कथा: करोडपती कसे असतात!! / मॅक्सिम गॉर्की

कथा: करोडपती कसे असतात!!

मॅक्सिम गॉर्की

संयुक्तराष्ट्र अमेरिकेच्या पोलाद, तेल सम्राट आणि इतर सम्राटांनी माझ्या विचारशक्तीला नेहमीच गुंगारा दिला आहे. मी विचारच करु शकत नाही, की एवढे सगळे पैसेवाले लोकं सामान्य नश्वर मनुष्य असू शकतील. मला नेहमीच वाटत आले आहे की त्यांच्यापैकी प्रत्येकाकडे कमीत कमी तीन पोटं आणि दिडशे दातं असतील. मला विश्वास होता की प्रत्येक करोडपती सकाळी सहा वाजल्यापासून अगदी अर्ध्‍या रात्रीपर्यत खातंच राहत असेल आणि ते सुध्दा सर्वात महागडे जेवणच हादडत असेल, जसे बदके, टर्की कोंबड्या, छोटी डुकरे, लोण्यासोबत गाजर, मिठाई, केक आणि हर तऱ्हेचे चविष्ट पक्वान्न. रात्रीपर्यत त्याचे जबडे इतके थकत असतील की तो आपल्या निग्रो नोकरांना त्याच्यासाठी अन्न चावून बारीक करुन देण्याचा आदेश देत असेल, जेणे करुन त्याला सहज गिळता यावे. सरतेशेवटी जेव्हा तो खूप थकून जात असेल तेव्हा घामाने डबडबलेल्या त्याला त्याचे नोकर बिछान्यापर्यत उचलून नेत असतील. मग दुसऱ्या दिवशी आपली श्रमसाध्य दिनचर्या पुन्हा सुरु करण्यासाठी तो सकाळी पुन्हा सहा वाजता उठत असेल.

परंतु एवढया जबरदस्त मेहनतीनंतर सुध्दा तो त्याच्या संपत्तीवर मिळणाऱ्या व्याजापैकी अर्धेसुध्दा खर्च करु शकत नसेल.

निश्चितच हे एक अवघड जगणे होत असावे. पण करणार तरी काय? करोडपती होण्याचा फायदाच काय जर तुम्हाला इतर लोकांपेक्षा जास्त खाता येऊ शकणार नसेल तर?

 मला वाटत होते, त्याची अंतर्वस्त्रे सुध्दा उत्कृष्ट नक्षीकामाने तयार केलेली असतील. त्याच्या बुटांच्या तळव्यांवर सोन्याचे खिळे ठोकलेले असतील आणि हॅटच्या ऐवजी तो हिऱ्यांनी तयार केलेली एखादी टोपी घालत असावा. त्याचे जॅकेट सर्वात महागडया मलमलीने बनवलेले असेल, ते कमीत कमी पन्नास मीटर लांब असेल आणि त्याच्यावर सोन्याची कमीत कमी तीनशे बटने लावलेली असतील. सुटटयांमध्ये तो एकावर एक आठ जॅकेट आणि सहा विजारी घालत असेल. हे खरे आहे की असे करणे खटकण्यासोबतच गैरसोईचे सुध्दा होत असावे पण एखादा करोडपती जो इतका श्रीमंत असेल, तो बाकीच्या इतर लोकांसारखे कपडे कसे काय घालू शकतो.

करोडपतीचे खिसे एका विशाल खड्ड्यासारखे असतील ज्यामध्ये तो संपूर्ण चर्च, संसदेची इमारत आणि इतर छोटया मोठया गरजेच्या गोष्टी ठेवू शकत असेल. परंतु एकीकडे मी विचार करत होतो की या महाशयांच्या पोटाची क्षमता एखादया मोठया समुद्री जहाजाच्या गोदामाइतकी असेल, तिथे मला या साहेबांच्या पायावर तंतोतंत येणाऱ्या विजारीची कल्पना करण्यात जरा अडचणच आली. याच्याही पलीकडे माझा विश्वास होता की, तो कमीतकमी एक वर्ग मैलापेक्षा बारीक आकाराच्या रजई खाली अजिबात झोपत नसेल. आणि जर तो तंबाखू चखळत असेल तर ती सुध्दा सर्वात उत्तम दर्जाची आणि एका वेळेला एक किंवा दोन पौंडापेक्षा कमी नसेल. आणि जर तो तपकीर ओढत असेल तर एका वेळेस एक पौंडापेक्षा कमी नसेल. पैसा स्वत:च स्वत:ला खर्चू पाहतो.

