अमेरिकन सत्ताधाऱ्यांच्या पापाचे ओझे वाहते अमेरिकन सैनिक
अमेरिकन सत्ताधाऱ्यांच्या पापाचे ओझे वाहते अमेरिकन सैनिक
रौशन
‘‘माझे शरीर एक पिंजरा बनले आहे, ते असह्य वेदनांचा स्रोत बनले आहे. ज्या आजाराने मला घेरले आहे त्यावर जगातील सर्वात प्रभावी औषधसुद्धा उपयोगी पडत नाही आणि ह्या आजारावर कुठलाही उपाय नाही. दररोज, प्रत्येक क्षण सबंध शरीरात वेदनांचा संचार असतो. हे सगळे एखाद्या यातनेपेक्षा कमी नाही. डॉक्टरने देऊ केलेल्या सगळ्या औषधांच्या पश्चातही माझे मन वाळवंटासारखे शुष्क झाले आहे आणि ते भयंकर अशा दहशतीच्या छायेत, वाढती बेचैनी आणि सततच्या चिंतेने वेढले गेले आहे. अगदी साध्या गोष्टी, ज्या सगळ्यांसाठी खूप सोप्या आहेत, त्या करणे मला अशक्य झाले आहे. मी न हसू शकतो, न रडू शकतो. मला घराबाहेर निघणेसुद्धा अवघड वाटते. कुठल्याही व्यग्रतेमध्ये मला सुख मिळत नाही. झोप येईपर्यंत कुठलीही गोष्ट माझ्यासाठी केवळ आणि केवळ वेळ घालवण्याचे साधनमात्र आहे. आता कायमस्वरूपी चिरनिद्रेत जाणे हीच सर्वात चांगली गोष्ट आहे.’’
वरील वाक्ये ३० वर्षीय अमेरिकन सैनिक डेनियल सॉमर्सच्या पत्रामधील आहेत. डेनियलने आत्महत्या केली आहे. २००३ पासून तो कित्येक वर्षे इराकमध्ये राहिला होता आणि त्याने अनेक सैन्य कारवायांमध्ये भाग घेतला होता. तो त्याच दिवशी अमेरिकेमध्ये आत्महत्या केलेल्या २२ सैनिकांपैकी एक होता. इराक आणि अफगाणिस्तान युद्धात सहभागी सैनिकांवर आभ्यास करणाऱ्या एका संस्थेच्या रिपोर्टनुसार अमेरिकेमध्ये दररोज २२ सैनिक आत्महत्या करत आहेत. २००९ नंतर आत्महत्येच्या संख्येत आणि प्रमाणात लक्षणीय वाढ झाली आहे. केवळ ३० वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सैनिकांमध्ये आत्महत्येचे प्रमाण ४४ टक्के वाढले आहे. कित्येक प्रकरणांमध्ये आत्महत्या करणाऱ्या सैनिकांची संख्या प्रत्यक्षात युद्धात मारले गेलेल्या सैनिकांपेक्षा जास्त आहे. उदाहरणादाखल, जानेवारी, २०१२ ते सप्टेंबर, २०१२ दरम्यान २४७ सैनिकांनी आत्महत्या केली तर २२२ सैनिक प्रत्यक्ष सैन्य-कार्यवाहीत मृत्यूमुखी पडले. २०१४ च्या पहिल्या तिमाहीमध्येच १८९२ सैनिकांनी आत्महत्या केल्या. सैनिकांच्या आत्महत्येचा दर सामान्य नागरिकांच्या आत्महत्येच्या दराच्या दुप्पटहून अधिक आहे. ह्या व्यतिरिक्त युद्धभूमीवरून परतलेल्या अमेरिकन सैन्यामधील बरेच सैनिक मानसिक रोगी आहेत आणि त्यापैकी बऱ्याच जणांना पी.एस.टी.डी. नामक मानसिक आजाराने घेरले आहे. ह्या आत्महत्या नसून अमेरिकन सत्ताधारी, भांडवलदार ह्यांच्या नफ्याकरिता बळी चढवण्यात आलेल्या हत्या आहेत.
