फेक न्यूजः डिजीटल माध्यमांमधून समाजाच्या नसांमध्ये भिनणारे द्वेषाचे विष

फेक न्यूजः डिजीटल माध्यमांमधून समाजाच्या नसांमध्ये भिनणारे द्वेषाचे विष

आनंद

खोट्याचं खरं करण्यासाठी समाजामध्ये अफवा पसरवणे जगातील सर्वच फॅसिस्ट लोकांचा मुख्य राजकीय हेतू राहिलेला आहे. आपल्या देशातील हिंदूत्ववादी फॅसिस्ट सुध्दा समाजाच्या नसा-नसांमधून अल्पसंख्याकांच्या विरुध्द  द्वेषभावना पसरवणे व दंगली भडकवण्यामध्ये या हेतुचा पुरेपूर वापर करत आलेले आहेत. संघ परिवाराचे विजारधारी अफवाबाज पूर्वी तोंडी अफवा पसरवत, परंतु त्याची एक भौगोलिक सीमा असायची व ती जास्त वेळ चालत नसे. परंतु मागील काही दशकांमध्ये झालेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीने संघाच्या अफवा तंत्रामध्ये नव-नवीन तांत्रिक बाबी जोडल्या गेल्या, ज्यामुळे अफवा पसरविणाच्या तंत्राने तमाम भौगोलिक व वेळेच्या सीमा ओलांडल्या आहेत आणि संपूर्ण भारतीय समाज अफवांच्या त्सुनामीच्या विळख्यात सापडला आहे. अगोदर टेलिफोन, नंतर इंटरनेट आणि त्यानंतर सोशल मिडीया आणि स्मार्टफोन व व्हाट्सअपच्या वापरामुळे संघ परिवाराचे हे अफवातंत्र दिवसेंदिवस गतीने वाढत आहे. सोशल मीडिया आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून पसरविण्यात येणाऱ्या फोटो आणि व्हिडीओमुळे दंगली व सांप्रदायिक घटना तर घडत आहेतच, सोबतच सर्व समाजामध्ये विशेषत: अल्पसंख्याकांमध्ये एक भीतीचे वातावरण कायम ठेवण्यामध्ये या डीजीटल तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या विषारी सामुग्रीची खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. या व्यतिरिक्त शासन आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी आणि केलेल्या कामाची वाहवा मिळविण्यासाठी खोट्या बातम्यांचा वापर करत आहे.

इंटरनेट, सोशल मीडिया आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून समाजामध्ये खोट्या बातम्या पसरविण्याच्या घटना, ज्यांना फेक न्यूजच्या नावाने ओळखले जाते, जगभरात भयावह रुप धारण करत आहे. अमेरिकेमध्ये मागील राष्ट्रपती निवडणूकीत ट्रंपच्या कार्यकर्त्यांनी या फेक न्यूजचा मोठ्या प्रमाणात वापर करत अप्रवासी, मुस्लिम व लॅटीन लोक आणि काळ्या लोकांच्या  विरोधात घृणास्पद वातावरण बनविले, ज्याचा ट्रंपच्या विजयात सिंहाचा वाटा होता. याचप्रकारे युरोप खंडातील भरपुर देशांमध्ये सुध्दा अप्रवासियांच्या विरोधात घृणा पसरविण्यामध्ये फेक न्यूजचा चांगलाच वापर सुरु आहे. ब्रिटनमध्ये युरोपीय संघातून वेगळं होण्यासाठी झालेल्या जनमत चाचणी दरम्यान सुध्दा फेक न्यूजचा खुल्या प्रकारे वापर केला गेला. परंतु भारतात फेक न्यूजच्या घटना ज्याप्रकारे पसरत आहे तशी परिस्थिती क्वचितच अन्य कुठल्या देशात बघावयास मिळेल. याचे मुख्य कारण हे आहे की, भारतामध्ये अधिकांश फेक न्यूज संघासारख्या केडर आधारित फॅसिस्ट संघटनांद्वारे संघटित मार्गाने पसरविल्या जात आहेत, ज्यांचा संपर्क देशातील कानाकोपऱ्यापर्यंत आहे.

