मुंबई मध्ये विषारी दारु पिण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या 87 लोकांच्या मृत्युस जबाबदार कोण?

मुंबई मध्ये विषारी दारु पिण्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या 87 लोकांच्या मृत्युस जबाबदार कोण? 

विराट 

Photo source http://www.bbc.com/news/world-asia-india-33212006

Photo source http://www.bbc.com/news/world-asia-india-33212006

मुंबई मधील मालाड़ पश्चिम मधील एका झोपड़पट्टी मध्ये बुधवारी (17 जून) सकाळ पासून आतापर्यन्त विषारी दारू पिल्यामुळे 87 लोक मृत्युमुखी पडल्यामुळे सबंध प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे. आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली असून 8 पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. विषारी दारू पिल्यामुळे एका पाठोपाठ एक लोक सरकारी दवाखान्यात मृत्युमुखी पडत आहेत. मृत्युमुखी पडलेले वा जीवन-मृत्युशी संघर्ष करणारे जवळपास सर्व लोक काबाडकष्ट करून पोट भरणारे कष्टकरी आहेत.त्या वस्तीवर आता मरणकळा पसरली आहे.

ही काय पहिलीच वेळ आहे जेव्हा विषारी दारू पिल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर माणसे मृत्युमुखी पडली आहेत? दररोज होणारे मृत्यु गृहीत न धरतासुद्धा विषारी दारू पिल्यामुळे इतक्या मोठ्या संख्येने माणसे मृत्युमुखी पडण्याची ही काही पहिली घटना नाही. मुंबई मधील विक्रोळी मध्ये 2004 मध्ये 100 हुन जास्त, उत्तर प्रदेशात प्रथम सप्टेंबर 2004 मध्ये आणि ह्या वर्षी जानेवारीतील दोन्ही घटनांमध्ये मिळून 70 हुन अधिक लोकांचा मृत्यु झाला. 2011 मध्ये पश्चिम बंगाल मध्ये जवळपास 170, 2009 मध्ये गुजरात मध्ये 100 हुन अधिक माणसांचा विषारी दारू मुळे मृत्यु झाला. प्रत्येक वेळी प्रशासनाचा दृष्टिकोण सारखाच राहिला आहे; अशा घटने नंतर काही लोकांना अटक केली जाते, काही अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या जातात वा त्यांना निलंबित केले जाते आणि काही काळानंतर अशा घटना विस्मृतित जातात.

तेव्हा प्रश्न उभा राहतो की ह्या निरपराध लोकांच्या मृत्युला जबाबदार कोण आहे? ज्यांना अशा घटनांनंतर अटक होते त्या व्यक्तीच जबाबदार असतात का? काही अधिकाऱ्यांना निलंबित करून किंवा त्यांच्या बदल्या करून अशा घटना नियंत्रणात आणता येतील काय?  वारंवार घडणाऱ्या अश्या घटना काय कोणता संकेत देत आहेत? सत्य हे आहे की अशा घटनांना ही मानवद्रोही व्यवस्था जबाबदार आहे, जिच्या साठी गरीब कष्टकरी जनतेची किंमत अत्यंत कमी आहे आणि जी व्यवस्था माणसाला नफ़ा कमवण्याचे साधन मात्र समजते.