जेव्हा जगातील बड्या लुटारूंच्या, भांडवलदारांच्या नफ्याच्या पुनर्वाटपाच्या प्रश्नावरून दुसरे महायुद्ध झाले तेव्हा अमेरिका आर्थिक आणि राजकीय दृष्ट्या इतकी मोठी शक्ती नव्हती. दुसऱ्या महायुद्धामध्ये सोविएत रशिया आणि जर्मनीमधील युद्धात एक शक्ती पराभूत होईल आणि दुसरी दुबळी होईल आणि तिला पराभूत करणे सहजशक्य होईल असा विचार अमेरिकेने केला. ह्या योजनेबरहुकूम अमेरिकेने युद्धामध्ये सुरक्षित अंतर राखले. दुसरे महायुद्ध १९३९ मध्येच सुरू झाले होते पण अमेरिका प्रत्यक्ष युद्धात १९४३-४४ मध्ये उतरली. जेव्हा पूर्वेकडून स्टालिनच्या नेतृत्वाखाली सोविएत रशियाची लाल सेना जर्मन नात्झींना स्टालिनग्राड मधून पळवून लावून बर्लिनपर्यंत पोहचत असतानाच्या अनुकूल परिस्थितीत अमेरिकेने जर्मनीच्या विरोधात पश्चिमेकडून युद्ध आघाडी उघडली. त्यानंतर तिने स्वत:चे सामथ्र्य सिद्ध करण्यासाठी जपानच्या दोन शहरांवरती अणुबॉम्ब टाकले. ह्या युद्धादरम्यान अमेरिकन भांडवलदार वर्गाने मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्र, औषधे आणि अन्य युद्ध सामग्री युरोपीय देशांना विकून मोठ्या प्रमाणात नफा कमावला. युद्धानंतर युरोपातील बरेच देश कंगाल झाले होते आणि राजकीय शक्ती गमावून बसले होते. अमेरिकेने ह्या देशांना कर्ज दिले, ह्या देशांमधील पायाभूत सुविधांच्या पुनर्निर्माणाचे प्रकल्प अमेरिकन कंपन्यांनी घेतले आणि अशा प्रकारे अमेरिका दुसऱ्या महायुद्धानंतर कुटनितीच्या माध्यमातून एक आर्थिक आणि राजकीय महासत्ता म्हणून उदयास आली, ज्यात शस्त्रास्त्रनिर्मिती उद्येगाचे मोठे योगदान होते. दुसऱ्या महायुद्धापासून १९६० च्या दशकापर्यंत जागतिक अर्थव्यवस्थेने सुवर्ण युग अनुभवले आणि त्या कालखंडामध्ये अमेरिका आर्थिक समृद्धी अनुभवत होती. १९७० च्या दशकात सुरू झालेल्या आर्थिक संकटामुळे अमेरिकेसहित अनेक देशांच्या अर्थव्यवस्था डळमळू लागल्या, २० व्या शतकाच्या शेवटी जागतिक अर्थ व्यवस्थेची परिस्थिती थोडी बहुत सुधारली पण पुन्हा हाउसिंग बूम, सब-प्राइम संकट आणि कर्ज संकट यांसारख्या एकापाठोपाठ आलेल्या संकटांमुळे अमेरिकन अर्थव्यवस्था जास्तच डळमळीत झाली. भांडवलाची ताकत आणि नफ्याचा हव्यास ह्यामुळे शस्त्रास्त्रांचा उद्योग हा अमेरिकेच्या गळ्यातील ढोल बनला आणि हा ढोल वाजता ठेवण्यासाठी युद्धे अनिवार्य झाली.
