किचाट – सुदेश जाधव यांची कथा
किचाट
सुदेश जाधव
शमीची आज लवकर सकाळ झाली, पण खूपच उशीर झाला असावा इतक्या घाईत ती सगळं आटपत होती. जिथे वर्दळ जास्त होती तो रस्ता तिला उजेड व्हायच्या आत स्वच्छ करायचा होता, जेणेकरून येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर धूळ उडू नये. कारण जितके कपडे स्वच्छ, तितकी माणसं डाग लागण्याला घाबरून असतात. बाकीच्या गावातल्या गल्ल्या आणि सार्वजनिक उकीरडे ती दिवसभरात स्वच्छ करणार होती. आपल्या गावात मुख्यमंत्री आणि सुप्रसिद्ध नटी येणार या धुंदीतच ती सैल झालेल्या झाडवा करकचून बांधू लागली. काल झालेल्या ग्रामपंचायतीच्या सभेत एकही माणूस स्वच्छता करावी म्हणून उभा राहिला नाही. शमीने मोठ्या धिराने ते काम स्वत:कडे घेतलं. अख्ख्या गावाच्या नाकावर टिच्चून. सभा झाल्यानंतर खटारा रिक्षातून केवढ्या मोठ्यामोठ्याने घोषणा! स्वच्छता अभियान गाजत होतं. त्याहीपेक्षा मुख्यमंत्री आणि नटी येणार याचाच गाजावाजा होत होता. जणू मुख्यमंत्री फडच घेऊन गावात उतरणार आहे. या सगळ्याची नवलाई तिच्या चेहऱ्यावर दाटली होती. सगळी जबाबदारी आपल्या स्वत:ची असंच तिला वाटायला लागलं. निदान आपण मुख्यमंत्र्याच्या आणि झालंच तर नटीच्या नजरेतसुद्धा येऊ. हे सगळं चित्र तिच्या खंगत गेलेल्या शरीरात एक वेगळीच ऊर्जा निर्माण करत होतं. नेहमीपेक्षा आज तिचा चेहरा हसरा वाटत होता. जणू काही बऱ्याच वर्षांनी आपल्याला हवं असलेलं काम मिळालं होतं. शमीची मुलगी सोना सहा वर्षांची. मळकट फ्रॉक. दोन दिवसांपूर्वी लाल रिबीनीने बांधलेल्या केसांच्या दोन वेण्या. काळीसावळी. एकंदरित चटकन कुणाचंही लक्ष न जाणारी. पण शमीचं लक्ष गेलं. ठिगळं पडलेली गोधडी सोनानं अंगावर घेतली होती. उशीरापर्यंत सोना झोपलेली शमीला आज चालणारं नव्हतं. तिच्या मदतीने गाव स्वच्छ करायचा होता. म्हणून शमी सोनावर खेकसली.
सोने, ए सोने, उठ लवकर. बापासारखी पसरून झोपू नकोस. उठ.
सोनाच्या अंगावरची गोधडी शमीने ओढली. तशी सोना जागी झाली. आणि जागच्या जागी डोळे पेंगवत शमीची बडबड ऐकत राहिली. शमीने सोनाच्या हाताला धरलं, बाहेर नेलं आणि गारठलेलं पाणी सोनाच्या तोंडाला लावलं. सोनाची झोप चांगलीच उडाली. शमीने आपल्या पदराने सोनाचं तोंड पुसलं. सोना मग चुलीजवळ येऊन हाताचे तळवे गरम करून तोंडाला शेक देऊ लागली. तिला बरं वाटायला लागलं होतं. कोंबडे गारठलेल्या बसक्या आवाजाने ओरडायला लागले होते. सोनाच्या हातात एक झाडू देऊन शमी पुढे, आणि सोना तिच्या मागे पाय घासत चालू लागली. शमी वैतागली.
‘‘चल ग पटापट. जडावू नकोस. अन्नांच्या गौंडाकडनं पातेरा उडवत ये.’’
