भारतीय विज्ञान परिषद – वैज्ञानिक तर्कपद्धतीचे श्राद्ध घालण्याची तयारी

भारतीय विज्ञान परिषद – वैज्ञानिक तर्कपद्धतीचे श्राद्ध घालण्याची तयारी 

तपीश

Vaidik scienceतसे पाहिले तर ह्या लेखाचा विषय नुकत्याच संपन्न झालेल्या भारतीय विज्ञान परिषदेशी निगडीत आहे, तरीही मी ह्या लेखाची सुरुवात थोडेसे मागे जाऊन, फार नाही, एक वर्षभर मागे जाऊन करत आहे. २ मार्च, २०१३ रोजी राजनाथ सिंग म्हणाले होते, ‘‘जर आमची सत्ता आली तर भारताला जगाची बौद्धिक राजधानी (वाचक ‘कुपमंडूकांची राजधानी’ असेही वाचू शकतात!) बनवू, भारताला पुनश्च जगद्गुरुच्या ( वाचक ‘गुरु घंटाल’ असेही वाचू शकतात!) स्थानी विराजमान करू.’’ त्याच भाषणामध्ये त्यांनी हेही सांगितले होते की भौतिकशास्त्राचा जगप्रसिद्ध अनिश्चिततेचा सिद्धांत वेदांमध्ये अगोदरच विशद केलेला आहे. ह्या सिद्धांताचे जनक समजले जाणारे हाइजेनबर्ग यांना ह्या सिद्धांताची माहिती १९२९ मधील भारतभेटीच्या दरम्यान रवींद्रनाथ टागोर यांच्याशी झालेल्या चर्चेमधून मिळाली. बिचाऱ्या राजनाथ सिंग यांना हे माहिती नव्हते की हाइजेनबर्ग यांनी हा सिद्धांत भारतभेटीच्या २ वर्षे अगोदरच मांडला होता! अशाच प्रकारे केंद्रीय  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यांच्याकडून शुल्भ-सूत्रांची मोडतोड करून त्याला पायथागोरसच्या प्रमेयाच्या समतुल्य दाखवण्याचा प्रयत्न असो किंवा मोदींनी (गणपतीचे उदाहरण देऊन) केलेला प्लास्टिक सर्जरीचा दावा किंवा संघाशी संबंधित किंवा संघाच्या विचारधारेने प्रभावित बुद्धिवंतांकडून (?!) केल्या जात असलेल्या जैनेटिक इंजीनीयरिंग, अणूबॉम्बचे अस्तित्व, गुरुत्वाकर्षणाच्या नियमाचा शोध़… म्हणजेच सर्व आधुनिक वैज्ञानिक शोधांचा उल्लेख वेदांमध्ये पूर्वीच होता अश्या दाव्यांची मालिकाच सुरू झाली आहे.

देशातील पुराणपंथी आणि पुनरुत्थानवादी शक्ती ज्या ‘‘बौद्धिक’’ वातावरण निर्मितीमध्ये तन-मन-धन (येथे हे लक्षात घ्या की हे ‘धन’ देशी-विदेशी भांडवलदारांच्या तिजोरीमधून बरसते) अर्पण करून लागल्या आहेत त्याचेच प्रतिबिंब भारतीय विज्ञान परिषदेच्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये  पडलेले बघावयास मिळाले. भारतीय विज्ञान परिषदेच्या मुंबई येथील अधिवेशनामध्ये प्राचीन भारतामधील वैमानिक तंत्रज्ञानाच्या (Aviation Technology) प्रगतीवर एक पेपर प्रस्तुत करण्यात आला. ह्या पेपरचे लेखक आनंद बोडस यांनी दावा केला की आपल्याकडील ऋषी-मुनींनी ७००० वर्षांपूर्वी विमान बनवण्याची कला आणि तंत्रज्ञान ह्यात नैपुण्य प्राप्त केले होते. ही विमाने एका देशातून दुसऱ्या देशाची, एका खंडातून दुसऱ्या खंडाची आणि एका ग्रहावरून दुसऱ्या ग्रहाची यात्रा करू शकत असत! हा दावा सादर करणाऱ्या ह्या नकली वैज्ञानिकाने, तो सांगत असलेली माहिती ‘वैमानिक शास्त्र’ नामक ग्रंथातून घेतल्याचे सांगितले. ह्या पाखंडी माणसाने असा दावासुद्धा केला की ह्या शास्त्राची रचना ऋषी भारद्वाज यांनी ७००० वर्षांपूर्वी केली होती. श्री बोडस यांचा असा दावा आहे की ही विमाने ६० ते २०० फूट लांब असत आणि त्यांच्यामध्ये ४० छोटी इंजिने लावलेली असत. ही विमाने चालवणाऱ्या  वैमानिकांच्या पोशाखाचा उल्लेख करत असताना हे महाशय म्हणतात की त्यांचे कपडे पाण्यामध्ये उगवणाऱ्या एका विशिष्ट प्रकारच्या वनस्पतीपासून तयार केले जात. अशाच प्रकारे ह्या अधिवेशनामध्ये अन्य दोन पेपर्सच्या माध्यमातून हे सांगण्याचा प्रयत्न केला गेला की प्राचीन काळातच भारतामध्ये आजच्या एवढी उन्नत शल्य चिकित्सा पद्धती (Surgical Science) अस्तित्वात होती आणि वनस्पती शास्त्र (Botany) सुद्धा आजच्या इतकेच उन्नत होते. चला तर मग, सर्वप्रथम आनंद बोडस यांच्या ‘वैमानिक शास्त्र’मधील दावे आधुनिक वैज्ञानिकांनी केलेल्या शोधांच्या कसोटीवर टिकतात की नाही ते पाहू आणि त्यावर ह्या वैज्ञानिकांचे काय मत आहे तेही बघू या.

