू शकणार नाही अशा वास्तवाला मृत्यू अटळ आहे अन् म्हणूनच शाश्वत व पवित्र असे काहीच नाही ” “विध्वंसाशिवाय सृजन अशक्य आहे” ही नवीन जीवन दृष्टी मूळ धरू लागली होती. हृदयाची कातरता होतीच पण आता त्या हृदयात लाख ह्रदये धडकू लागली होती.

“हम मेहनतकश जगवालों से जब अपना हिस्सा मांगेंगे

इक खेत नही, इक देश नही, हम सारी दुनिया मांगेंगे..

जब सफ़ सीधी हो जाएगी जब सब झगड़े मिट जायेंगे

हम हर इक देश के झंडे पर इक लाल सितारा मांगेंगे..”

गुलामीने व्याख्यायित होणाऱ्या समाजामध्ये सौंदर्य आणि प्रेम शुद्ध आणि निरपेक्ष नसुच शकते. अशा वेळी त्या अन्याय्य गुलामी विरोधातील संघर्ष अनिवार्यत: प्रेम व सौंदर्य टिकविण्याचा संघर्ष बनतो.

फैज नी ते प्रेम अमान्य केले जे वास्तवापासून पलायन करू पाहत होते, स्वतः भोवती भ्रमांचे मनोरे रचू पाहत होते. त्यांनी वर्ग समाजाविरुद्धच्या संघर्षाच्या निखाऱ्यांत स्वतःला झोकून दिले. जीवनाचा अर्थ आणि प्रेम समजण्यासाठी! शेवटी प्रेम ही अमूर्तनात अस्तित्वमान असलेली संकल्पना नव्हे, तर ते खऱ्या व्यक्तिंमधील खरे नाते असते, जे जगले जाते!

दुसऱ्या महायुद्धाच्या काळात मानवी रक्तासाठी पिसाळलेल्या हिटलरच्या फाशीवादी जर्मनीने कामगारांचे राज्य असणाऱ्या सोव्हिएत युनियन वर हल्ला केल्या नंतर फैजनी जर्मनी विरुद्ध भारतीय लष्करात शामिल होऊन रशियाच्या सैनिकाची भूमिका अदा केली. पण त्यांच्या या भूमिकेवर प्रश्न निश्चितच उपस्थित केले जाऊ शकतात. ही भूमिका मुख्यतः भावनिक आणि आवेगात घेतली गेलेली होती. समाज-बदलासाठी समाजाचे वास्तवदर्शी विश्लेषण करताना या बदलांमध्ये समाजाची आंतरिक गती मुख्य कारक आणि निर्धारक असते हा कळीचा मुद्दाच फैज विसरतात. शेवटी ते सोव्हिएत रशियाच्या कामगार सत्तेच्या फौजेत नव्हे तर ग्रेट ब्रिटन च्या साम्राज्यवादी फौजेत लेफ्टनंट कर्नल होते! म्हणून वस्तुनिष्ठ वास्तवाचे स्थान प्राथमिक राहते आणि या परिघटनेचे योग्य विश्लेषण करूनच योग्य सिद्धांत जन्मतो. अन्यथा अयोग्य सिद्धांतन पुढे अयोग्य व्यवहाराला जन्म देते. पुढे महायुद्ध संपताच त्यांनी लष्करातून काढता पाय घेतला. पण त्यांची लढाऊ वृत्ती आणि मुल्यांसाठी राज्यसत्तेच्या कोणत्या ही संस्तराशी तडजोड न करण्याची त्यांची भूमिका त्यांना इतर बोलघेवड्या “लोककवीं”पेक्षा वेगळे करते जे तारखेनुसार आदर्श आणि सोयीनुसार भूमिका बदलत असतात.

“प्रोग्रेसिव राइटर्स मूवमेंट” सारख्या राष्ट्रव्यापी प्रगतिशील साहित्यिक आंदोलनाचे फैज कित्येक वर्षे केंद्रबिंदू राहिले. अदब-ए-लतीफ नावाच्या मासिकाचे संपादकत्व त्यांनी भूषविले. नक्शे फरियादी, जिन्दांनामा, दस्ते तहे संग, सरे वादी ए सीना, शामे शहरे यारां, मेरे दिल मेरे मुसाफिर, गुबारे अय्याम यांसारख्या काव्य जगतात अजरामर रचनांना त्यांनी जन्म दिला. शिक्षक, पत्रकार, कवी, लेखक, क्रांतिकारक, टीकाकार, प्रभावी ट्रेड युनियन ॲक्टिविस्ट अशा चतुरस्त्र भूमिका निभावल्या. “रावळपिंडी षडयंत्र खटल्यामध्ये” चार वर्षांचा कारावास भोगल्या नंतर चळवळीत सक्रियता आणखी वाढली. कैदेत असताना त्यांची लेखणी विशेष तळपली. तब्बल दोन कवितासंग्रह! वयाच्या उताराला पॅलेस्टाईन च्या मुक्तीसंग्रामात उडी घेण्यासाठी फैज बैरूतला पोहोचले. तिथे ही मुक्तीची गीते गायली. त्यांना ‘लेनिन शांती पुरस्कारा’ने गौरवण्यात आले. खऱ्या अर्थाने मानवतेचा गाभा हा अमूर्त स्वर्गीय मुल्यांमध्ये नसून खऱ्या संघर्षरत जनतेच्या सुखदुःखात पावलोपावली स्वतःची तैनाती देण्यात आहे याचाच परिचय फैजच्या जीवनातून व त्यांच्या संघर्षातून येतो. त्यांच्या संघर्षाची आणि सृजन संसाराची मशाल तेवती ठेवण्याची जबाबदारी त्यांच्या वारसदारांचीच आहे.

“ऐ ख़ाक-नशीनों उठ बैठो वो वक़्त क़रीब आ पहुँचा है

जब तख़्त गिराए जाएँगे जब ताज उछाले जाएँगे..”