कार्ल मार्क्‍स-नारायण सुर्वे

कार्ल मार्क्‍स

नारायण सुर्वे

poster_marx_bigमाझ्या पहिल्या संपातच

मार्क्‍स मला असा भेटला.

 

मिरवणुकीच्या मध्यभागी

माझ्या खांद्यावर त्याचा बॅनर होता.

जानकी अक्का म्हणाली, ‘वळिखलंस ह्याला –

ह्यो आमचा मार्कसबाबा

जर्मनीत जलमला, पोताभर ग्रंथ लिवले

आणि इंग्लंडच्या मातीला मिळाला.

‘सन्याषाला काय बाबा

सगळीकडची भूमी सारखीच

तुझ्यासारखी त्यालाही चार कच्चीबच्ची होती.’

माझ्या पहिल्या संपातच

मार्क्‍स मला असा भेटला.

 

पुढे एका सभेत मी बोलत होतो,

– तर या मंदीचे कारण काय

दारिद्र्याचे गोत्र काय

पुन्हा मार्क्‍स पुढे आला; मी सांगतो म्हणाला,

आणि घडाघडा बोलतच गेला.

परवा एका गेटसभेत भाषण ऐकत उभा होता.

मी म्हणालो –

‘आता इतिहासाचे नायक आपणच आहोत,

यापुढच्या सर्वच चरित्रांचेही.’

तेव्हा मोठ्याने टाळी त्यानेच वाजविली

खळखळून हसत, पुढे येत;

खांद्यावर हात ठेवीत म्हणाला,

‘अरे कविता-बिविता लिहितोस की काय

छान, छान.

मलासुद्धा गटे आवडायचा.’

 

स्फुलिंग १ सप्‍टेंबर २०१४