गाब्रिएल गार्सिया मार्केझ : वास्तवाचा मायावी चित्रकार
गाब्रिएल गार्सिया मार्केझ : वास्तवाचा मायावी चित्रकार
अक्षय काळे
मार्केझ आता आपल्यात नाहीत. गाब्रिएल गार्सिया मार्केझ म्हणजे इतिहासावर जादू करून कादंबरीत जीवनाच्या ताणतणावांचे धागे विणणारा वास्तवाचा कवी. या कादंबऱ्यांमध्ये लोक संघर्ष करतात, प्रेम करतात, हरतात, दडपले जातात आणि विद्रोह करतात. ब्रेष्टने म्हटले आहे की साहित्याने वास्तवाचे जसेच्या तसे चित्रण करायचे नसते तर पक्षधर लिखाण करायचे असते. मार्केझच्या कादंबऱ्यांमध्ये, प्रामुख्याने ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’, ‘ऑटम ऑफ दि पॅट्रियार्क’ व ‘लव्ह अॅण्ड दी अदर डेमन’मध्ये त्यांची लोकपक्षधरता स्पष्टपणे दिसून येते. मार्केझ यांच्या जाण्याने लॅटिन अमेरिकन साहित्यातील एक गौरवशाली युग समाप्त झाले आहे. त्यांच्या साहित्यिक कामगिरीचे मूल्यांकन अजून दीर्घ काळ होत राहील. त्यांच्या रचनांमध्ये जे वैविध्य आणि विस्तार आहे त्याचे चिकित्सक विवेचन एका लेखात केले जाऊ शकत नाही. परंतु या लेखामध्ये आपण मार्केझ यांच्या जाण्यानंतर त्यांचे स्मरण करताना त्यांच्या साहित्यसृष्टीचा एक संक्षिप्त आढावा घेणार आहोत. पुढे कधीतरी स्फुल्लिंगमध्ये विस्तारपूर्वक मार्केझ यांच्या साहित्यसृष्टीचे चिकित्सक विश्लेषण केले जाईल.
अनेक समीक्षकांच्या मते मार्केझची कादंबरी ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ने जागतिक पातळीवर ऱ्हासोन्मुख किंवा साचलेपणाने ग्रस्त कादंबरी लेखनात नवजीवनाचा संचार केला. पाश्चिमात्य वास्तववादी कादंबरी लेखनात विषयवस्तू अधिकाधिक स्वकेंद्रित होत चालली होती. तिच्या तुलनेत जादुई वास्तववादाचे क्षितिज बरेच विस्तृत होते व त्यामध्ये इतिहास आणि संस्कृतीची परिपूर्णता दिसत होती. लोकपक्षधरतेचा त्याग न करता कल्पनेच्या असीम भराऱ्यांसह जादुई वास्तववाद एक सर्वसमावेशक साहित्य बनून समोर आला.
विसाव्या शतकाचे पाचवे आणि सहावे दशक म्हणजे भांडवलशाहीच्या तथाकथित सुवर्णयुगाचा कालखंड. त्याशिवाय मार्शल योजनेचा लाभ घेऊन युरोप आणि जपानसुद्धा दुसऱ्या महायुद्धाच्या विद्ध्वंसातून व हानीतून बाहेर पडून नवरूप धारण करणाऱ्या भांडवलशाहीत आपली स्थिती बळकट करीत होते. या भांडवलशाहीच्या सुवर्णयुगातील अमेरिकन साहित्याचा, विशेषत्वाने कादंबरी लेखनाचा आढावा घेतल्यास असे लक्षात येते की या काळातील कादंबरी लेखन उपनगरीय नवधनाढ्य वर्गाच्या अतिविकृत इच्छांची दुर्गंधीयुक्त गरळ आणि स्वकेंद्रित अतितुच्छ उद्गारांचे चित्रण करीत होते. या कादंबऱ्या एका ‘कॉसी क्लॉस्ट्रोफोबिक’ कलेची रचना करतात ज्यांची श्रेष्ठतम व्याख्या अहंकेद्रित वास्तवाच्या रूपात केली जाऊ शकते. उदाहरणादाखल आपण अपडाईकची कादंबरी पाहू शकतो जिच्या केंद्रस्थानी बायकांची अदलाबदल (वाईफ स्वॅपिंग), आत्मग्लानी आणि एका विकृत ‘स्व’ची अभिव्यक्ती आहे. या प्रकारे नॉरमन मिलरची ‘दि नेकेड अॅण्ड दि डेड’ आणि नोबाकोबची ‘एडा’ आत्मव्यभिचाराकडे घसरताना