सोना भराभर त्या अंधारातनं चालू लागली. जणू कैक वर्ष हा रस्ता तिच्या पावलांनी मळलेला असावा. उजेड व्हायच्या आत दोघींनी जास्त कचरा असलेल्या जागा स्वच्छ करून घेतल्या. जवळजवळ निम्मा गाव स्वच्छ केल्यावर सोनाच्या पोटात कावळे ओरडायला लागले. शमीने शिव्या हासडत हासडत शेवटी पाच वाजेपर्यंत सगळा पसारा आवरला. तोपर्य़ंत सोनाच्या भूकेची माती झाली होती. अख्खा गाव स्वच्छ करून सोना, शमी घरी चालल्या. अगदी काळोख व्हायला आला, आणि अशा दिवेलागणीच्या वेळी शमीचं घर सोडता सगळ्या घरांत दिवे मिणमिणत होते. शमी घराजवळ आली. तंगड्या पसरून झोपलेल्या सदाकडे पाह्यलं, थुंकली आणि आत गेली. तिच्या पाठोपाठ सोनाही गेली. नेहमी ठरल्याप्रमाणे सदाची उजळणी घ्यायला शमीने सुरुवात केली.
‘‘भाड्याला दुसरं काम काय हाय, हा… दिवसभर ढोसायची अन् आंड लोळवत बसायचं. घरात काळोख पडला तरी मेल्याला कसली सुध्या नाय. पासली पड म्हणू मेल्या.’’
बापाचा उद्धार ऐकता ऐकता सोना झोपून गेली. तिला न जेवताच झोपलेली पाहून शमी अजून चवताळली.
‘‘तीनसांझची झोपू नको, खा आणि मग झोप.’’
भात आणि सुकटीचं कालवण शमीनं चुलीवरून उतरलं. ताटं लावायला घेतली.
‘‘सोने, हे ठेव जा बापसाच्या फुड्यात. गिळ म्हणावं. दमला असंल दिवसभर बुड गरम करून.’’
सोनानं मुकाट बोलानं सदाच्या फुड्यात ताट ठेवलं. सदानं गुपचुप चॉकलेट काढून सोनाच्या हातावर टेकवलं. सोनानं ते फ्रॉकच्या खिशात चटकन ठेवलं आणि जेवायला येऊन बसली. सोनाचं जेऊन झालं. बापाच्या पुढ्यातलं रिकामं ताट आणून ठेवलं. अंगावर घेऊन झोपून गेली. शमी कालवण भाताच्या टोपातच ओतून खायला लागली. सोनाकडे पाहात एकेक घास तोंडात टाकू लागली. तिची नजर सोनाकडे होती, पण पाहात होती तो उद्याचा दिवस… मुख्यमंत्र्यासमोर माझं आणि सोनाचं नाव… सोनाला शाबासकी. अख्ख्या गावासमोर आपलं नाव घेतील. हिरोईनपण आपल्याला ओळख दाखवील. पेप्रात फोटू येईल काय? अजून काय काय घडंल उद्या? अजून बरंच काही रंगवता रंगवता पुढ्यातलं जेवण कधी संपलं तिचं तिलाच कळलं नाही. सगळं आटपून सोनाच्या बाजूला येऊन पडली. डोळा लागायच्या आत नेहमीप्रमाणे अंगणाकडचा दरवाजा उघडून सदाकडे पाह्यलं. कसलीच चिंता नाही, अशा अवस्थेत झोपलेला पाहून दरवाजा लावला आणि सोनाच्या बाजूला येऊन पडली. आज थकलेली असूनसुद्धा तिचा डोळा लागत नव्हता. फाटक्या छपराच्या छिद्रातून बराच वेळ उद्याचा दिवस बघत होती. हळूहळू दिवसभराचा थकवा डोळ्यांवर जाणवू लागला. उद्याच्या दिवसाची रंगत भरता भरता ती झोपी गेली.
शमीला जेव्हा सकाळी जाग आली, तेव्हा कोंबड्यांचं ओरडणं थांबलं होतं. ठिगळं पडलेल्या छपरातून उन्ह घरभर पसरलं होतं. पण सोनाला त्याचा काहीएक फरक पडत नव्हता. ती साखरझोपेत होती. शमीने भराभरा आटपायला घेतलं. सोनाला शिव्या हासडत नेहमीप्रमाणे उठवलं. दोघींचं जेमेतेम आटपत आलं होतं. सोना आज किरमीर करत नव्हती. आजचा दिवस रंगवता रंगवता शमी खूष होती. तिच्या डोळ्यांत आज वेगळीच चमक दिसत होती. मोजक्याच दिवशी घालायचा, सोनासाठी अजून नवीन असणारा जुना फ्रॉक, मळक्या साडीच्या बोचक्यातून शमीने काढला. मागच्या शिमग्यात धुवून ठेवलेली तीन वर्षांपूर्वीची साडी स्वत:साठी काढली. ग्रामपंचायतीत आज चार वाजताच देवाच्या उत्सवाची गाणी सुरू झाली होती. कार्यकर्त्यानी पताके लावायला रात्रीपासूनच सुरुवात केली होती. ग्रामपंचायतीपासूनचा अर्ध्या गावाचा परिसर पताक्यांनी फडकत होता. कार्यकर्त्यानी मुद्दामहून जास्त करून भगव्या रंगाचे पताके लावलेले. सकाळी आठ वाजता बँजो पार्टीवाले, खालूबाजेवाले आणि घोषणा ठोकणारे मस्तीतच आले होते. गावात जत्राच भरल्यासारखी वाटत होती. मुख्यमंत्री येणार, हिरोईन येणार म्हणून.
