ढंढारी बलात्कार आणि हत्या प्रकरण – सामाजिक वास्तावाचे दर्शन
ढंढारी बलात्कार आणि हत्या प्रकरण – सामाजिक वास्तावाचे दर्शन
सामूहिक बलात्कार, तक्रार मागे घेण्यासाठी धमकावणे, मारहाण आणि शेवटी घरात घुसून जाळून हत्या! ढंढारीतील या प्रकरणाने पुन्हा एकदा आपल्या सामाजिक वास्तावाचे भयानक, बिभत्स रूप आपल्यासमोर ठेवले आहे. एक दिलासा मात्र आहे. पोलीस, प्रशासन आणि सत्ताधारी उघडउघड गुन्हेगारांच्या बाजूने उभे असताना जनता खंबीरपणे न्यायाचा लढा उभारते आहे, लढते आहे.
लुधियाना येथील सर्वसाधारण कुटुंबातील शहनाज या बारावीत शिकणाऱ्या १६ वर्षीय मुलीचे राजकीय वरदहस्त लाभलेल्या एका गुंडांच्या टोळक्याने २५ ऑक्टोबर रोजी शाळेत जातेवेळी अपहरण केले. तिचे कुटुंबीय जेव्हा पोलिसांकडे गेले तेव्हा त्यांना पोलिसांच्या अत्यंत असंवेदनशील वागण्याला तोंड द्यावे लागले. विनाकारण बदनामी कशासाठी ओढवून घेता, मुलगी कुणासोबत तरी पळून गेली असेल, स्वतःहून परत येईल, असे सांगून पोलिसांनी पालकांची बोळवण करण्याचा प्रयत्न केला. दोन दिवसांनंतर गुंडांनी शहनाजला सोडून दिले. शरीर आणि मनावर सामूहिक बलात्काराचे घाव घेऊन शहनाज २७ ऑक्टोबरच्या मध्यरात्री घरी परतली. दुसऱ्या दिवशी पालक पुन्हा तिला घेऊन पोलिसांकडे गेले तर पोलिसांकडून पुन्हा तीच टाळाटाळ. त्यांना एका पोलीस चौकीतून दुसऱ्या पोलिस चौकीत हेलपाटे मारावे लागले. एका चौकीच्या इन चार्जने तर त्यांच्याकडे ५० हजार रुपयांची लाच मागितली. बरीच धावाधाव केल्यानंतर अखेर एफआयआर नोंदवून घेण्यात आली, मात्र तिच्यामध्ये बलात्काराचे कलम लावण्यात आले नाही. शहनाजच्या आईवडिलांनी तिची वैद्यकीय तपासणी करण्याची मागणी केली मात्र आज- उद्या करत करत पोलिस टाळत राहिले व यातच एक आठवडा उलटला. एका आठवड्यानंतर वैद्यकीय चाचणी केल्यास बलात्काराची पुष्ठी होण्याची शक्यता कमीच असते. त्यांच्या वकिलालासुद्धा विकत घेण्यात आले होते. मोठ्या चलाखीने न्यायाधिशासमोर तिचा जबाब नोंदविण्यात आला की तिच्यासोबत बलात्काराचा ‘प्रयत्न’ करण्यात आला होता. मुलगी हे समजू शकली नाही की ‘प्रयत्न’ म्हटल्याने सगळे अर्थच बदलून जातात. चार गुंडांवर एफआयआर नोंदविण्यात आली. तिघांना अटक करण्यात आली. या टोळक्यातील अन्य गुंडांनी मधल्या काळात तिच्या कुटुंबियांना तक्रार मागे घेण्यासाठी धमकावणे सुरू केले, आणि मग ३१ ऑक्टोबर रोजी शहनाज घरी एकटी असताना गुंडांनी घरात घुसून तिचे हातपाय बांधून, तिच्या तोंडात कापडाचा बोळा कोंबून तिला अमानुष मारहाण केली. १० दिवस कोठडीत राहिल्यानंतर बलात्कार व अपहरणाचे तीन आरोपीसुद्धा जामिनावर सुटले. शहनाज व तिच्या कुटुंबियांना जिवे मारण्याच्या धमक्या देण्यात येऊ लागल्या. परंतु त्यांनी तक्रार मागे घेतली नाही. ते पोलिसांकडे संरक्षण मागण्यासाठी गेले, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले, वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडे मदतीची याचना केली परंतु काहीही उपयोग झाला नाही. अखेर, चार डिसेंबर रोजी शहनाजचे आईवडिल या प्रकरणासंबंधात कचेरीत गेले असता गुंडांनी घरात घुसून शहनाजवर रॉकेल ओतून तिला पेटवून दिले.
