‘गांधी’कार रिचर्ड अॅटनबरो यांना खुले पत्र
‘गांधी’कार रिचर्ड अॅटनबरो यांना खुले पत्र
अभिजीत
आदरणीय महाशय,
आपल्या मृत्यूनंतर जगभरातून आपल्याला श्रद्धांजली वाहण्यात आली. ज्या भारत देशात आपण आपला महाकाव्यात्मक ‘गांधी’ चित्रपट बनविला त्या भारतातही सिनेरसिकांनीच नव्हे तर लेखक, कलावंत, राजकारणी, समाजकारणी तसेच जनसामान्यांनीदेखील आपल्याला श्रद्धांजली वाहिली. आपल्याबद्दल आणि आपल्या जगप्रसिद्ध गांधी चित्रपटाबद्दल येथील वर्तमानपत्रांमधून भरभरून लिहिले गेले. ‘‘८० नंतरच्या पिढीला महात्मा गांधी समजावण्याचे ऐतिहासिक कार्य कोणी केले असेल तर ते तुमच्या गांधी या चित्रपटाने’’, हे या लिखाणातूनच समजले. त्यामुळे आपला गांधी पुन्हा एकदा पाहावा, समजून घ्यावा असे वाटणे साहजिकच होते, आणि तसा तो पाहताना, चित्रपटाच्या ‘‘भव्यते’’ने, त्यात सहभागी मोठमोठ्या कलावंतांची नावे पाहून दबून जाताना अवचित काही प्रश्न मनात आले. ते या पत्राद्वारे आपल्याला विचारावे, म्हणून हा पत्रप्रपंच. या प्रश्नांची उत्तरे आता आपण कधीच देऊ शकणार नाही हे खरेच, परंतु निरपेक्ष भावनेने प्रश्न विचारणे हेदेखील गांधीवादाला धरूनच असल्यामुळे, तसे करीत आहे.
गांधी हे आधुनिक भारतातील एक निर्विवाद महानायक. वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी घेतलेल्या निर्णयांबद्दल तसेच एकंदर गांधीवादाबद्दल कितीही मतभेद बाळगणाऱ्या माणसालादेखील गांधी हे महानायक होते हे अमान्य करता येणार नाही. आणि त्यामुळे गांधींसारख्या ऐतिहासिक महानायकाच्या जीवनावर आधारित चित्रपटाला ‘एपिक फिल्म’ (महाकाव्यात्मक चित्रपट) म्हणणेदेखील योग्यच. परंतु नायकत्व हे विशिष्ट सामाजिक राजकीय संदर्भांत सिद्ध होते. कोणतीही व्यक्ती नायकत्वास प्राप्त होते ती विशिष्ट काळातील सामाजिक-राजकीय-आर्थिक संदर्भांत. हे संदर्भ वेगळे केले तर मग महात्मा गांधी काय किंवा राहुल गांधी काय, फारसा काही फरक राहत नाही. महाकाव्याचेही तसेच. व्यक्तीची कविता होऊ शकेल, महाकाव्य समाजाचे असते. समग्र समाजाची स्पंदनं एकवटून महाकाव्याचा जन्म होतो. म्हणूनच गांधींच्या जीवनावरील महाकाव्यात्मक चित्रपट म्हणजे अर्थातच आधुनिक भारतीय समाजाचे महाकाव्य असावयास हवे, येथील समाजाच्या क्रियाप्रक्रिया निर्धारित करणाऱ्या घटकांचे, जाणीवांचे ते प्रातिनिधिक चित्र असावयास हवे, असे मानणे वावगे ठरणार नाही. आपल्या चित्रपटाला महाकाव्याचा दर्जा अनेक थोरामोङ्ग्यांनी बहाल केलेला आहे, त्यामुळे उपरोक्त बाबी गांधी चित्रपटात नक्कीच असतील या अपेक्षेने चित्रपट पाहावयास बसलो.
