युद्धखोर साम्राज्यवादाचे सिंहावलोकन

पहिल्या महायुद्धाची शंभर वर्षे – युद्धखोर साम्राज्यवादाचे सिंहावलोकन

विराट

गेल्या शतकात साम्राज्यवादाने मानवतेला दोन साम्राज्यवादी युद्धांच्या आगीत लोटून नफ्यासाठी मोठ्या प्रमाणात नरबळी दिले. १९१४ ते १९१८ पर्यंत चाललेले पहिले महायुद्ध आणि १९३९ ते १९४५ पर्यंत चाललेले दुसरे महायुद्ध यांनी असंख्य लोकांचे जीव घेतले. त्या अगोदर मानवसमाजाला एवढ्या मोठ्या नरसंहाराला कधीच सामोरे जावे लागले नव्हते. आजपासून १०० वर्षांपूर्वी १९१४ साली पहिल्या महायुद्धाला तोंड फुटले. एकूण जग दोन गटांमध्ये विभागले गेले. ब्रिटन, फ्रान्स, रशिया, संयुक्त राज्य अमेरिका, जपान आदी ‘मित्र शक्ती’ (एलाइड पावर्स) च्या नावाने ओळखल्या जात होत्या, तर जर्मनी, ऑस्ट्रिया हंगेरी, ऑटोमन साम्राज्य, बल्गेरिया आदी ‘एक्सिस पावर्स’च्या नावाने ओळखल्या जात होत्या. मित्र शक्तींकडून जवळपास ४ कोटी ३० लाख लोकांनी या युद्धामध्ये भाग घेतला ज्यांपैकी ५६ लाख लोक मारले गेले आणि ‘अ‍ॅक्सिस पावर्स’कडून जवळपास २.५ कोटी लोक युद्धात उतरले ज्यांपैकी ४४ लाख लोक मारले गेले. युद्धात मित्र शक्तींचा विजय झाला. या भयंकर युद्धाने सुमारे १ कोटी ६० लाख लोकांचे जीव घेतले आणि असंख्य लोक शारीरिकदृष्ट्या निकामी झाले. नव्या भांडवली शक्तींच्या उदयामुळे जगाच्या पुनर्विभाजनासाठी लढले जाणारे हे एक साम्राज्यवादी युद्ध होते.

