विज्ञानाकरिता प्राणांचे दान देणारा शहीद वैज्ञानिक ब्रुनो
आजपासून ठीक 422 वर्षांआधी 17 फेब्रुवारीला सन 1600 मध्ये आपल्या तत्त्वांसाठी बलिदान देणाऱ्या महान वैज्ञानिक जर्दानो ब्रूनो ला रोम मध्ये मृत्युदंड दिला गेला होता. मृत्युदंड देण्याचा ‘न्यायालयाचा’ निर्णय ऐकून ब्रूनो ने ‘इन्क्विझिटर’ना (inquisitor) शांतपणे सांगितले होते “तुम्ही दंड देणार आहात आणि मी आपला गुन्हेगार आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की दयाळू देवाच्या नावावर आपला निर्णय देतांना सुद्धा तुमचे हृदय माझ्यापेक्षा अधिक भयग्रस्त आहे.”
‘इन्क्विझिशन’ ची ही प्रथा होती की ते आपला निर्णय या धूर्ततापूर्ण शब्दांमध्ये द्यायचे – “पवित्र धर्म या गुन्हेगाराला रक्त न सांडता मृत्युदंड देण्याची प्रार्थना करत आहे”. पण वास्तवात याचा अर्थ होता भयंकर मृत्युदंड – म्हणजे जिवंतच जाळून टाकणे.
ब्रूनो आयुष्यभर कोपर्निकसच्या सिद्धांतांचा प्रचार करण्यासाठी संघर्ष करीत राहिला. ब्रूनोने केवळ कोपर्निकसच्या सिद्धांतांची पुनरावृत्ती केली नाही तर एका परिश्रमी शिष्याप्रमाणे त्याला अधिक विस्तृत केले. स्वतः कोपर्निकसच्या तुलनेमध्ये त्याने जगाला अधिक चांगल्या प्रकारे समजले होते. जर्दानो ब्रूनोने सांगितले की केवळ पृथ्वीच नाही तर सूर्य सुद्धा आपल्या अक्षाभोवती फिरतो. ब्रूनोच्या मृत्यूनंतर खूप वर्षांनीच हे तथ्य सिद्ध होऊ शकले.
ब्रूनोने सांगितले की अनेक ग्रह सूर्याभोवती फिरतात आणि मनुष्य आतापर्यंत अज्ञात असलेल्या अन्य ग्रहांचा सुद्धा शोध घेऊ शकतो. त्याची ही गोष्ट सत्य निघाली. ब्रूनोच्या मृत्यूनंतर जवळपास दोनशे वर्षांनी अशा अज्ञात ग्रहांमध्ये सर्वात आधी युरेनस आणि काही काळानंतर नेपच्यून आणि प्लूटो ग्रह तसेच ज्यांना एस्टेरॉयड म्हणतात अशा शेकडो छोट्या-छोट्या ग्रहांचा शोध लागला. अशाप्रकारे या प्रतिभाशाली इटालियन शास्त्रज्ञाची भविष्यवाणी शंभर टक्के खरी सिद्ध झाली.
कोपर्निकस दूरवरच्या ताऱ्यांवर कमी लक्ष देत होता. परंतु ब्रूनोने विश्वासाने सांगितले की प्रत्येक तारा आपल्या सूर्यासारखाच विशाल सुर्य आहे. त्यांने हे सुद्धा सांगितले की ग्रह प्रत्येक ताऱ्यांच्या भोवती फिरतात, आपण त्यांना केवळ बघू शकत नाही कारण ते आपल्यापासून खूप दूर आहेत. ब्रूनोने सांगितले की प्रत्येक तारा त्याच्या ग्रहांसोबत एक तसेच विश्व आहे जसे की आपले सूर्य मंडळ आणि ब्रह्मांडामध्ये अशा विश्वांची संख्या अनंत आहे.
जर्दानो ब्रूनोने सांगितले की ब्रह्मांडातील सर्व विश्वांची आपली स्वतःची उत्पत्ती आणि आपला स्वतःचा अंत आहे आणि ते सतत बदलत राहतात. हा विचार फारच साहसी होता कारण ख्रिश्चन धर्मानुसार तर विश्व अपरिवर्तनशील आहे आणि ते सदैव तसेच बनलेले राहते जसे ईश्वराने त्याला बनवले आहे.