Photo source http://www.bbc.com/news/world-asia-india-33212006

Photo source http://www.bbc.com/news/world-asia-india-33212006

प्रशासनाला अशा धोकादायक अवैध्य दारु भट्टयांची कल्पना नसते? झोपड़पट्टयांमध्ये पोलिसांच्या गाड्या दिवस रात्र चक्कर मारत असतात. हे पोलिसवाले ह्या भागात चकरा तिथे कायदा व्यवस्था कायम करण्यासाठी मारत नसतात तर स्थानिक छोटे व्यापारी आणि कारखानदार यांच्या साठी भाडोत्री गुंडांसारखे काम करतात. सर्व अपराध, सर्व बेकायदेशीर कामे पोलिसांसमक्ष होत असतात आणि हे सर्व धंदे पोलिस, नगरसेवक-आमदार-खासदार आदींचे खीसे गरम करूनच केले जातात. निशंकपणे आपण म्हणू शकतो अशा अवैध्य दारु भट्टयांबद्दल प्रशासनाला पूर्ण कल्पना असते. दारु अधिक परिणामकारक करण्यासाठी त्यात मेथानोल आणि कित्येक वेळा पेस्टीसाइडसुद्धा उपयोगात आणले जातात. अशा दारुच्या गुणवत्तेचे काही निश्चित मानकं नसतात आणि तिची लॅबोरेटरी चाचणी सुद्धा होत नाही, त्यामुळे अशा दारुमध्ये ह्या धोकादायक पदार्थांची मात्रा कमी जास्त होत रहाते. ह्या दारुमध्ये ह्या विषारी पदार्थांची मात्रा कमी असली तरी अशा दारुच्या निरंतर सेवानामुळे डोळे ख़राब होण्यासारखे धोके तर कायम असतातच. ह्या विषारी पदार्थांचे प्रमाण जर जास्त असेल तर काय होते, हे ह्या घटनेच्या निमित्ताने समोर आलेच आहे.

आपल्या समाजाचे हे कटु सत्य आहे की जेव्हा एखाद्या कष्टकरी माणसाला दिवस-रात्र काबाड़कष्ट, मेहनत करावी लगाते त्याच वेळी त्याचे अमर्याद अमानवीकरण होत जाते आणि दारु वा अन्य व्यसने त्याचे  जीवनातील भयंकर अनिश्चितता, दैन्य आणि शारीरिक वेदना विसरण्याचे साधन बनतात. आपल्या समाजात अश्या मूर्खांची कमी नाही जे कष्टकरी जनतेच्या दुःखाचे कारण त्यांच्या बचत न करण्याच्या आणि सर्व कमाई दारु मध्ये उडवण्याच्या मानसिकते शोधतात. खरी गोष्ट ह्यांच्या एकदम उलट असते आणि ते व्यसनाधिन होतात त्याचे कारण त्यांच्या जीवनातील असंख्य समस्यांमध्ये लपलेले असते. जे लोक गरीब-कष्टकऱ्यांच्या बचत न करण्याच्या प्रव्रुत्तीला त्यांच्या सर्व समस्यांचे कारण मानतात, त्यांना विचारले गेले पाहिजे की एक माणूस 5000-8000 रुपयांच्या एकूण कमाई मधून किती रक्कम बचत करू शकतो?  जे 1000-1500 रुपये ते व्यसनामध्ये उडवतात त्याची बचत करून ते सुखी संपन्न जीवन व्यतीत करू शकतात काय? इथे व्यसनाची अनिवार्यता किंवा त्याचे समर्थन केले जात नसून समाजातील एका अशा वस्तुस्थिती कड़े लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे की एका मानवद्रोही समाज व्यवस्थेमध्ये कशा प्रकारे गरिबांसाठी व्यसने हे दररोजच्या समस्यांमधुन क्षणिक सुटका करून घेण्याचे साधन बनतात. ज्या व्यवस्थेमध्ये प्रत्येक वस्तुचे रूपांतर क्रयवस्तु मध्ये केले जाते त्या व्यवस्थेत जगणे हलाखीचे झालेल्या गरीबांच्या व्यसनाच्या गरजेचे सुद्धा क्रयवस्तु मध्ये रूपांतर केले जाते. गरीब कामगार वस्त्यांमधला स्वस्त दारुचा हा व्यवसाय कष्टकरी जनतेच्या ह्या अगतिक गरजेच्या माध्यमातून नफ़ा कमवण्याच्या नफेखोर मानसिकतेवर आधारलेला आहे. नफ्याच्या ह्या आंधळ्या हव्यासाचे बळी नेहमीच गरीब-कष्टकरीच असतात. ही घटना काही अनोखी घटना नसून नफ्याच्या आंधळ्या हव्यासासाठी केल्या जाणाऱ्या हत्येच्या न थांबणाऱ्या घटनांच्या मलिकेतली अजुन एक कड़ी आहे.