त्याची बोटे अद्भूत तऱ्हेने संवेदनशील असतील आणि त्यांच्यामध्ये आपल्या इच्छेनुसार लांब होण्याची जादुई ताकद असेल, उदाहरणादाखल तो सायबेरीयामध्ये अंकुरीत होत असणाऱ्या एका डॉलरवर न्यूयॉर्कमधून नजर ठेऊ शकत असेल आणि आपली जागा न सोडता बेरिंग स्ट्रेट पर्यंत हात लांबवून आपल्या आवडीचे फूल तोडू शकत असेल.

विचित्र म्हणजे एवढया सगळयानंतरही मी या गोष्टीची कल्पना नाही करु शकलो की या दैत्याचे डोके कसे असेल. वाटलं जणू ते मांस आणि हाडांचा असा गोळा असेल ज्याला फक्त प्रत्येक वस्तूतून सोने ओरबाडून घेण्याची प्रेरणा मिळत असावी. एकंदरीतच काय, की करोडपती लोकांविषयीची माझी प्रतिमा एका मर्यादेपर्यंत अस्पष्ट होती. थोडक्यात सांगायचे तर मला सर्वात अगोदर लांबलचक दोन हात दिसत असत. ज्यांनी पृथ्वीगोलास आपल्या कवेत घेतलेले आहे आणि त्याला आपल्या तोंडाच्या गुहेजवळ ओढून ठेवले आहे. तो आपल्या धरणीला शोषित व चावत आहे व त्याची हावरट लाळ तिच्यावर टपकत आहे. जणू काही तो तंदूरमध्ये भाजलेला स्वादिष्ट बटाटाच असावा.

तुम्ही त्याक्षणी माझ्या आश्चर्याची कल्पना करु शकाल जेव्हा मी एका करोडपतीला भेटलो आणि तो मला अतिशय सामान्य माणसासारखा दिसला.

एका खोलगट आरामखूर्चीमध्ये माझ्या समोर वाकलेला म्हातारा इसम बसला होता. त्याचे सुरकुतलेले गोरे हात शांतपणे त्याच्या पोटावर धरलेले होते. त्याच्या लोंबणाऱ्या गालावर कोरलेली दाढी होती आणि त्याचा ओघळलेला खालचा ओठ त्याची सुंदर अशी बत्तीशी दाखवत होता, ज्याच्यातले काहीएक दात सोन्याचे होते. त्याचा रक्तहीन आणि पातळ वरचा ओठ त्याच्या दातांना चिकटलेला होता आणि जेव्हा तो बोलायचा तेव्हा त्याच्या वरच्या ओठाची थोडी सुध्दा हालचाल होत नव्हती. त्याच्या रंग उडालेल्या डोळयावर भुवयांचा थांगपत्ताही नव्हता आणि सूर्याखाली तापलेल्या त्याच्या डोक्यावर एक सुध्दा केस नव्हता. त्याला पाहिल्यावर असे वाटत होते की त्याच्या चेहऱ्यावर आणखी थोडी त्वचा असती तर बरे झाले असते. त्याचा लालबुंद आणि गतीहिन मऊ चेहरा नुकत्याच जन्मलेल्या बाळासारखा वाटत होता. हे ठरवणे अवघड होते की हे जनावर एवढयातच या जगात आले आहे की इथून जाण्याच्या तयारीत आहे.

त्याचा पेहराव सुध्दा एखादया सामान्य माणसासारखाच होता. त्याच्या अंगावरील सोने फक्त घडयाळ, अंगठी आणि दातापर्यंतच मर्यादित होते. सर्व मिळूनही अंदाजे ते अर्ध्या पौंडापेक्षा कमी होते. सामान्यत: तो युरोपातील एखादया राजेशाही घरातील जुन्या नोकरासारखा दिसत होता.

ज्या खोलीमध्ये तो मला भेटला तिच्यामध्ये सौंदर्याच्या व सुविधेच्या दृष्टीने काहीही उल्लेखनीय असे नव्हते. फर्निचर विशालकाय होते एवढेच काय ते बस.

त्याच्या फर्निचरकडे पाहून वाटायचे की कधी कधी हत्ती तेथे मुक्कामास येत असावा.

‘‘काय तुम्ही… तुम्हीच… करोडपती आहात?’’ स्वत:च्या डोळयांवर अविश्वास व्यक्त करत मी विचारले.

“हो, हो ” त्याने डोके हालवत उत्तर दिले.

