‘द काश्मीर फाइल्स’: काश्मिरी पंडितांची शोकांतिका दाखवण्याच्या नावाखाली मुस्लिम आणि डाव्यांविरुद्ध द्वेष वाढवण्याचा हिंदुत्ववाद्यांचा डाव

मूळ हिंदी लेखाचे लेखक:आनंद सिंह
अनुवाद:जय

उत्तर प्रदेशसह चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपच्या विजयानंतर संघ परिवाराची संपूर्ण फॅसिस्ट यंत्रणा आता विवेक अग्निहोत्रीच्या ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पंतप्रधान मोदींनी चित्रपटाच्या निर्माता, दिग्दर्शक आणि मुख्य कलाकारांची भेट घेतली. एवढेच नाही तर हा चित्रपट चर्चेत रहावा म्हणून मोदींनी भाजपच्या बैठकीत या चित्रपटाला बदनाम करण्याच्या षडयंत्राचा उल्लेख केला. गृहमंत्री अमित शहा यांनीही चित्रपटाच्या टीमची भेट घेतली. जास्तीत जास्त लोकांना चित्रपट पाहता यावा म्हणून भाजपशासित राज्यांनी चित्रपट करमुक्त केला आहे. संघ परिवाराचे कार्यकर्ते आणि त्यांचे चेलेचपाटे विविध शहरांतील सिनेमागृहांमध्ये चित्रपट प्रदर्शनाच्या माध्यमातून हिंदुत्वाचा विषारी द्वेषपूर्ण राजकीय प्रचार करत आहेत. स्पष्टपणे हे सर्व विचारपूर्वक आखलेल्या रणनीती अंतर्गत केले जात आहे ज्याचा समाजावर तसाच परिणाम होणार आहे जसा नाझी जर्मनीमध्ये ‘द इटर्नल ज्यू’ सारख्या ज्यू-विरोधी प्रोपगंडा चित्रपटांचा झाला होता.

काश्मीर प्रश्नाच्या इतिहासाच्या सर्व पैलूंशी परिचित असलेल्या कोणत्याही व्यक्तीला हे सहज समजू शकते की या चित्रपटात अर्धसत्य आणि संपूर्ण असत्य यांची सरमिसळ करत काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि स्थलांतराच्या शोकांतिकेला काश्मीर समस्येच्या संपूर्ण संदर्भापासून वेगळे करत एका स्वतंत्र समस्येच्या स्वरुपात प्रस्तुत केले आहे. पण या चित्रपटाची सर्वात धोकादायक बाब म्हणजे काश्मिरी पंडितांची शोकांतिका दाखवण्याच्या आड संघ परिवाराचा मुस्लीम आणि कम्युनिझमविरोधी अजेंडा अतिशय उघड आणि अश्लील स्वरूपात समोर आणला गेला आहे, जो कमी ऐतिहासिक व राजकीय जाणीव असलेल्या कोण्याही व्यक्तिमध्ये काश्‍मीर समस्येबद्दल विवेक निर्माण करण्याऐवजी द्वेष आणि राग निर्माण करण्याचे काम करतो.

