त्रिपुरा विधानसभा निवडणुकीचे निकाल आणि संसदीय डाव्यांचे संकट
राजकारणामध्ये गोष्टी एखाद्या पक्षाच्या नेत्याचा साधेपणा किंवा भ्रष्टाचार मुक्त जीवनातून नाहीत तर व्यक्ती व पक्षाच्या विचारधारेवरून, राजकारण आणि धोरणांवरून ठरत असतात. गांधी आणि नेहरूंच्या काळातील बहुतेक काँग्रेसी नेते सुद्धा साधं जीवन जगत होते. आणीबाणीचे समर्थन करणारे भाकप नेते इंद्रजीत गुप्तासुद्धा अतिशय साधे जीवन जगत होते. आणखी मागे गेल्यास दिसेल की प्रुधो, बाकुनिन आणि व्हाईटलिंग सुद्धा अत्यंत गरिबीत आयुष्य जगायचे आणि मार्तोव, मार्तिनोव सारखे तमाम मेन्शेव्हिक नेतेसुद्धा भ्रष्टाचारी किंवा श्रीमंतांमध्ये जगणारे लोक नव्हते. हे त्यांच्या राजकारणावरून ठरायचे की ते क्रांतिकारी होते की कामगार वर्गाचे शत्रू. जर राजकारण नेत्यांच्या जगण्याचा पद्धतीवरूनच ठरत असतं तर तमाम राजनीतिशास्त्र आणि राजकीय अर्थशास्त्र समजून घेण्याची गरजच काय होती! भावुकतावादी मार्क्सवादी, मार्क्सवाद तर काही अभ्यासत नाहीत, ‘कॉमन सेन्स लॉजिक’ वापरत राहतात. ते स्वतःला मार्क्सवादी म्हणवतात परंतु ते तॉलस्तॉयपंथी असतात.