सण-उत्सवांसंबंधी काही विचार

-कात्यायनी

(अनुवाद: जयवर्धन)

शेतीवर अवलंबित प्राचीन समाजात सणांचा जन्म पिकांच्या पेरणी आणि कापणीच्या हंगामावर आधारित होता. सार्वजनिक आनंद उत्सवाचे ते संस्थात्मक स्वरूप होते. कल्पनावादी (जादूई) विश्व दृष्टिकोन आणि नैसर्गिक शक्तींची पूजा करण्याच्या आदिम काळात या सणांसोबत जादूटोण्याच्या काही सामूहिक क्रिया जोडलेल्या होत्या. मग संस्थाबद्ध धर्मांनी या सणांना सत्ताधारी वर्गाच्या हितानुसार पुनर्संस्कारित व पुनर्गठित केले आणि त्यात विविध धार्मिक पौराणिक कथा आणि विधी जोडले गेले. असे असूनही, भांडवलशाहीपूर्व समाजात, सामान्य उत्पादक जनसमुदायाने हे सण-उत्सव मोठ्या प्रमाणात त्यांच्या पद्धतीने साजरे केले. सण मुख्यत्वे सामान्य पीडितांसाठी सामूहिकतेचा उत्सव होते. आयुष्यभर शोषणाचे ओझे वाहणारे लोक कमीतकमी एका दिवसासाठी तरी खुश व्हायचे, गायचे, वाजवायचे, नाचायचे.

मात्र भांडवलाच्या राक्षसाने हा रसही सर्वसामान्यांच्या जीवनातून हिसकावून घेतला. जीवनातील प्रत्येक गोष्टीचे विकल्या जाणाऱ्या मालामध्ये रूपांतर झाले आहे आणि सर्व काही बाजाराच्या अधीन आहे. होळी-दिवाळी-दसरा असे सर्व सण हे समाजातील श्रीमंतांसाठी ‘स्टेटस सिम्बॉल’ बनले आहेत. ज्याच्या गाठीशी जितका पैसा जास्त तितका त्याचा सण अधिक तेजस्वी आणि रंगतदार. सामान्य लोकांसाठी सण केवळ भीषण ताण घेऊन येतो. थोडे दिवे लावण्याची व फटाके फोडण्याची किंवा थोडे अबीर-गुलाल लावण्याची व करंज्या खाण्याची मुलांची हौस पूर्ण करण्यात आणि काही सामाजिक औपचारिकता पूर्ण करण्याच्या दडपणाखाली गरीब कष्टकरी आणि निम्न मध्यमवर्गीय लोकांची सारी ताकद पणाला लागते. जे श्रीमंत लोक सण मोठ्या उत्साहाने साजरे करतात, त्यांना सुद्धा सर्व आनंद वास्तवात त्यांच्या संपत्तीच्या उघड्या प्रदर्शनातून मिळतो. भांडवलशाही समाजातील श्रमविभागणीतून निर्माण झालेल्या सर्वव्यापी एकाकीपणाने (एलियनेशन) सामूहिकतेची भावना लयाला जाऊन उत्सवांच्या जीवनरसालाच नष्ट केले आहे. एकाकीपणाचे बळी केवळ उत्पादक कामगारच नाहीत तर त्याहूनही अधिक परजीवी-समृद्धशाली वर्ग आहेत. ते भांडवलाला लगाम लावून त्यावर स्वार होऊ इच्छितात, परंतु उलट भांडवलच त्यांच्या पाठीवर स्वार होऊन त्यांची स्वारी करू लागते. एक सामाजिक प्राणी म्हणून माणसाला आनंद केवळ सामूहिकरीत्याच मिळतो. सामूहिकतेपासून वंचित असलेला श्रीमंत परजीवी हा एक शापित मानव असतो जो केवळ त्याच्या संपत्तीच्या प्रदर्शनातून आनंद मिळवण्याच्या खोट्या जाणीवेने ग्रस्त असतो किंवा असा एक “सुसंस्कृत प्राणी” असतो जो पाहिजे ते खाऊन-पिऊन, विविध प्रकारे लैंगिक भूक भागवून आणि रुग्ण कल्पनांमध्ये जगून आनंदी राहण्याची सवय लावतो.