४० वर्षांपूर्वी IISC, बेंगलोर  मधील प्राध्यापक मुकुंद, एस.एस.देशपांडे, एच.आर. नागेन्द्र, ए.प्रभु आणि एस.पी गोविन्दराजू ह्यांच्या टीमने १९७४ मध्ये Scientific Opinion नामक शोध-पत्रिकेमध्ये एक पेपर प्रकाशित केला होता ज्याचे शीर्षक होते ‘‘Critical Study of the Work Vyamanika Shastra’’. ह्या पेपरमध्ये ह्या वैज्ञानिकांनी ‘वैमानिक शास्त्र’  ह्या पुस्तकाच्या अभ्यासाच्या आधारे काही निष्कर्ष काढले होते जे अवैज्ञानिक दृष्टीकोन ठेवणाऱ्या लोकांच्या काल्पनिक उपलब्धींमधील हवा काढून घेण्यास पुरेसे आहेत. ह्या पेपरमध्ये वैज्ञानिकांनी ह्या पुस्तकाच्या अभ्यासाच्या आधारे असे म्हटले होते की हे पुस्तक पंडित सुभ्भार्या शास्त्री द्वारा १९०० ते १९२२ च्या दरम्यान शोधले गेले आहे, ज्याला १९५१ मध्ये International Academy of Sanskrit Research at Mysore चे संस्थापक ए.एम. जोयसेर यांच्या द्वारे प्रकाशित केले गेले होते. त्यामुळे हे पुस्तक ७००० वर्षांपूर्वी ऋषी भारद्वाज यांनी लिहिले आहे असे म्हणणे चुकीचे आहे. ह्या पेपरमध्ये ‘वैमानिक शास्त्र’मध्ये वर्णिलेल्या विमानांच्या बाबतीत प्राध्यापक मुकुन्द यांनी त्यांच्या चमूबरोबर सखोल अभ्यास करून नमूद केले की ‘‘ह्या पुस्तकामध्ये विमानांच्या बाबत वास्तविक तथ्य देण्या ऐवजी मनमानी विवरण देण्यात आले आहे’’. वर्णन केलेल्या कुठल्याही विमानाची ना योग्यता आहे, ना त्यांच्यामध्ये अशी लक्षणे आहेत ज्यांच्या आधारे त्यांना उडवता येऊ शकेल; त्यांचे त्रिकोनमितिय स्वरूप उडण्यासाठी आवश्यक निकषांच्या पातळीवर अकल्पनीयरित्या भयंकर असे आहे, आणि ज्या सिद्धांतांचे वर्णन विमानाच्या उडण्या संबंधात केले गेले आहे ते सिद्धांत प्रत्यक्षात त्यांना उडण्यास सहाय्यभूत ठरणारे नाहीत’.१

दूरच्या भूतकाळात अस्तित्वात असलेल्या स्वर्णिम इतिहासाची मनमोहक कल्पना वास्तवात विज्ञानाचा मार्ग कश्या प्रकारे प्रशस्त करू शकेल ह्याचा निर्णय आपण सुजाण वाचकांवरती सोडूयात आणि ह्या विज्ञान परिषदेमध्ये प्रस्तुत केल्या गेलेल्या वनस्पती शास्त्राचा विकास आणि शल्य चिकित्सेसंबंधीच्या अतिरंजित दाव्यांच्या मागचे सत्य समजून घेण्याचा प्रयत्न करूयात.

आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भारतीय विचारवंत देवीप्रसाद चटृोपाध्याय यांनी आपल्या प्रसिद्ध ‘प्राचीन भारतातील विज्ञान आणि समाज’ या ग्रंथातील अकराव्या अध्यायामध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग—हृदय संहिता यामध्ये नमूद केलेल्या वनस्पतींसंबंधात स्पष्ट उल्लेख केला आहे  – ‘‘सर्वप्रथम वनस्पतींची चर्चा करूयात – ठाकुर बळवंत सिंह आणि के. सी. चुनेकर यांनी कित्येक दशके चिकाटीने संशोधन करून आयुर्वेद विषयक ३ प्रमुख ग्रंथांमध्ये उल्लेखिलेल्या जडी-बुटी, वनस्पतींची यादी बनवली आहे. त्यांच्या संख्येविषयी ते लिहितात : ‘ह्या तिन्ही संहितांमध्ये उल्लेख आलेल्या जडी-बुटी, वनस्पतींची संख्या ढोबळमानाने ६०० ते ७०० च्या दरम्यान असल्याचे अनुमान आहे….’ इथे लक्षात घेण्याची गोष्ट ही आहे कि ह्या आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये ह्या वनस्पतींवर वनस्पतींच्या रूपात विचार केला गेलेला नाही. ह्यांमध्ये केवळ ह्या गोष्टीचे विवेचन केले गेले आहे की ह्या वनस्पतींच्या विभिन्न भागांचा किंवा त्यांच्यापासून निर्मित उत्पादनांच्या उपयोगाने मनुष्याच्या शरीरावर काय प्रभाव पडतो.’’२ वाचक इथे हे बघू शकतात की प्राचीन आयुर्वेदाचार्यांच्या वनस्पती जगतातील रुचीचे मुख्य कारण वनस्पती शास्त्राचा आधुनिक दृष्टीकोन – ज्याने ज्ञानाच्या ह्या शाखेला स्वतंत्र  अश्या संशोधन शाखेत रुपांतरीत केले – नसून त्या वनस्पतींमधील औषधी गुणधर्म हे होते.

ह्याच विज्ञान परिषदेमध्ये अश्विन सावंत यांच्या द्वारे शल्य चिकित्सेवर सादर केलेल्या पेपरमध्ये दावा केला गेला की भारतामध्ये आजपासून ८००० वर्षांपूर्वी प्लास्टिक सर्जरी सोबतच कपाळ आणि डोळ्यांची सर्जरीसुद्धा होत असे. हे सत्य आहे की चरक संहितेमध्ये शल्य चिकित्सेचे वर्णन आढळते. परंतु अश्विन सावंत यांच्याकडून ८००० वर्षांपूर्वी शल्य चिकित्सा अस्तित्वात असल्यासंबंधी जो दावा केला गेला आहे, त्याची सत्यता पडताळण्यासाठी आपल्याला ह्या विषयाचा विस्तृत धांडोळा घ्यावा लागेल.

सत्य तर हे आहे की आयुर्वेदाच्या विकासाचा इतिहास हा भारतातील प्रगतिशील आणि प्रतिगामी शक्तींमधील संघर्षाचा इतिहास राहिला आहे. पुरातन काळात आयुर्वेदाला, जेव्हा तो त्याच्या विकासाच्या प्रारंभिक अवस्थेत होता, समाज-बहिष्कृत करण्यात आले होते आणि अशा प्रकारे प्राचीन भारतातील एका महान भौतिकवादी वैज्ञानिक परंपरेला परम्परावाद्यांकडून आणि पोंगा-पंडितांकडून धुळीस मिळवले गेले. आता ह्यात आश्चर्य वाटण्यासारखे काहीही नाही की त्या काळातील पोंगा पंडितांचे आजचे वारसदार अर्थातच आर.एस.एस़ आणि त्यांचे संस्कृती-धर्म-ध्वजधारी नवनवीन मार्गांनी विज्ञान विरोधी प्रचार करत आहेत.