दिसतात. जगातील सर्वांत शक्तीशाली देश अशा साहित्याचे सृजन करीत होता ज्याची अंतर्वस्तू भिकार आणि रूप करंटे होते. ब्रिटन आणि फ्रान्समध्येदेखील सॅम्युएल बेकेट यांच्यानंतर कादंबऱ्यांमध्ये उथळ, पोकळ आणि अत्ममग्न पात्रांची रेलचेल दिसून येते जी ‘स्व’च्या पलीकडे जाऊ शकत नाहीत व ज्यांच्यासाठी निकृष्ट वैयक्तिक इच्छांची पूर्तता हाच जीवनाचा केंद्रबिंदू आहे. कादंबरी लेखनाच्या या संकटग्रस्त शैलीला लॅटिन अमेरिकन लेखकांच्या रचनांमुळे मोकळा श्वास घेता आला. लॅटिन अमेरिकन लेखक केवळ कादंबरीचे सार आणि रूप यांनाच समृद्ध करीत होते असे नाही तर कादंबरी लेखनाच्या विविध पैलूंचादेखील ते विस्तार करताना दिसतात. आंखेल आस्तुरियास आपल्या ‘एल सेन्योर प्रेसिदेन्ते’ (सर प्रेसिडेंट) मध्ये, खुआन रूल्फो आपल्या ‘पेद्रो पारामो’मध्ये, आलेखो कार्पेंतियेर आपल्या ‘एल रेइनो दे एस्ते मुन्दो’ (दि किंगडम ऑफ दि वल्र्ड) मध्ये जनतेचा इतिहास, गुलामी, विद्रोह, प्रेम, संघर्ष यांचे चित्रण करीत होते. कलादृष्ट्या समृद्ध असलेले हे साहित्य लेखन स्वकेंद्रित नव्हते तर इतिहास आणि समाजाशी जोडलेले होते. या लेखकांनी आपल्या साहित्यिक अभिव्यक्तीसाठी वास्तव आणि फॅन्टॅसीच्या जैविक मिश्रणाचा प्रयोग केला. या कादंबऱ्यांमध्ये वास्तवाचे फोटोग्राफिक चित्रण नाही तर वास्तवाच्या दडलेल्या त्या विविध पैलूंची अभिव्यक्तीदेखील आहे जे समाजात घडणाऱ्या घटनांच्या खाली दबलेले असतात व साध्या डोळ्यांनी दिसत नाहीत. लॅटिन अमेरिकेचा इतिहास म्हणजे युरोपियन इतिहास, मूळ लॅटिन अमेरिकन इतिहास व आप्रिâकेची संस्कृती यांच्या संघर्ष व संगमाचा इतिहास आहे. एजटेक, माया व इंका संस्कृतीच्या काळाशी थांबलेल्या लॅटिन अमेरिकेचा सामना पुनरुज्जीवन व प्रबोधनाच्या काळातून गेलेल्या युरोपशी होतो. एकाचा विश्वदृष्टिकोन जादुई आहे आणि दुसऱ्याचा मानवता, तर्क आणि विज्ञानाने समृद्ध झालेला आहे. आफ्रिकादेखील बहुतांशी जादुई विश्वदृष्टिकोनाचाच वाहक आहे. दोन परस्पविरोधी विश्वदृष्टिकोनांची टक्कर आणि सिंम्मलन. या तीन संस्कृतींच्या सम्मिलनातून एका जटिल सामाजिक संरचनेची आणि समृद्ध साहित्य कला आणि संगिताची निर्मिती झाली. साम्राज्यवादाच्या दीर्घ कालावधीने अगोदर लॅटिन अमेरिकेच्या इतिहासाची नैसर्गिक गती अवरुद्ध केली व त्यानंतर, प्रामुख्याने अमेरिकन साम्राज्यवादाच्या काळात तख्तापलट, लोकविद्रोह आणि दमनाने येथील भूमी रक्तरंजित केली. या लोकविद्रोहांना व रक्तपाताला अधिकृत इतिहास लेखनाने गायब केले किंवा बदनाम केले. अशा इतिहासातून मार्गक्रमण केलेल्या आणि अजूनही करणाऱ्या समाजातील साहित्याला अभिव्यक्तीसाठी एका नव्या शैलीची गरज होती जी मखमली गालीचे आणि रेशमी पडद्यांआड दबलेल्या इतिहासातील घटनांना पुढे आणील, जीवनातील विकटता, कुरूपता, दुर्दशा, विजयाच्या आशेसह संघर्षांतील पराभव व त्यांतून निर्माण होणारे एकाकीपण व्यक्त करील. जादुई वास्तववादाने नव्या परिस्थितीतून निर्माण झालेली ही गरज कादंबरी लेखनात पूर्ण केली.
