कोरोना षडयंत्र सिद्धांत: वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या अभावाचे परिणाम
लेखक: निखिल
आज कॉविड -19 महामारीचा उद्रेक होऊन 2 वर्षापेक्षा जास्त काळ लोटलेला आहे. दरम्यानच्या काळात जग अतोनात जीवित तसेच वित्तीय हानीतून गेले आहे आणि साहजिकच भांडवली समाजातील इतर बहुतांशी सामाजिक संकटांप्रमाणे ह्या आरोग्य संकटाचा सर्वाधिक मार जगभरातील कामकरी जनतेवरच पडला. ध्वस्त झालेली एकंदरीत आरोग्य व्यवस्था, खाजगी दवाखान्यांची लूट, ऑक्सिजन पासून औषधींचा काळाबाजार सोबतच केंद्र व राज्यसरकारांच्या अनियोजित लोकडाऊनमुळे उपासमार, बेकारी व अनेक प्रवासी कामगारांची हजारो किलोमीटरची पायी फरफट अशा किती समस्या सांगाव्यात? ह्या आरोग्य संकटाच्या काळात भांडवली आर्थिक व्यवस्थेचा आजारही समोर आला, पण कामकरी जनता ह्या आजाराचे योग्य निदान करू शकली का? त्याचा योग्य प्रतिकार करू शकली का? उत्तर साहजिकच ‘नाही’ असेच आहे. ह्या समस्यांचे उत्तर शोधण्यात आलेल्या विचारधारात्मक बाधांमध्ये एक महत्वाचे कारण षडयंत्र सिद्धांत सुध्दा राहिलेले आहेत. त्यामुळे ह्या षडयंत्र सिद्धांतांचे खंडण करणे आणि राजकीय दृष्ट्या त्यांनी निभावलेले विचारधारात्मक कार्य समजून घेणे आवश्यक बनते.
जगभर कोरोना महामारीच्या उद्रेकासोबत षडयंत्र सिद्धांतांचीही लाट आली होती. ह्यातील काहींनी कॉविड -19 गंभीर आजार आहे हेच नाकारत म्हटले की हा साधा सर्दी-खोकला करणाराच आजार आहे परंतु औषध निर्मिती उद्योग, लस निर्मिती उद्योग आणि डॉक्टर लॉबीनी आपल्या नफ्यासाठी ह्याच्या भयंकरतेचा बागुलबुवा उभा केला आहे. काहींनी म्हटले की हा नवीन विषाणू घातक आहे पण तो ‘मानवनिर्मित’ आहे म्हणजेच प्रयोगशाळेत तयार केला गेलेला आहे. असे म्हणणाऱ्या काहींना हा विषाणू बिल गेट्स सारख्या काही भांडवलदारांनी आपल्या नफ्यासाठी, काहींना चीनने आपल्या साम्राज्यवादी उद्देशांसाठी, तर काहींना जगातील सर्वात मोठ्या उद्योगपत्यांनी व त्यांच्या नियंत्रणातील जागतिक “डीप स्टेट” कडून जगभरातील जनप्रतिरोधाच्या दमनासाठी किंवा ‘लोकसंख्या नियंत्रणासाठी’ तयार केलेले जैविक हत्यार वाटले. काहींनी वाटले की 5G तंत्रज्ञानाच्या रेडिएशनमुळे कोरोना विषाणूचा उद्भव झालेला आहे.
आंधळा असंतोष!
सर्व षडयंत्र सिद्धांतांचा एकत्रित विचार केला तर एक लक्षात येईल की ह्या वेगवेगळ्या षडयंत्र सिद्धांतांमध्ये काही सामान्य गोष्टी समान आहेत. त्यातील एक ही की कामकरी जनतेत भांडवलाच्या नफेखोरीच्या उद्देशाबद्दलची अनुभव-जन्य जाण व व्यवस्थेबद्दलच्या अविश्वासाची भावना नक्कीच आहे. यावर आधारित षडयंत्र सिद्धांतांना सामान्य जनतेत पटकन स्विकार्यता मिळाली, कारण ह्या मागे जनतेचा “सामान्य बोध” काम करत होता, जो अनुभवांच्या सारसंग्रहवादी एकत्रीकरणातुन तयार होतो. इंद्रियानुगत ज्ञानालाच अंतिम सत्य मानण्यातून व संकल्पनात्मक ज्ञानाच्या पायरीला नाकारण्यातुन असे सिध्दांत फोफावतात. अशा सिद्धांतांमुळे विषाणू व आजाराच्या उद्भव व प्रसाराच्या सामाजिक-आर्थिक कारणांच्या मुळापर्यंत जाण्याऐवजी फक्त वरवरचे व उथळ विश्लेषण केले जाते. मग आजाराचे निदानच नीट झाले नाही तर उपचार नीट कसा करता येईल?