मी त्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवल्याचं नाटक केलं आणि निर्णय घेतला की त्याच्या थापांची त्याच वेळी परिक्षा घ्यावी.

“तुम्ही नाष्टयामध्ये किती मटन खाऊ शकता” मी विचारले.

“मी मटन खात नाही,” त्याने जाहीर केले, “फक्त संत्र्याची एक फोड, एक अंडे आणि चहाचा छोटा कप.”

लहान मुलांसारख्या त्याच्या डोळयांमध्ये अंधुकशा पाण्याच्या दोन मोठया थेंबासारखी चकाकी आली, ज्यात मला खोटेपणा अजिबात दिसत नव्हता

‘‘चला ठीक आहे.’’ मी साशंकपणे बोलणे सुरु केले. ‘‘मी तुम्हाला विनंती करतो कि तुम्ही मला प्रामाणिकपणे सांगावं की तुम्ही दिवसभरात किती वेळा जेवता?’’

‘‘दिवसातून दोन वेळा.’’ त्याने थंडपणे उत्तर दिले. ‘‘न्याहरी आणि रात्रीचे जेवण माझ्यासाठी पुरेसे होते. रात्रीच्या जेवणात मी थोडेसे सूप, थोडेसे चिकन आणि थोडसं गोड खातो. एखादे फळ, एक कॉफी, एक सिगार…’’

माझे आश्चर्य भोपळयासारखे वाढत होते. त्याने माझ्याकडे एखाद्या संताच्या नजरेने पाहिले. मी श्वास घ्यायला थांबलो आणि पुन्हा विचारायला सुरुवात केली.

 ‘‘परंतु जर हे सत्य आहे तर तुम्ही तुमच्या पैशाचं काय करता?’’

त्याने आपले खांदे जरा उचलले आणि त्याचे डोळे खोबणीमध्ये थोडा वेळ रेंगाळले आणि त्याने उत्तर दिले.

‘‘मी त्यांचा उपयोग आणखी पैसे निर्माण करण्यासाठी करतो…’’

 ‘‘कशासाठी?’’

 ‘‘जेणेकरून मी अधिक पैसे तयार करु शकेल…’’

 ‘‘परंतु कशासाठी?’’ मी हट्टाने विचारले.

तो समोरील बाजूस वाकला आणि कोपरांना खूर्चीच्या बाजूंवर टेकवत जरा उत्सुकतेने विचारले.

‘‘काय तुम्ही वेडे आहात?’’

 ‘‘काय तुम्ही वेडे आहात? ’’ मी उलट उत्तर दिले.

म्हाताऱ्याने त्याचे डोके झुकवले आणि सोन्याच्या दातांमधून हळूहळू बोलायला सुरवात केली:

 ‘‘तु खूपच मनोरंजक माणूस आहेस… मला आठवत नाही मी कधी तुझ्यासारख्या माणसाला भेटलो असेल…”

त्याने आपले डोके वर केले आणि आपले तोंड जवळजवळ कानांपर्यत रुंदावत शांतीपूर्वक माझे निरीक्षण करणे सुरु केले. त्याच्या शांत वर्तवणूकीला पाहून वाटत होते की तो स्वत:ला सामान्य व्यक्ती खचितच समजत होता. मी त्याच्या टायपिनवर मढवलेल्या छोटयाशा हिऱ्याला पाहिले. जर तो बूटाच्या टाचेइतका मोठा असता तर कदाचित मी समजू शकलो असतो मी कुठे बसलो आहे.

“मग स्वत:सोबत तुम्ही काय करता?’’

“मी पैसे निर्माण करतो’’ आपले खांदे आणखी जास्त रुंदावत त्याने उत्तर दिले.

 ‘‘म्हणजे तुम्ही नकली नोटांचा धंदा करता?’’ मी आनंदून बोललो, जणू काही मी रहस्यावरुन पडदा उठवणारच आहे. परंतु या वेळेला त्याला ऊचकी यायला सुरुवात झाली. त्याचे संपूर्ण धड हालायला लागले जणु एखादा अदृश्य हात त्याला गुदगुद्या करत होता. तो आपल्या डोळयांची जोर्जोरात उघडझाप करु लागला.

‘‘हा तर खटयाळपणा आहे’’ शांत होत तो म्हणाला आणि माझ्याकडे एक आल्हाददायक नजर टाकली. ‘‘दया करून करुन मला आणखी काही विचारा’’ त्याने निमंत्रण देत म्हटले आणि काही कारणास्तव आपल्या गालांना थोडेसे फुगवले.