सदा घराच्या बाहेरच झोपल्याने त्याला हा सगळा गोंगाट झोंबू लागला. ‘‘रांडेच्या आणि दलालाच्या लग्नाची तयारी करतायत. गावकऱ्यांच्या हातात केळं देऊन जातील बघा. मग बसा सोलवत’’, असं म्हणून परत झोपी जायचा. पण झोप येईना. शेवटी तोही आता उठून बसला. रात्री अर्धवट पिऊन ठेवलेली बिडी परत पेटवून सगळा वर्दळीचा किचाट पाहू लागला. आतमध्ये शमी आणि सोना तयार होत्या. बऱ्याच दिवसांनी लोकांच्यात मिसळण्याचा योग आला होता. घराबाहेर पडताना शमीने सदाकडे न पाहता त्याच्या उशीजवळ चहाचा कप ठेवला आणि सोनाला म्हणाली, ‘‘जेवण करून ठेवलंय, जेवून घे म्हणावं’’. त्यांचा नट्टापट्टा पाहून सदा हसला. सोनाला जवळ बोलावून दोन रुपये हातावर ठेवले. सोना शमीच्या मागोमाग चालू लागली. त्या दिसेनाश्या होईपर्यंत सदा त्यांच्याकडे पाहात राह्यला. स्वत:शीच हसून चहाचा कप तोंडाला लावला. शमी आणि सोना ग्रामपंचायतीजवळ आली. पाहते तर अफाट गर्दी. मासिक सभेपेक्षा दहा पटीने लोक अगदी झाडून आलेले होते. कधी नव्हे त्या मुलांचं कारण सांगून प्रत्येक कामातून अंगं काढून घेणाऱ्या बाया आज पोरांना कमरेवर घेऊन उभ्या होत्या. काठीच्या आधारावर खेळणाऱ्या म्हाताऱ्या आज पहिल्यांदाच ग्रामपंचायतीजवळ पानसुपारीच्या पिशव्या काढून गप्पा रंगवत होत्या. शाळेत जाणारी पोरं. नुकत्याच तारुण्यात पदार्पण केलेल्या पोरी कोणीही पाहात नसताना कोणीतरी पाहातंय असा आव आणत लाजत मुरडत एकमेकींच्या नव्या ड्रेसची पाहाणी करत उभ्या होत्या. मुख्यमंत्र्याच्या पक्षातले कार्यकर्ते लाल टिक्का लावून – काही दाढी वाढवलेले, काही सफेद कपडे घातलेले – माज दाखवत फोड येईस्तोवर घोषणा देत होते. पक्षात नसणारे शेपूट घातल्यावाणी शांत पण सहभागी असल्यासारखे उभे होते. स्पीकरवाल्याने ‘‘जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे इश्वर गाणं’’ फुटलेल्या खरखरत्या कण्र्यावर जोरात लावलं होतं. एकीकडे बँजो पार्टी, तुताऱ्या, खालुबाजे, सनई. नुसता उत्सव नव्हे, जत्रा भरली होती, मुख्यमंत्र्याच्या आणि नटीच्या स्वागतासाठी. एवढ्या सगळ्या वर्दळीतून शमी सोनाचा हात धरून एकेकाला कोपराने मागे सारत ग्रामपंचायतीच्या मंचाजवळ पोचली. पण मंचापासून जरा लांबच उभी राहिली. मंचाच्या तोंडाजवळ तोंडाला पावडर थापून आलेल्या बाया स्वागतासाठी आरतीची ताटं धरून उभ्या होत्या. ग्रामपंचायतीच्या नोटीस बोर्डवर स्वच्छता अभियानाची कार्यक्रम पत्रिका आणि इंग्लिशमधून चुकीचं ‘वेलकम’ लिहिल होतं. शोभा यावी म्हणून शाळेतल्या पोरानं काढलेलं न ओळखता येणारं फूल.