हे सर्व षडयंत्र सिद्धांत व्यवस्थेचा दोष एखाद्या भांडवलदारावर व भांडवलदारांच्या गटावर वा एखाद्या देशावर टाकून एकंदरीत व्यवस्थेला दोषमुक्त करण्याच्या स्थितीची निर्मिती करतात. मग अशा सिद्धांतांतून निघणारा दोषनिवारणाचा कार्यक्रम जास्तीत जास्त व्यवस्था सुधारापर्यंत जातो ,जो व्यवस्था परिवर्तनाच्या विचारावर पडदा टाकण्याचे काम करतो.
सामान्य जनता सामान्यतः आयुष्याच्या वस्तूगत स्थितीमुळे असलेल्या विज्ञानाच्या अभावामुळे आणि अनुभववादाच्या प्रभावामुळे दिसणाऱ्या वास्तवाच्या कारणांपर्यंत पोहोचू शकत नाही आणि त्यामुळेच षडयंत्र सिद्धांतांच्या योग्य व्यवस्थात्मक विश्लेषणापासून विचलित करण्याच्या घातक विचारधारात्मक प्रभावाचे शिकार होतात. कामगार वर्गाने वैज्ञानिक विचारांचे ध्वजवाहक असल्याशिवाय व्यवस्थापरिवर्तनाचा विचारच करता येणार नाही. वैज्ञानिक दृष्टिकोनातून सार्स कॉविड-2 विषाणू आणि कॉविड आजाराबद्दल काही गोष्टी आधी समजून घेऊन मग षडयंत्र सिद्धांतांच्या उदयाच्या मुळापर्यंत जाऊयात.
कोरोनाच्या विषाणूचा उद्भव प्रयोग शाळेत झालेला नाही!
कोरोनाचा उद्भव प्रयोगशाळेत झालेला नसून आतापर्यंतचे संशोधन हेच सांगते आहे की हा विषाणू प्राण्यांमधून उत्परिवर्तनामुळे (Mutation) ‘स्पेसिज जंप’द्वारे (एका सजीवातून दुसऱ्या सजीवात उडी मारून) माणसांत आला आहे. माणसांत आढळलेला विषाणू व वटवाघूळांमध्ये आढळलेल्या विषाणूत खूप साधर्म्य आहे. पण जो फरक आहे तो प्रयोगशाळेत तयार होऊ शकण्याच्या मानवी क्षमतेच्या पलीकडचा आहे. मग हे विषाणू तयार होतात तरी कसे?
कुठलाही रोगजनक सूक्ष्मजीव प्राण्यांच्या पेशींमध्ये, त्या पेशींवरच्या ॲंकर्समुळे प्रवेश करतो व नंतर त्या पेशींसोबत आंतरक्रियेद्वारे आजाराचे कारण बनतो. जगातील सगळ्या सजीवांमध्ये पेशी विभाजन सतत चालू असते ह्याप्रक्रियेत बाह्य व अंतर्गत अनेक कारकांमुळे त्यांच्या जनुकीय पदार्थात (Genetic Material) उत्परिवर्तन (Mutation) होऊ शकते. सजीवांचा उद्विकासही (Evolution) ह्यामुळेच होत आलेला आहे तसेच प्राण्यांमधील कर्करोगही ह्यामुळेच होतो आणि प्राण्यांमधील विषाणू माणसांत संसर्ग करण्याची क्षमता ग्रहण करू शकतात म्हणजेच ‘स्पेसिज जम्प’ ही त्यामुळेच होऊ शकते. अशी ‘स्पेसिज जम्प’ करून माणसांत आलेल्या काही सुक्ष्मजीवांची उदाहरणे म्हणजे इबोला, स्वाइन फ्लू, रॅबीएस, इन्फ्लुएन्झा आणि सार्स अशी अनेक आहेत. ह्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की अशा स्पेसिज जम्पचे नजीकच्या काळात प्रमाण वाढले आहे. त्यामागचे खरे कारण भांडवलशाही कडून नफ्यासाठी निसर्गाची अंधाधुंद लूट व त्यामुळे आजवर अस्पर्शित अशा सुदूर भागांत निसर्गातील हस्तक्षेप वाढत्या प्रमाणात पोहोचणे व त्यातून माणूस व इतर जंगली प्राण्यांची आंतरक्रिया सतत वाढणे, हे आहे. तसेच औद्योगिक शेती, औद्योगिक पशु शेती, आणि एकंदरीत जलवायू परिवर्तन ह्यामुळेही हे प्रमाण वाढते आहे. भांडवली व्यवस्थेची नफ्याची लालसा ह्या उत्परिवर्तनाच्या बाह्य कारकांना व स्पेसिज जम्प होण्यासाठी आवश्यक स्थितीला वाढवते आहे. त्यामुळे कॉविड–19 आजाराचा कारक सार्स कोरोना व्हायरस-2 सारख्या विषाणूंच्या उद्भवाचा दोष एखाद्या बिल गेट्स सारख्या भांडवलदाराचा वा भांडवलदारांच्या एखाद्या गटाचा नसून एकंदरीत भांडवली व्यवस्थेचाच आहे.