 

फेक न्यूज द्वारे पसरविले जाते द्वेषाचे विष

राजकीय प्रचारासाठी (प्रपोगंडासाठी) माहिती तंत्रज्ञानाचा वापर करण्यामध्ये भारतीय जनता पार्टीची आय.टी.सेल कुठल्याही अन्य पक्षाच्या तुलनेत सर्वात पुढे राहिलेली आहे. भाजपाच्या आय.टी.सेल शिवाय संघ परिवाराने ऑनलाईन ट्रोल्सची एक पूर्ण फौजच उभी केलेली आहे, जी खोट्या बातम्यांना फेसबुक, ट्वीट आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून काही क्षणात संपूर्ण देशात पसरविते. अशा खोट्या बातम्यांचा मुख्य स्त्रोत hindutva.info (हिंदुत्व डॉट इन्फो), dainikhindu.org (दैनिकहिंदू डॉट ओआरजी) आणि postcard.news (पोस्टकार्ड डॉट न्यूज) यांसारख्या वेबसाईट्स आहेत ज्या नेहमी बातम्यांना मीठ मिर्ची लावून, त्यांचा संदर्भ तोडून आणि खऱ्यामध्ये खोटं मिसळवून, भडकावू व आकर्षक शीर्षकांचे लेख, फोटो आणि व्हिडीओ च्या माध्यमातून फेक न्यूज तयार करत असतात. या वेबसाईट्सच्या माध्यमातून Support Indian Army (सपोर्ट इंडियन आर्मी), I Support Narendra Modi (आय सपोर्ट नरेंद्र मोदी), I Support Rohit Sardana (आय सपोर्ट रोहित सर्दाना) अशा नावांसारखे असंख्य फेसबुक पेज जोडलेले असतात, ज्यांच्या माध्यमातून रोज लाखोंच्या संख्येने लोक या वेबसाईट्सला भेट देतात. लक्ष्य देण्यासारखी गोष्ट म्हणजे अशा वेबसाईट्स चालविणारे आपल्या वेबसाईट्सवर जाहिराती लावून जोमात कमाई सुध्दा करत आहेत. औपचारिक पध्दतीने ते भले ही कुठल्या संघटनेशी संलग्न नसू देत परंतु ते स्वतःला राष्ट्रवादी व मोदी समर्थक सांगत असतात.

या व्यतिरिक्त ऑनलाईन ट्रोल्सची फौज ट्वीटर वरून सुध्दा कुठल्या ना कुठल्या मुद्याला संघटीत स्वरुपात ट्रेंड करतात. हे ट्रोल्स प्रगतीशील, धर्मनिरपेक्ष आणि डाव्या विचारधारेच्या लोकांना खुलेआम अश्लील शिव्या देत असतात, जीवे मारण्याच्या व महिलांना बलात्काराच्या धमक्या देण्यास सुध्दा घाबरत नाहीत. मजेशीर बाब ही आहे की, यातील बऱ्याचशा ट्रोल्सना नरेंद्र मोदी फॉलो पण करतात आणि या ट्रोल्स सोबत चहापाणी सुध्दा घेतात. संबित पात्रा, शाइना एन.सी., परेश रावल, बाबुल सुप्रियो आणि कैलास विजयवर्गीय सारखे भाजपा नेते सुध्दा बऱ्याच वेळेस ट्वीटच्या माध्यमातून बेशरमपणे फेक न्यूज पसरवतांना रंगेहात पकडले गेले आहेत. एवढेच नव्हे तर अभिजीत, अनुपम खेर, विरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर सारखे सेलिब्रिटी सुध्दा ट्रोल्स प्रमाणे आचरण करतांना दिसून आले आहेत. सर्वात धोक्याची बाब ही आहे की झी. न्यूज, रिपब्लिक टी.व्ही. व टाइम्स नाऊ सारखे विकाऊ टी.व्ही. चॅनेल्स सुध्दा बेशरमपणे फेक न्यूज प्रसारित करतात ज्यामुळे फेक न्यूज मुख्य बातमी बनते. वेबसाईट्स, ट्वीट आणि फेसबुक शिवाय फेक न्यूज पसरविण्याचे सर्वात मोठे माध्यम व्हाट्सअप आहे. खरं तर असं म्हटलं पाहिजे की, व्हाट्सअपच फेक न्यूज पसरविण्याचे सर्वात मोठे माध्यम आहे कारण जेथे वेबसाइट, फेसबुक आणि ट्वीटच्या माध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या फेक न्यूज फक्त मोठ्या शहरांमधील मध्यमवर्गीय लोकांपर्यंतच मर्यादित राहतात तेथे व्हाट्सअपच्या माध्यमातून पसरविल्या जाणाऱ्या फेक न्यूज या निम्न मध्यम वर्ग व मजूर वर्ग आणि छोट्या छोट्या शहरांपासून ते थेट खेडी व वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचतात.

