अशाच एका दिवशी…
अशाच एका दिवशी…
(one of these days या कथेचे भाषांतर)
गाब्रिएल गार्सिया मार्केझ
अनुवाद – अभिजीत
सोमवारचा दिवस उबदार आणि पावसाशिवाय उगवला. बिनडिग्रीचा दातांचा डॉक्टर असलेल्या ऑरेलिओ एस्कोव्हारने- त्याला भल्या पहाटे उठायची सवय – पहाटे सहा वाजता आपले ऑफिस उघडले. प्लास्टरच्या साच्यात बसवलेले काही खोटे दात त्याने काचेच्या पेटीबाहेर काढले आणि टेबलावर मूठभर उपकरणे आकारानुसार मांडून ठेवली- प्रदर्शनात मांडल्यासारखी. त्याने गळ्यापाशी सोन्याची गुंडी असलेला एक पट्ट्यापट्ट्यांचा बिनकॉलरचा शर्ट घातलेला होता आणि खाली सस्पेंडर्सनी तोलून धरलेली पँट. तो अगदी ताठ होता – ताठ, शिडशिडीत आणि आजूबाजूच्या परिस्थितीशी क्वचितच सुसंगत वाटणारा चेहरा, बहिऱ्या लोकांचा चेहरा असतो तसा.
वस्तू टेबलावर मांडून झाल्यावर ड्रिल खुर्चीपाशी ओढून तो खोट्या दातांना पॉलिश करण्यासाठी बसला. असं वाटत होतं की आपण काय करीत आहोत याचा काहीएक विचार तो करीत नसावा. पण त्याचं काम चाललं होतं. पायाने ड्रिल चालवणं सुरू होतं – जेव्हा गरज नसायची तेव्हासुद्धा.
आठ वाजून गेल्यानंतर खिडकीतनं आभाळ पाहण्यासाठी म्हणून तो थोडा वेळ थांबला, आणि तेवढ्यात त्याचं लक्ष लागूनच असलेल्या घराच्या खांबावर गेली. तेथे दोन घारी उन्हात अंग वाळवत जणू ध्यानस्थ बसलेल्या होत्या. दुपारच्या जेवणाअगोदर पुन्हा पाऊस पडणार, असा विचार करतच तो पुन्हा कामाला लागला.
‘‘पापा…’’ त्याच्या अकरा वर्षांच्या मुलाच्या चिरक्या आवाजाने त्याची तंद्री मोडली.
‘‘काय…’’
‘‘महापौर विचारतायत, त्यांची दाढ काढाल का?’’
‘‘मी नाहीये म्हणून सांग!’’ तो एक सोन्याचा दात पॉलिश करीत होता. ‘‘तेसुद्धा सांगतायत, तुम्ही आहात. तुमचा आवाज येतोय बाहेर’’, हाताच्या अंतरावर धरून अर्धवट उघड्या डोळ्यांनी तो दात निरखत असतानाच लहानशा वेटिंग रूममधून पुन्हा त्याच्या मुलाने ओरडून सांगितलं. त्याने दाताचं परिक्षण सुरूच ठेवलं. काम पूर्ण करून दात पुन्हा टेबलावर ठेवल्यानंतरच त्याच्या तोंडून शब्द निघाले – ‘‘उत्तम आहे!’’
त्याने पुन्हा ड्रिल सुरू केलं. बाकी असलेल्या कामाच्या वस्तू ज्या पुठ्ठ्याच्या बॉक्समध्ये ठेवलेल्या होत्या त्यातनं त्याने काही कवळ्या बाहेर काढल्या आणि सोनं पॉलिश करू लागला.
‘‘पापा…’’ पुन्हा मुलाची हाक आली.
‘‘काय?’’ त्याचे हावभाव अजूनही किंचितसुद्धा बदलले नव्हते.
‘‘ते म्हणतायत, दाढ काढली नाही तर ते तुम्हांला गोळ्या घालतील.’’
कसलीही घाई न करता अगदी सावकाश त्याने ड्रिल चालवणं थांबवलं. ते खुर्चीपासून दूर लोटलं आणि टेबलाचा खालचा ड्रॉवर ओढून पूर्ण बाहेर काढला. तिथे एक रिवॉल्व्हर होतं. ‘‘ठिकंय, ये आणि गोळ्या घाल म्हणावं’’, तो म्हणाला.
त्याने शांतपणे खुर्ची दरवाजाच्या दिशेने फिरवली. त्याचा हात अजूनही ड्रॉवरच्या कडेवर विसावला होता. तेवढ्यात शहराचा महापौर दारात येऊन पोहोचला. त्याने डाव्या बाजूने गुळगुळीत दाढी केलेली होती पण दुसरी बाजू सुजलेली होती आणि पाच दिवसांची दाढीसुद्धा दिसत होती. दातांच्या डॉक्टरला महापौराच्या निस्तेज डोळ्यांमध्ये बऱ्याच रात्रींची तडफड दिसली. त्याने बोटांनी हलकेच ड्रॉवर बंद केला आणि अगदी हळू आवाजात म्हणाला, ‘‘बसा’’.