चित्रपट पाहिल्यानंतर सिनेमागृहातून बाहेर पडलेल्या लोकांच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रसिद्ध करून द्वेष आणि संताप वाढवला जात आहे. यातील बहुतेक प्रतिक्रियांमध्ये चित्रपट पाहिल्यानंतर लोक रडताना आणि भावनिक टिपणी करताना दिसत आहेत. काश्मिरी पंडितांची शोकांतिका दाखवून लोकांमध्ये नकारात्मक भावना आणि राग भरणे हा चित्रपटाचा उद्देश आहे. पण काश्मिरी पंडितांच्या शोकांतिकेची कारणे जाणून घेण्यासाठी कुणी कुतूहलाने चित्रपट पाहायला गेला तर त्याच्या हाती मात्र निराशाच येईल. चित्रपटात काश्मिरी पंडितांची समस्या आणि शोकांतिका भारताच्या स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या काश्मीर समस्या आणि शोकांतिकेचा भाग म्हणून दाखवण्याऐवजी ती स्वतंत्र समस्या म्हणून मांडण्यात आली आहे. चित्रपटात याचा अजिबात उल्लेख नाही की स्वातंत्र्यानंतर काश्मिरींनी इस्लामच्या आधारावर पाकिस्तानात सामील न होण्याचा निर्णय घेतला होता. काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याच्या आश्वासनापासून भारतीय राज्यसत्तेने तोंड फिरवणे, भारतीय राज्यसत्तेचे बळजबरीचे आणि अलोकशाही वर्तन यामुळे काश्मीर समस्या अधिकच वाढत गेली, ज्याच्या परिणामी काश्मीर खोर्‍यातील मुस्लिम लोकसंख्येचा दुरावलेपणा सतत वाढत गेला आहे. काश्मिरी मुस्लिम समुदायामध्ये भारतीय राज्यसत्तेविषयी वेगळेपणाची भावना असूनसुद्धा 1980 च्या दशकाच्या उत्तरार्धापूर्वी त्यांच्यामध्ये अल्पसंख्याक काश्मिरी पंडित लोकसंख्येच्या विरोधात पूर्वाग्रह भलेही असतील, परंतु द्वेष आणि हिंसाचारसारखी परिस्थिती नव्हती. अशी परिस्थिती निर्माण होण्यास 1980 च्या दशकात घडलेल्या काही महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घटना कारणीभूत होत्या.

11 फेब्रुवारी 1984 रोजी, भारत आणि पाकिस्तानच्या कब्ज्यात असलेल्या काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र लढ्याचा लोकप्रिय नेता मकबूल बट्ट याला तिहार तुरुंगात फाशी देण्यात आली. या घटनेने काश्मिरी तरुणांमध्ये असंतोष वाढवण्याचे काम केले. जुलै 1984 मध्ये इंदिरा गांधींनी फारुख अब्दुल्ला यांचे सरकार उलथून टाकले, त्यामुळे खोऱ्यात पुन्हा एकदा असंतोष निर्माण झाला. श्रीनगरमध्ये 72 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात आली होती. पण 1986 मध्ये फारुख अब्दुल्ला यांनी तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्याशी करार केला आणि ते पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले. मार्च 1987 मध्ये जम्मू आणि काश्मीर विधानसभेच्या निवडणुका झाल्या ज्यामध्ये नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसने युती केली. या निवडणुकांमध्ये प्रचंड हेराफेरी झाली. विरोधी मुस्लिम युनायटेड फ्रंट (MUF) ची काश्मीर खोर्‍यात प्रचंड लोकप्रियता असूनही निवडणुकीतील हेराफेरीमुळे ते विधानसभेत जागा मिळवू शकले नाहीत. या निवडणुकांमधील धांदलीनंतर काश्मिरी तरुणांच्या मोठ्या संख्येचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडाला आणि मोठ्या संख्येने तरुणांनी बंदुका हातात घेतल्या. ह्यानंतरच काश्मीरमधील सशस्त्र संघर्ष प्रभावी स्वरूपात समोर आला. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ज्या नेत्यांनी नंतर दहशतवादाच्या मार्गावर जाण्याचा निर्णय घेतला त्यांनी 1987 च्या निवडणुकीत भाग घेतला होता आणि निवडणुकीतील हेराफेरीमुळे त्यांचा भ्रमनिरास झाला. 1986 मध्ये स्थापन झालेल्या इस्लामिक स्टुडंट्स लीगचे चार प्रमुख सदस्य – अब्दुल हमीद शेख, अशफाक माजिद वानी, जावेद अहमद मीर आणि यासिन मलिक – ज्यांना हाजी ग्रुप म्हणतात, त्यांनी MUF च्या समर्थनात निवडणूक प्रचार केला होता. अगदी हिजबुल मुजाहिद्दीनचा प्रमुख सय्यद सलाहुद्दीन ज्याचे खरे नाव मोहम्मद युसूफ शाह आहे, त्याने 1987 च्या निवडणुकीत MUF चा उमेदवार म्हणून भाग घेतला होता. 1987 च्या निवडणुकीतील प्रचंड हेराफेरीनंतर, काश्मीरमध्ये जे जनतेचे आंदोलन झाले त्यामागे गेल्या 40 वर्षांचा चुकीचा कारभार, आर्थिक गोंधळ, बेरोजगारी आणि भ्रष्टाचार ही प्रमुख कारणे होती. 1988 मध्ये वीज दरवाढीच्या विरोधात झालेली निदर्शने दडपून टाकल्याने काश्मीर खोऱ्यातील लोकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला होता. त्याच वर्षी मकबूल बट्टच्या स्मृतीदिनी पोलिसांनी काश्मिरी स्वातंत्र्याच्या समर्थकांवर अंदाधुंद गोळीबार केला होता. हा तोच काळ होता जेव्हा पाकिस्तानने अमेरिकेच्या मदतीने अफगाणिस्तानात सोव्हिएत युनियनविरुद्ध लढण्यासाठी प्रशिक्षित मुजाहिदीनना  काश्मीरमधील जिहादसाठी पाठवण्यास सुरुवात केली आणि काश्मीरच्या स्वातंत्र्यलढ्याला इस्लामिक कट्टरतावादी रंग देण्याची धूर्त खेळी केली, ज्यामुळे काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या लढ्याला नुकसान तर पोहोचलेच शिवाय त्याने अल्पसंख्याक काश्मिरी पंडितांविरुद्ध द्वेष पसरवण्यात मोठी भूमिका बजावली.