सामान्य लोकांसाठी सण-उत्सवांच्या अप्रासंगिकतेचे आणखी एक ऐतिहासिक कारण आहे. बहुतांश सण हे कृषी उत्पादनाची प्रधानता असलेल्या युगातील सण आहेत. कारखान्यांच्या उत्पादनाची प्रधानता आणि कृषी उत्पादनाचे यांत्रिकीकरण तसेच पिकांचे बदलते हंगाम, पॅटर्न आणि व्यापारीकरणाच्या युगात या सणांच्या आनंदाचा मूळ स्त्रोतच कोरडा पडला आहे. जेव्हा पाश्चिमात्य देशांमध्ये भांडवलशाही ‘पुनर्जागरण-प्रबोधन-लोकशाही क्रांती’च्या प्रक्रियेत आली, तेव्हा समूह नृत्य, समूह संगीत (ऑपेरा, बॅले, सिम्फनीच्या मैफिली इ.), आधुनिक नाटक इत्यादींसह सामूहिक उत्सवाचे विविध प्रकार विकसित झाले तसेच काही प्राचीन व मध्ययुगीन सणांना देखील पुनर्संस्कारित करत त्यांच्या धार्मिक विधींच्या पैलूला दुय्यम केले आणि सामूहिक उत्सवाच्या पैलूला प्रमुख बनविले. तथापि, त्या पाश्चिमात्य समाजांतही वाढत्या भांडवलशाही दुष्प्रवृत्तींनी सामुहिकतेच्या उत्सवांचा आत्मा मारून टाकला आहे. तरीही त्या समाजांच्या सामाजिक जडणघडणीत इतकी लोकशाही मूल्ये रुजलेली आहेत की आजही स्त्री-पुरुष विशेष प्रसंगी रस्त्यावर निघून खातात-पितात, वाजवणे, गाणे, नाचणे इत्यादी करतात.

भारतासारख्या उत्तर-वसाहतिक समाजात भांडवलशाही देखील लोकशाही क्रांतीने नव्हे तर क्रमिक प्रक्रियेतून आली. या जन्मजात आजारी-अपंग भांडवलशाहीने सामूहिकतेच्या उत्सवाला कोणतेही नवीन स्वरूप दिले नाही — ना सामूहिक जीवनात, ना ही कलेत. जुन्या मध्ययुगीन धार्मिक उत्सव-आयोजनांनाच थोडासा बदल करून स्वीकारण्यात आले, ज्यात एक धार्मिक पैलू होता, तर दुसरा भांडवली दिखाव्याचा आणि बाजाराचा पैलू होता. उत्सवाच्या या धार्मिक पैलूचा वापर राष्ट्रीय चळवळीच्या काळात पुराणमतवादी आणि पुनरुज्जीवनवादी राष्ट्रवाद्यांनी केला होता आणि आज त्याचा उपयोग मुख्यतः धार्मिक कट्टरपंथी फॅसिस्ट करत आहेत. नवउदारवादाच्या दशकाच्या काळात आपल्या सामाजिक जीवनाच्या संपूर्ण विस्तारामध्ये सणांच्या भांडवलशाही सामाजिक आचाराने प्रवेश केला आहे आणि तो नसानसांत भिनला आहे.