आपल्या चित्रपटात आपण १८९३ ते १९४८ पर्यंतचा प्रवास आहे, महात्मा गांधींचा, आणि ज्या भारताच्या संदर्भात मोहनदास करमचंद गांधी महात्मा गांधी या महानायकपदापर्यंत पोहोचले त्या भारताचा. या काळात भारतात विलक्षण घडामोडी घडत होत्या, खरोखरच या काळामध्ये महाकाव्याच्या निर्मितीसाठी आवश्यक असे भरपूर काही आहे. परंतु आपल्या चित्रपटात त्यापैकी किती गोष्टी आल्या आहेत? येथील जातिव्यवस्था हा या समाजाचा आणि आपल्या चित्रपटातील काळातील समाजाचा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. या जातिव्यवस्थेच्या संदर्भातच आणखी एक महानायक येथे निर्माण झाला – डॉ. भीमराव आंबेडकर. डॉ. आंबेडकरांशी महात्मा गांधींचे असलेले मतभेद हा भारतीय राजकारणाचा एक अत्यंत महत्त्वाचा अध्याय आहे आणि त्याची भारतीय राजकारणाला विशिष्ट दिशा देण्यात महत्त्वाची भूमिका आहे. परंतु असे असूनही या चित्रपटात डॉ. भीमराव आंबेडकरांचा नामोल्लेखदेखील येऊ नये, याला काय म्हणावे? ज्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकरांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघांची मागणी केली त्या गोलमेज परिषदेचा उल्लेख आपल्या चित्रपटात येतो, त्या परिषदेला गेले असता महात्मा गांधी राजघराण्यातील कोणाकोणाला भेटले हेदेखील आपण वॉइसओव्हरमधून सांगता, परंतु डॉ. आंबेडकरांचा उल्लेखसुद्धा आपण करीत नाही! आपण गांधींनी वेगवेगळ्या प्रसंगी केलेली उपोषणे दाखविली आहेत. असेच एक उपोषण महात्मा गांधींनी डॉ. आंबेडकरांनी केलेल्या स्वतंत्र मतदारसंघाच्या मागणीच्या विरोधात केले होते, आणि शेवटी डॉ. आंबेडकरांना नाईलाजाने आपली मागणी मागे घ्यावी लागली, हा सर्वज्ञात इतिहास आहे. परंतु महात्मा गांधींचे नेमके हेच उपोषणसुद्धा आपल्या चित्रपटात ‘‘राहून गेले’’ आहे. त्याचप्रमाणे महात्मा गांधींच्या अहिंसेच्या तत्त्वज्ञानाला विरोधी असे एक सशस्त्र क्रांतीचे तत्त्वज्ञानही भारतात अस्तित्वात होते. महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा मार्ग आणि क्रांतिकारकांचा सशस्त्र क्रांतीचा मार्ग यांमधील संघर्ष हादेखील भारतीय समाजाच्या इतिहासाचा एक अविभाज्य भाग आहे. १९३१ साली भगतसिंह, राजगुरू आणि सुखदेव फाशी गेले त्यावेळी महात्मा गांधींच्या भूमिकेला देशभरात मोठ्या प्रमाणात विरोध होत होता आणि या क्रांतिकारकांचे हौतात्म्य काही साधीसुधी घटना नाही, तर तिच्या राजकीय संदर्भांमुळे ती नितांत महत्त्वाची ऐतिहासिक घटना आहे. असे असूनही भगतसिंहांसारख्या क्रांतिकारकाचा व त्यांच्या हौतात्म्याचा आपल्या चित्रपटात नामोल्लेखदेखील नाही, याला काय म्हणावे? जातिव्यवस्थेच्या प्रश्नावर आपण महात्मा गांधींच्या बाजूचे आहात की आंबेडकरांच्या, आपण सत्याग्रहाचा मार्ग योग्य समजता की सशस्त्र कांतीचा हा प्रत्येकाचा व्यक्तिगत निर्णय आहे, परंतु जातिव्यवस्था आणि तिच्या अनुषंगाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भगतसिहांसारख्या क्रांतिकारकांचा सशस्त्र लढा यांना वगळून आधुनिक भारताचे महाकाव्य लिहिले जाऊ शकत नाही, हे निश्चित. कुठल्याही कलावंताला एखादी कलाकृती निर्माण करताना – विशेषत: सत्य घटना आणि व्यक्तींवर आधारित कलाकृती निर्माण करताना- सर्वच्या सर्व तपशील त्यात कोंबता येत नाही, निवडक तपशील घ्यावा लागतो हे खरे, पण आपण केवळ तपशीलच गाळलेला नाही, आपण गाळलेत संदर्भ, अत्यंत महत्त्वाचे असे संदर्भ. ज्यांच्यावाचून मोहनदास करमचंद गांधी यांच्या महानायकत्वाचा विचार होऊच शकत नाही, आणि ज्यांच्यावाचून भारताचे महाकाव्य लिहिले जाऊच शकत नाही, असे संदर्भ आपण सपशेल गाळलेले आहेत. कोणी नथुराम गोडसे नामक व्यक्ती मोहनदास गांधी नामक एका ७८ वर्षाच्या वृद्धावर गोळ्या झाडते ती घटना दररोज कुठे ना कुठे होणाऱ्या खुनापेक्षा वेगळी, एक ऐतिहासिक राजकीय हत्या ठरते कारण गोळी झाडणाऱ्या नथुराम गोडसेशी काही राजकीय सामाजिक संदर्भ जोडलेले असतात, आणि मोहनदास गांधी यांच्याशीदेखील काही राष्ट्रीय संदर्भ जोडलेले असतात. खरे तर आपल्या चित्रपटात ही गांधीहत्यासुद्धा एका आकस्मिक घटनेहून अधिक काहीच वाटत नाही कारण आपल्या चित्रपटात देशातील हिंदुत्त्ववादी राजकारणाचे संदर्भ आलेले नाहीत, अपवाद एका दृश्याचा जेव्हा पाश्र्वभागी खाकी हाफ चड्डीतली काही माणसे दिसत आहेत.