नऊ वाजल्यापासून लोकांची वर्दळ जास्तीच वाढली होती. कार्यकर्त्याना चांगलाच घाम फुटला होता. घामामुळे कपाळावरच्या टिक्क्यांचा वरघळ अगदी तोंडापर्यंत आला होता. बायांच्या मेणबत्त्या दुसऱ्यांदा संपल्या. त्या पेटवण्याचा तिसरा राउंड होता. गजरे सुकत चालले होते. तोंडावरची पावडर केव्हाच उडाली होती. मुख्यमंत्री साहेब आणि नटी केव्हाही येऊ शकतात या आदरापोटी बिचाऱ्या झक मारून प्रतिष्ठित नवऱ्यांच्या मानासाठी उभ्या होत्या. शमी एवढ्या गर्दीत असून नसल्यासारखीच उभी होती. जितकं पुढे सरकता येईल, तितकं पुढे सरकत होती. सोना कंटाळली होती. पण जाणवू देत नव्हती. गावचा पोलिस पाटील, सरपंच आणि स्वत:ला उद्योगपती समजणारे, स्वत: मोठे असल्याचा आव आणणारे लोक, आरतीचं ताट धरून उभ्या असलेल्या बायकांचा कोमेजून गेलेला थाट नव्या जोमाने पाहात होते. काही लोकांनी शमीला चेहऱ्यावर नुसतं पाणचट हसू आणून ओळख दाखवण्याचा प्रयत्न केला. बाकी जणं आपापल्या नादात होते. शमी त्या घोळक्यात ‘सूट’ होत नव्हती. पण तिला तसं बोलणारं आणि तिथून बाहेर काढणारं असं कोणीच नव्हतं.
दहाबारा गाड्या धुरळा उडवत आल्या. एका मागोमाग एक. फांदी पडायची वाट पाहणारे बँजोवाले, तुताऱ्यांवाले, खालूबाजे, सनईवाले, रक्त उसळल्यागत तुटून पडले. स्पीकरवाल्याने तर डेसिबल नावाचा प्रकारच मोडला. फटाक्यांची फॅक्टरी फुटल्यासारखीच वाटायला लागली. घाम फुटलेल्या बायांनी, कोणी रुमालाने तर कोणी पदरानेच तोंडावरचा घाम पुसला. पदर डोक्यावर धरून ओवाळणीसाठी पुन्हा नव्याने आपापल्या नवऱ्यांच्या चेहऱ्याचं दर्शन घेऊन उभ्या राहिल्या. शमी अगदी टक लावून पाहात होती. मुख्यमंत्री आणि नटीसोबत हातात बंदुका आणि काही दांडके घेऊन चालत येणारा घोळका पाहात होती. पण जमावाचा सगळा कटाक्ष हिरोईनीला झेलावा लागत होता. मेकअप लावून गोरीपान, अर्धी उघडी छाती, चकचकणाऱ्या अर्ध्या उघड्या मांड्या… पण लोक मात्र डोळे फाडून तिच्या पूर्ण शरीराचं काल्पनिक चित्र रंगवत लाळ आतल्या आत गिळत उभे होते. मुख्यमंत्री आणि हिरोईन मंचाच्या तोंडाजवळ आरतीचं ताट धरून उभ्या असलेल्या बायांपर्यंत पोचले. बायांची एकच धांदल. कोण ओवाळणार पहिलं! शेवटी निर्णय झाला आणि सरपंचाच्या बायकोनं मान पटकावला. बघता बघता मुख्यमंत्र्याचं कपाळ लाल झालं. हिरोईनला एलर्जी असल्याचं सांगितल्यामुळे नुसतं तोंडासमोरून ताट फिरवण्यात आलं. शमी हे सगळं पाहात होती. टिव्हीवर पाहिलेल्या नटीला प्रत्यक्षात बघून आपण जगातली सगळ्यात सुंदर गोष्ट पाहात असल्याचं समाधान सोनाच्या चेहऱ्यावर दिसत होतं. सगळा गोतावळा आता नियोजनाप्रमाणे मंचाकडे