 मी क्षणभर विचार केला आणि खंबीर आवाजात विचारले.

‘‘आणि तुम्ही पैसा कसा निर्माण करता?’’

“अरे हो! हे योग्य विचारणं झालं’’ त्याने होकारार्थी मान हालवली. ‘‘अतिशय सामान्य अशी गोष्ट आहे. मी रेल्वेचा मालक आहे. शेतकरी माल निर्माण करतात, मी त्यांचा माल बाजारात पोहोचवतो. फक्त एवढयाच गोष्टीचा हिशोब करावा लागतो की शेतकऱ्यासाठी फक्त एवढे पैसे सोडावेत की तो उपाशी रहायला नको आणि तुमच्यासाठी काम करत रहावा. बाकीचे पैसे मी भाड्याच्या नावावर आपल्या खिशात टाकतो. फक्त एवढीशी गोष्ट आहे.”

 ‘‘आणि काय? शेतकरी याने समाधानी राहतात?’’

“माझ्या मते सगळे नाही रहात” बालसुलभतेने तो बोलला. ‘‘परंतु असं म्हणतात ना, लोकं कधीच समाधानी होत नसतात. अशी वेडी माणसे तुम्हाला प्रत्येक ठिकाणी भेटतील जी फक्त तक्रार करत असतात…”

“तर मग, काय शासन तुम्हाला काही बोलत नाही?’’ आत्मविश्वास कमी असून देखील मी विचारले.

“सरकार?” त्याचा आवाज घुमला मग त्याने थोडा विचार करत आपल्या कपाळावर बोटे फिरवली. मग त्याने आपले डोके हालवले, जणू त्याला काही आठवलं :“बरं …तुमचा अर्थ ते लोकं…जे वाशिंग्टन मध्ये बसतात? नाही, ते मला त्रास देत नाहीत. ती चांगली माणसं आहेत… त्यांच्यापैकी काही जण तर माझ्या क्लबचे सभासदसुद्धा आहेत. परंतु त्यांच्याशी जास्त भेटणे होत नाही…म्हणून कधी कधी मी त्यांच्याबाबत विसरुन जातो. नाही, ते मला त्रास देत नाहीत” त्याने त्याचे म्हणणे दुसऱ्यांदा परत मांडले आणि माझ्याकडे उत्सुकतेने पाहत विचारले:

 ‘‘काय तुम्ही असे म्हणू इच्छिता की अशी सरकारे पण असतात जी लोकांना पैसा निर्माण करण्यापासून अडवत असतात?”

 मला माझी निरागसता आणि त्याच्या बुध्दीमत्तेवर कीव आली.

“नाही,” मी हळू आवाजात उत्तरलो. “माझ्या बोलण्याचा उद्देश हा नव्हता… म्हणजे सरकारने कधी कधी तरी या उघड उघड दरोड्यावर अंकुश ठेवला पाहिजे ना.”

 ‘‘आता पाहा.’’ त्याने मध्येच थांबवले. “हा तर आदर्शवाद झाला. इथे हे सर्व चालत नाही. व्यक्तीगत कामांमध्ये हस्तक्षेप करण्याचा सरकारला काही एक अधिकार नाही.”

त्याच्या लहान मुलांसारख्या बुद्धिमत्तेसमोर मी स्वत:ला खुपच खुजा अनुभवत होतो.

‘‘परंतु जर एक व्यक्ती अनेक लोकांना उध्वस्त करत असेल तर काय ते व्यक्तीगत काम समजले जाईल?’’ मी विनम्रतेने विचारले.

‘‘उध्दवस्त’’ डोळे विस्फारत त्याने उत्तर दयायला सुरुवात केली. ‘‘बरबादी चा अर्थ होतो जेव्हा मजूरीचे दर वाढणे किंवा संप होणे. पण आमच्याकडे प्रवासी माणसं आहेत. जे राजीखुशीने कमी मजूरीवर संपकऱ्यांच्या जागेवर काम करायला सुरुवात करतात. जेव्हा आपल्या राज्यात खुप सारे प्रवासी परप्रांतीय होतील, जे कमी पगारावर काम करतील आणि खुप साऱ्या वस्तू विकत घेतील तेव्हा सर्व काही व्यवस्थित होईल.”

