‘‘महान संस्कृती’’च्या पुनर्स्थापनेसाठी!
‘‘महान संस्कृती’’च्या पुनर्स्थापनेसाठी!
नारायण खराडे
‘‘महान हिंदू संस्कृती’’ची पुनर्स्थापना करून हिंदू संस्कृतीच्या अलौकिक आत्मिक तेजाने सारे विश्व उजळून टाकण्याची अदम्य इच्छा बाळगणाऱ्या परंपरेच्या पाईकांमध्ये सध्या विलक्षण उत्साह संचारलेला आहे. गुजरातमध्ये आपली धर्मनिष्ठा पुरेपूर आणि वारंवार सिद्ध केलेला सच्चा हिंदू आता दिल्लीच्या तख्तावर विराजमान झाल्याने असे होणे स्वाभाविकच आहे. अर्थात, जेव्हा सत्ता हाती नव्हती तेव्हा ही रामाची वानरसेना अगदीच शांत आणि निष्क्रिय होती असे समजण्याचे कारण नाही. परंतु प्रतिकूल परिस्थितीत गनिमी डावपेच लढविणारी वानरसेना आता खुल्या मैदानात उतरून उघड युद्ध छेडण्याची तयारी करीत आहे. १९९८ ते २००४ या काळात अपुरे राहिलेले कार्यभार झपाट्याने पूर्ण करण्याची मोहीम आता धडाक्यात सुरू होण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.
नोव्हेंबरमध्ये दिल्लीत होऊ घातलेल्या विश्व हिंदू परिषदेच्या शिखर परिषदेसंबंधी इंदौरमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष प्रवीण तोगडियांनी, ‘‘तुम्ही गुजरात विसरला असाल, तरी तुम्हांला मुजफ्फरनगर लक्षात असेल. हनुमानाच्या शेपटाला आग लागली तर लंका जळून खाक झाल्याशिवाय राहणार नाही’’, असा सज्जड दम मुसलमानांना देऊन आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. विशेष म्हणजे अन्य प्रसंगी दिसणारा ‘बोलाची कढी आणि बोलाचा भात’ असला प्रकार तोगडिया येथे करणार नाहीत. नवीन सरकार सत्तेत येऊन काही दिवस उलटायच्या आत पुण्यात झालेल्या मुसलमान तरुणाच्या हत्येने हे सिद्ध केलेले आहे की तोगडिया आणि त्यांची हिंदुत्त्ववादी टोळी फक्त बोलत नाही, त्यांचा ‘‘कर्मा’’वर विश्वास आहे. बाळ ठाकरे आणि शिवाजी महाराजांची विकृत चित्रे फेसबुकवरून पसरवून वातावरण तापलेले असताना प्रार्थनेहून परतणाऱ्या मोहसिन शेखचा हिंदू राष्ट्र सेनेच्या ‘‘सैनिकां’’नी निर्घृणपणे मुडदा पाडला. परदेशातील प्रॉक्सी सव्र्हरवरून अपलोड करण्यात आलेली ही चित्रे कोणी आणि कशासाठी पसरवली होती याचा पत्ता पोलिसांना लागणे अर्थातच शक्य नाही. मोहसिन व्यतिरिक्त अन्य एका मुसलमान तरुणावरही जिवघेणा हल्ला करण्यात आला. ‘‘या दाढीवाल्याला मारा’’ म्हणून आरोळ्या ठोकत एक बेभान टोळी लोखंडी रॉड घेऊन त्याच्यावर तुटून पडली. कसाबसा त्यांच्या तावडीतून सुटून त्याने एका दुकानात लपण्याचा प्रयत्न केला असता, दुकानात घुसून त्या तरुणांनी त्याला बदडले. शेवटी त्याने आपण मरून पडल्याचे नाटक केल्यामुळे टोळक्याने मारहाण थांबवली आणि त्याचा जीव वाचला. ही घटना म्हणजे हिंदू राष्ट्र निर्माण करून ‘‘सातवे सोनेरी पान’’ लिहिण्यासाठी आतूर झालेल्या ‘‘धर्मवीरां’’च्या धोरणाची प्रतिकात्मक अभिव्यक्ती आहे. मुसलमानांना या हिंदू राष्ट्रात राहायचे असेल तर त्यांना मृतप्राय होऊनच राहावे लागेल! या घटनेनंतर विविध प्रागतिक संघटनांनी सभा भरवून निषेध नोंदविला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी या घटनेची सखोल चौकशी करून धार्मिक तणाव पसरविणाऱ्या संघटनांवर कारवाई करण्याचे आश्वासनही दिले. परंतु खरे सूत्रधार काही कायद्याच्या हाती अजून लागलेले नाहीत!
लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या काळात गोवा राज्याचे भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी नरेंद्र मोदींच्या विरोधात विधान करणारे गुजरातमधील खिश्चन पाद्री आणि श्रीराम सेनेचे प्रमोद मुतालिक म्हणजे एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे सांगून आपली व पक्षाची ‘‘धर्मनिरपेक्ष’’ आणि ‘‘सर्वसमावेशक’’ वृत्ती गोव्यातील जनतेच्या मनावर बिंबवली होती. मात्र निवडणुकांमध्ये घवघवीत यश मिळवून दिल्लीत भाजपची सत्ता आल्यानंतर त्याच गोव्यात सात दिवसांच्या अखिल भारतीय हिंदू परिषदेचे धडाक्यात आयोजन झाले. या प्रसंगी सनातन भारतीय संस्कृती संस्थेच्या निमंत्रणावरून या परिषदेत आलेल्या प्रमोद मुतालिक यांनी स्त्रियांनी स्कर्ट परिधान करण्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करून स्त्रियांची वेशभूषा कशी असावी याबद्दल ‘‘मार्गदर्शन’’ केले. गोव्यात मोठ्या संख्येने असलेल्या खिश्चन समाजातील सर्व वयोगटांतील स्त्रिया सर्रास स्कर्ट वापरत असल्यामुळे त्याच्यावर बंदी घालण्याची भाषा तेथे राजकीयदृष्ट्या परवडणारी नाही. तरीही स्कर्ट कसे असावेत, त्यांची लांबी किती असावी याबद्दल महत्त्वपपूर्ण खल झाला. (स्कर्टच्या विषयाचे सामाजिक महत्त्व किती मोठे आहे हे कदाचित काही मूर्खांना कळणार नाही. वेशभूषा ही स्त्रियांची वैयक्तिक बाब आहे असा त्यांचा भोळा समज असू शकतो. परंतु भारतापासून वेगळ्या पडलेल्या ‘‘इंडिया’’मध्ये होणाऱ्या बलात्कारांना या स्कर्टसारख्या वेशभूषाच जबाबदार असतात. मोहन भागवतांना विचारा! खरे तर स्त्रियांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर आसाराम बापू अधिक मौलिक सूचना करू शकतात, मात्र सध्या बलात्काराच्या आरोपाखाली तेच तुरुंगात असल्यामुळे त्यांना या चर्चेत सहभागी होता आलेले नाही. परंतु, या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार असलेल्या व्यक्तीची नवे सरकार सत्तेत येताच हत्या होऊन त्याला त्याच्या पापाचे फळ मिळालेले असल्याने बापूसुद्धा लवकच तुरुंगातून बाहेर पडून समस्त स्त्रीवर्गाला मौलिक मार्गदर्शन करतील अशी आशा करायला हरकत नाही.) विशेष म्हणजे मुतालिकांना वाटणाऱ्या ‘सांस्कृतिक चिंते’त मनोहर पर्रीकर सरकारमधील मंत्री सुदीन ढवळीकरदेखील सहभागी होते. हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकाराने भरलेल्या या परिषदेत १२५ कट्टर हिंदुत्ववादी संघटना सहभागी झालेल्या होत्या आणि भारतात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेची हाक देण्यासाठी ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
याच परिषदेत बोलताना हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक चारुदत्त पिंगळे यांनी हिंदूंना त्यांच्या राजकीय कर्तव्याची जाणीव करून देतना सांगितले, ‘‘केंद्रातील सत्तापरिवर्तन हे भारतात हिंदू राष्ट्राच्या स्थापनेसाठी पुरेसे आहे, असे समजणे हा भ्रम आहे. कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अपत्य असलेल्या भाजपने कधीच स्वत:ला छत्रपती शिवाजी महाराज आणि सावरकरांच्या परंपरेपासून वेगळे केलेले आहे. त्यामुळे भाजपकडून तशी कोणतीही अपेक्षा करणे चुकीचे आहे. म्हणूनच इ.स. ७११ मध्ये सुरू झालेला लढा अजूनही संपलेला नाही. हिंदूंनी पुन्हा एकदा त्याच जुन्या आत्मशक्तीचा प्रत्यय देत अजोड शौर्याने स्वाभिमान आणि प्रतिष्ठेसाठी लढले पाहिजे. मतपेट्यांतून हिंदू राष्ट्र निर्माण होऊ शकणार नाही. ते फक्त घनघोर युद्धातूनच साध्य होऊ शकते आणि त्यासाठी हिंदूंनी दुसऱ्या स्वातंत्र्ययुद्धाची तुतारी फुंकली पाहिजे.’’