गेला. मंचावर खुच्र्यांपेक्षा माण्सं जास्त झाली. बाकीचे मंचावर कोपऱ्याकोपऱ्यात मुख्यमंत्र्याचे नातलगच असल्यासारखे उभे होते. मुख्यमंत्र्याने हात वर करताच कुत्री शांत बसावी तसा गोंधळ शांत होत जिथल्या तिथे आपली जागा घेऊन बसला. सरपंचाने प्रास्ताविकाला सुरुवात केली. प्रास्ताविक म्हणजे आपण केलेली गावातली कामं – रम्याला दारुतून कसं सोडवलं, रुक्मिणीच्या नवऱ्याला रातोरात डॉक्टरकडे कसं नेलं, जरी तो जगला नाही तरी रुक्मिणीला दिलेला आसरा, कंपनीला गावात येण्यास आपण बंदी घातली, मुख्यमंत्र्यांना मतं मिळावी म्हणून आपण कशा चपला झिजवल्या! हे कैकदा ऐकलेलं भाषण ग्रामस्थ आज नव्याने मुख्यमंत्र्यासोबत ऐकत असल्यामुळे एकदोनदा टाळ्या वाजल्या. एवढं सगळं सांगता सांगता सरपंचाला ठसका लागला. मुख्यमंत्र्याने जवळचीच मिनरल वॉटरची बॉटल सरपंचाच्या समोर केली. सरपंचाने दोन घोट पित असतानाच सूत्रसंचालकाने भाषण संपलं असं घोषित केलं. सरपंचाच्या ठसक्यामुळे त्याच्या धुमसणाऱ्या गोष्टी तशाच आतल्या आत गोठून गेल्या, हे चेहऱ्यावर किंचित दिसलं. प्रत्येक जण येऊन भरभरून बोलत होता. पण स्वच्छता अभियानासंबंधी कोणीही चकार शब्दसुद्धा काढत नव्हतं. मुख्यमंत्री आता चेहऱ्यावर पाणचट हसू आणून समोर बसलेल्या लोकांना ऊर्जा देण्याचा प्रयत्न करत होता. हिरोईन लाकडाच्या खुर्चीच्या ढेकणांना चुकवण्यात वेळ घालवता घालवता लालेलाल झाली होती. जवळजवळ दीड तासाच्या भाषणांनंतर पोलिस पाटलाने स्वच्छतेचा विषय छेडला. शमीची धडधड वाढू लागली. तिला वाटलं आपलं नाव घेईल, आपलं नाव घेईल! शेवटी पोलिस पाटीलही लायनीवर आला, हगंदारीवर बोलून नव्या शौचालयाची मागणी करून खुर्चीवर येऊन बसला. हिरोईनीच्या आणि मुख्यमंत्र्याच्या बुडाला आता कढ येऊ लागले होते. पण उठता येईना. चेहऱ्यावरचं पाणचट हसूही आता गायब झालं होतं. शमीला आता हळूहळू कळायला लागलं, परवा ग्रामसभेत झालं ते सगळं नाटक होतं. सभेतल्या सगळ्या लोकांनी आपल्याला घातलेली भुरळ, आपला सत्कार होईल म्हणून लोकांनी दिलेली खोटी आशा आता तिला पूर्ण कळली होती. बऱ्याच वेळानं मुख्यमंत्र्याला बुड मोकळं करण्याची संधी मिळाली. मुख्यमंत्री उठला आणि भाषण बोलायला लागला – पहिला स्वत:चा स्ट्रगल, मग विरोधी पक्षावर टीका, थोड्या वेळानं आश्वासनांचा गारवा आणि सरतेशेवटी या गावाला स्वच्छता अभियानाचा पुरस्कार आणि दोन लाख रूपये देणगी म्हणून देण्याचं घोषित केलं. पुन्हा फटाके, खालुबाजा, तुताऱ्या, बँजोपार्टीवाले रक्त उसळल्यागत बडवायला लागले. मुख्यमंत्र्यांनी हिरोईनकडे पाह्यलं आणि हजार शब्द आपल्या पोटातच गोठवून भाषण थांबवलं!