या निर्घृण घटनेनंतरसुद्धा पोलिस प्रशासनाने गुन्हेगारांना पाठीशी घालणे सुरूच ठेवले. बहुतांश शरीर जळालेल्या अवस्थेत शहनाजचे आई-वडिल तिला बाईकवर बसून फोकल पॉर्इंट स्टेशनवर घेऊन गेले. तेथे पोलिसांनी त्यांचे काहीही ऐकून घेण्यास व मदत करण्यास स्पष्ट नकार दिला. आईवडिलांना शहनाजला बाईकवर बसवूनच सरकारी इस्पितळात घेऊन जावे लागले. शहनाजने इस्पितळात जजसमोर दिलेल्या जबाबात जाळण्याच्या संदर्भात सात तरुणांचा उल्लेख केला. चारी बाजूंनी टीका होत असल्यामुळे पोलिसांनी अखेर चार गुंडांना अटक केली. इतर आरोपी मोकाट फिरत राहिले. उपचारासाठी पोलिस प्रशासन किंवा सरकारने कोणतीही विशेष मदत केली नाही. ९० टक्के जळालेल्या शहनाजला लुधियानाहून पटियालाच्या रजिंदर इस्पितळात हलविण्यात आले. तेथून चंदिगढच्या ३२ सेक्टर इस्पितळात. शहनाजला ताबडतोब एखाद्या चांगल्या इस्पितळात भरती करून उपचार करण्यासाठी कुटुंबियांची मदत करण्यात आली असती तर कदाचित तिचा जीव वाचला असता. चार दिवस शहनाज मृत्यूशी झुंजत होती. ८ डिसेंबरच्या रात्री तिची प्राणज्योत मालवली. मृत्यूच्या थोडा वेळ अगोदर तिने आपल्या आईवडिलांना सांगितले – ‘‘मुझे इन्साफ चाहिये!’’
या एकूण प्रकरणात शहनाज व तिच्या कुटुंबियांनी दाखविलेली हिम्मत वाखाणण्यासारखी आहे. कित्येक स्त्रिया व त्यांचे कुटुांबीय सामाजिक बदनामी, मारहाण, जिवाच्या धोक्यामुळे व न्याय मिळण्याची अपेक्षा नसल्यामुळे अशा घटना लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु या धैर्यवान मुलीने व तिच्या हिम्मतवान गरीब कुटुंबियांनी असे केले नाही.
८ डिसेंबर रोजी कारखाना मजदूर युनियन पंजाबने प्रेमनगर ढंढारी येथे लोकांची एक सभा बोलावून पीडित कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी संघर्ष सुरू करण्याची घोषणा केली. या सभेत जवळपास एक हजार कारखाना कामगार, दुकानदार, फेरीवाले सहभागी झाले होते. कारखाना मजदूर युनियनच्या नेत्यांनी व मोहल्ल्यातील काही लोक मिळून ढंढारी बलात्कार व हत्याकांडविरोधी संघर्ष समिती स्थापन करण्यात आली. दुसऱ्या दिवशी पोलिस कमिशनर कार्यालयासमोर मोठे धरणे आंदोलन करण्याचा व सर्व आरोपींना ताबडतोब अटक करून व लवकरात लवकर आरोपपत्र सादर करून फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये केस चालविण्याची मागणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे दोषींना मृत्यूदंड, गुंडांची मदत करणाऱ्या पोलिसांना तुरुंगवास, पीडित कुटुंबाला अधिक नुकसानभरपाई, सर्वसामान्यांची, विशेषतः स्त्रियांच्या सुरक्षेची सुनिश्चिती आदी मागण्या करण्याचे ठरविण्यात आले.
त्याच रात्री १ वाजता शहनाजचा मृत्यू झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी पोलिस कमिशनरच्या कार्यालयासमोर धरणे होऊ शकले नाही, परंतु शहनाजच्या घरापाशीच हजारो लोक जमले. कारखाना मजदूर युनियनसोबत बिगुल मजदूर दस्ता, टॅक्सटाइल हौजरी कामगार युनियन, नौजवान भारत सभा आणि पंजाब स्टुडंट्स युनियन (ललकार) हेदेखील या संघर्षात सामील झाले. हजारो लोक या निदर्शनात सहभागी झाले. प्रशासनाकडून एकूण इलाक्यात पोलिसांचा कडक बंदोबस्त लावून लोकांना निदर्शनात सहभागी होण्यास अटकाव करण्याचा प्रयत्न झाला. दहशतीद्वारे आंदोलन फोडण्यात अपयश आल्यानंतर काही राजकीय पक्षांचे नेते आणि धार्मिक नेत्यांमार्फतही प्रयत्न करण्यात आले. काँग्रेसच्या एका मुसलमान नेत्याने हा त्यांच्या समाजाचा मुद्दा असून निदर्शन बंद करण्यास सांगितले परंतु शहनाजच्या आईने निदर्शन बंद होणार नसल्याचे ठणकावून सांगितले. कामगार नेत्यांना ‘असामाजिक तत्त्व’ आणि ‘दहशतवादी’ म्हणून बदनामी करण्याचे प्रयत्नसुद्धा झाले. दुसऱ्या बाजूने अशा प्रकारची कारस्थाने सुरू असूनही लोकांनी संघर्ष सुरूच ठेवला.
पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांनी मिडियासमोर ‘‘या प्रकरणाचे वास्तव काही वेगळेच आहे’’, असे वक्तव्य दिले. याचाच अर्थ शहनाजने ९० टक्के जळालेल्या अवस्थेत दिलेला जबाब खोटा होता! पंजाब सरकार या प्रकरणाला चुकीचे वळण देण्याचा प्रयत्न करून गुन्हेगारांना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत होते हे उघड झाले होते. सुखबीरसिंह बादल यांच्या या वक्तव्याच्या विरोधात १४ डिसेंबर रोजी ३ हजार आंदोलनकर्त्यानी, ज्यांच्यामध्ये प्रामुख्याने कामगारांचा समावेश होता, संघर्ष समितीच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रीय महामार्ग बंद केला. ढंढारी इलाका आता पोलिस छावणी बनला होता. पोलिसांच्या दहशतीला न जुमानता लोक खंबीरपणे उभे होते आणि प्रशासनाकडून न्यायाचे ठोस आश्वासन मिळाल्यानंतरच राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यात आला. यानंतर सरकारने बादल यांचे वक्तव्य वेगळ्या प्रकरणाबाबत होते, अशी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.
यानंतर अजूनही मोकाट असलेला आणि एक दोषी पोलिसांच्या हाती आला. अन्य दोन व्यक्तींनादेखील यानंतर अटक करण्यात आली. आता पोलिसांचे म्हणणे झाले की अटक करण्यात आलेल्यांपैकी एक व्यक्ती सुल्तान याच्या मते २५ ते २७ ऑक्टोबर या काळात मुलगी त्याच्यासोबत होती, व तिचे अपहरण करण्यात आलेले नव्हते. पोलिस खोटे साक्षीदार उभे करून प्रकरणाला वेगळा रंग देण्याचा प्रयत्न करीत असल्याचेच आतापर्यंत दिसून आले होते. अशा परिस्थितीमध्ये ‘ढंढारी बलात्कार आणि हत्या प्रकरण विरोधी संघर्ष समिती’चे पुर्नगठन करण्यात आले आणि २० डिसेंबर रोजी एका विशाल श्रद्धांजली सभेची घोषणा करण्यात आली. गाव आणि शहरांमध्ये अभियान चालवून लोकांना एकत्रित करण्यात आले. या दिवशी जास्त मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावून सतत दहशतीचे वातावरण निर्माण केले गेले, तरीही कडाक्याच्या थंडीतही १० हजार लोक या श्रद्धांजली सभेसाठी गोळा झाले.
आज समाजात स्त्रिया पावलोपावली महिलाविरोधी मानसिकतेच्या बळी ठरत आहेत. यामागे राजकीय वजन लाभलेल्या टोळक्यांकडून होणाऱ्या उपद्रवाचा मोठा वाटा आहे. अशा वेळी या समस्येला तोंड देण्यासाठी लोकांची एकजूट आत्यंतिक महत्त्वाची असून शहनाजला न्याय मिळवून देण्यासाठी लोकांनी उभारलेल्या संघर्षाने त्या एकजुटीचा एक आदर्श घालून दिलेला आहे. या संघर्षामुळे आरोपींना अटक झालीच, त्याचबरोबर स्त्रियांवर होणाऱ्या भीषण अत्याचारांना वाचा फोडत पोलिस आणि प्रशासनाच्या दडपशाहीला न जुमानता एकजुटीने संघर्ष करण्याची प्रेरणा दिलेली आहे. परंतु हा लढा अजून संपलेला नाही. शहनाजवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या नराधमांना शिक्षा होण्यासाठी लोकांची ही झुंजार एकता टिकवून ठेवावी लागेल, तसेच स्त्रिया व सर्वसमान्य जनतेला वेठीस धरणाऱ्या गुंडतंत्रापासून लोकांच्या संरक्षणाचा आणि मुक्तीचा हा लढा पुढे नेण्यासाठी लोकांची ही एकता अधिक विशाल आणि मजबूत बनवावी लागले.
स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५