जादुई वास्तववाद म्हणजे वास्तववादी साहित्य लेखनाचीच एक शैली होय जिच्यामध्ये वास्तव आणि फॅन्टसी यांचे संश्लेषण होते, वास्तव आणि फॅन्टसीमध्ये सीमारेषा उरत नाही, दोन्ही एकमेकांमध्ये अशा प्रकारे मिसळून जातात की कादंबरीतील घटना आणि पात्रांच्या सामान्य जीवनाचे ते अंग बनून जाते. परंतु वाचकासाठी वास्तवात अशा घटनांची कल्पना करणे अशक्य असते. याच्या उदाहरणादाखल ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’मधील एका घटनेचा उल्लेख करता येईल. माकोन्दो (खोसे अर्कादियो बुएनदिया – बुएनदिया परिवाराचा संस्थापक – याने वसविलेले शहर) मध्ये एक भटक्यांची टोळी येत असते जिचा प्रमुख असतो मेलकियादेस. मेलकियादेस खोसे अर्कादियो बुएनदियाचा खूप चांगला मित्र असतो जो जगभरात होणाऱ्या वेगवेगळ्या आविष्कारांबद्दल त्याला माहिती देतो. मेलकियादेसनेच बुएनदिया घरण्याची पांडुलिपी तयार केलेली असते. आता माकोंदोमध्ये पुन्हा एकदा ही भटक्यांची टोळी आलेली आहे आणि खोसे अर्कादियो बुएनदिया मेलकियादेसला भेटू इच्छितो जेणेकरून त्याला आपल्या स्वप्नांचा अर्थ समजून घेता येईल. खोसे अर्कादियो बुएनदिया भटक्यांच्या टोळीमध्ये मेलकियादेसचा शोध घेत असतो. अशा वेळी वेगवेगळे कारनामे दाखविणाऱ्या भटक्यांपैकी एक जण आपल्याभोवती जमलेल्या गर्दीला उद्देशून म्हणतो की त्याच्यापाशी एक द्रव्य आहे जे पिताच तो वितळून जमिनीवर वाहून जाईल. हा भटक्या ते द्रव्य पितो आणि खरोखरच वितळून जातो. परंतु माकोंदोच्या लोकांना यात काही विशेष गंमत वाटत नाही व म्हणूनच ते तेथून निघून जातात कारण जेवढा रोमांच त्यांना अपेक्षित होता तेवढा त्यांना या प्रकारातून मिळालेला नसतो. ही घटना खोसे अर्कादियो बुएनदियासमोर घडते आणि तो या प्रकाराकडे बिलकूल लक्ष न देता आपला मेलकियादेसचा शोध सुरू ठेवतो. याच प्रकारे कादंबरीतील एक पात्र रेमेदियोस दी ब्युटी सदेह स्वर्गात उडून जाते, मउरिसियो बेबिलोनिया जेथे जेथे जातो तेथे तेथे त्याच्या भवती पिवळी फुलपाखरे उडत असतात. या साऱ्या गोष्टी माकोंदोच्या लोकांसाठी अगदी सामान्य घटना असतात व त्यांच्या दृष्टीने यात आश्चर्यकारक असं काहीच नसतं. परंतु त्याचबरोबर ज्या गोष्टी वाचकासाठी अगदी साधारण असतात त्या कादंबरीमध्ये अगदी असामान्य बनून जातात. उदाहरणादाखल एक लोहचुंबक. ही एक अगदी सामान्य वस्तू आहे परंतु जेव्हा मेलकियादेस लोहचुंबक घेऊन माकोंदोमध्ये येतो त्यावेळी तेथील लोकांसाठी ही अत्यंत आश्चर्यजनक बाब असते आणि त्यांना त्याची भीती वाटू लागते. अशा प्रकारे जादुई वास्तववादात वास्तव आणि फॅन्टसी अगदी सहज एकरूप होऊन जातात.
‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’ जादुई वास्तववादाची प्रातिनिधिक साहित्यकृती मानली जाते. ही कादंबरी म्हणजे बुएनदिया घराण्याच्या सात पिढ्यांचा इतिहास आहे जो अनेकार्थांनी लॅटिन अमेरिकेच्या इतिहासाचे प्रतिबिंब आहे. बुएनदिया घराण्याचे अस्तित्त्व सात पिढ्यांच्या कालवधीत समाप्त होते. खोसे अर्कादियो बुएनदियाने हे स्वप्न पाहिलेले असते की माकोंदोमध्ये मोठमोठी काचेची घरे असतील व त्यांमध्ये सर्व लोक असतील, नसतील ते फक्त बुएनदिया. या स्वप्नाचा अर्थ त्याला कळत नाही व तो कधीच त्याचा अर्थ समजू शकत नाही. वास्तविक बुएनदिया कुटुंब एक भांडवलादर वर्ग आहे आणि कोणत्याही वर्गिकृत, श्रेणीबद्ध समाजाला अखेरीस समाप्त व्हावयाचे आहे व त्यानंतर सर्व लोक निसर्गासोबत सामंजस्य प्रस्थापित करून राहतील जेथे मानव व निसर्गादरम्यान मैत्रिपूर्ण अंतर्विरोध असतील. या स्वप्नाचा अर्थ मेलकियादेस जाणतो परंतु त्याला हेही ठाऊक आहे की बुएनदिया कधीच हे समजू शकणार नाही कारण भांडवलदार वर्ग कधीच आपला विनाश समजू शकत नाही. मेलकियादेसकडे असलेल्या पांडुलिपीनुसार एका प्रचंड चक्रीवादळात माकोंदोचे अस्तित्त्व या पृथ्वीवरून नष्ट होईल. इतिहासाच्या एका अत्यंत अस्थिर, उलथापालथीच्या कालावधीतून मार्गक्रमण करूनच समाजवादी समाज अस्तित्त्वात येईल. माकोंदोचा प्रचंड विद्ध्वंस मार्क्सच्या शब्दांतील सर्व प्रागैतिहासिक काळाचा अंत दर्शवितो व मानवतेला ही आशा प्रदान करतो की एकांताच्या पैलूवर एकतेच्या पैलूचा विजय होईल व लोकांमध्ये मुक्त संबंध निर्माण होतील. मार्केझच्या या लिखाणाची व्याख्या ऐतिहासिक भौतिकवादी रूपातूनही केली जाऊ शकते.
‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’मध्ये एकांत आणि एकतेचे द्वंद्व कायम जाणवत राहते. बुएनदिया कुटुंबाचे पुरुष लोकआंदोलनांना नेतृत्त्व देण्याचा प्रयत्न करतात परंतु दर वेळी ते अयशस्वी ठरतात. हे अपयश त्यांना एकाकीपणात लोटते. प्रत्येक पिढीगणिक ते एकाकीपणात अधिकाधिक खोल घसरत राहतात. प्रत्येक पिढी कुंडलाकार गतीने आपल्या विनाशाच्या दिशेने पुढे सरकते. प्रत्येक पिढी आपल्या अगोदरच्या पिढीच्या चुका पुन्हा करताना दिसून येते परंतु वास्तवात परिस्थिती अधिकाधिक गुंतीगुंतीची बनत जाते, सामाजिक राजकीय ताणतणाव अधिक क्लिष्ट होत जातात, संघर्षाचा स्तर अधिक उन्नत होत जातो, मात्र तयारी पूर्वीसारखीच कमकुवत राहून जाते. उदारवादी आणि दक्षिणपंथी गटांदरम्यानच्या गृहयुद्धात या भांडवली कुटुंबाचे वंशज भाग घेतात. कर्नल अउरेल्यानो बुएनदिया उदारवादी गटाचे नेतृत्त्व करतो व पराभवानंतर अपमानजनक संधीवर हस्ताक्षर करतो. त्याचा पराभव आणि अपमानजनक संधी त्याला एकाकी बनवतात. त्यानंतर साम्राज्यवादी शक्तीच्या विरोधातील संघर्षातही हे कुटुंब राष्ट्रीय भांडवलदाराच्या रूपात नेतृत्त्व देण्यात अपयशी ठरते. अउरेल्यानो सेगुन्दो आणि पेत्रा कोतेस यांचा संबंध माकोंदोसाठी भाग्यशाली ठरतो. यामुळे उत्पादन तीव्र होते. अउरेल्यानो सेगुन्दो आणि पेत्रा कोतेसचा संबंध म्हणजे राष्ट्रीय भांडवलदार वर्गाच्या विकासाचे रूपक आहे. भांडवलाचा विकास अजून आदिम संचयाच्या टप्प्यातच होता. परंतु साम्राज्यवादी बनाना कंपनी या विकासाचा गर्भपात करते. साम्राज्यवादाच्या विरोधातील संघर्षात बुएनदिया घराणे पुन्हा एकदा नेतृत्त्व देण्यात अपयशी ठरते. अशा प्रकारे एकान्त आणि एकता (सॉलिट्यूड आणि सॉलिडॅरिटी) यांचे द्वंद्व कादंबरीत सतत सुरूच राहते. हा एकांत एखाद्या विशिष्ट व्यक्तीवर समाजातील विकृती आणि निराशेच्या पडलेल्या प्रभावातून निर्माण झालेला नाही तर हा एकांत लॅटिन अमेरिकेच्या कठिण इतिहासातून निर्माण झालेला आहे. लॅटिन अमेरिकेच्या या एकांताची अभिव्यक्ती ओक्तावियो पास आपल्या लॅबरिन्थ ऑफ सॉलिट्यूडच्या लेखांमध्येदेखील करतात.
मार्केझ एकांत आणि एकतेच्या द्वंद्वाच्या माध्यमातून मानवी भावनांची कोमलतम अभिव्यक्ती घटनांच्या त्याच लयबद्ध क्रमाने दर्शवितात. एकूण वृतांतात भावना आणि घटनांचा असा काही द्वंद्वात्मक ताळमेळ साधलेला असतो की ना भावना कंटाळवाण्या व अकारण लांबलचक भासतात ना त्यांतील घटना. सार्त्र म्हणाले होते की कला जेवढी जास्त परिष्कृत होत जाते तेवढीच ती सर्वहारापासून दूर जाऊ लागते. सार्त्र यांनी ही टिप्पणी अर्थातच सर्रिअलिस्ट आणि डाडाइस्ट कलेच्या संदर्भात केलेली होती. परंतु मार्केझ यांचे लिखाण परिष्कृत असूनही लोकपक्षधरदेखील आहे. त्यांच्या लेखनशैलीवर स्पेनी बरोक, विलियम फॉकनर, बोर्खेस व स्पेनी इतिहासलेखनाचा स्पष्ट प्रभाव दिसून येतो. जेथे अंतर्वस्तूच्या स्तरावर अतिशयोक्ती आहे तेथे रूपाच्या स्तरावर विलक्षण अचूकता आहे. विलक्षण सजगतेसह कादंबरी आणि कथेची संरचना घडवलेली आहे आणि तिला काव्यात्मक गद्याने अलंकृत केले गेले आहे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक तत्त्वांशी सखोल सांधा ही मार्केझ यांच्या अद्भुत कथाकथनाची सारवस्तू आहे. मार्केझ यांच्या लेखनात इतिहास आणि संस्कृतीच्या चेतनेची झलक दिसते जी त्यांच्या विषयवस्तूचा व्यापक विस्तार बनते आणि त्यांच्या लेखनात नवनव्या पैलूंना सामावून घेते.