तो थोडासा उत्तेजित झाला होता आणि एक लहान मुल व म्हाताऱ्याच्या मिश्रणाहून अंमळ कमी भासत होता. त्याची नाजूक गोरी बोटे थरथरली आणि त्याचा रुक्ष आवाज माझ्या कानावर आदळू लागला:

 “सरकार? वास्तविक पाहता हा मनोवेधक प्रश्न आहे. एक चांगले सरकार असणे महत्वाचे आहे. ज्याला या गोष्टीची काळजी असते की या देशामध्ये तेवढीच माणसे रहावीत जेवढयांची मला गरज आहे आणि त्यांनी तितकेच विकत घ्यावे जितकं मी विकू पाहतो; आणि कामगार तेवढेच असावेत की माझे काम कधी थांबू नये. पण त्याहून जास्त नाही! मग कोणी समाजवादी शिल्लक राहणार नाहीत आणि आंदेालनेही होणार नाहीत. आणि सरकारने जास्त कर सुध्दा आकारु नये. लोक जे देऊ करतील तेवढेच घ्यावे, याला मी म्हणतो चांगले सरकार.”

“तो मूर्ख नाही, हा एक गर्भित ईशारा आहे, की त्याला त्याच्या महानतेचं भान आहे.” मी विचार करत होतो. “या माणसाने खरोखर राजाच असले पाहिजे होतं”

“मला हवंय” तो स्थिर व विश्वासपूर्ण आवाजात बोलत गेला “की या देशात सूख शांती नांदो, सरकारने अनेक तत्ववेत्त्यांना भाडयाने ठेवले आहे जे प्रत्येक रविवारी कमीत कमी आठ तास लोकांना हेच शिकविण्यासाठी खर्च करतात की कायद्याचा सन्मान केला पाहिजे आणि जर तत्ववेत्यांकडून हे कार्य होत नसेल तर सरकार फौजेला पाचारण करते. पध्दत नाही, तर परिणाम जास्त महत्वाचा असतो. ग्राहक आणि कामगारांना कायद्याचा सन्मान करायला शिकविले पाहिजे, बस्स!” आपली बोटे चाळवत त्याने बोलणे पूर्ण केले.

 ‘‘आणि धर्माबाबत तुमचा काय विचार आहे?’’ आता मी प्रश्न केला, खरतर त्याने त्याची राजकीय भूमिका अगोदरच स्पष्ट केली होती.

“बरं!” त्याने उत्साहाने आपले गुडघे थोपटले आणि पापण्या मिटत म्हणाला, ‘‘मी या बाबतीत खुपच चांगला विचार करतो. धर्म लोकांसाठी अत्यंत गरजेचा आहे, या गोष्टीवर माझा पूर्ण विश्वास आहे. खरं सांगू, मी स्वत:च प्रत्येक रविवारी चर्चमध्ये उपदेश करत असतो…अगदी खरं सांगतोय तुम्हाला.”

 ‘‘आणि तुम्ही आपल्या उपदेशात काय बोलता?’’ मी प्रश्न केला.

‘‘ते सर्व जे एखादा खरा ख्रिस्ती चर्चमध्ये बोलू शकतो’’ त्याने खूपच भावुक होत उत्तर दिले. ‘‘बघा मी एका छोटया चर्चमध्ये भाषण देतो आणि गरीब लोकांना नेहमीच दयावाचक शब्दांची आणि पित्यासमान सल्ल्याची गरज असते… मी त्यांना सांगतो…”

“इसामसीह च्या मुलांनो! ईर्षेच्या सैतानाच्या लालसेपासून स्वत:ला वाचवा आणि दुनियादारीने भरलेल्या वस्तूंचा त्याग करा. या धरतीवर आयुष्य खुपच थोडे असते: फक्त चाळीसीच्या वयापर्यत माणूस चांगला कामगार राहू शकतो. चाळीसच्या नंतर त्याला कारखान्यांमध्ये रोजगार मिळू शकत नाही. आयुष्य थोडंसुध्दा सुरक्षित नाहीये. कामाच्या वेळी फक्त एक चुक आणि मशिन तुमच्या हाडांचा चुराडा करु शकते. डुलकी लागली आणि तुमची कथा समाप्त होऊ शकते. प्रत्येक पावलावर आजार आणि दुर्भाग्य कुत्र्यासारखं तुमचा पाठलाग करत असते. एक गरीब व्यक्ती एखादया उंच इमारतीवर उभ्या असलेल्या आंधळया व्यक्ती सारखी आहे. तो ज्या दिशेला जाईल स्वत:ला उध्वस्त करेल, जसे की जूडचा भाऊ देवदूत जेम्सने आपल्याला सांगितले आहे. बंधूनो, तुम्ही जगरहाटीच्या वस्तुंपासून स्वत:ला दूर ठेवले पाहिजे. उध्वस्त करणाऱ्या सैतानाचा कारनामा आहे. इसामसीहच्या आवडत्या बाळांनो, तुमचे साम्राज्य तुमच्या परमपित्याच्या साम्राज्याप्रमाणे आहे. ते स्वर्गात आहे. आणि जर तुमच्यात धैर्य असेल आणि तुम्ही आपल्या आयुष्याबदल तक्रार न करता, गोंधळून न जाता आयुष्य घालवाल, तर तो तुम्हाला त्याच्याजवळ बोलावेल आणि या पृथ्वीवरच्या कठीण परिश्रमाच्या परिणामी तुम्हाला देणगीच्या रुपात चिरकाल शांती देईन. हे जीवन तुमच्या आत्माच्या शुध्दीकरणासाठी दिले गेले आहे, आणि जितकं तुम्ही या आयुष्यात सहन कराल तितकचं जास्त सुख तुम्हाला लाभेल-जसे खुद्द संदेष्टया जूडने सांगितले आहे.”

