नारायण सुर्वे यांच्या दोन कविता

नारायण सुर्वे यांच्या दोन कविता

त्याने यावे

असेल हिम्मत लढणारांची
आणि सुळावर चढणारांची
निर्भय निधड्या छातीवरती
जुलूम रगडीत जाणारांची
त्याने यावे-

कसले भेद अन खुरटे वारे
मोजीत बसला वरचे तारे
चुलीत ज्यांच्या विस्तव नाही
तेथे फुलतील कसे निखारे
उगा रुसावे-

रोज बडविती नवेच ढोल
हवेत जिरती फुसके बोल
थंडे ताबूत झाले तरीही
उगाच बसले घालीत घोळ
किती दळावे-

हरला असेल त्याने यावे
अन्यायावर तुटून पडावे
पीडला असेल त्याने यावे
आणि व्यथेवर औषध न्यावे

खचला असेल त्याने यावे
बोल धीराचे मनन करावे
वंचीत असेल त्याने यावे
स्वत:स फूंकून पावन व्हावे

लखलखत्या पात्यांनी यावे
घरघरत्या जात्यांनी यावे
अणुअणूच्या कणाकणांतून
उसळत धुमसत पेटत यावे

जाळीत जावे; घडवीत यावे
संहारावे; उभवीत यावे
विराट श्रमसूर्याच्या कक्षेत
स्वत:स उजळीत मुक्त फिरावे.

लेनिन

अजुन मी तुझ्यावर काही लिहिले नाही
ही खंत नाही;
एक कमालीची जबाबदारी वाटते
जेव्हा मी हात ठेवतो हृदयावर लेनिन,

मध्यान्ह रात्र आणि –
एक घुम्मसा आवाज शहरात घुमतोय
वरचा पोल खाली ओढून
खडखडत ट्रॅम उभी राहते,
तेव्हा डकवीत असतो पोष्टर किंवा;
दिव्याखाली बसून वादविवाद करतो आम्ही.

फारच सुखाचे हे दिवस,
अगदी धगीजवळच्या उंबेसारखे.
खरेखुरे जगत आहोत
असे वाटू देणारे सोनेरी दिवस.

मोठे लोभसवाणे हे शहर
कोट्यवधी व्होल्ट्सचा एक तारा.
थंड होते एक दिवस
गपगार होते, थांबताच चाके,
माणसे रस्त्यावर येतात
जळत राहतात भर दिवसा दिवे
पुरासम रस्त्यावर माणसांचे थवे
शर्थ होते चौकाचौकात
घणवाले; रणवाले होतात.
जिंकतात; ठिणग्या पेटवतात छावे
अशा वेळी कुणीही इथे नतमस्तक व्हावे.

जेव्हा ते आम्हाला घेऊन गेले
‘साले! लेनिनवाले दिसतात’ म्हणाले,
कानशिले तापली, पण बरेही वाटले
राक्षसांनी आता तरी आम्हाला नीटसे ओळखले

‘हे आता जागे झालेत
रूपच बदलणार आहेत पृथ्वीचे’ तू लिहिलेस.

अजून शबद आम्ही पुरा करू शकलो नाही.
अजून तुझ्यावर मी काही लिहू धजलो नाही.