वजीरपूरच्या गरम रोला कामगारांचे ऐतिहासिक आंदोलन
वजीरपूरच्या गरम रोला कामगारांचे ऐतिहासिक आंदोलन
दिल्लीच्या उत्तर पश्चिम भागात वजीरपूर औद्योगिक इलाक्यातील इस्पात उद्योगाच्या गरम रोला कामगारांनी ६ जूनपासून एका शानदार संघर्षास आरंभ केला. मजुरी वाढविणे, कामाचे तास कमी करणे आणि अशाच अन्य अधिकारांसाठी कामगारांनी गरम रोला मजदूर एकता समितीच्या नेतृत्त्वाखाली संप पुकारला आणि आपल्या अधिकारांसाठी दीड महिन्याचे दीर्घ यशस्वी आंदोलन चालविले. बिगुल मजदूर दस्ता संघटनेची या आंदोलनात विशेष भूमिका होती. दीड महिन्यांच्या दीर्घ संघर्षाद्वारे कामगारांनी आपल्या बहुतेक मागण्यांसमोर मालकांना झुकण्यास भाग पाडले.
आंदोलनाची पाश्र्वभूमी
दिल्लीच्या वजीरपूर औद्योगिक क्षेत्रात इस्पात उद्योगाचे काम मोठ्या प्रमाणात चालते. येथे कामगारांना अत्यंत अमानुष परिस्थितीत काम करावे लागते. कामगारांना सतत १२-१४ तास काम करावे लागते. कोणत्याही कारखान्यात किमान मजुरी दिली जात नाही, सर्व श्रम कायद्यांची उघडउघड पायमल्ली होते. गरम रोलाच्या कामगारांना सतत पोलाद वितळविणाऱ्या भट्टीवर काम करावे लागते. सुरक्षेची कोणतीही उपकरणे मालक कामगारांना पुरवीत नाहीत आणि कामगार सर्रास अपघातांचे बळी ठरतात. आपल्या मागण्यांसाठी गेल्या वर्षीदेखील कामगारांनी गरम रोला मजदूर एकता समितीच्या नेतृत्त्वाखाली संप केला होता. त्यावेळी मालकांनी पोलिस आणि गुंडांच्या मदतीने समझोता करविला. यावेळी त्यांनी १५०० रुपयांची पगारवाढ मान्य केली होती तसेच दर वर्षी १००० रुपयांची पगारवाढ देण्याचेही मान्य केले होते. प्रत्यक्षात मात्र त्यांनी एक तर पगारवाढ केलीच नाही किंवा फक्त १००० रुपये पगारवाढ केली. यानंतर २०१४ च्या एप्रिलमध्ये एक वर्ष पूर्ण होताच गरम रोला मजदूर एकता समितीच्या नेतृत्त्वाखाली कामगारांनी सर्व मालकांना नोटीस पाठवून गेल्या वर्षीच्या आश्वासनांची आठवण करून दिली आणि १००० रुपये पगारवाढीची मागणी केली. जूनच्या सुरुवातीपर्यंत मालकांनी ही मागणी मान्य न केल्यामुळे ६ जूनपासून कामगारांनी संप पुकारला.
आंदोलनाचा संक्षिप्त घटनाक्रम
संप पुकारून कामगारांनी मालकांसमोर १५०० रुपये पगारवाढीची मागणी ठेवली. संप सुरू झाल्यानंतर कामगारांनी कारखान्यांमध्ये श्रमकायद्यांचे पालन होत नसल्याबद्दल श्रमविभागावर दबाव आणण्यास सुुरुवात केली. यानंतर १९ जूनला गरम रोला मजदूर एकता समितीच्या दबावामुळे श्रमविभागाने आकस्मिक निरीक्षणासाठी लेबर इन्स्पेक्टरला इलाक्यात पाठविले व त्यावेळी श्रमकायद्यांचे पालन होत नसल्याचे उघडकीस आले. यानंतर कारखाना अधिनियम आणि औद्योगिक विवाद अधिनियमांतर्गत सर्व मालकांना दंड ठोठावण्यात आला. यानंतर मालकांवरही आंदोलनाचा दबाव वाढत गेला. आतापर्यंत सर्व गरम रोला कारखान्यांमध्ये काम ठप्प झालेले होते. दुसरीकडे, कायदेशीर कारवाईदेखील मालकांसाठी डोकेदुखी बनली होती. याच दरम्यान कामगारांनी इलाक्यात दोन विशाल रॅली काढल्या ज्यांमध्ये २००० हून अधिक कामगार सहभागी झाले होते. आर्थिक समस्येला तोंड देण्यासाठी १९ जूनपासून कामगारांनी सामूहिक स्वैंपाकास सुरूवात केली आणि राजा पार्क या संपाच्या ठिकाणी स्वैंंपाकघर चालवू लागले. यामुळे कामगारांचे संघर्ष तोडण्याच्या उपायांतील मालकांचे एक शस्त्र निकामी झाले. यामुळे मालकांवर दबाव वाढत गेला. या दबावामुळे २७ जून रोजी मालकांनी श्रमविभागाच्या मध्यस्थीने व श्रम उपायुक्तांच्या उपस्थितीत गरम रोला मजदूर एकता समितीच्या प्रतिनिधी मंडळाशी समझोता केला, ज्यानुसार आठ तासांचा कार्यदिवस, डबल शिफ्टमध्ये काम आणि किमान मजुरीचे आश्वासन देण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी मालक हा समझोता लागू करण्यास टाळाटाळ करू लागले. याचा परिणाम म्हणून २८ जून रोजी एका कारखान्यात श्रम उपायुक्तांच्या उपस्थितीत आणखी एक बोलणी झाली जी आठ तास चालली आणि मालकांनी अखेरीस गुंड आणि पोलिसांना पाचारण केले व कारखान्यांच्या दरवाजांना टाळे ठोकले. प्रत्युत्तरादाखल कामगारांनी प्रत्येक कारखान्याचे गेट घेरले आणि त्यांना टाळी ठोकण्यास सुरुवात केली. याबरोबर गरम रोला मजदूर एकता समितीने कारखाना गेटवर कब्जा करण्याची घोषणा दिली. २९ जून रोजी या पावलाबरोबर कामगार सत्याग्रहास सुरुवात झाली, व समझोता लागू करण्यासाठी योग्य पाउले न उचलल्यास श्रम विभागाला घेराव घालण्याची चेतावनी कामगारांनी दिली. पुढचे तीन दिवस कारखाना गेटवर कब्जे सुरू राहिले व अन्य काही मालकांनी समझोता लागू करण्यास सुरुवात केली. परंतु मालकांमध्ये काही स्थानिक गुंडदेखील होते ज्यांनी समझोत्यावर अंमल करण्यास स्पष्ट नकार दिला. ३ जुलै रोजी एका कारखाना मालकाने समझोता लागू करण्याचे निमित्त करून कामगारांना कारखान्यात बोलावून घेतले व गुंडांकरवी मारझोड करून तसेच धमकावून काम करून घेण्यास सुरुवात केली. यावर शेकडो कामगारांनी कारखाना गेटला घेराव केला. पोलिसांचे अपार प्रयत्न आणि काही साथीदारांच्या अटकेच्या प्रयत्नांनंतरदेखील घेराव भंग करणे शक्य झाले नाही. कामगारांच्या दबावामुळे श्रमविभागाच्या काही अधिकाऱ्यांनादेखील तेथे येणे भाग पडले. परंतु जेव्हा या अधिकाऱ्यांनी समाधानकारक कारवाई केली नाही तेव्हा जवळजवळ हजार कामगारांचा समूह मार्च करीत श्रमायुक्त कार्यालयाच्या दिशेने निघाला. उप श्रमायुक्त कार्यालयासमोर कामगारांचे धरणे सुरू झाले ज्यानंतर स्वत: उपश्रमायुक्तांनी येऊन प्रकरणावर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले व मालकांना एक कारणे दाखवा नोटीस बजावली. या नोटीशीद्वारे समझोता लागू न करण्याची कारणे ७ जुलैपर्यंत देण्याचा आदेश देण्यात आला होता. यानंतर दुसऱ्याच दिवशी कामगारांनी राजा पार्कमध्ये कामगार सत्याग्रहांतर्गत साखळी उपोषणास सुरुवात केली. या उपोषणामुळे ज्या कारखान्यांतील कामगार आंदोलनात सक्रिय भूमिका पार पाडीत नव्हते तेदेखील आंदोलनाच्या ठिकाणी येऊ लागले व रोज राजा पार्कमध्ये विशाल सभा होऊ लागल्या. त्याचबरोबर सामूहिक स्वैंपाकघरही सुरू राहिले. ७ जुलै रोजी कामगारांच्या सत्याग्रहाचा परिणाम दिसून आला आणि श्रमविभागात पुन्हा समझोता लागू करण्याचे लेखी आश्वासन मालकांनी दिले. ९ आणि १० जुलै रोजी २३ पैकी १९ गरम रोला कारखान्यांमध्ये कामगारांनी आपल्या एकजुटीच्या बळावर समझोता लागू करवून घेतला.
यासाठी आदल्या दिवशीच कामगारांच्या कारखाना समित्या बनविण्यात आलेल्या होत्या व प्रत्येक कारखान्यात तीन कामगार प्रधान नियुक्त करण्यात आले होते. ६ वाजता कारखाना बंद होतो की नाही हे पाहण्याची तसेच मालकांनी जर गुंड किंवा पोलिसांना बोलाविले तरीही कामगार एकजूट होऊन ६ वा. कारखाना बंद करतील हे निश्चित करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली होती. यानंतरसुद्धा बऱ्याच मालकांनी आश्वासन पाळण्यास टाळाटाळ करण्याचा प्रयत्न केला परंतु कामगारांच्या पोलादी एकतेसमोर त्यांना हार मानावी लागली. अशा प्रकारे दीड महिन्यांपर्यत चाललेल्या या शानदार संघर्षाने पुन्हा एकदा दाखवून दिले की भांडवलाच्या संघटित शक्तीचा सामना कामगारांची एकताच करू शकते.