 त्याने छताकडे बोट दाखवले आणि थोडा वेळ विचार केल्यानंतर शांत आणि धीरगंभीर आवाजात बोलला:

‘‘हो, माझ्या प्रिय बंधु-भगिनींनो, जर तुम्ही आपल्या शेजाऱ्यासाठी भलेही तो कोणीही असो, जर त्यागणार नसाल तर हे जीवन पोकळ आणि अतिशय सामान्य आहे. इर्षेच्या राक्षसासमोर तुमच्या मनांना समर्पित करु नका. कोणत्या गोष्टीची हाव बाळगाल? जीवनातील सूख फक्त भ्रमच असते; राक्षसाचे खेळणे जणू. आपण सर्व मारले जाणार. श्रीमंत आणि गरीब-राजा आणि कोळशाच्या खाणीत काम करणारे मजूर, बॅंकेत काम करणारे आणि रस्त्यावर झाडू मारणारे. असेही होऊ शकते की स्वर्गातील उपवनात तुम्ही राजे बनाल आणि राजा झाडू घेऊन रस्त्यातली पाने साफ करत असेल आणि तुम्ही खाल्लेल्या मिठाईचे तुकडे खात असेल. बंधूनो, इथे या जगामध्ये आशा करण्यासारखे काय आहे? पापाने बरबटलेल्या या दाट जंगलात जिथे आत्मा लहान मुलांसारखे पाप करीत असतो. प्रेम आणि विनम्रतेचा मार्ग निवडा आणि जे तुमच्या नशीबात येतेय ते सहन करा, आपल्या सहकाऱ्यांना प्रेम द्या, आणि त्यांनाही जे तुमचा अपमान करतात…’’

त्याने परत डोळे मिटून घेतले आणि आपल्या आरामखूर्चीत आरामात झुलत बोलणे सुरु ठेवले:

“तुमच्यासमोर एखाद्याच्या गरीबीचा आणि दुसऱ्याच्या श्रीमंतीचा विरोधाभास दाखवणाऱ्या लोभाच्या त्या पापी भावनांकडे आणि लोकांच्या बोलण्याकडे थोडेही लक्ष देऊ नका. असे लोक सैतानाचे सहकारी असतात. आपल्या शेजाऱ्याशी ईर्षा बाळगण्यास देवाने तुम्हास मनाई केलेली आहे. श्रीमंत माणसेसुध्दा कंगाल असतात; प्रेमाच्या बाबतीत. इसामसीहचा भाऊ जूडने म्हटले होते, श्रीमंतावर प्रेम करा कारण ते ईश्वराचे आवडते आहेत. समानतेच्या गोष्टीवर आणि सैतानाच्या इतर बोलण्यावर थोडेही लक्ष देऊ नका. या धरतीवर समानता काय असते? तुम्ही तुमच्या ईश्वरासमोर एक दुसऱ्यासोबत आपल्या आत्माच्या शुध्दतेची बरोबरी केली पाहिजे. धैर्याने आपली अवस्था धारण करा आणि आज्ञा पालन केल्याने तुमचे दु:ख हलके होईल. ईश्वर तुमच्या सोबत आहे माझ्या मुलांनो, आणि तुम्हाला त्याच्याशिवाय कोणत्याच गोष्टीची आवश्यकता नाही.”

म्हातारा गप्प झाला आणि त्याने त्याच्या ओठांना ताणले. त्याचे सोन्याचे दात चमकले आणि तो विजयी मुद्रेने माझ्याकडे पाहू लागला.