वास्तविक पाहता, भांडवली समाजात एकूण संपत्तीवर मूठभर लोकांची मालकी असते आणि ह्या लोकांच्या अंतर्गत प्रतिस्पर्धेमुळे बाजारामध्ये अराजकतेचे वातावरण तयार होते ज्यातून पुन्हा पुन्हा आर्थिक संकटे तयार होतात. आर्थिक संकटामध्ये गरजेपेक्षा जास्त उत्पादन होते आणि रोजगार गेल्यामुळे जनतेची क्रयशक्ती कमी होते. अशा वेळी भांडवली व्यवस्थेला टिकून राहण्यासाठी उत्पादन साधनांचा मोठ्या प्रमाणात विनाश करावा लागतो जेणे करून त्यांच्या पुनर्निर्माणामधून नवीन बाजार आणि नवीन रोजगार निर्माण करणे शक्य व्हावे. ह्याच कारणाने भांडवली व्यवस्था मानवतेवर पुन्हा-पुन्हा युद्धे लादते जेणे करून भांडवलदारांना गुंतवणूक करण्यासाठी नवीन संधी तयार होतील. पहिले व दुसरे महायुद्ध आणि त्यानंतरची तमाम छोटी-मोठी युद्धे ह्यांचे खरे कारण ह्यात दडले आहे.
अमेरिकेची स्थिती अजून गुंतागुंतीची आहे कारण तिला केवळ युद्धांच्या माध्यमातून मोठा विध्वंस घडवून आणून आपल्या भांडवलदारांच्या नफ्यासाठी बाजार हवा आहे असे नव्हे तर अमेरिकेचा शस्त्रास्त्रांचा व्यापारही प्रचंड मोठा आहे. जर जगात शांतता प्रस्थापित झाली आणि देशा-देशांमधील तणावपूर्ण वातावरण संपुष्टात आले तर अमेरिकन शस्त्रास्त्र-निर्मिती उद्येग नष्ट होईल आणि तिच्या अर्थव्यवस्थेचा पायाच उखडून जाईल. अमेरिकेचे युद्ध लढण्यामागचे तिसरे कारण हेसुद्धा आहे की तिला कित्येक वर्षांपासून चालत आलेली स्वत:ची नेतागिरी टिकवायची आहे. त्यामुळेच अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धानंतर व्हिएतनाम, इराक आणि अफगाणिस्तान सारखी तीन मोठी युद्धे मानवतेवर लादली. ह्या तीन युद्धांव्यतिरिक्त अमेरिका जगभरातील ७० पेक्षा जास्त देशांमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात सैन्य कारवाया करत राहिली आहे. ह्या युद्धांमध्ये निरपराध लोकांवर केले गेलेले अत्याचार अजूनही विसरले गेले नाहीयेत. ह्या बरोबरच देशा-देशांमध्ये तणावाचे वातावरण कायम राहण्यासाठी प्रयत्न करणे, इतर देशांमध्ये स्वत:चे हित सांभाळणारे सरकार स्थापित करणे किंवा त्यासाठीच्या जनविरोधी विद्रोहांना सक्रिय पाठींबा देणे आणि गाझामध्ये निर्मम हत्याकांड करणाऱ्या इस्रायलसारख्या देशांची पाठराखण करण्याचे काम अमेरिका करत आली आहे. ह्या घृणित आणि निर्मम कामासाठी अमेरिकेकडे जगातील सर्वात मोठी सैन्य शक्ती आहे, आधुनिक शस्त्रास्त्र आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारच्या निर्दयी कारवाया करण्यासाठी सैन्यामध्ये स्पेशल युनिट्स अस्तित्वात आहेत. ह्या ताकदीचा उपयोग करून जगभरातील निर्दोष लोकांवर केले गेलेले काळजाचा थरकाप उडवणारे अत्याचार लपून राहिलेले नाहीत. हिरोशिमा व नागासाकीच्या जखमा अजून भरल्या गेल्या नाहीयेत. व्हिएतनाममध्ये दुसऱ्या महायुद्धापेक्षा जास्त प्रमाणात बॉम्ब वर्षाव केला गेला. निष्क्रिय बॉम्बची कित्येक वर्षे असलेली दहशत तिथे ज्यांनी अनुभवली आहे त्यांना रात्री झोपणे सुद्धा कठीण आहे. निरपराधांना कैदी बनवून त्यांच्यावर करण्यात आलेले अत्याचार आणि ड्रोन हल्लयांच्या माध्यमातून केलेली हत्याकांडेही कोणी विसरू शकत नाही. अमेरिकन युद्धखोरांनी लहान मुलं, बायकांना सुद्धा सोडले नाही.