गोव्यात ‘‘दुसऱ्या स्वातंत्र्यलढ्या’’चे हे आवाहन केले जात असताना त्याची प्राथमिक तयारी भाजपची सत्ता असलेल्या छत्तीसगढमध्ये सुनियोजित पद्धतीने सुरूही झाली आहे. ग्रामपंचायतींमधून गैर-हिंदू परंपरांवर बंदीच्या ठरावांचे सत्र जोरात चालू आहे. खिश्चन धर्मप्रसारकांकरवी हिंदूंचे बळजबरीने चालविलेले धर्मांतर आणि हिंदू देवदेवतांबद्दल केल्या जाणाऱ्या अपमानास्पद विधानांना चाप बसविण्याच्या ‘‘उदात्त ध्येया’’साठी कोणत्याही प्रकारच्या गैर-हिंदू परंपरांवर बंदी घालण्याचे प्रकार सुरू आहेत. ग्रामपंचयतींचा अशा प्रकारे कट्टर हिंदुत्त्ववादाच्या प्रसारासाठी वापर होत असताना आणि देशाच्या घटनेने दिलेल्या सेक्युलरिझमच्या तत्त्वाची खुलेआम पायमल्ली होत असताना छत्तीसगढ सरकार गप्प आहे, हे सांगायला नकोच. पुन्हा अशा तऱ्हेने हिंदू लाट पसरत असताना शिवसेना आपले ‘‘धर्मकर्तव्य’’ पार पाडण्यात कसूर करील हे शक्यच नाही. त्यांच्या खासदारांनीसुद्धा महाराष्ट्र भवनात मुसलमान वेटरच्या तोंडात पोळी कोंबत त्याचा रोजा तोडून आपल्या दिवंगत साहेबांना ‘‘श्रद्धांजली’’ वाहिली. त्यानंतर, अगोदर असे काही न घडल्याचे ठोकून दिले आणि नंतर प्रसंग सीसीटिव्ही कॅमेरात बंदिस्त झाल्याचे लक्षात येताच वेटर मुसलमान असून त्याचा रोजा असल्याचे माहित नसल्यामुळे हे घडल्याची सारवासारव केली. परंतु या घटनेनंतर ‘सामना’तील अग्रलेखात मात्र हिंदू मुजोरपणा किंचितही कमी झालेला दिसला नाही.
एकीकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदू जनजागृती समिती, विश्व हिंदू परिषद, शिवसेना यांनी संघटनात्मक पातळीवर आपली धर्मकर्तव्ये पार पाडण्यास सुरुवात केलेली असताना व्यक्तिगत पातळीवरसुद्धा ही ‘‘कर्तव्यजाणीव’’ जाज्ज्वल्य रूपात समोर येऊ लागली आहे. फेसबुक आणि वॉट्सअॅप सारख्या सोशल नेटवर्किंग माध्यमांमधून अनेक जण ‘‘धर्मजागृती’’ करीत आहेत. जगात जे काही उदात्त आणि महान आहे ते सारे हिंदू धर्मात आहे आणि हिंदू धर्मात जे काही आहे ते सारेच कसे उदात्त आणि महान आहे याचे धडे ‘‘तर्कशुद्ध’’ आणि ‘‘विज्ञाननिष्ठ’’ पद्धतींनी या माध्यमांमधून मिळू लागले आहेत. त्यामुळे अशा भारलेल्या वातावरणात सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती ए.आर. दवे, इतिहासकार वाय. सुदर्शन राव, शिक्षणतज्ञ दे.भ. दीनानाथ बत्रा आदी मंडळीसुद्धा आपला खारीचा वाटा उचलत आहेत. पूर्वीच्या काळी आपल्या समाजातील जातीव्यवस्था कशी चोख काम करीत होती आणि तिचे पुनरुज्जीवन करणे कसे आवश्यक आहे ते सुदर्शन राव यांनी कळवळून सांगितले तर आपण या देशाचा हुकूमशहा असतो तर इयत्ता पहिलीपासून भगवद्गीता आणि महाभारत विद्याथ्र्यांसाठी सक्तीचे केले असते म्हणून सांगत न्यायमूर्ती ए.आर. दवे यांनी आपल्या ‘‘न्यायबुद्धी’’चा पुरावा दिला.
एकंदरच, महान संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाचे कार्य जोरात सुरू झालेले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपल्या स्वयंसेवकांसाठी उद्दीष्ट निश्चित करून समस्त हिंदूंची एकजूट बनविण्यासाठी राखी अभियानाची घोषणा केलेलीच आहे. तेव्हा विद्याथ्र्यांचे पाश्चात्य प्रभावाने ‘‘दूषित’’ झालेले अभ्यासक्रम लवकरात लवकर बदलण्यात येतील, प्रकाशनसंस्थानी कोणती पुस्तके छापावीत आणि कोणती छापू नयेत, कोणती जाळून टाकावीत याबद्दल निश्चित धोरण राबविले जाईल, कलाकार-साहित्यिकांनी चित्रे कशी काढावीत आणि कसे साहित्य लिहावे याबद्दल मार्गदर्शक तत्त्वे निश्चित केली जातील, स्त्रियांनी कधी घराबाहेर पडावे, कधी परत यावे, कुठे जावे आणि कुठे जाऊ नये याबद्दल कायदे केले जातील अशी आशा करायला हरकत नाही. आणि या ‘‘शुद्धिकरणा’’च्या विरोधकांना, सावित्री आणि सितेची परंपरा विसरणाऱ्या स्त्रियांना, जातींचे महत्त्व आणि माहात्म्य झुगारू पाहणाऱ्या दलितांना आणि हिंदू धर्माचा कोणत्याही प्रकारे अनादर करणाऱ्या प्रत्येकाला अर्थातच चांगल्या प्रकारे वठणीवर आणले जाईल. कारण समाजाला ‘‘चांगले दिवस’’ येण्यासाठी ते गरजेचे आहे!
स्फुलिंग १ सप्टेंबर २०१४