‘फॉक्सकॉन’च्या कामगारांचे नारकीय जीवन

‘फॉक्सकॉन’च्या कामगारांचे नारकीय जीवन

सनी

foxconn6_1645133cचीनची फॉक्सकॉन कंपनी अ‍ॅप्पलसारख्या कंपन्यांसाठी महाग इलेक्ट्रॉनिक आणि संगणकाचे भाग बनवते. तिच्या कित्येक कारखान्यांमध्ये सुमारे १२ लाख कामगार काम करतात. या कारखान्यांमध्ये ज्या पद्धतीने कामगारांकडून काम करून घेतले जाते, त्यामुळे २०१० ते २०१४ पर्यंत आत्महत्येची २२ प्रकरणे समोर आली आहेत आणि अशा कित्येक घटना दाबून टाकण्यात आल्या आहेत. जगभरात कम्युनिस्ट देश म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चीनची भांडवलशाही याच्याहून नग्न रूपात स्वत:चे दर्शन घडवू शकत नाही. चीन जगातील सर्वांत मोठा निर्यातदार देश आहे. परंतु बाजारात स्वस्त दरात उपलब्ध असलेला चीनी माल चीनच्या कामगारांचे वास्तव सांगत नाही. परंतु फॉक्सकॉनच्या घटना एकूण चीनची दुर्दशा व्यक्त करीत आहेत. फॉक्सकॉन चीनचा सर्वांत मोठा निर्यातदार आहे. तो आईफोन, आईपॅड, एक्स बॉक्स, प्ले स्टेशन यांसारख्या महागड्या वस्तू बनवतो. दिवसभर कामगारांना एका जागी बसून मोबाईल आणि लॅपटॉपच्या महत्त्वाच्या भागांना असेंबली लाईनवर बारा-बारा तास बनविण्याचे काम करावे लागते. अ‍ॅप्पल कंपनी जेव्हा एखादा नवीन आईफोन बाजारात आणते तेव्हा त्याच्या मागणीच्या पूर्ततेसाठी कामगारांकडून आठवडाभरात १२० तासांपेक्षा जास्त काम करून घेतले जाते. हेच काम २४ तास आणि आठवड्याचे सात दिवस चालते. फॅक्टरीमध्ये मॅनेजर, इन्स्ट्रक्टर आणि गार्ड गुंडासारखे वागतात. कामात चूक झाल्यास कामगारांना सर्वांसमोर अपमानित केले जाते. दररोज काम सुरू होण्याअगोदर उत्पादन वाढविण्यासाठी जोरदार भाषणे ठोकली जातात आणि कामाच्या वेळीसुद्धा उत्पादन वाढविण्याचे आवाहन केले जाते. अनुशासन टिकवून ठेवण्याबद्दलचे पोस्टर सर्वत्र दिसून येतात. कामगारांना राहण्यासाठी कंपनीच्या कँपसमध्येच जागा दिली जाते. त्यांना तुरुंग म्हटल्यास वावगे ठरू नये. एका खोलीत कित्येक कामगारांना कोंबले जाते. त्यांच्या प्रत्येक कृतीवर सेक्युरिटी कॅमेऱ्याची नजर असते. फॉक्सकॉनच्या तुरुंगवजा वसतिगृहांमध्ये धर्मगुरू, समुपदेशक आणि डॉक्टर यांचा वावर असतो जे कामगारांना हे जीवन जगण्याबद्दल उपदेशामृत पाजण्याचे काम करतात, आणि प्रकरण हाताबाहेर जात असल्याचे जाणवल्यास कामगारांची रवानगी थेट वेड्यांच्या इस्पितळात केली जाते. २०१० मध्ये झालेल्या कामगारांच्या १४ आत्महत्यांमुळे फॉक्सकॉनवर जगभरातून टीका होताच फॉक्सकॉनने कामगारांच्या कामाची परिस्थिती सुधारण्याऐवजी अशी व्यवस्था निर्माण केली की कामगार आत्महत्या करू शकणार नाहीत. स्टीलच्या जाळीने कामगारांचे वसतिगृह घेरण्यात आले आणि खिडक्यांवरसुद्धा स्टीलचे गज बसवण्यात आले आहेत, जेणेकरून कामगार बाहेर उडी घेऊन आत्महत्या करू शकणार नाहीत! कामावर नियुक्त करतानाच कामगारांकडून लेखी करार करून घेतला जातो की ते आत्महत्या करणार नाहीत आणि जर त्यांनी आत्महत्या केली तर त्यासाठी फॉक्सकॉन जबाबदार असणार नाही. २०१४ मध्ये आत्महत्या करणारा फॉक्सकॉनचा कामगार लिझी याने आपले तुटलेपण शब्दांत मांडताना म्हटले होते की ते आपल्या तरुण कब्रस्तानाचा पहारा करीत आहेत. आज प्रत्येक कामगार हेच करीत आहे, परंतु त्याचबरोबर विद्रोहाची भावनादेखील खदखदते आहे आणि आता ती व्यक्तही होऊ लागली आहे. ऑक्टोबर महिन्यात १००० कामगार वेतनवाढ आणि कामाच्या ठिकाणी चांगल्या सुविधांच्या मागणीसाठी संपावर गेले होते. गेल्या काही वर्षांमध्ये फॉक्सकॉनच नाही तर चीनभरात कामगारांच्या संघर्षांना वेग आला आहे. जोपर्यंत तरुण ही नफेखोर व्यवस्थाच थडग्यात गाडून टाकत नाहीत, तोपर्यंत हे संघर्ष सुरूच राहतील.

स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५