कॉविड–19 साध्या सर्दी खोकल्या सारखाच आजार नाही!
पण मग अनेकांना तो तसा का भासतो? त्याचे कारण परत लक्षणांमधील अनुभविक पातळीच्या काही समानतेत आहे. एक तर कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या बहुतांश लोकांना अत्यंत किरकोळ लक्षण जाणवतात. दुसरी गोष्ट ही की कोरोना व्हायरस श्वास नलिका व फुफुसांच्या विशिष्ट पेशींचा संसर्ग करवतो. पण असा संसर्ग कोरोना व्हायरस व्यतिरिक्त अनेक जिवाणू व विषाणूंमुळे होऊ शकतो. असा संसर्ग करणारा कुठलाही रोगजनक सूक्ष्मजीव मानवी शरीरात जेव्हा जातो तेव्हा रोगप्रतिकार शक्तीची पहिली फळी असणारी जन्मजात रोग प्रतिकारशक्ती (जिची प्रतिक्रिया ‘नॉन स्पेसिफिक’ म्हणजे ‘गैर-विशिष्ठ’ असते) आपली लढाई सुरू करते. सूक्ष्मजीव कुठलाही असू देत सुरवातीला जवळपास सारखेच सायटोकाईन्स (Cytokines, रोगाशी लढण्यासाठी शरीराने सोडलेली काही प्रथिने) आणि कॉम्प्लिमेंट सिस्टिम (पूरक प्रणाली, Compliment System) क्रियांवित करून प्रतिकार सुरू होतो. त्यामुळेच श्वसन संस्थेच्या अशा आजारांमध्ये सुरवातीची लक्षणं सूक्ष्मजीव कुठलाही असला तरी सारखीच असतात. पण सूक्ष्मजीवाच्या विशिष्टतेनुसार त्यांचे शरीरावर होणारे परिणाम विशिष्ट असतात आणि नंतर शरीराची अनुकुलक रोगप्रतिकारक्षमता(Adaptive Immunity) त्याच्या विरुद्ध विशिष्ट प्रतिकार उभा करते ज्यात मुख्य भूमिका लिंफोसाईट्स (Lymphocytes) प्रकाराच्या पांढऱ्या रक्ताच्या पेशींची व त्यांनी तयार केलेल्या विशिष्ट अँटिबॉडीज (Antibodies) ची असते. संसर्गजन्य आजाराचे व्यक्तिनिहाय गांभीर्य हे सूक्ष्मजीवाचा जालीमपणा (Virulence), रोगप्रतिकार शक्तिची प्रतिक्रिया, त्या सूक्ष्मजीवाची संसर्गजन्यता व संक्रमणक्षमता तसेच आजारी व्यक्तीच्या उपचाराची एकंदरीत सामाजिक व्यवस्था अशा अनेक कारणांनी निर्धारित होते. सूक्ष्मजीवांतील असे भेद थोडक्यात विविध वैज्ञानिक परिमाणे वापरून समजले जातात. जसे की मूलभूत पुनरुत्पादन क्रमांक (Basic Reproduction Number म्हणजेच R0), हा आकडा कुठल्याही संसर्गजन्य आजाराच्या संसर्गजन्यतेचे किंवा संक्रमणक्षमतेचे वर्णन करतो. हॉस्पिटलाईझेशन रेट (Hospitalization Rate), संसर्ग मृत्यूदर (इन्फेक्शन मोर्टलिटी रेट, Infection Mortality Rate) म्हणजे एकंदरीत संसर्ग झालेल्या लोकांमध्ये मृत्यूचे प्रमाण, इत्यादी.