या संदर्भाशिवाय 1989-90 मधील काश्मिरी पंडितांच्या हत्या आणि त्यानंतरच्या त्यांच्या स्थलांतराला समजताच येऊ शकत नाही. पण ‘द काश्मीर फाईल्स’चा उद्देश हे स्पष्ट करण्याचा नसून लोकांच्या नसांत द्वेषाचे विष पसरवणे हा आहे. त्यामुळेच या चित्रपटात काश्मीरचा हा समकालीन इतिहास पूर्णपणे गायब करण्यात आला असून, इतिहासाच्या नावाखाली काश्मीरच्या प्राचीन इतिहासाच्या वैभवाच्या आणि मध्ययुगीन सरंजामी मुस्लिम राज्यकर्त्यांच्या रानटीपणाच्या कहाण्या मांडण्यात आल्या आहेत, ज्याचा वर्तमान काश्मीर समस्या आणि काश्मिरी पंडितांच्या स्थलांतराशी काहीही संबंध नाही. ( मध्‍यकाळातही अशी एखादी घटना घडल्याचा प्रामाणिक स्त्रोत नाही. विवेक अग्निहोत्री यांनी या घटनेचा संदर्भ संघी स्त्रोतांमधून घेतला आहे) चित्रपटातील संपूर्ण वर्णन ‘हिंदू धोक्यात आहे’ आणि ‘इस्लाम कट्टरतावादीच आहे’ या संघाच्या प्रचाराशी सुसंगत आहे.