wwi_paintingआज पहिल्या महायुद्धाला १०० वर्षे लोटल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्या कारणांचे विवेचन- विश्लेषण करणे म्हणजे काही अ‍ॅकॅडमिक कसरत नाही. आजसुद्धा आपण साम्राज्यवादाच्या युगातच जगतो आहोत आणि आजसुद्धा साम्राज्यवादाद्वारे सामान्य कष्टकरी जनतेवर अनेक युद्धे लादली जात आहेत. म्हणून, साम्राज्यवाद कशा प्रकारे युद्धांना जन्म देतो, हे समजून घेणे आजही गरजेचे आहे. तसे पाहता पहिल्या महायुद्धाबद्दल जवळपास सर्वांनीच वाचलेले आहे, ऐकलेले आहे. परंतु त्याची ऐतिहासिक कारणे काय होती याबाबत अनेक भ्रम दिसून येतात, किंवा अधिक स्पष्ट शब्दांत सांगावयाचे झाले तर, अनेक भ्रम पसरविले गेले आहेत. अनेक भाडोत्री इतिहासकार हे युद्ध काही शासकांच्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा आणि इच्छेमुळे घडले, असेच सांगत असतात. बहुतेक या युद्धाची एकूण ऐतिहासिक पृष्ठभूमी गायब करतात आणि ऑस्ट्रियाचा आर्कड्यूक फ्रांज फर्डिनांडची साराजेवोमध्ये हत्या झाल्यामुळे या युद्धाचा भडका उडाल्याचे सांगतात. शालेय पुस्तकांमध्येसुद्धा अशा प्रकारच्या तात्कालिक कारणांवरच जोर दिला जातो आणि त्याच्या मूळ कारणांकडे डोळेझाक केली जाते. जर ऑस्ट्रियाच्या राजकुमाराची हत्या झाली नसती तर पहिले महायुद्ध झालेच नसते का? हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणताही गंभीर वाचक अशा मूर्ख विश्लेषणावर विश्वास ठेवणार नाही. काही गोष्टी समजून घेण्यासाठी पहिले महायुद्ध समजून घेणे महत्त्वाचे आहे. पहिल्या महायुद्धात पहिल्यांदाच साम्राज्यवादाचे अंतर्विरोध आणि भांडवलशाहीचे नरभक्षक चारित्र्य पूर्णपणे नग्न रूपात अशा प्रकारे जगासमोर आले होते. याच काळात सर्वहारा आंदोलनातील गद्दारांनी आणि घरभेद्यांनी आपापले मुखवटे उतरवले आणि त्यांचा खरा चेहरा दिसून आला. दुसऱ्या इंटरनॅशनलचे तमाम नेते साम्राज्यवादी युद्धाला सर्वहारा क्रांतीची संधी बनविण्याऐवजी ‘पितृभूमीच्या रक्षणा’ची घोषणा देत आक्रमक अंधराष्ट्रवादाच्या प्रवाहात सामील झाले. दुसरीकडे, लेनिनच्या नेतृत्त्वाखाली बोल्शेविक पार्टीने युद्धाला क्रांतीच्या संधीत रूपांतरित करण्याच्या क्रांतिकारी घोषणेची अंमलबजावणी केली. या युद्धातून युद्धातून निर्माण झालेल्या परिस्थितीने १९१७ च्या ऑक्टोबर क्रांतीला जन्म दिला व लेनिनवादाचा विजय झाला. हे महायुद्ध साम्राज्यवादाचे तीव्र होणारे अंतर्विरोध टोकाला जाण्याची अभिव्यक्ती होते. दोन्ही महायुद्धांची कारणे समजून घेण्यासाठी साम्राज्यवाद काय आहे व तो अटळपणे युद्धांना कसा जन्म दोतो ते समजून घेणे गरजेचे आहे. साम्राज्यवादाचा एक एक पैलू समजून घेणे येथे आपला उद्देश नाही. परंतु थोडक्यात साम्राज्यवादाचे मूलभूत बिंदू समजून घेण्याचा प्रयत्न आपण करू. भांडवलशाही कोणत्या टप्प्यांमधून प्रवास करीत साम्राज्यवादापर्यंत येऊन पोहोचली ते समजून घेणे गरजेचे आहे. साम्राज्यवादी युद्धाने निर्माण केलेल्या संधीचा ऐतिहासिक लाभ घेऊन रशियामध्ये क्रांती करणाऱ्या लेनिन यांनी साम्राज्यवादाचे सर्व पैलू विस्तारपूर्वक मांडलेले आहेत. त्यांनी साम्राज्यवादाची व्याख्या करताना म्हटले आहे – साम्राज्यवाद भांडवलशाहीची एक विशेष अवस्था आहे. त्याची विशिष्ट प्रकृती तीन रूपांमधून प्रकट होते ; १. साम्राज्यवाद एकाधिकारी भांडवलशाही आहे. २. साम्राज्यवाद ऱ्हासोन्मुख भांडवलशाही आहे. ३. साम्राज्यवाद मरणासन्न भांडवलशाही आहे. लेनिन यांनी साम्राज्यवादाची पाच मूलभूत वैशिष्ट्ये या प्रकारे सांगितली आहेत ; १. उत्पादन आणि भांडवलाच्या एकवटण्याचे परिणाम इतके विकसित होतात की आर्थिक जीवनावर एकाधिकारी संघटनांचे अधिपत्य स्थापन होते. २. बँकिंग भांडवल आणि औद्योगिक भांडवल एकत्र येतात व या वित्तीय भांडवलावर एक वित्तीय अल्पतंत्राचा उदय होतो. ३. मालांच्या निर्यातीहून पूर्णपणे भिन्न अशा भांडवलाच्या निर्यातीला विशेष महत्त्व प्राप्त होते. ४. आंतरराष्ट्रीय एकाधिकार संघ निर्माण होतात. ५. सर्वाधिक शक्तीशाली भांडवली शक्तींमध्ये एकूण जगाचे क्षेत्रीय वाटप पूर्ण होते. ही मूलभूत वैशिष्ट्ये समजून घेऊनच आपण आधुनिक युद्धांची कारणे समजू शकतो. ही वैशिष्ट्ये थोडक्यात समजवण्याचा येथे प्रयत्न केलेला आहे.