आता जुन्या सण-उत्सवांना पुनर्संस्कारित करून त्यांना सामूहिकतेच्या उत्साहवर्धक, आनंददायी उत्सवात रूपांतरीत करणे शक्य नाही. कामगार वर्गाच्या अग्रदलाला वर्गसंघर्षाच्या प्रबळ झंझावाताला पुन्हा आवाहन करताना सचेतनपणे सामूहिकतेच्या उत्सवाची आपली नवीन-नवीन रूपं त्याच प्रकारे सृजित करावे लागतील ज्याप्रकारे त्यांना सर्वहारा सामूहिक वाद्य संगीत, स्वर संगीत (फक्त लोकप्रियच नाही तर शास्त्रीय देखील) थिएटर, सिनेमा इत्यादीची नवनवीन रूपं शोधावे लागतील. प्रदीर्घ काळ चालू असलेल्या वर्गसंघर्षाचे स्वरूप आज पोझिशनल वॉरफेअरचे झाले आहे. या ‘पोझिशनल वॉरफेअर’ दरम्यान शत्रूने स्वतःचे खंदक खोदले आहेत आणि आम्हालाही स्वतःचे खंदक खोदून बंकर बांधावे लागतील. म्हणजेच, आपल्यालासुद्धा आपल्या समांतर संस्थांचा विकास करावा लागेल, सामूहिक सांस्कृतिक-सामाजिक कार्यक्रम, उत्सवांचे पर्यायी स्वरूप विकसित करावे लागेल. तृणमूल स्तरावर लोकसत्तेच्या पर्यायी स्वरूपाच्या भ्रूणांच्या विकासाशी ही प्रक्रिया अतूटपणे जोडली जाईल. श्रमजीवी वर्गाच्या दूरदर्शी अग्रदलाने जनसामान्यांच्या पुढाकाराचे आयोजन करण्याच्या विविध प्रयत्नांबरोबरच, ऑक्टोबर क्रांती दिन, मे दिन, भगतसिंग-राजगुरू-सुखदेव यांसारख्या क्रांतिकारकांचा हुतात्मा दिन इत्यादी निमित्त होणाऱ्या त्याच-त्याच आयोजनांपासून पुढे जात कार्निव्हल, सण, उत्सव यांचे विविध नवीन प्रकार विकसित केले पाहिजेत. सांस्कृतिक गटांना प्रचारात्मक लोकप्रिय प्रस्तुती आणि कार्यक्रमांच्या कक्षेतून बाहेर यावे लागेल आणि स्टेज-कन्सर्ट तसेच स्ट्रीट कॉन्सर्ट, थिएटर इत्यादींचे नवनवीन प्रयोग विकसित करावे लागतील.

संघर्षमय जीवनातही सर्जनशीलतेचे उत्प्रेरक हवे असते. शोषित, हताश लोक आणि विद्रोहासाठी उठलेले लोक या दोघांच्याही जीवनात मनोरंजनाचे, उत्सवाचे स्थान असले पाहिजे. क्रांतिकारी बदल हे काही दिवसांचे काम नाही. ते अगदी सामरिक युद्धासारखे असू शकत नाही. हे जीवनासारखे आहे. ही जगण्याची पद्धत आहे. क्रांतीमध्ये गुंतलेल्यांचे स्वतःचे सण आणि कार्निव्हल असणे आवश्यक आहे आणि ज्यांना क्रांतीची गरज आहे, त्या ‘धरतीच्या अभाग्यांना’ सुद्धा आनंद साजरा करण्यासाठी, सर्जनशील ऊर्जा मिळविण्यासाठी, आशेच्या पुनर्शोधाची प्रेरणा देण्यासाठी, नवीन भविष्याची स्वप्ने पाहण्यासाठी सामूहिकतेच्या नवनवीन उत्सवांचे, कार्निव्हलांचे रूप जर विकसित केले नाही तर ते भूतकाळातील सामूहिकतेच्या पुनर्प्राप्तीच्या मृगजळात जगत राहतील, धार्मिक भ्रामक चेतनेला शरण जात राहतील आणि धार्मिक कट्टरपंथी व नफेखोर भक्षकांचे शिकार बनत राहतील.