या चित्रपटात संपूर्ण काश्मिरी मुस्लिम लोकसंख्येला एक एकजिनसी समूह म्हणून चित्रित केले आहे, ज्यामध्ये सर्व काश्मिरी मुस्लिम पात्रे एकतर काश्मिरी पंडितांच्या रक्ताची तहानलेली आहेत किंवा त्यांची संपत्ती हडपण्याची इच्छा बाळगत आहेत किंवा त्यांच्या स्त्रियांवर वाईट नजर टाकत आहेत. मुस्लिम मुले पाकिस्तान क्रिकेट संघाचे समर्थक आहेत, मुस्लिम महिला पंडितांना रेशन मिळू नये म्हणून रेशन डेपोत संपूर्ण धान्य ताब्यात घेतात. मुस्लिम शेजारी पंडित पळून जाण्याची वाट पाहतात जेणेकरून ते त्यांची मालमत्ता ताब्यात घेऊ शकतील. मौलवींची वाईट नजर पंडितांच्या स्त्रियांवर असते. जेव्हा 1990 मध्ये पंडितांविरुद्धचा द्वेष शिगेला पोहोचला होता, तेव्हा काश्मिरी मुस्लिम लोकसंख्येमध्ये अशा लोकांची उपस्थिती आणि अशा काही घटना नाकारता येत नाहीत कारण अशा घटनांच्या काही आठवणी आहेत, परंतु त्या काळातील ज्या सर्व आठवणी, रिपोर्ट्स आहेत ज्यात काश्मिरी पंडितांच्या आठवणींचाही समावेश आहे, त्यातून हेसुद्धा समोर येते की अनेक काश्मिरी मुस्लिमांनी पंडितांना वाचवले होते आणि पंडितांनी खोरे सोडावे अशी त्यांची इच्छा नव्हती. परंतु ‘द काश्मीर फाइल्स’मध्ये असे एकही मुस्लिम पात्र नाही जे पंडितांच्या पलायनाने दु:खी झाले आहे. कारण स्पष्ट आहे की असे पात्र असल्‍याने द्वेषाचा प्रभाव थोडा कमी झाला असता.

चित्रपटात अतिशय हुशारीने हे सत्यही पूर्णपणे लपवून ठेवण्यात आले आहे की ज्या काळात काश्मिरी पंडितांवर हल्ले होत होते त्या वेळी अनेक काश्मिरी मुस्लिमांनासुद्धा लक्ष्य करण्यात आले होते ज्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेसच्या नेत्यांव्यतिरिक्त मीरवाईज मोहम्मद फारूख सारखे अनेक मवाळ फुटीरतावादी नेते आणि सामान्य काश्मिरी मुस्लिमही सामील होते. पाकिस्तानसमर्थक इस्लामिक कट्टरपंथीयांच्या निशाण्यावर ते सर्वच होते जे काश्मीरला पाकिस्तानात विलीन करण्यास विरोध करत होते, मग ते भारताच्या दृष्टिकोनातून विरोध करत असो किंवा काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या दृष्टिकोनातून विरोध करत असो. दहशतवादाच्या काळात काश्मिरी पंडितांपेक्षा अनेक पटींनी काश्मिरी मुस्लिमांचा मृत्यू झाला. परंतु विवेक अग्निहोत्रीने हे सत्य दाखवायला सुरुवात केली तर ते मुस्लिमांविरुद्ध द्वेष कसा पसरवू शकतील आणि काश्मीरच्या समस्येला हिंदू विरुद्ध मुस्लीम लढाई कशी दाखवू शकतील!

चित्रपटातील एका दृश्यात जेएनयूमध्ये जेव्हा प्रा. राधिका मेनन काश्मीरमध्ये भारतीय लष्कराने केलेल्या अत्याचाराबाबत चर्चा करताना काश्मीरमध्ये सापडलेल्या 7000 हून अधिक अज्ञात कबरींचा संदर्भ देतात तेव्हा चित्रपटाचे मुख्य पात्र लगेच बोलतो की ‘व्हाट अबाऊट बट मजार’? जेव्हा प्रा. बट मजार म्हणजे काय असे विचारते तेव्हा तो सांगतो की दल तलावात एक लाख काश्मिरी हिंदूंना बुडवून मारले गेले. इतके लोक मरण पावले की त्यांच्या जानव्यांचेच 7 मोठे ढिग तयार झाले. हे दृश्य व्हाटअबाउटरीच्या विशिष्ट संघी शैलीचे उदाहरण आहे. त्यात चतुराईने मध्ययुगीन काळातील एक प्रसंग सध्याच्या काश्मीरमध्ये झालेल्या अत्याचाराविरुद्ध मांडला जातो आणि त्याचा काळ मुद्दाम सांगितला जात नाही जेणेकरून असे वाटावे की अशा घटना आधुनिक काश्मीरमधील पंडितांच्या बाबतीत घडल्या आहेत आणि लोकांचे हृदय काश्मिरी मुस्लिमांविरुद्ध द्वेषाने भरून जावे.