आशिया-आफ्रिका-लॅटिन अमेरिकेच्या देशांमध्ये, विशेषत्वाने जेथे साम्राज्यवादी शासन दीर्घ काळ अस्तित्त्वात होते व त्यानंतर साम्राज्यवादाचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दबाव कायम होता अशा देशांमध्ये मानवी अस्तित्त्वाला छिन्नविच्छिन्न करणाऱ्या गुंतागुंतीच्या अंतर्विरोधांचे प्रगटीकरण करण्यासाठी अभिजात वास्तववादी लेखन पुरेसे नसते. त्यासाठी वास्तव आणि कल्पनेमधील भिंत नष्ट करावी लागते. परिस्थितीनुसार रूपातही बदल करणे आवश्यक बनते, नाहीतर संदर्भांना योग्य ओळख दिली जाऊ शकत नाही. भांडवलदार वर्ग आणि साम्राज्यवादी देश यांची भागिदारी सामान्य कष्टकरी जनतेचे शोषण व उत्पीडन करते. कष्टकरी जनता नारकीय परिस्थितीत जीवन कंठत असते व विद्रोह करताच जुलुमी दमनाची बळी ठरते व त्यानंतर विलक्षण सफाईदारपणे हे दमन इतिहासाच्या पानांमधून गायब केले जाते. त्या सत्याला अंधकारातून बाहेर खेचून काढण्यासाठी आत्म्याला थरारून सोडणाऱ्या लेखनशैलीची नितांत आवश्यकता असते. त्याशिवाय जेथे लोकांना शासक वर्गाच्या दृष्टिकोनातून विचार करण्याची सवय लावण्यात आलेली आहे तेथे कथासाहित्य इतिहासाचे प्रतिपाठ (काउंटर नेरेटिव्ह) बनून जाते. २१ जुलै १९२८ रोजी कोलंबिया शहरातील माग्दालेनामध्ये युनायटेड फ्रूट कंपनीच्या कामगारांनी कामाची अमानुष परिस्थिती, कामाच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या सुविधांचा अभाव, भयंकर शोषण आणि कमी मजुरीच्या विरोधात संप पुकारला. युनायटेड फ्रूट कंपनी अमेरिकेतील एक कंपनी होती व कोलंबियाच्या सेनेने या संपाचे दमन केले. संपाच्या दिवशी कित्येक लोक मारले गेले. अधिकृत दस्तावेजांनुसार मृतांची संख्या ४७ ते १०० होती. परंतु या नरसंहाराच्या घटनेबाबत शहरातील लोक अनभिज्ञ होते व त्यांना याबद्दल विचारताच त्यांचे उत्तर असायचे की २१ जुलै रोजी काहीच झाले नाही व युनायटेड फ्रूट कंपनीच्या काळात तर शहर विकास करीत होते! शासक वर्ग अत्यंत हुशारीने मौनाचे कारस्थान रचतो व घटनांचे अस्तित्त्वच नाकारतो. मार्केझने वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूडमध्ये या घटनेला आधार बनवून बनाना कंपनीच्या संपाचा प्रसंग रंगविला आहे. बनाना कंपनीत संप होतो, खोसे अर्कादियो सेगुन्दो कामगार युनियनचा नेता असतो. संपाच्या दिवशी नरसंहार होतो व कंपनीचे सगळेच्या सगळे कामगार, ज्यांची संख्या ३००० असते, मशिनगनने उडविले जातात. केवळ खोसे अर्कादियो सेगुन्दो, या नरसंहाराचा एकमेव साक्षीदार, बचावतो. कोलंबियाच्या लोकांसाठी अज्ञात असलेले इतिहासाचे हे तथ्य ‘वन हंड्रेड इयर्स ऑफ सॉलिट्यूड’मधून उजेडात आले. याच प्रकारे ‘ऑटम ऑफ दि पॅट्रियार्क’मध्येसुद्धा इतिहासाच्या अशाच अनेक घटना आहेत ज्यांबद्द्ल शासकवर्गाने मौन पाळले किंवा त्या दाबून टाकल्या.