 ‘‘तुम्ही धर्माचा चांगलाच वापर केलात’’ मी म्हणालो.

“होय, अगदी बरोबर! मला त्याचे महत्व माहिती आहे.’’ तो म्हणाला.

“मी माझं म्हणणं पुन्हा एकदा मांडतो की गरीबांसाठी धर्म अत्यंत गरजेचा आहे. मला हे आवडतं. तो म्हणतो कि या पृथ्वीवरील सर्व वस्तू सैतानाच्या आहेत आणि हे मानवा जर तू आपल्या आत्म्याला वाचवू पाहतोस तर पृथ्वीवरील कोणत्याच वस्तूला स्पर्श करायची देखील लालसा बाळगू नकोस. जीवनातील सर्व सुखे तुला मरणानंतर भेटतील. स्वर्गातील प्रत्येक वस्तू तुझीच आहे. जेव्हा लोक या गोष्टीवर विश्वास ठेवतात, तेव्हा त्यांना काबूत ठेवणं सोपं जाते. हो. धर्म एका चिकट वंगणासारखं काम करतो आणि जीवनाच्या यंत्राला आपण हे वंगण सतत घालत राहिलो तर सारे भाग व्यवस्थित काम करत राहतात आणि यंत्र चालविणाऱ्यासाठी सोपं होतं.”

“हा माणूस खराखुरा राजाच आहे” मी निर्णय दिला.

‘‘कदाचित तुम्ही विज्ञानाविषयी काही सांगू इच्छिता?’’ मी शांतपणे प्रश्न विचारला.

 ‘‘विज्ञान?’’ त्याने एक बोट छताकडे दाखविले. मग त्याने आपले घडयाळ बाहेर काढले वेळ पाहिली आणि त्याच्या साखळीला आपल्या बोटावर फिरवत त्याला हवेत झोकून दिले. मग त्याने सुस्कारा टाकत बोलणे सुरु केले:

“विज्ञान… होय मला माहितीये. पुस्तके. जर ती अमेरिकेविषयी चांगले विचार मांडत असतील तर ते उपयुक्त आहे. मला वाटते की हे कवी लोक जी पुस्तकं बिस्तकं लिहीतात, ते खुपच कमी पैसे कमावतात. अशा देशामध्ये जिथे जो तो आपापल्या कामात व्यस्त आहे तिथे पुस्तकं वाचण्यासाठीचा वेळ कुणाकडेच नाही… हां!, हे लेखक लोक रागावतात कि कोणीच त्यांची पुस्तकं विकत घेत नाहीत. शासनाने लेखकांना व्यवस्थित पैसे दिले पाहिजेत. चांगलं खाणारा पिणारा माणूस नेहमी आनंदी आणि दयाळू होत असतो. जर अमेरिकेविषयी पुस्तके खरोखर गरजेची असतील तर चांगल्या लेखकांना पगारावर ठेवले पाहिजे आणि अमेरिकेच्या गरजेची पुस्तके निर्माण केली पाहिजे…आणि काय.”

‘‘विज्ञानाची तुमची परिभाषा खूपच संकुचित आहे.’’ मी विचार करत बोललो.

त्याने डोळे झाकले आणि विचारात हरवून गेला, मग डोळे उघडून खंबीरपणे बोलू लागला:

 ‘‘हो,हो…प्राध्यापक आणि तत्वज्ञ…’’ ते सुध्दा विज्ञान असते. मला माहितीये, प्राध्यापक, सुईण, दाताचे डॉक्टर हे सगळे. वकील, डॉक्टर, इंजिनिअर. बरं, बरं. ते सर्व आवश्यक आहे. चांगल्या विज्ञानाने वाईट गोष्टी कधीही शिकविल्या नाही पाहिजेत. पण माझ्या मुलीच्या शिक्षकाने मला सांगितले होते, की सामाजिक विज्ञान पण काही तरी भानगड असते. पण बोलणं मला काही समजलं नाही…माझ्या विचारानुसार हे नुकसानकारक आहे. एक समाजशास्त्रज्ञ चांगल्या विज्ञानाची निर्मिती करु शकत नाही. त्याचं विज्ञानाशी काही घेणे देणे नसते. एडीसन जे बनवत आहे तसं विज्ञान उपयुक्त आहे. फोनोग्राफ आणि सिनेमा हे उपयोगी आहे. परंतु विज्ञानाची एवढी सगळी पुस्तके? ही तर हद्दच झाली. लोकांनी ती पुस्तके नाही वाचली पाहिजेत जी त्यांच्या डोक्यामध्ये प्रश्न निर्माण करतील. या पृथ्वीवर सर्व काही तसेच आहे जसे ते असायला पाहिजे आणि त्याला पुस्तकांच्या माध्यमातून विस्कळीत नाही केले पाहिजे.”