थोड्या वेळानं गावचा सरपंच उठला, गहिवरून आलेल्या आवाजात मोठमोठ्या शब्दांनी मुख्यमंत्र्यांना सजवलं. दोन लाखापेक्षा जास्त किंमती शब्द मुख्यमंत्र्यांच्या पायावजवळ आदळत आपटत म्हणाला, ‘‘साहेब, तुम्ही आलाव, आमचा गाव पावन झाला. आता आमची आणि गाववाल्यांची एकच इच्छा हाव, आपला आणि मॅडमचा हातात झाडू धरून फोटो काढायचा. आणि या फोटोचा बॅनर आम्ही बारा गावात लावू, कारण उद्याच्या पिढीला स्वच्छेतेचा मतलब तुमच्याकडूनच कळेल, आणि तुम्ही आमच्यासाठी आदर्श ठराल. तुमच्या बॅनरकडे बघून सगळ्या माणसांना हुरूप येईल.’’ शेवटचा हुंदका देऊन, नमस्कार म्हणून सरपंच जागेवर जाऊन बसला. सरपंचाने मुख्यमंत्र्याला चांगलंच गोचीत टाकलं होतं. झक मारून करावंच लागणार! मुख्यमंत्र्यानं हिरोईनकडे पाह्यलं. हिरोईननं मुख्यमंत्र्याकडे. मुख्यमंत्री लाचार होत काहीतरी नुसतं नजरेनं बोलला. बाई तयार झाली.
लग्नाची व्हिडिओ बनवणारा फोटोग्राफर तालुक्यावरून आणला. हिरोईन मेकअपसाठी गर्दीतून गाडीत गेली. फोटो काढायचा म्हणून कचरा तरी हवाच. नाहीतर तो फोटो नुसताच लग्नात काढल्यासारखा होईल. पण गावात इतका कचरा नव्हताच. गावाबाहेरच्या वेशीवरून तिघेचौघे तो सिमेंटच्या फाटक्या पिशवीतून पंधरा मिनिटात गाडीवरून घेऊन आले. सगळी तयारी झाली. जवळजवळ दोन तासांनी मेकअप करून मॅडम बाहेर आल्या. कपडे बदललेले होते. मघापेक्षा कपडे कमी झाले होते. मुख्यमंत्री साहेब आले. पहिले हिरोईनचे फोटो काढण्यात आले. हातात झाडू आणि मादक पोज. फोटो काढता काढता कॅमेरावाला मात्र हलत होता. वेगवेगळ्या एंगल्सनी फोटो काढण्यात आले. मुख्यमंत्री बिचारा ओटीभरणीसाठी राहिल्यागत वाकून उभा राहून फोटो काढून घेतो होता. मग दोघांचे एकत्र फोटो काढले गेले. झाला. जवळजवळ एक तासाचा कार्यक्रम झाला. मग उत्सव पुन्हा सुरू झाला. वाजवणारे पुन्हा तुटून पडले. कार्यकर्ते नाचता नाचता लावलेले पताके आपल्या गळ्यात घालून नाचू लागले.
मुख्यमंत्री आणि हिरोईनची गाडी धुरळा उडवत केव्हाचीच दिसेनाशी झाली. आणि प्रत्येक जण निरोप घेऊ लागला. नाचणारे दुपारच्या उन्हाने मंद होत गेले. गर्दी हळूहळू कमी होत गेली. सरपंचाने जाता जाता शमीकडे पाह्यलं आणि म्हणाला, ‘‘शमे बघ, आजच्या कार्यक्रमामुळे लोकांनी कचरा केला. तेवढं जरा उद्या बघ.’’ सरपंच हसला आणि निघून गेला.