आंदोलनाचे धडे
हे आंदोलन एखाद्या कारखान्यापुरते मर्यादित आंदोलन नव्हते तर इलाका व पेशाच्या आधारावर उभारण्यात आलेले हे आंदोलन होते. नेतृत्त्वाने भूतकाळातील अयशस्वी कामगार आंदोलनांच्या चुकांचे सारसंकलन करून ही स्पष्ट जाणीव निर्माण केली की आज जर आंदोलन कारखान्यापुरते मर्यादित होऊन राहिले तर भांडवलाच्या संघटित शक्तीशी लढणे शक्य नाही. हे लक्षात घेऊन कामगारांनी विशाल रॅलींचे आयोजन केले व इलाक्यातील अन्य कामगारांनादेखील सहकार्याचे आवाहन केले. आंदोलनाला एकूण औद्योगिक इलाक्यात विशाल समर्थन मिळाले आणि इलाक्यात काम करणाऱ्या अन्य पेशांतील कामगारांनीदेखील, जसे ठंडा रोलातील कामगार, गरम रोला कामगारांना साथ दिली.
आणखी एक कारण आहे जे भूतकाळातील अनेक कामगार आंदोलनांच्या अपयशाचे कारण राहिलेले आहे, आणि ते म्हणजे आंदोलनात दलाल आणि गद्दार व्यक्ती आणि संघटनांची भूमिका. या आंदोलनातही गद्दार आणि दलालांनी आंदोलन विफल बनविण्याचे प्राणपणाने प्रयत्न केले परंतु कामगारांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडले. इंकलाबी मजदूर केंद्र नामक संघटनेची घृणित भूमिकादेखील कामगारांसमोर उघड झाली. या संघटनेने सतत अपप्रचार करून आंदोलनाला हानी पोहोचविण्याचे प्रयत्न केले व आंदोलनाला काही प्रमाणात हानी पोहोचविण्यात ये यशस्वीदेखील झाले. गद्दारी करताना पकडल्या गेलेल्या या संघटनेच्या लोकांना कामगारांनी चोप दिला आणि आंदोलनातून हाकलून लावले. अशा प्रकारेच समस्त गद्दार संघटनांचे वास्तव रूप आंदोलनाच्या दरम्यान स्पष्ट होत असते. इंकलाबी मजदूर केंद्र ने गरम रोला मजदूर एकता समितीच्या ऑफिसमधील फाईल्स चोरण्यापासून लेबर इन्स्पेक्टरसोबत गाडीमधून फिरण्यापर्यंत आणि महिला सोबत्यांना शिवीगाळ करण्यापासून कामगारांना आंदोलन समाप्त करण्यास सांगण्यापर्यंत सगळी नीच कार्ये केली.
बिगूल मजदूर दस्ता संघटनेने आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली व कामगारांमध्ये सतत क्रांतिकारी प्रचार केला. कामगारांची राजकीय जाणीव उन्नत बनविण्यासाठी सतत कामगार शाळा चालविल्या. हे लक्षात घेऊन पोलिसांनी बिगुल मजदूर दस्ताच्या कार्यकर्त्यांचे अपहरणही केले. परंतु कामगारांच्या झुंजार एकतेमुळे पोलिसांना त्यांना सोडून द्यावे लागले. श्रमविभाग आणि पोलिसांची भूमिकादेखील कामगारांसमोर उघडी पडली. तसे पाहता पोलिस कोणाच्या बाजून असतात हे कामगार आपल्या अनुभवांतूनच जाणत असतात कारण आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांनी ज्या नग्नतेने मालकांची सोबत केली व गरम रोला कामगार एकता समिती व बिगुल मजदूर दस्ताच्या लोकांना धमकावले, त्यांना कित्येकदा अटक केली, त्यांचे अपहरण केले त्यावरून त्यांचे चारित्र्य उघड झाले. वजीरपूर कामगार आंदोलनाच्या दरम्यान गरम रोला कामगारांनी केवळ पोलिसच नाहीत तर राज्यसत्तेचे चारित्र्यदेखील एका मर्यादेपर्यंत जाणले आहे. श्रम विभाग असो, पोलिस असो किंवा न्यायालये असोत, कामगार हे समजून चुकले आहेत की राज्यसत्ता वास्तवात कोणाच्या बाजूने आहे, तिचे वर्गचारित्र्य काय आहे व कामगार आंदोलन केवळ कायद्याच्या चौकटीत राहून फार काही प्राप्त करू शकत नाही.
स्फुलिंग १ सप्टेंबर २०१४