आयुर्वेदाच्या इतिहासाची चर्चा करत असताना देवी प्रसाद चटृोपाध्याय यांनी त्यांची रचना ‘प्राचीन भारतातील विज्ञान आणि समाज’ मध्ये एका ठिकाणी सांगितले आहे की ‘‘आयुर्विज्ञानाला भारतीय परंपरेमध्ये आयुर्वेद म्हटले गेले आहे. त्याचे ३ प्रमुख स्त्रोत ग्रंथ आहेत ज्यांना अलंकारिक भाषेमध्ये वृद्धत्रयी अर्थातच तीन प्राचीन ग्रंथ असे म्हटले जाते. ते ग्रंथ आहेत : चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांग संग्रह.’’…३ प्राचीन काळामध्ये चरक संहितेच्या उपेक्षेचे ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध आहेत. चटृोपाध्याय हे सांगतात की संहितेच्या रचनेमध्ये अंतिम योगदान दिलेल्या दृढ़बल ह्याने स्वत: हे कबूल केले आहे की ‘‘अग्निवेशद्वारे तंत्रबद्ध आणि चरकाद्वारे संस्कृतबद्ध करून त्याच्यापर्यंत (दृढ़बल पर्यंत) पोहोचेतो चरक संहितेचा जवळ जवळ एक तृतीयांश भाग गायब झाला होता.’’…४ वाचकांनी ही गोष्ट लक्षात घ्यावी की दृढ़बलाचा जन्म गुप्त काळात सहाव्या शतकाच्या आसपास झाला होता. भारतीय विधी निर्मात्यांमध्ये सर्वात प्राचीन मानले जाणारे आपस्तंब, गौतम आणि वसिष्ठ यांची वचने उद्धृत करून चटृोपाध्याय यांनी काया चिकित्सक आणि शल्य चिकित्सकांच्या (Physicians) प्रती ब्राह्मण आणि पुरोहित वर्गाने पसरवलेल्या घृणेच्या भावनेचा संदर्भ देत म्हटले आहे की ‘‘आपस्तंब धर्मसूत्रात म्हणतात : ‘एखाद्या काया चिकित्सकाकडून, शिकाऱ्याकडून, शल्य चिकित्सकाकडून, व्याभिचाऱ्याकडून किंवा षंढ व्यक्तीकडून अन्न ग्रहण करू नये…’ गौतम धर्मसूत्रामध्ये ह्या गोष्टीवर जोर दिला गेला आहे की ‘ब्राह्मण एखाद्या अशा व्यापाऱ्याकडून तर अन्न ग्रहण करू शकतो जो स्वत: कारागीर नाही परंतु त्याने एखाद्या कारागीर, व्यभिचारिणी स्त्री, अपराधी, सुतार, शल्य चिकित्सक आणि अशाच अन्य लोकांकडून अन्न ग्रहण करता कामा नये.’ त्याच प्रकारे वसिष्ठसुद्धा म्हणतो की ‘याचना न करताही जर एखादा काया चिकित्सक, शिकारी, शल्य चिकित्सक भिक्षा देऊ इच्छित असेल तरी ती भिक्षा घेण्याचा निषेध केला पाहिजे.’ ‘‘ ५

चटृोपाध्याय पुढे लिहितात की धर्मसूत्रांपासून ते स्मृतींच्या रचनेच्या दीर्घ कालखंडामध्ये चिकित्सक आणि त्याच्या चिकित्सा कार्याविषयी जवळ जवळ सर्व धर्मासूत्रकार आणि स्मृतीकारांची तिरस्काराची भावना जशीच्या तशी कायम राहिली. ते पुढे लिहितात की मनुने तर हेदेखील घोषित केले की ‘‘चिकित्सकाकडून प्राप्त झालेले अन्न ‘पू’सारखे दूषित असते’’६ अशा प्रकारे आपण बघू शकतो की भारतीय चिकित्सा शास्त्रामधील महान वैज्ञानिकांवरसुद्धा शूद्रांप्रमाणेच नीचता लादण्यात आली.

आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्याशी निगडित शेकडो संघटना तसेच खाटे बुद्धिजीवी पुराणांत आणि शास्त्रांमध्ये असलेल्या आणि धर्माच्या वेष्टनात गुंडाळून ठेवलेल्या महान भौतिकवादी परंपरा आणि वैज्ञानिक उपलब्धींच्या जागी मिथक, भाकडकथा यांनाच प्राचीन भारताच्या  वैज्ञानिक उपलब्धींच्या रूपात प्रस्तुत करण्याच्या आपल्या फॅसिस्ट अजेंड्यावर मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. आपण विसरता कामा नये की फॅसिस्ट शक्तींचा पहिला हल्ला जनतेची तर्कशक्ती आणि इतिहासबोध यांवरच असतो. तर्कशक्ती आणि इतिहासबोध ह्यांनी रिक्त समाजमानस फॅसिस्ट अजेंड्यावर संघटित करणे नेहमीच सोपे असते. जर्मनीमध्ये हिटलरने पाठ्यपुस्तकांचे पुनर्लेखन करावयास लावले होते, हा निव्वळ योगायोग नाही. त्याने जर्मन समाजाचे हरवलेले वैभव पुन्हा प्राप्त करून देण्याचे आश्वासन जनतेला दिले होते आणि जर्मनीला जगातील सर्वात शक्तिशाली देश बनवण्याचे स्वप्न दाखवले होते. आज आपणसुद्धा चहूबाजूंनी अश्या असंख्य घटना घडताना बघत आहोत.

आपण हेही लक्षात घेतले पाहिजे की अंधविश्वास आणि इतिहासोन्मुखता यांच्या वाढत्या  ज्वराचा संबंध केवळ आर.एस.एस, भाजपा किंवा त्यांच्या सहयोगी संघटनांपुरता मर्यादित नाही. आज ही एक विश्वव्यापी परिघटना बनली आहे आणि वेगवेगळ्या धार्मिक कटृरपंथी आणि पुनरुत्थानवादी शक्ती ह्यामध्ये सहभागी आहेत. ह्या परिघटनेचा वस्तुगत आधार भांडवलशाहीच्या विश्वव्यापी पतनोन्मुखतेमध्ये निहित आहे. आज जागतिक भांडवलशाही तिच्या स्वाभाविक गतीने अशा स्थितीला येऊन पोहोचली आहे जेथून तिच्याकडे जनतेला देण्यासाठी सकारात्मक असे काहीही उरलेले नाही. विज्ञान, कला आणि इतिहास ही क्षेत्रेसुद्धा ह्याला अपवाद नाहीत. भांडवलाचे वर्चस्व कायम राखण्यासाठी भांडवलशाही स्वयंस्फूर्त गतीने समाजात अंधविश्वास, अंधभक्ति, कूपमंडूकता आणि  इतिहासोन्मुखता ह्यासारख्या टाकावू मूल्यांना खतपाणी घालत आहे. अनिर्बंध भांडवली शक्तीचे अस्तित्व कायम ठेवण्यासाठी आवश्यकता असते ती म्हणजे सर्व प्रकारच्या पुरातन आणि नवनवीन अंध-उन्मादी विचारांना समाजाच्या धमन्यांमध्ये भिनवले जाण्याची! आर.एस.एस आणि भाजप यांचा तथाकथित वैज्ञानिक-सांस्कृतिक अजेंडा प्रत्यक्षात भारतीय भांडवली वर्गाच्या ह्याच अचेतन वस्तुगत आवश्यकतेची सचेतन अभिव्यक्ति आहे.

या सामान्य परिस्थितीच्या संदर्भातच आपण भारतीय विज्ञान परिषदेच्या मुंबई अधिवेशनामध्ये घडलेल्या लाजिरवाण्या घटना बघू-समजू शकतो. ह्यावेळी हल्ल्यासाठी देशामध्ये विज्ञानासाठी प्रख्यात असलेल्या सर्वाेच्च संस्थेचा मंच निवडला गेला होता, त्यामुळे ह्या प्रकरणाचे गांभीर्य जास्त आहे. सांप्रदायिक फॅसिस्ट शक्तींनी ह्या मंचाला निशाणा बनवून आणि सोबतच ‘विज्ञाना’चा नारा देऊन देशाच्या उरल्या-सुरल्या वैज्ञानिक तर्कशक्तीचे थडगे खोदण्याची घोषणा केली आहे.

स्रोत

१. लेख ‘वैदिक-विज्ञान : महाकाव्यांमधील मिथक आणि फिक्शन यांच्याकडे बघण्याच्या दृष्टिकोनाबाबत काही प्रश्न’, Blog: The Spark of Change

२. पान ९६,‘प्राचीन भारतामध्ये विज्ञान आणि समाज’,देवी प्रसाद चटृोपाध्याय

३. पान २८,उपरोक्त

४. पान ३९,उपरोक्त

५. पान २४१,उपरोक्त

६. पान २४३,उपरोक्त

स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५