आपल्या चित्रपटात जाणवलेली आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे चित्रपटातील ब्रिटिश सत्तेचे चित्रण. महात्मा गांधींवर चित्रपट करायचा तर डॉ. आंबेडकर, हुतात्मा भगत सिंह यांना वगळून करता येऊ शकेल, परंतु ब्रिटिशांना वगळून चित्रपटच होऊ शकणार नाही. त्यामुळे आपल्या चित्रपटातून ब्रिटिशांना वगळण्याचा विचारही केला जाऊ शकत नाही. परंतु ब्रिटिशांचे चित्रण कसे करावयाचे याचा निर्णय मात्र कलाकृती बनविताना कलावंताला घेता येतो. आपल्या गांधी चित्रपटात चित्रपटात साहजिकच वारंवार ब्रिटिश येतात, परंतु ते साम्राज्यवादी ब्रिटिश सत्तेच्या संदर्भांसह येतात का? असा प्रश्न पडतो. हे थोडेसे उदाहरणासह स्पष्ट करून सांगावे लागेल. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दृश्यात जनरल डायरसह हातात बंदुका घेऊन भारतीय सैनिकांची फौज दिसते, जी निःशस्त्र भारतीयांवर बेछूट गोळीबर करून शेकडो लोकांचे प्राण घेते. आता येथे वरवर पाहिले तर काही भारतीयांनी गोळ्या घालून काही भारतीयांचे प्राण घेतले असे म्हणावे लागेल. परंतु गोळ्या घालणाऱ्या भारतीय सैनिकांच्या बंदुकांमागे केवळ डायर नावाची एक व्यक्ती नसते तर साम्राज्यवादी ब्रिटिश सत्ता असते. हा सत्तासंदर्भ जर पातळ केला तर अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. आपल्या चित्रपटात या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या दृश्यानंतर येणाऱ्या दृश्यात जनरल डायर याची न्यायाधिशांसमोर ट्रायल सुरू असल्याचे दाखविले आहे. दृश्यामध्ये सर्वच न्यायाधीश या भीषण हत्याकांडामुळे सुन्न झालेले दिसतात. त्यांच्यासमोर मग्रूर डायर उभा आहे. डायरने गोळीबार करण्याचा हुकूम कां दिला, हुकूम देण्याआधी त्याने चेतावनी कां दिली नाही, घायाळ लोकांना मदत कां केली नाही अशा प्रकारचे प्रश्न न्यायाधीश विचारतात. मदत मागितली असती तर केली असती असे मुजोरपणाचे उत्तर डायर यावेळी देतो. त्यावर तीन वर्षाचे घायाळ मूल मदत कशी मागणार असा सवाल, हेलावून गेलेले न्यायाधीश करतात. डायर त्यावर काहीच उत्तर देत नाही. येथे दृश्य संपते. न्यायाधीश पुढे काय निवाडा करतात ते दाखविलेले नाही! खरे तर येथे आपण एक चलाखी केलेली आहे, असे म्हणावयास पुरेसा वाव आहे. कारण सारेच न्यायाधीश अगदी सुन्न झालेले दिसून येतात आणि डायरचे कृत्य त्यांना अजिबात पटलेले नाही असे दिसून येते. वास्तवात, डायरवर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नव्हती, उलट त्याला बक्षिसी देण्यात आली, असे इतिहास सांगतो. आपण निवाडा होण्याअगोदरच दृश्य संपविले. आपण असत्य दाखविले नाही. पण आपण दृश्य विशिष्ट क्षणी संपवून एक महत्त्वाचे सत्य सांगायचे टाळले, एवढेच नाही तर विशिष्ट पद्धतीने दृश्य संपवून असे काहीतरी सूचित केले जे वास्तवाचा विपार्यास करणारे आहे. आपल्या एकूणच चित्रपटात वारंवार असे होताना दिसून येते आणि मग सगळाच खेळ सद्गगुण आणि दुर्गण, चांगला माणूस आणि वाईट माणूस अशा संदर्भशून्य पातळीवर येऊन पोहोचतो. ब्रिटिशांची साम्राज्यवादी सत्ता भारतावर राज्य करीत होती, भारत ही ब्रिटिशांची वसाहत होती याचे आर्थिक, सामाजिक, राजकीय संदर्भ सुस्पष्टपणे दिसून न येता, किंबहुना ते दडपले जाऊन, ब्रिटिश भारतावर राज्य करीत होते, त्यांपैकी काही चांगले होते आणि काही वाईट होते, त्या वाईट ब्रिटिशांविरोधात महात्मा गांधींनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला आणि शेवटी चांगल्या ब्रिटिशांना महात्मा गांधींची सत्यावर आधारलेली मागणी मान्य करावी लागली आणि त्यांनी भारतावरची सत्ता सोडून दिली, अशा प्रकारचे काहीसे चित्र निर्माण होते!