मी उभा राहिलो.

‘‘बरं, तर तुम्ही निघालात?’’

“हो,” मी म्हणालो “आता मी जाताच आहे तर कदाचित तुम्ही मला सांगू शकता, करोडपती असण्याचा अर्थ काय आहे?

त्याला ऊचक्या यायला लागल्या आणि तो आपले पाय आपटू लागला. कदाचित ही त्याची हसण्याची पध्दत होती.

 ‘‘ही एक सवय आहे.’’ त्याचा श्वास परतल्यावर तो मोठ्याने बोलला.

 ‘‘सवय काय असते?’’ मी प्रश्न केला.

“करोडपती होणे…एक सवय असते भाऊ.”

 काही वेळ विचार केल्यानंतर मी माझा शेवटचा प्रश्न विचारला:

 ‘‘तर तुम्ही समजता की सगळे टुकार, नशेखोर आणि करोडपती एकसारखेच असतात?’’

हे बोलणं त्याला टोचलं असावं. त्याचे डोळे विस्फारले गेले आणि रागाने त्यांना हिरवे केले.

‘‘मला वाटतेय की तुमचं संगोपन चांगल्या संस्कारात नाही झालेलं’’ त्याने रागात म्हटले.

 ‘‘नमस्ते!” मी म्हटले.

तो सन्मानपूर्वक मला पडवीपर्यत सोडवायला आला आणि पायऱ्यांवरील आपल्या बुटांकडे पहात उभा राहिला. त्याच्या घरासमोर एक लॉन होता. ज्यावर व्यवस्थित कापलेले दाट गवत होते. मी हा विचार करत चालत होतो की बरं झालं या माणसाला मला पुन्हा कधी नाही भेटावे लागणार. तेवढयात मला पाठीमागून आवाज आला.

‘‘ऐका!’’ मी वळालो, तो तिथेच उभा होता आणि मला पाहत होता

‘‘काय युरोपात गरजेपेक्षा जास्त राजे आहेत’’ त्याने हळू हळू विचारले.

‘‘जर तुम्ही माझे मत विचाराल तर आम्हाला त्यापैकी एकाची सुध्दा गरज नाही.’’ मी उत्तर दिले.

 तो एका बाजूला झाला आणि तिथेच थुंकला.

‘‘मी स्वत:साठी दोन एक राजांना पगारावर ठेवण्याचा विचार करतोय.’’ तो म्हणाला ‘‘तुमचा काय विचार आहे?’’

‘‘परंतु कशाकरीता?’’

“खुप मजा येईल. मी त्यांना आदेश देईल कि त्यांनी येथे बॉक्सिंग करुन दाखवावी…”

त्याने लॉनकडे इशारा केला आणि विचारपूस करण्याच्या तऱ्हेने बोलला. ‘‘दर दिवशी एक ते दीड वाजेपर्यत. कसे राहील? दुपारच्या जेवणानंतर काही काळ कलेसोबत वेळ घालविणे चांगले राहील…खुपच मस्त.”

 तो प्रामाणिकपणे बोलत होता आणि मला वाटले कि आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो काहीही करु शकतो.

 ‘‘पण या कामासाठी राजेच का?’’

 ‘‘कारण आजपर्यत याबाबतीत कोणी विचारच नाही केला’’ त्याने समजावले.

‘‘परंतु राजांना तर स्वत: इतरांना आदेश द्यायची सवय लागलेली असते.’’ एवढे बोलून मी निघालो.

‘‘ऐका तरी’’ त्याने मला परत हाक मारली. मी परत थांबलो. आपल्या खिश्यामध्ये हात घालून तो अजूनही तेथेच उभा होता. त्याचा चेहऱ्यावर कोणत्या तरी स्वप्नाचा भाव दिसत होता.

त्याने आपले ओठ हालवले जणू काही चघळत असावा आणि हळूच बोलला:

 ‘‘तीन महिन्यासाठी दोन राजांना एक ते दीड वाजेपर्यत बॉक्सिंग करवून घ्यायला तुमच्या अंदाजाने किती खर्च येईल.’’

अनुवाद: प्रवि‍ण सोनवणे