ब्रूनो अत्यंत प्रतिभाशाली व्यक्ती होता. त्याला त्याल्या बुद्धीच्या बळावर जी गोष्ट समजली, ती खगोलशास्त्रज्ञांनी नंतर दुर्बिणी आणि टेलिस्कोपच्या साहाय्याने जाणली. आज आपल्यासाठी हा अंदाज लावणे सुद्धा कठीण आहे की ब्रूनोने खगोल विज्ञानामध्ये किती मोठी क्रांती केली होती. असे वाटते जसे काही त्याने एखाद्या बंदिवासातील व्यक्तीला बाहेर काढून त्याला अंधकारमय कोठडी ऐवजी एका विचित्र आणि अनंत विश्वाचे सुंदर दृश्य दाखवले होते.
ब्रूनो नंतर काही काळाने एक दुसरा खगोलशास्त्रज्ञ केपलरने हे स्वीकार केले की या महान आणि प्रसिद्ध इटालियन वैज्ञानिकाची पुस्तके वाचून त्याचे डोके चक्रावून जात होते. कदाचित तो या अंतराळात निराधार फिरत राहतो, या विश्वाचे काही केंद्र नाही आणि कुठलाही आरंभ किंवा अंत नाही अशा कल्पनांच्या अज्ञात दहशतीने तो दहशतग्रस्त होत होता.
पादरी जनार्दो ब्रूनोला आपला कट्टर शत्रू मानायला लागले. विश्वांची संख्या अनंत आहे आणि ब्रम्हांडाचा काही प्रारंभ किंवा अंत नाही हा ब्रूनोचा सिद्धांत विश्वाच्या सृष्टीच्या संबंधात तसेच पृथ्वीवर येशू ख्रिस्त अवतरण्याच्या बाबतीत बायबलच्या विधानांना उद्ध्वस्त करण्यासाठी पुरेसा होता. बायबलमधील हीच विधाने तर ख्रिश्चन धर्माचा आधारस्तंभ होते. पादरींनी ब्रूनो विरुद्ध जे अभियोग पत्र तयार केले त्यामध्ये पूर्ण 130 उतारे होते.
पादरींनी या महान वैज्ञानिकाला “देवाला शिव्या देणारा” म्हटले आणि ते सतत यासाठी प्रयत्नशील होते की सर्व ठिकाणांचे शासक ब्रूनोला आपल्या देशांमधून काढून टाकतील परंतु ब्रुनो जेवढा जास्त भटकंती करत राहिला तेवढाच तो आपल्या साहसी सिद्धांतांचा प्रचार सुद्धा करत राहिला.
स्वदेशापासून दूर केल्या गेलेला ब्रूनो आपला देश इटलीसाठी, सतत आतूर राहत होता. त्याला मारून टाकण्यासाठी त्याच्या शत्रूंनी ब्रूनोच्या देशप्रेमाच्या भावनेचा फायदा घेतला.
कुलीन तसेच नवयुवक इटालियन जियोवानी मोचेनीगो ने असे ढोंग केले की त्याला ब्रूनोच्या त्या अनेक पुस्तकांमध्ये विशेष रस आहे जी युरोपमध्ये विविध शहरांमध्ये छापली गेली आहेत. त्याने लिहिले की तो त्याचा शिष्य बनू इच्छितो आणि हे सुद्धा म्हटले की या बदल्यात तो त्याला उदारपणे पुरस्कृत करेल. निर्वासित ब्रूनोसाठी स्वदेशी परतणे खूप धोकादायक होते. परंतु जियोवानी मोचेनीगोने कपटपूर्वक त्याला आश्वासन दिले की तो आपल्या शिक्षकाला शत्रूंपासून वाचवेल. ब्रूनो विविध देशांमध्ये भटकंती करून करून कंटाळला होता. त्याने कपटी मोचेनीगोवर विश्वास ठेवला.