मोहनदास करमचंद गांधी यांचा महत्मा गांधी होण्यापर्यंतच्या प्रवासाबद्दल आपण भरपूर अभ्यास केला, त्यांच्या आयुष्यातील अनेक घटना योग्य कालक्रमानुसार आपण लोकांसमोर ठेवल्यात याबद्दल आपण खचितच अभिनंदनास पात्र आहात. परंतु घटनाक्रमाची कालक्रमानुसार मांडणी म्हणजे श्रेष्ठ कला असे म्हणावयाचे झाल्यास माध्यमिक शाळेतील इतिहासाचे पुस्तक, छपाईच्या चुका वगळता, बऱ्यापैकी ‘‘कलात्मक’’ असते, असे म्हणावे लागेल. कलाकृतीचा आस्वाद घेताना आपल्याला जे हवे आहे ते त्या कलाकृतीत शोधण्यापैक्षा, तिच्यात काय आहे ते पाहावे, हे मान्य. मात्र समीक्षा करताना ती कलाकृती व्यापक सत्याच्या कितीशी जवळ गेलेली आहे, हे पाहावेच लागेल. त्या अर्थाने आपला चित्रपट फारच एकांगी आणि अतिसुलभीकृत वाटतो. एखाद्या महान व्यक्तीचे मोठेपण दाखवून देणाऱ्या विविध घटनांच्या एकरेषीय मांडणीतून त्याच्या महानायकत्वाचे दर्शन घडत नाही, तसेच विशिष्ट काळातील वेगवेगळ्या घडामोडींच्या संदर्भहीन चित्रणातून महाकाव्य अवतरत नाही. महाकाव्याचे महाकाव्यपण त्यातील ओळींच्या संख्येत नसते तसेच चित्रपटाचे मोठेपण त्यामध्ये वापरलेल्या मॉबच्या संख्येत नसावे. म्हणूनच काही वर्षांपूर्वी ‘‘गांधीवादा’’चे स्मरण करून देणाऱ्या ‘लगे रहो मुन्नाभाई’ आणि आपल्या ‘गांधी’ चित्रपटात फारसा गुणात्मक फरक आहे असे वाटत नाही. शांततेच्या प्रचारासाङ्गी आपण चित्रपट बनविलात. आपल्या त्या भावनेचा आम्ही नक्कीच आदर करतो. परंतु खरे सांगायचे तर अहिंसा, शांतता याबद्दल फारच जिव्हाळ्याने कुणी बोलू लागलं की आता उगाच शंका येऊ लागते!
आपल्या चित्रपटाला अनेक ‘ऑस्कर’ मिळालेले असल्यामुळे अशा प्रकारचे मत प्रदर्शन करण्याचे धाडस करणे उद्धटपणाचे होईल, हे ठाऊक आहे. परंतु येथे मुद्दा पुन्हा संदर्भांचा आहे. पश्चिमेत मंदी येताच भारतीय कथानकावर आधारित, भारतीय कलाकारांना घेऊन स्लमडॉग मिलियोनेर सारखा चित्रपट बनविला जातो, आणि त्यालासुद्धा कित्येक ‘ऑस्कर’ मिळतात! आपल्याला भारतातील तत्कालीन काँग्रेस सरकारकडून हा चित्रपट बनविण्यासाठी आर्थिक साहाय्य लाभले होते, त्याचा ‘‘संदर्भ’’देखील काही संदर्भ चित्रपटातून गाळण्याशी असावा का असे उगाच वाटू लागते. असो. काही उणेअधिक लिहिले गेल असल्यास, क्षमा करावी. सत्याचा आग्रह धरावा म्हणून हा पत्रलेखनाचा खटाटोप.
कळावे,
एक सामान्य प्रेक्षक.
स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५