प्रा. तुलसीराम यांना ‘स्‍फुलिंग’ची श्रद्धांजली

प्रा. तुलसीराम यांना ‘स्‍फुलिंग’ची श्रद्धांजली

Prof Tulsiramराजकीय विचारवंत आणि लेखक तुलसीराम यांचे गेल्या १३ फेब्रुवारी झालेले निधन म्हणजे हिंदी साहित्य आणि उत्पीडित जनतेच्या आंदोलनांसाठी एक न भरून निघणारी हानी आहे. तुलसीराम विरोधी विचारांशी धैर्यपूर्वक वादविवाद करणारे, डाव्या विचारधारेशी जवळीक असलेले एक प्रबुद्ध दलित विचारवंत होते. डावी विचारसरणी आणि आंदोलनांमध्ये त्यांचा दीर्घ काळ सक्रिय सहभाग होता. अर्थातच, आपल्या नंतरच्या वर्षांमध्ये जातीच्या प्रश्नावर त्यांच्या विचारांमध्ये अशा अनेक गोष्टी होत्या ज्यांच्याशी माक्र्सवादी दृष्टिकोनातून सहमत होता येणार नाही. परंतु गंभीरपणे आपले विचार मांडत विरोधी विचारांसोबत निरोगी लोकशाही भूमिका घेणे त्यांचे वैशिष्ट्य होते. चंदीगढमध्ये ‘जाती प्रश्न आणि मार्क्‍सवाद’ या विषयावर अरविंद स्मृती न्यासतर्फे आयोजित अखिल भारतीय चर्चासत्रामध्ये (१२ – १६ मार्च २०१३) मध्ये सहभागी होऊन चर्चा करताना त्यांनी आपल्या याच भूमिकेचे दर्शन घडविले.

ते रशियन भाषा आणि इतिहासाचे उत्तम जाणकार,, एक चांगले वक्ता आणि शिक्षक असण्याबरोबरच एक दर्जेदार लेखकही होते. त्यांच्या आत्मकथेचे दोन खंड ‘मुर्दहिया’ आणि ‘मणिकर्णिका’ अनोख्या साहित्यकृती असण्याबरोबरच पूर्व उत्तर प्रदेशच्या दलितांच्या जीवनस्थितीचे तसेच साठ आणि सत्तरच्या दशकातील या क्षेत्रातील डाव्या आंदोलनातील घडामोडींचे जिवंत दस्तऐवज आहेत. त्यांच्या अनेक विचारांशी असहमती असूनदेखील जनतेशी असलेल्या त्यांच्या बांधीलकीचा तसेच निष्ठेचा आम्ही मनापासून आदर करतो. ‘स्‍फुलिंग’कडून त्यांना हार्दिक आणि विनम्र श्रद्धांजली.

स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५