‘‘गुड मॉर्निंग’’, महापौर म्हणाला.
‘‘मॉर्निंग..’’ महापौराच्या शुभेच्छांना त्याने प्रतिसाद दिला. उपकरणं पाण्यात उकळत असताना महापौराने खुर्चीच्या हेडरेस्टवर डोकं टेकलं आणि त्याला किंचित आराम वाटला. त्याचा श्वास बर्फासारखा थंड झाला होता. ऑफिस अगदीच साधारण होतं – एक लाकडी खुर्ची, पायानं चालवायचं ड्रिल, सेरॅमिकच्या बाटल्या असलेली एक काचेची पेटी. खुर्चीच्या समोरच खांद्याएवढ्या उंचीचा पडदा लावलेली खिडकी होती. दातांचा डॉक्टर जवळ येत असल्याचं जाणवताच महापौर टाचा दाबून तयार झाला आणि त्याने तोंड उघडलं.
ऑरेलिओ एस्कोव्हारने महापौराचं डोकं उजेडाच्याच्या दिशेने वळवलं. किडलेली दाढ नीट तपासून झाल्यावर त्याने आपल्या बोटांनी हलकेच महापौराचा जबडा बंद केला.
‘‘गुंगी दिल्याशिवाय करावं लागेल’’, त्याने सांगितलं.
‘‘का?’’
‘‘पू झालाय… त्यामुळे…’’
महापौराने त्याच्या डोळ्यात पाहिलं. चालेल, त्याने हसण्याचा क्षीण प्रयत्न केला. दातांच्या डॉक्टरने हसून वगैरे प्रतिसाद दिला नाही. त्याने स्टेरेलाईज केलेल्या साहित्याचं बेसिन टेबलापाशी आणलं आणि थंडगार चिमटीत पकडून हत्यारं पाण्याबाहेर काढली – आतासुद्धा कसल्याही घाईशिवाय. नंतर त्याने पिकदाणी बुटाच्या टोकाने ढकलली आणि बेसिनमध्ये हात धुण्यासाठी गेला. हे सगळं करताना त्याने एकदासुद्धा महापौराकडे पाहिलं नाही, पण महापौराने मात्र इतका वेळ आपली नजर क्षणभरसुद्धा त्याच्यावरून हटू दिली नव्हती.
ती खालची अक्कलदाढ होती. दातांच्या डॉक्टरने आपले पाय किंचित फाकवले आणि दाढ गरम चिमट्यामध्ये धरली. त्यासरशी महापौराने खुर्चीचे हात गच्च पकडले, दोन्ही पाउलं साऱ्या ताकदीनिशी आवळून धरली. त्याला आपल्या ओटीपोटात एक थंडगार पोकळी जाणवू लागली होती. तरीही त्याने तोंडातून चकार आवाज काढला नाही. दातांच्या डॉक्टरने फक्त आपलं मनगट फिरवलं – कसल्याही आकसाशिवाय – उलट कडवट हळुवारपणे. तो म्हणाला –
‘‘आमच्या वीस माणसांच्या मरणाची किंमत आता मोजशील.’’
महापौराला जबड्यात हाडांची करकर जाणवली आणि त्याच्या डोळ्यांत आसवं तरारली. मात्र त्याने दाढ बाहेर निघेपर्यंत श्वास घेतला नाही. मग आसवांमधूनच त्याने ती दाढ पाहिली. पण त्याच्या वेदनेला ती एवढी अनोळखी वाटली की अगोदरच्या पाच रात्रींच्या यातनांचा त्याला अर्थच लागेना.
पिकदाणीवर वाकून, घामाघूम आणि धाप लागलेल्या अवस्थेत महापौराने अंगरख्याचे बटण सोडवले आणि रुमालासाठी खिसा चाचपू लागला. तेवढ्यात दातांच्या डॉक्टरनेच एक स्वच्छ कपडा त्याला देऊ केला आणि म्हणाला, ‘‘डोळे पूस’’.
महापौराने डोळे पुसले. तो थरथरत होता. दातांचा डॉक्टर हात धूत असताना महापौराची नजर पोपडे गेलेल्या छताकडे गेली. तिथे एक कोळ्याचं जाळं होतं. त्यात कोळ्याची अंडी आणि मेलेले किडे दिसत होते. हात पुसत दातांचा डॉक्टर परतला. आराम करायचा आणि मिठाच्या पाण्याने गुळण्या करायच्या, त्याने सांगितलं. महापौर उठून उभा राहिला. त्याने सहज सैनिकी सॅल्यूट करून ‘गुडबाय’ म्हटलं आणि अंगरख्याचं बटण न लावताच पाय ओढत दारापर्यंत गेला.
‘‘बिल पाठवून दे’’, त्याने दातांच्या डॉक्टरला फर्मावलं.
‘‘घरी पाठवायचं की कार्यालयात?’’
महापौराने त्याच्याकडे पाहिलंसुद्धा नाही. त्याने दार ओढून घेतलं आणि पडद्याच्या आडून उत्तरला,
‘‘कुठेही पाठवलं तरी सारखंच’’
स्फुलिंग १ सप्टेंबर २०१४