एवढ्या तीव्र वेगाने का पसरत आहे फेक न्यूज?

मागील काही वर्षामध्ये भारतात मोबाईल फोन व इंटरनेटचा प्रचार-प्रसार झालेला आपणास दिसून येत आहे. ट्रायच्या(भारताचे टेलीफोन नियामक प्राधिकरण) संदर्भानुसार भारतात यावेळी 1 अब्जपेक्षाही अधिक मोबाईल फोनचा वापर केला जातोय ज्यामध्ये स्मार्टफोनचीच संख्या 30 कोटी पेक्षाही जास्त आहे. एका सर्वेक्षणानुसार जून 2017 पर्यंत भारतात इंटरनेट वापरकर्त्यांचा आकडा 45 कोटीपेक्षाही पुढे गेला आहे. शहरी भारतातील जवळपास 45 कोटी लोकांमधून जवळपास 27 कोटी(60 टक्के) लोक इंटरनेटचा वापर करतात, तर ग्रामीण भारतात राहणाऱ्या जवळपास 90 कोटींमधून 16 कोटी (17 टक्के) लोक इंटरनेटचा वापर करतात. हे सर्वेक्षण असे सुध्दा सांगते की, शहरांमध्ये 77 टक्के इंटरनेट वापरकर्ते आणि खेड्यांमध्ये 92 टक्के वापरकर्ते इंटरनेट कनेक्शनसाठी मोबाईलचा वापर करतात कारण कँप्यूटर, लॅपटॉप आणि आयपॅडच्या तुलनेत स्मार्टफोन स्वस्तात उपलब्ध होतो व आणि छोटी शहरे व खेड्यांमध्ये इंटरनेटची गती खूपच कमी असते. (स्‍त्रोतःhttp://www.Livemint.com/industry/QWzlOYEsfQJknXhC3HiuVi/Number-of-Internet-Users-in-India-could-cross-450-million-by-html)

वरील आकड्यांवरुन असे लक्षात येते की अलिकडील वर्षांमध्ये फेक न्यूजच्या घटना गतीने पसरण्याची कारणे काय आहेत व हे सुध्दा की, वेबसाइट, फेसबुक व ट्वीटच्या तुलनेत व्हाट्सअपची क्षमता जास्त का आहे. सद्य परिस्थितीमध्ये व्हाट्सअप वापरकर्त्यांची संख्या 16 कोटी, फेसबुक वापरकर्त्यांची संख्या 15 कोटी, आणि ट्वीटर वापरकर्त्यांची संख्या 2.2 कोटी आहे. रिलायंस जियो सारख्या कंपन्या बाजारात उतरल्यामुळे मोबाईल डेटाच्या दरांमध्ये झालेल्या कमालीच्या घसरणीमुळे फेक न्यूज पसरण्याचा वेग तीव्र गतीने वाढलेला आहे. एका अन्य सर्वेक्षणानुसार इंटरनेटचा वापर करणाऱ्यांमध्ये 41 टक्के लोक सोशल मीडियाला ऑनलाईन बातम्यांचा मुख्य स्त्रोत समजतात आणि 56टक्के लोक सोशल मिडीयाच्या माध्यमातून अनेक बातम्यांची देवाण-घेवाण करतात(तिवारी 2015). राजकीय स्थिरतेच्या कमतरतेमुळे लोक सोशल मिडीया व व्हाट्सअपवर प्राप्त बातम्यांना खरं समजतात व त्यामागील घृणास्पद फॅसिस्ट षडयंत्र त्यांना उमगत नाही. 2013 ची मुजफ्फरनगर दंगल, 2015 ला दादरीतील अखलाकची बेदम मारहाण करुन केलेली हत्या, 2016 च्या छपरा दंगली, 2017 ची बसीरहाट दंगल या सर्वांमध्ये सोशल मिडीया आणि व्हाट्सअपच्या माध्यमातून पसरविल्या गेलेल्या फेक न्यूजची भूमिका खूप मोठी ठरली आहे.