नफ्याच्या हव्यासापोटी केल्या जाणाऱ्या ह्या हत्याकांडासाठी तंत्रज्ञान आणि मशिन्स ह्यापेक्षाही महत्वाचे हत्यार आहे ते म्हणजे – मनुष्य, ज्याचे रुपांतर जनावराप्रमाणे हिंस्र पशूमध्ये आणि आदेशाबरहुकूम हत्या करणाऱ्या मशीनमध्ये करण्यावर पूर्ण जोर दिला जातो. शिव्यांची लाखोली, अपमानजनक शब्द आणि कडक शिक्षा ह्यांचा भडीमार असलेल्या सैनिक प्रशिक्षणामध्ये त्यांना हत्या करण्यास सक्षम बनवले जाते. सैन्यामध्ये हे शिकवले जाते कि सैनिकाचे काम विचार करणे नसून आदेशांचे पालन करणे आहे. परंतु, जर्मन कवी ब्रेख्तने म्हटल्याप्रमाणे – मनुष्य सर्वात प्रभावी हत्यार आहे पण त्याचा एक गुणधर्म आहे की तो विचार करू शकतो. जेव्हा कधी ह्या मशिन्समधील मानवी मन जागे होते तेव्हा ते ह्या हत्या करण्याच्या विरोधात विद्रोह करते. हा विद्रोह विविध रूपांमध्ये व्यक्त होतो आणि अमेरिकन सैनिकांच्या आत्महत्या त्याचेच एक रूप आहे. अफगाणिस्तान, इराकमधील हत्याकांडामध्ये सहभागी असलेल्या सैनिकांपैकी जे पूर्णपणे पशू बनले नाहीत त्यांना रक्ताचे वाहणारे पाट, बायकांचा आकांत, लहानग्यांचे रडणे आणि निरपराधांचे निरागस, घाबरलेले आणि दयनीय चेहरे नेहमी छळत राहतात. ते मानसिक तणाव, बेचैनी आणि निद्रानाश ह्यांना बळी पडतात आणि हे सर्व इतक्या टोकाला जाते कि त्यांच्या समोर पशू बनणे किंवा आत्महत्या करणे हे दोनच मार्ग शिल्लक राहतात. ल्ल
हे सर्व केवळ अमेरिकेतच होत आहे असे नाही तर सबंध जगभरात अशा घटना घडत आहेत. भांडवली व्यवस्थेसाठी युद्ध किती अनिवार्य झाले आहे ह्याचा अंदाज ह्या तथ्यातून घेता येईल की २०१३ मध्ये जागतिक पातळीवर शस्त्रास्त्र व्यवहारांची उलाढाल १०० दश अब्ज डॉलर्सच्या आसपास होती. जगभरात मनुष्यास संवेदनाहीन, निर्दयी बनवण्याचे काम लहान असल्यापासूनच सुरू होते. टिव्ही, मीडिया, पुस्तके, पत्रिका आणि चित्रपट इत्यादींचा खुराक देऊन सुरुवातीपासूनच मनुष्याला पशू बनवण्याचे प्रयत्न केले जातात. चित्रपट, खास करून हॉलीवुडच्या चित्रपटांमधून हिंसा एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या घृणित पातळीवर दाखवली जाते की प्रेक्षकाला हळूहळू त्या हिंसेची सवय होऊन जाते. नायक नेहमी लोकांना भाजी कापल्यासारखे कापतो आणि लोकांना ह्याचे काहीही वाईट वाटत नाही, किंबहुना आनंदच होतो. अशा प्रकारे लोकांना हे शिकवण्याचा प्रयत्न केला जातो की एखाद्या मनुष्याचे मारले जाणे ही काही खूप मोठी गोष्ट नाही. चित्रपट हे तर एक उदाहरण आहे, मानवतेच्या शत्रूंकडून अशा प्रकारचा हल्ला अनेकविध रूपांमधून केला जातोय. यासंबंधीची इतिहासातील एक घटना आठवते – सॉण्डर्सच्या