चित्रपटात हे सत्यही धूर्तपणे लपवण्यात आले आहे की ज्या काळात काश्मिरी पंडितांवर अत्यंत घृणास्पद गुन्हे घडले, त्या काळात दिल्लीत व्ही.पी. सिंग यांचे सरकार होते जे भाजपच्या पाठिंब्याशिवाय एक दिवसही टिकू शकले नसते. मात्र काश्मिरी पंडितांवरील अत्याचाराच्या मुद्द्यावरून भाजपने सरकारचा पाठिंबा काढून घेतला नाही. चित्रपटात तो काळ अशा रीतीने मांडण्यात आला आहे जणू काही त्या वेळी राजीव गांधींचे काँग्रेस सरकार होते. यातून दिसून येते की चित्रपट निर्मात्याचा हेतू सत्य दाखवण्याचा नसून संघ परिवाराचा प्रोपगंडा पसरवण्याचा आहे.

व्ही.पी सिंग यांचे सरकार 2 डिसेंबर 1989 रोजी सत्तेत आले आणि 8 डिसेंबर रोजी काश्मिरी अतिरेक्यांनी त्या सरकारमधील गृहमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांची मुलगी रुबिया सईद हिचे अपहरण केले. भारत सरकारने गृहमंत्र्यांच्या मुलीच्या सुटकेच्या बदल्यात 5 अतिरेक्यांची सुटका केली, ज्यानंतर काश्मीर खोऱ्यात अतिरेक्यांचे वर्चस्व वाढले आणि काश्मिरी पंडितांच्या हत्यांमध्ये मोठी वाढ झाली. 18 जानेवारी 1990 रोजी फारुख अब्दुल्ला यांच्या सरकारने राजीनामा दिला आणि कुख्यात जगमोहन यांची काश्मीरमध्ये दुसऱ्यांदा राज्यपालपदी नियुक्ती झाली. अनेक काश्मिरी पंडितांसह अनेक पत्रकार आणि विश्लेषकांचा असा दावा आहे की जगमोहनने स्वतः काश्मिरी पंडितांना खोऱ्यातून बाहेर पडण्यास सांगितले आणि त्यांच्या सुटकेसाठी वाहने देखील दिली जेणेकरून त्यांना खोऱ्यातील सुरक्षा दलांचा निर्दयीपणे वापर करण्याचे निमित्त मिळेल. हे विवेचन वादग्रस्त असले तरी जगमोहन यांच्या कार्यकाळात काश्मिरी पंडितांना सुरक्षित वातावरण मिळू शकले नाही आणि त्यामुळे पंडितांना स्थलांतर करावे लागले हे निश्चित. त्यावेळी जम्मू आणि काश्मीरमध्ये तैनात असलेले वरिष्ठ नोकरशहा वजाहत हबीबुल्ला यांनी लिहिले आहे की खोऱ्यातील अनेक मुस्लिमांनी त्यांच्याकडे काश्मिरी पंडितांचे पलायन थांबवण्याची विनंती केली होती, ज्यानंतर त्यांनी जगमोहन यांना दूरदर्शनच्या प्रसारणाद्वारे काश्मिरी पंडितांना खोरे न सोडण्यास सांगण्याची विनंती केली. पण तसे करण्याऐवजी जगमोहन यांनी जाहीर केले की जर काश्मिरी पंडितांनी खोरे सोडले तर त्यांची व्यवस्था निर्वासित छावणीत केली जाईल आणि सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांचे पगार मिळत राहतील. पंडितांना खोऱ्यातील सुरक्षिततेची खात्री देण्याऐवजी त्यांच्या स्थलांतराला चालना देण्यात जगमोहनची असलेली भूमिकाही चित्रपटात पूर्णपणे झाकण्यात आली आहे. तसेच 19 जानेवारी 1990 रोजी श्रीनगरमध्ये काश्मिरी पंडितांवर झालेले हल्ले आणि त्यांच्या विरोधात द्वेषाने भरलेल्या घोषणांचे तपशीलवार चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे, परंतु त्यानंतर दोन दिवसांनी श्रीनगरमधील गौकदल पुलाजवळ सीआरपीएफने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 50 काश्मिरींना आपला जीव गमवावा लागला होता आणि तेव्हापासून खोऱ्यातील वातावरण आणखी खराब झाले होते हे वास्तव लपवून ठेवले आहे.