फेक न्यूजच्या या त्सूनामीचा सामना कशाप्रकारे केला जाऊ शकतो?

तसं पाहिलं तर भारतात फेक न्यूजचा परदाफाश करण्यात AltNews (अल्ट न्यूज), SM Hoax Slayer(एस.एम. हॉक्स स्लेयर)  आणि Boomlive (बूमलाईव्ह) यांसारख्या वेबसाइट्स महत्वाची जबाबदारी पार पाडत आहेत, परंतु त्यांची सीमा ही आहे की, त्यांची मजल महानगरांमधील उच्चभ्रू घटकांपर्यंतच आहे. या वेबसाइट्सच्या माध्मामतून फेक न्यूज पकडल्या जावून देखील त्या फेक न्यूज ने आपले काम पूर्ण केलेले असते कारण साधारण जनतेपर्यंत ही बाब पोहोचतच नाही की, जी बातमी ते वाचत आहेत ती खोटी आहे. गूगल आणि फेसबुक सारख्या कंपन्या फेक न्यूज पकडण्यासाठी काही अल्गोरीदम (संगणक प्रणाली) विकसित करत आहेत परंतु हे तांत्रिक समाधान फेक न्यूजशी दोन हात करण्यास पुरेसे नाही आहे कारण ही समस्या तांत्रिक नसून राजकीय आहे. गूगल द्वारे वापरल्या गेलेल्या एका अल्गोरीदमचा परिणाम हा झाला की, त्यामुळे डाव्या विचारांशी संबंधित वेबसाइट्सवर जाणाऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. हे यामुळे घडलं कारण या एल्गोरीदम मध्ये  कोणती बातमी अथवा लेखाची मुख्य प्रवाहातील माध्यमांशी तुलना करुन त्याची सत्यता पडताळून बघितली जात असे. परंतु मुख्य भांडवली प्रवाहातील माध्यमांमध्ये डाव्या विचारांशी संबंधित बातम्या कमी असतात, अशाने या अल्गोरीदममुळे वामपंथी वेबसाइट्स आणि ब्लॉगचे खूप मोठे नुकसान झाले आहे कारण गूगल सर्च मध्ये या वेबसाइट्स शेवटी येवू लागल्या. यामुळे तो एक तांत्रिक प्रश्न नसून राजकीय प्रश्न आहे.

अशा फेक न्यूज विरुध्द प्रभावी मोहिमेसाठी आवश्यक आहे की त्यांचा परदाफाश करुन सर्वसामान्य जनतेसमोर हे आणलं पाहिजे. ज्याप्रकारे फेक न्यूज संघटित पध्दतीने पसरविल्या जातात त्याचप्रकारे त्याचा भंडाफोड सुध्दा संघटीत पध्दतीनेच केला जावू शकतो. हे काम क्रांतिकारी संघटनांचं आहे कारण 21 व्या शतकात इंटरनेट आणि सोशल मीडिया सुध्दा वर्ग संघर्षाचा महत्वाचा मुद्दा आहे. जगजाहीर आहे की, यासाठी सर्वतोपरी रचनात्मक माध्यमांमधून क्रांतिकारी संघटनांना सर्वसामान्य जनतेमध्ये सामाजिक आधार वाढविण्याची आवश्यकता आहे.

अनुवाद: सतिश घोरपडे

स्फुलिंग अंक 3 जून 2018