हत्येनंतर सर्व सहकारी राजगुरूच्या अचूक निशाण्याचे कौतुक करत होते त्यावेळी राजगुरूने म्हटले होते सॉण्डर्स सुद्धा कोण्या एका आईचा मुलगाच होता. भगत सिंगने सुद्धा सॉण्डर्सच्या हत्येनंतर वितरीत केलेल्या पत्रकांमध्ये लिहिले होते – ‘‘आम्हाला माणसाच्या मृत्यूचे दुःख आहे’’. आज पावलोपावली दिसणाऱ्या हिंसेच्या माध्यमातून लोकांना इतक्या टोकाचे असंवेदनशील बनवले जात आहे कि त्यांना इस्रायल द्वारा पॅलेस्टाईनमध्ये लहान मुलांसकट हजारोंच्या हत्याकांडाची बातमी वर्तमानपत्रामधील इतर बातम्यांपेक्षा वेगळी वाटत नाही, त्यांना ती बातमी बेचैन करत नाही, कुठलीही चीड निर्माण करत नाही. हिंसेचा हा पाठ हत्या करण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या सैनिकांसाठीच असतो असे नाही तर सामान्य नागरिकांसाठीसुद्धा असतो. तमाम सत्ताधारी लुटारू त्यांच्याकडून केल्या जाणाऱ्या वा करवून घेतल्या जाणाऱ्या हत्याकांडांना लोकांची संमती मिळवण्याचे किंवा अशा हत्याकांडांना ‘छोटी-मोठी’ घटना बनवून प्रस्तुत करण्याचे काम करतात. भारतातसुद्धा सैन्य आणि पोलिस दलाला ह्याच आधारे तयार केले जाते. जर असे नसते तर काश्मीर, पूर्वोत्तर भारतासहित देशभरातील विविध भागांमध्ये केले जात असलेले सरकारी दमनचक्र भारतीय राज्यत्तेला कधीच शक्य झाले नसते. भारतामध्येसुद्धा सैन्य आणि अर्धसैनिक दलांमध्ये सैनिकांच्या आत्महत्या किंवा त्यांच्या वरिष्ठांच्या हत्या करण्यासारख्या वाढत्या घटना सैन्यदलातील वाढत्या बेचैनीच्याच निदर्शक आहेत.
त्यामुळेच, जोपर्यंत भांडवली व्यवस्थेचे अस्तित्व आहे तोपर्यंत ती मानवजातीवर युद्धे लादेल, नफ्यासाठी निरपराध लोकांचे हत्याकांड करत राहील, सैनिकांना हत्या करणारी मशीन बनण्यास किंवा आत्महत्या करण्यास बाध्य करत राहील आणि मानव जातीस पशूंच्या पातळीवर पतित होण्यास भाग पाडेल. परंतु इतिहासाचा हा धडा आहे कि त्यांच्या संपूर्ण प्रयत्नांच्या पश्चातही लुटारू सत्ताधारी संपूर्ण मानवजातीला कदापि पशू बनवू शकणार नाहीत. रशियन कथाकार चेखवच्या मते – ‘‘जिवंत माणसे अन्यायाच्या विरोधात प्रतिकार करतात’’. इतिहासाच्या प्रत्येक कालखंडात स्पार्टाकस आणि भगात सिंह आदीr जन्म घेत राहिले आहेत आणि क्रांतीच्या माध्यमातून लुटारूंना धुळीस मिळवत राहिले आहेत. आज अमेरिकन सैनिकांचा राग व्यक्तिगत विद्रोह किंवा आत्महत्यांच्या रूपात समोर येत आहे, कदाचित उद्या जन-आंदोलनांच्या समर्थनाच्या रूपातही पुढे येईल आणि ते मानवतेला पशु बनवणाऱ्या ह्या लुटारू व्यवस्थेचा अंत करू पाहणाऱ्या लढाईमध्ये भागीदार बनतील.
स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५