मुस्लिमांव्यतिरिक्त, ‘द काश्मीर फाइल्स’द्वारे पसरवलेल्या द्वेषाचे दुसरे प्रमुख लक्ष्य डावे आहेत. या चित्रपटात पल्लवी जोशीने जेएनयूमधील प्राध्यापिका प्रो. राधिका मेननची भूमिका साकारली. पल्लवी जोशीने तिच्या एका मुलाखतीत म्हटले आहे की, तिने हे पात्र अशा प्रकारे साकारले आहे की लोक त्याचा तीव्र द्वेष करतील. या प्रोफेसरला देशाविरुद्ध काम करणार्‍या एक कुटील व्यक्तीच्या रूपात चित्रित करण्यात आले आहे, जो आपल्या विद्यार्थ्यांचे ‘ब्रेनवॉश’ करतो आणि त्यांना भारताविरूद्ध काम करण्यास प्रेरित करतो. ती तिच्या खुल्या वर्गात काश्मीरच्या स्वातंत्र्याबद्दल बोलते आणि तिचे विद्यार्थी भारताचे विभाजन करण्याचे नारे देतात. हा 2016 मधील जेएनयू प्रकरणाचा संघी दुष्प्रचार आहे जो विवेक अग्निहोत्रीने अतिशय निर्लज्जपणे दाखवला आहे. 

इतकंच नाही तर संघ परिवाराकडून पसरवल्या जात असलेल्या ‘डावे-जिहादी संगनमताचं’ खोटं कथनही या चित्रपटात हास्यास्पद पद्धतीने मांडण्यात आलं आहे. प्रोफेसर राधिका तिचा विद्यार्थी कृष्णाला काश्मिरी दहशतवादी बिट्टा कराटेला भेटायला पाठवते. बिट्टाच्या घरात एक चित्र दाखवले आहे ज्यात बिट्टाने राधिकाचा हात धरला आहे. या दृश्याची प्रेरणा अरुंधती रॉय आणि यासिन मलिक यांच्या छायाचित्रातून घेतली गेली आहे जे काही वर्षांपूर्वी संघींनी निर्लज्जपणे व्हायरल केले होते. विवेक अग्निहोत्रीसह संपूर्ण संघ परिवाराचे स्त्रीविरोधी चरित्रही या दृश्यातून समोर येते. यातून दोघांचे खूप जवळचे नाते दाखवण्यात आले आहे जेणेकरून प्रेक्षक स्वातंत्र्याबद्दल बोलणाऱ्या डाव्यांचा तिरस्कार करू लागतील. जेएनयू अध्यक्षपदाची निवडणूक लढण्याबद्दल बिट्टा कृष्णाचे अभिनंदन करतो आणि बाहेर पडताना त्याच्या हातात पिस्तूल देतो. जेएनयूच्या माध्यमातून चित्रपट निर्मात्याने संपूर्ण डाव्यांबद्दल लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. प्रेक्षकांच्या मनात हा संबंध ठरवण्यासाठी मार्क्स, लेनिन आणि माओ इत्यादींच्या प्रतिमा JNU च्या दृश्यांच्या पार्श्वभूमीत ठळकपणे मांडण्यात आल्या आहेत.