शमी तिथेच बसून राहिली होती. सोना गाढ झोपेत शमीच्या मांडीवर डोके ठेवून होती. दूरदूरपर्यंत धुरळा उडाला होता. तो उन्हातून चांगलाच चमकत होता. फटाक्यांचा धूर अजून रेंगाळत होता. पताक्यांच्या लांबलांब रांगा मधूनच तुटल्या होत्या. क्वचितच रांगा जशा होत्या तशा धुळीत मिसळत होत्या. कागदी कपटे, फरसाणाच्या खाऊन टाकलेल्या डिश, प्लास्टिकची ग्लासं, उन्हात चांगलेच तापून गेले होते. ते पाहून शमीला रडूच फुटायचं बाकी होतं – साधं आपलं नावसुद्धा नाही घेतलं. प्रत्येक जण आपापल्या घरी जाणार. उत्सव झाला म्हणून चांगलं चोपडं जेवणार. उरलंसुरलं गवरावर फेकणार. ती सगळी घाण आपण साफ करायची. तेही अवघ्या शंभर रुपयासाठी. तेही मिळतील न मिळतील… मनात राग सलत गेला. सोनाला उठवलं. दोघीही घराच्या दिशेने भराभरा चालू लागल्या. शमी आजुबाजूला कचरा किती पडलाय हे पाहात पाहात निघाली. दोघीही घरी पोहोचल्या. सदा बाहेर नव्हता. घर उघडलं. सोना जाऊन झोपली. दोघीही जेवल्या आणि शमीने सोनाच्या बाजूला अंग टाकलं. तिचा काही केल्या डोळा लागत नव्हता – भिक्कारचोट माण्सं. गाव स्वच्छ कोण करणार. ग्रामपंचायतीच्या सभेला विचारलं तर एकही माणूस तयार झाला नाही. मी एवढ्या माण्सांमधून उठून बोलले, मी करणार. मग मात्र भर सभेत गांडीवरले हात काढून टाळ्या वाजवल्या. सत्कार होईल, फोटो काढू. अजून बरंच काही. अर्धा तास नुसता यातच गेला होता. पण आज यातलं काही झालंच नाही. साधं नावसुद्धा कोणी आपलं काढलं नाही भाड्यानी. मंत्र्याचे आणि उघड्या बुडाच्या नटीचे हातात झाडवा घेऊन फोटो काढले. उद्या मोठमोठे बॅनर लागणार. वरती या भडव्या कार्यकर्त्याचे अभिनंदनाचे हात जोडून टिळा लावलेले फोटो असणार… असं स्वत:च धुमसत राहिली. सोना म्हणाली, ‘‘आये आपला फोटो का नाही काढला?’’ शमीने तिच्याकडे पाह्यल. काहीच बोलली नाही. पिठ मळताना सगळा राग काढत होती. बाहेर सदाचा आवाज येत होता. खूप प्यायला होता. ‘‘आयझवाडीचे कधी गावाकडे बघतात का… रांड आणून फोटो काढून गेले. दोन लाख रुपये देणार. मुख्यमंत्र्याचा घ्या हातात.’’ शमीलाही बरं वाटत होतं. पण ती घाबरली. कुणी ऐकलं तर! बाहेर गेली. ‘‘ऐ मेल्या गप्प बस. मेला जगू देणार नाय आम्हांला.’’
जेवणं झाली. शमी सोनाच्या बाजूला येऊन झोपली. पुन्हा उठून सदा झोपला का पाहायला गेली. सदा जागेवर नव्हता. तिने दरवाजा लावला आणि येऊन झोपली. कार्यकर्त्यानी धावपळ करून जिवाचा आटापिटा करून सगळ्या घरातल्या लाइटी जायच्या आत बॅनर तयार केले होते. मंत्र्याचे आणि हिरोईनचे सगळे फोटो बॅनरवर झाडू काढताना झळकू लागले. बॅनर रातोरात गावभर लावले. मोठमोठे बॅनर पाहून सदा अजूनच शिव्या देऊ लागला. अगदी मध्यरात्री येऊन आपल्या जागेवर झोपला. सकाळी शमी उठली. थोडं उजाडलंच होतं. सोनाला घेऊन कालची पडलेली घाण साफ करून तिला दुसऱ्या कामाला जायचं होतं. ग्रामपंचायतीजवळ गेली तेव्हा बराच गोंधळ उडाला होता. एवढी गर्दी कसली? शमीला आश्चर्य़ वाटलं. थोडं पुढं होऊन पाह्यलं आणि उडालीच. मुख्यमंत्र्याच्या आणि हिरोईनच्या तोंडावर गू फासला होता! तिच्या डोळ्यासमोर सदा दिसला. तिने पटकन सोनाचा हात पकडला आणि दोघीही पटापटा झाडू मारायला लागल्या. कार्यकर्त्याची तोंडं लाल झाली होती. शिव्या हासडत हासडत गदारोळ चालू केला. आपल्या मुख्यमंत्र्याच्या तोंडाला गू फासला, त्यामुळे ते अजूनच चवताळले होते. बॅनर बघण्यासारखा नव्हता तरीही पुन्हा पुन्हा तिथे पाहून शिव्या हासडत होते. शमीने कचरा साफ करण्याची घाई केली. सोनालाही घाई करायला सांगत होती. पण सोना मध्येच थांबली आणि त्या हिरोईनच्या गू फासलेल्या बॅनरकडे टक लावून पाहात राह्यली.
स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५