या महान वैज्ञानिकाला हे माहित नव्हते की त्याला धोका देऊन इटलीमध्ये परत बोलवण्याची ही नीच योजना कॅथोलिक चर्चच्या ‘न्यायालया’ द्वारे बनवली गेली होती. स्पेन आणि इटलीमध्ये ‘इन्क्विझिशन’ नावाचं भयानक न्यायालय होते. ते धर्माचा विरोध करणाऱ्यांवर अत्याचार करायचे. ‘इन्क्विझिटरांनी’ म्हणजेच वरील संस्थेच्या न्यायाधीशांनी या संस्थेच्या अस्तित्व काळामध्ये लाखो निर्दोषांचा बळी घेतला होता. ब्रूनो सुद्धा त्याचाच एक निर्दोष शिकार बनला.
जर्दानो ब्रूनो इटलीच्या व्हेनिस नगरात पोहोचला आणि मोचेनीगोला शिकवू लागला. मोचेनीगोने वैज्ञानिकाकडून प्रतिज्ञा करून घेतली की देश सोडून जायच्या वेळी तो मोचेनीगोला निरोप देईल. हीसुद्धा एक चाल होती. मोचेनीगोला ही भीती होती की जर ब्रूनोला योजनेची माहिती मिळाली तर तो युवावस्थेप्रमाणेच चुपचाप पळून जाईल. परंतु जर ब्रूनो त्याला जातेवेळी निरोप द्यायला आला तर त्याला थांबवणे सोपे जाईल.
काही महिन्यांच्या शिक्षणानंतर मोचेनीगोने सांगितले की ब्रूनो त्याला व्यवस्थित शिकवत नाहीये आणि तो त्याच्या पासून त्याचे सिद्धांत लपवत आहे. या आरोपाच्या उत्तरामध्ये ब्रूनोने व्हेनिस सोडण्याचा निश्चय केला आणि मोचेनीगोने ‘इन्क्विझिशन’ ला याची सूचना दिली. 23 मे 1592 रोजी या प्रख्यात वैज्ञानिकाला जेलमध्ये टाकले गेले. त्याने यातनामय अवस्थेत जेलमध्ये आठ वर्ष काढली. ज्या कोठडीमध्ये ब्रूनोला ठेवले गेले होते ती कोठडी जेल मधील काचेच्या छताखाली होती. अशा छताखाली उष्म्यामध्ये असह्य ताप व कोंदटपणा तसेच थंडीमध्ये प्रचंड थंडी राहते. अशा कोठडीमध्ये कैद्याचे जीवन भयानक व यातनामय असते. ही छळ करून मारण्यासारखी गोष्ट होती.
मारेकऱ्यांनी ब्रूनोला आठ वर्षांपर्यंत जेलमध्ये का बंद ठेवले? त्याचे कारण त्यांना आशा होती की ते या खगोल वैज्ञानिकाला आपले सिद्धांत त्यागण्यासाठी बाध्य करू शकतील. जर असे झाले असते तर तो त्यांच्यासाठी एक मोठा विजय ठरला असता. संपूर्ण युरोप या प्रख्यात वैज्ञानिकाला ओळखत होता आणि त्याचा आदर करत होता. जर ही घोषणा केली असती की तो चुकीचा होता आणि पादरी योग्य होते तर खूप सारे लोक परत विश्वाच्या सृष्टीसंदर्भात धर्माच्या विधानांवर विश्वास ठेवायला लागले असते.
परंतु जर्दानो ब्रूनो दगडा प्रमाणे दृढ आणि साहसी व्यक्ती होता. पादरी धमक्यांनी आणि यातनांनी ब्रूनोला विचलित करु शकले नाहीत. तो दृढतेने आपल्या विचारांची सत्यता सिद्ध करत राहिला.
शेवटी मारेकऱ्यांनी त्याला मृत्युदंड देण्याचा निर्णय घेतला. न्यायालयाचा निर्णय ऐकून ब्रुनोने ‘इन्क्विझिटरांना’ शांतपणे सांगितले होते “तुम्ही दंड देणार आहात आणि मी आपला गुन्हेगार आहे, परंतु आश्चर्याची गोष्ट ही आहे की दयाळू देवाच्या नावावर आपला निर्णय देतांना सुद्धा तुमचे हृदय माझ्यापेक्षा अधिक भयग्रस्त आहे”
(‘अनुराग ट्रस्ट’ द्वारा प्रकाशित अ. वोल्कोव चे पुस्तक ‘धरती और आकाश’ मधून अनुवादित)
मराठी अनुवाद: जयवर्धन