यात हे लक्षात घेतले पाहिजे की संसर्ग झालेल्या प्रत्येक व्यक्तीची चाचणी होत नाही आणि अनेकांना संस्थात्मक सुविधांची उपलब्धताही नसते त्यामुळे संसर्गित लोकांपैकी निदान झालेल्या ‘केसेस’ मध्ये केस मृत्यूदर (Case Mortality Rate) पाहिला जातो. कॉविड-19 चा एकंदरीत केस मृत्यूदर सामान्य सर्दी, फ्लू पेक्षा जास्त आहे.
लशींची कल्पना चुकीची नाही
कुठल्याही आजारविरोधातील शरीराची प्रतिकारशक्ती नैसर्गिक असू शकते त्याबद्दल वरती चर्चा केली गेली आहे किंवा ती कृत्रिम म्हणजे लसीच्या माध्यमातून तयार केलेली असू शकते. ह्यात रोगजनक सूक्ष्मजीव मृत स्वरूपात, किंवा जिवंत पण कमजोर करून, किंवा त्या सूक्ष्मजीवाचा कुठलातरी अँटीजन (Antigen) सुटा करून शरीरात सोडून प्रतिकार उभा करणाऱ्या यंत्रणेला कार्यान्वित (Trigger) केले जाते. अशामुळे खऱ्या लढाई आधीच रोगप्रतिकारक्षमता लढण्यास सुसज्ज होते. मग खरी लढाई झालीच तर त्यात तिला जिंकणं तुलनेनें बरंच सोपं होऊन जातं. करोना लशीची भीती तर आज जगात कोट्यवधी लोकांनी लस घेतली आहे म्हणून व्यवहारात दूर झाली आहे. फार गंभीर स्वरूपाचे प्रतिकूल परिणाम इतर कुठल्याही लसी प्रमाणे नगण्य म्हणावे एवढेच आहेत. नपुंसकत्व येतं, लसीने कोरोना होतो ह्यासारख्या अनेक भ्रम व्यवहारात गळून पडले आहेत. लस घेतलेल्या व्यक्तींमध्ये इस्पितळात भरतीचा दर, रोगग्रस्तता आणि मृत्यदर उल्लेखनीय रित्या कमी झाला आहे. गेल्या शतकामध्ये अनेक लशींमुळेच अगोदर कोट्यवधी जीव घेणाऱ्या आजारांवर माणसाने मात केली आहे.
परंतु तरीही लस हेच एक षडयंत्र आहे असे ऐकायला मिळते. या षडयंत्र सिद्धांताचे बळी उजव्या शक्तींप्रमाणे काही निर्बुद्ध आणि अनुभववादी “डावे” सुद्धा आहेत ती म्हणजे औषध किंवा लस निर्मिती कंपन्या, दवाखाने इत्यादींच्या नफेखोरीसाठीच हा विषाणू तयार करण्यात आला किंवा पसरवण्यात आला आहे; इतकेच नाही तर लोकशाही आणि नागरी अधिकारांचे दमन करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आले असेही काहींनी म्हटले. पहिली गोष्ट ही की हा विषाणू वर सांगितल्या प्रमाणे प्रयोगशाळेत तयार झालेला नाही. दुसरे, ह्याला षडयंत्र करून पसरवण्यातही आलेले नाही. हे खरे आहे की राज्यसत्ता भांडवलदार वर्गाच्याच हिताकरिता काम करते. पण मग महामारी वाढवून, लॉकडाऊन लागू करून, अर्थव्यवस्थेच्या बहुतांश उद्योगांना बंद ठेवून भांडवलदार वर्ग एकंदरीत भांडवलशाहीचे हित कसे जपेल? भांडवली राज्यसत्ता भांडवलदार वर्गाच्या एखाद्या गटाचे नव्हे तर एकंदरीत भांडवलदार वर्गाच्या सामूहिक व दीर्घकालीन हितांचे प्रतिनिधित्व करण्याचे काम करते. त्यामुळे अशा सिद्धांतामागे पुन्हा उथळ-अनुभववादी-सारसंग्रहवाद काम करतो आहे. ज्यातून दिसणाऱ्या वास्तवालाच अंतिम सत्य मानले जाऊन निष्कर्ष काढले जात आहे. हे बरोबर आहे की कोरोना