मुख्य पात्रातील बिट्टा कराटे आणि यासिन मलिक या पात्रांना चतुराईने चित्रपटात मिश्रित करण्यात आले आहे जेणेकरून प्रेक्षक काश्मिरी फुटीरतावाद्यांचा रानटी आणि दांभिक माणूस समजून पराकोटीचा द्वेष करतील. एकीकडे बिट्टा 20 हून अधिक पंडितांच्या हत्येची कबुली देतो, तर दुसरीकडे गांधीवादी पद्धतीने स्वातंत्र्य चळवळ सुरू करण्याबद्दल आणि डाव्यांसोबत हातमिळवणी करून भारताविरुद्ध कट रचतो. या चित्रपटात इतिहासाशी प्रतारणा करत, 2003 मध्ये काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील नदीमार्गात झालेल्या काश्मीरी पंडितांच्या हत्याकांडाला 1990 च्या दशकातील काश्मिरी लोकांच्या स्थलांतराच्या निरंतरतेमध्ये दाखवले गेले आहे आणि त्याला सुद्धा JKLF च्या बिट्टा कराटे याने घडवले असे चित्रण केले आहे. सत्य हे आहे की नदीमार्ग हत्याकांड हे जेकेएलएफचे काम नव्हते तर लष्कर-ए-तोयबाचे काम होते. अशाप्रकारे इतिहासाशी दगाबाजी करून काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या सर्व संघटनांना आणि सर्व व्यक्तींना ‘हैवान’ संबोधून प्रेक्षकांच्या मनात द्वेष निर्माण करण्याचा चित्रपट निर्मात्याचा हेतू आहे. चित्रपटाच्या शेवटच्या दृश्यात नदीमार्ग गावातील सर्व काश्मिरी पंडितांना रांगेत उभे करून प्रत्येकाला एकामागून एक गोळी मारण्याचे भीषण दृश्य दाखवण्यात आले आहे आणि शेवटी बालकाची निर्घृणपणे हत्या केली जात असल्याचे दृश्य दाखवले गेले आहे, जेणेकरून प्रेक्षकांनी चित्रपट बघून संपूर्ण काश्मिरी मुस्लीम लोकसंख्येच्या विरोधात द्वेषाची भावना घेऊन बाहेर पडावे.

या चित्रपटातील अनुपम खेर यांच्या भूमिकेचे खूप कौतुक होत आहे. पण या व्यक्तिरेखेद्वारेही नरेंद्र मोदींना काश्मिरी पंडितांचा मसिहा म्हणून दाखवण्याच्या संघाच्या खोटेपणाचा नमुना चित्रपट निर्मात्याने चतुराईने मांडला आहे. पुष्कर नाथ नावाच्या या पात्राने खोऱ्यातून स्थलांतर केल्यानंतर काश्मीरमधून कलम 370 हटवणे हा त्याच्या जीवनाचा एकमेव उद्देश बनवला आहे. मोदी सरकारने काश्मीरमधून कलम 370 हटवल्याने काश्मिरी पंडितांना न्याय मिळाला आहे, असा भ्रम प्रेक्षकांच्या मनात निर्माण करणे हाच हे दाखवण्याचा उद्देश आहे. सत्य हे आहे की अनुपम खेर सारख्या श्रीमंत काश्मिरी पंडितांनी कलम 370 रद्द केल्यानंतर आपली राष्ट्रवादी छाती फुगवली असली तरी हजारोंच्या संख्येने जे गरीब काश्मिरी पंडित अजूनही छावण्यांमध्ये राहण्यास भाग आहेत त्यांच्या जीवनात कलम 370 रद्द केल्याने कोणताही फरक पडला नाही. स्थलांतराचा खरा त्रास सहन करणार्‍या या काश्मिरी पंडितांना खरा न्याय तेव्हाच मिळू शकेल जेव्हा काश्मीरमध्ये अशी परिस्थिती निर्माण होईल जेणेकरून काश्मिरी पंडित खोऱ्यातील त्यांच्या घरी परत जाऊ शकतील. पण सत्य हे आहे की मोदी सरकारच्या धोरणांनी खोऱ्यातील वातावरण बिघडवून पंडितांच्या हिताच्या विरोधात सुद्धा काम केले आहे.

परंतु काश्मिरी पंडितांच्या जीवनाशी निगडीत हे कटू सत्य विवेक अग्निहोत्रीसारख्या संघी प्रचारकाने दाखवावे अशी अपेक्षा करणे निरर्थक आहे.