भांडवली व्यवस्था रोज नव्या प्रसारमाध्यमांद्वारे लोकांची चेतना धूसर करते आणि भावनांना अश्मिभूत करून टाकते. लोकांमध्ये भयंकर परात्मभाव आणि विरक्ती पसरते. दररोज ही व्यवस्था पतनाच्या खोल दरीमध्ये घरंगळत जात असते, आजचे दुःस्वप्न उद्याच्या वास्तवात रूपांतरित होत असते. ‘ऑटम ऑफ दि पॅट्रियार्क’मध्ये एक घटना आहे जिच्यामध्ये मुलांना लॉटरीचे तिकिट काढण्यासाठी बोलावले जाते. ही रॉयल लॉटरी आहे व ती निष्कपट असल्याचे भासविण्यासाठी मुलांमार्फत ती काढली जाते. परंतु लॉटरी निष्कपट असूच शकत नाही व मुलांना हे ठाऊक असते. त्यामुळे राज्य २००० मुलांना गायब करते. आईवडिलांनी याचा प्रतिरोध करताच त्यांनादेखील तुरुंगात डांबले जाते. या मुलांना लपवून ठेवण्यासाठी देशाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत फिरविले जाते. परंतु यामुळे हुकूमशहालादेखील अडचणींना तोंड द्यावे लागते व शेवटी तो निर्णय घेतो की एक तर तो किंवा मुले! अर्थात, तोच राहू शकतो व त्या २००० गाणाऱ्या मुलांना डायनामाईटने उडवून दिले जाते. १९८२ मध्ये अल सल्वादोरमध्ये सेनेने लहान लहान मुलांना हवेत उडवून बंदुकीच्या संगिनीने भेदण्याचा रानटी खेळ केला होता. याच प्रकारे बनाना कंपनीने माकोंदोमध्ये ११ वर्ष पाऊस पाडला ज्यामुळे शहर उद्ध्वस्त आणि नष्ट झाले. अमेरिकेने विएनाम युद्धाच्या काळात विएनाम नष्ट करण्यासाठी नकली ढगांतून पाऊस पाडण्याची कारवाई केली होती. अशा थंड आणि धूसर चेतनेच्या समाजामध्ये हे सांगण्यासाठी की एक मृत्यू होणे हीसुद्धा एक विपदा आहे, वास्तवाला अतिशयोक्तीचा आधार घ्यावा लागतो. तेव्हाच शंभर मृत्यूंच्या कल्पनेने हादरून गेलेले वाचक एका व्यक्तीच्या मृत्यूबद्दलदेखील विचार करू लागतात.
अशा प्रकारे, अशा प्रकारच्या वास्तववादी लिखाणाची मागणी काळ करतो जे लोकांना आतून हेलावून सोडील, थरारून टाकील, जीवनाच्या विकट परिस्थितीबद्दल विचार करायला भाग पाडील. परंतु त्याच वेळी ते लेखन इतिहासाची चेतना आणि सामाजिक जाणीव यांनी समृद्ध असावे लागते. काफ्का आणि बेकेट यांच्या रचनादेखील समाजाच्या कुरूप वास्तवाची अभिव्यक्ती घडवितात परंतु त्यांच्या लेखनाचा आशय ‘स्व’पाशी येऊन थबकतो व व्यक्ती एका अंधकाराने, संकटाने आणि निराशेने भरलेल्या श्वास कोंडून टाकणाऱ्या बोगद्यात प्रवेश करते. तो बोगदा हळूहळू आक्रसत जातो. अर्थाची गती ‘स्व’पासून समाजाच्या दिशेने न होता समाजापासून ‘स्व’च्या दिशेने होते व त्यांतून घोर निराशा जन्म घेते. मार्केझच्या लेखनात अतिशयोक्ती असते व परिस्थितीतून निर्माण होणारा एकांत सामाजोन्मुख असतो जो विचार करायला भाग पाडतो. ही अतिशयोक्ती व्यक्तीमध्ये आत्मभय, नैराश्य निर्माण करीत नाही कारण ही अतिशयोक्ती लोककल्पनांशी बांधलेली असते जी इतिहासाच्या पानांमधून वास्तवाला जादुई लकाकी देऊन प्रस्तुत करते.
स्फुलिंग १ सप्टेंबर २०१४