महामारीच्या उद्रेकाचा फायदा शक्य असलेल्या प्रत्येक भांडवली उद्योगांपासून ते व्यापाऱ्यांपर्यंत सर्वांनी नक्कीच करून घेतला व ह्या काळात शक्य तेवढी लूटही केली, ह्या व्यतिरिक्त ठप्प असणाऱ्या अनेक छोट्या उद्योगांना अत्यंत पडत्या दरात गिळून मोठ्या कंपन्यांनी आपला आकारही वाढवला. पण भांडवली राज्यसत्ता एकंदरीत भांडवलदार वर्गाच्या नफ्याच्या किमतीवर तुलनेने अत्यंत छोट्या क्षेत्राच्या किंवा कंपन्यांच्या फायद्यासाठी असे करूच शकत नाही. असे झाले आहे असे तर्कासाठी मानले तर अशा स्थितीत भांडवलदार वर्गाच्या आपसी संघर्षातून व्यवस्था तिच्या राजकीय संकटाकडे गेली असती आणि भांडवली राज्यसत्ता आपली प्रासंगिकताच गमावून बसली असती. भांडवलदार वर्ग आपल्या मावनद्रोही स्वभावानुसार प्रत्येक संकटात संधी शोधण्याचा प्रयत्न करतोच परंतु त्यामुळे विश्लेषण हेतुवादी पद्धतीने करणे हे राज्यसत्तेप्रती असलेल्या अज्ञानेचेच आणि कारण आणि परिणामाला न समजण्याचे लक्षण आहे.
अनियोजित लोकडाऊन: दोष नक्की कुठे होता ते लक्षात घ्या!
भारतात ज्या पद्धतीने लॉकडाऊन लागू करण्यात आले त्यात नक्कीच भांडवली राज्यसत्तेची कामकरी जनतेप्रती असणारी टोकाची असंवेदनशीलता आणि बेफिकिरी दिसून आली. पण रोगाचा संसर्ग रोखण्यासाठी गरज असतांना अशी पावलं उचलणे स्वतःहून चुकीचे नाही; जसे की माओकालीन समाजवादी चीन मधील कामगार वर्गीय सत्तेने सुद्धा ‘मिझल्स’ च्या उद्रेकानंतर अशा प्रकारचे निर्बंध लावत जनतेच्या सहभागातून रोगाला रोखले होते. शेवटी कुठलेही धोरण कसे लागू होईल हे लागू करणाऱ्या सतेची वर्गपक्षधरता निर्धारित करत असते. तेव्हा लॉकडाऊनच्या कल्पनेला नाही, तर ज्या पद्धतीने भारतात लॉकडाऊन लागू केला गेला त्याला लक्ष केले गेले पाहिजे.
व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करा! इतिहासातून धडे घ्या!
एकंदरीत संकटाचा उद्भव, प्रसार, नियंत्रणातील अक्षमता व अव्यवस्थेचा दोष हा भांडवली व्यवस्थेचाच आहे हे अनुभववादी सारसंग्रहवादी विश्लेषण नाकारल्या शिवाय, खरे सत्य गवसणे शक्य नाही. विश्लेषणात अशा चूका करणाऱ्यांनी व्यवस्थात्मक अपयश एखाद्या-दुसऱ्या व्यक्तीवर किंवा गटावर ढकलणे, त्यांच्यात बळीचे बकरे शोधणे याद्वारे खरेतर व्यवस्थेला दोषमुक्त करण्याचे व जनप्रतिरोधाला योग्य दिशेकडे जाण्यापासून थांबवले जाते! हे म्हणजे लक्षणांनाच आजार समजण्यासारखे आहे. जर आजार समजला नाही तर इलाज होईल कसा? कामगार वर्गाकडून कोरोनाकाळातील संकटाचा योग्य प्रतिरोध उभं करण्यात आलेल्या बाधांमधील एक विचारधारात्मक बाधा ही सुद्धा होती. आता तरी ह्या षडयंत्र सिद्धांतांनी कामगार वर्गाचे काय नुकसान केलं ते समजून भविष्यासाठी त्यातून योग्य धडे घेतले पाहिजे. कामगार वर्गाने अनुभववाद नाकारून आधुनिक वैज्ञानिक विचारांचे ध्वजवाहक झाले पाहिजे.