१. एकाधिकार (मक्‍त्‍तेदार) साम्राज्यवादाचा आर्थिक पाया आहे.

साम्राज्यवादाला एकाधिकारी भांडवलशाहीसुद्धा म्हटले जाते. भांडवलशाहीच्या पहिल्या टप्प्यात मुक्त स्पर्धा हे त्याचे वैशिष्ट्य होते. परंतु भांडवलशाही आपल्या अंतर्विरोधांतून मक्‍त्‍तेदारीला जन्म देते, हे तिचे वैशिट्य आहे. भांडवलशाहीचा हा सामान्य नियम आहे की मोठे भांडवल लहान भांडवलाला गिळून टाकते. एकाधिकारी भांडवलशाही किंवा साम्राज्यवादाचा जन्म तीन टप्प्यांतून जाऊन झाला. पहिल्या टप्प्यात एकोणिसाव्या शतकाच्या सातव्या आणि आठव्या दशकात मुक्त स्पर्धा उत्पादक शक्तींच्या विकासामुळे आपल्या अत्युच्च बिंदूवर पोहोचली. आंतरिक दहन इंजिन, विजेची मोटर इत्यादी शोध लावले गेले व त्यामुळे उत्पादक शक्तींचा अभूतपूर्व विकास झाला. यामुळे अवजड उद्योगांचा उत्पादनामधील सापेक्ष सहभाग वाढला. १८७३ च्या मंदीमुळे दुसऱ्या टप्प्यातील उद्योगांमध्ये स्पर्धा तीव्र होत गेली आणि त्यातच लहान व मध्यम उद्योग मोठ्या प्रमाणात बंद होऊ लागले. आता एकाधिकारी संघांच्या (कार्टेल, ट्रस्ट, सिंडिकेट इत्यादी) विकासाचा मार्ग मोकळा झाला. डिझेल इंजिन,वाफेचं टर्बायन इत्यादी आविष्कारांमुळे उत्पादन शक्तींचा आणखी मोठ्या प्रमाणावर विकास झाला. उत्पादनात मोठ्या उद्योगांचा वाटा सतत वाढत गेला. अशा प्रकारे एकाधिकाराच्या टप्प्यापर्यंतच्या संक्रमणाची परिस्थिती प्राथमिक स्तरावर पूर्ण झाली होती. परंतु त्यानंतर उत्पादक शक्तींचा विकास अवरुद्ध होऊ लागला. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस व विसाव्या शतकाच्या आरंभी तिसऱ्या टप्प्यात भांडवलाच्या संचयाची आणि एकवटण्याची गती अत्यंत वेगवान झाली होती. मोठ्या उद्योगांच्या हातात भांडवलाचे एकवटणे अधिकाधिक होत चालले. एकाधिकारी संघटना वेगाने विकसित होऊ लागल्या आणि समस्त आर्थिक जीवनाचा पाया बनून गेल्या. या वेळेपर्यंत एकाधिकारी संघटनांनी बहुतेक उत्पादनांच्या उत्पादनावर आणि वितरणावर मजबूत पकड मिळवलेली होती आणि भांडवलशाही देशांच्या नाड्या त्यांच्या हाती आलेल्या होत्या. या एकाधिकारी संघटना विक्रीच्या अटी, फेडीच्या तारखा इत्यादीसंबंधी समझोते करायच्या. त्या बाजारपेठा आपापसात वाटून घेत होत्या आणि किती माल पैदा केला जाईल व काय किंमत निश्चित केली जाईल हेसुद्धा ठरवू लागल्या. या संघटनांची संख्या सतत वाढत जात होती. १९८६ मध्ये जर्मनीमध्ये कार्टेलांची संख्या जवळपास २५० होती आणि १९०५ येईतो ती ३८५ वर पोहोचली. यांमध्ये जवळपास १२००० उद्योग सहभागी होते. संयुक्त राज्य अमेरिकेमध्ये १९०० मध्ये १८५ ट्रस्ट अस्तित्त्वात होते आणि १९०७ येईस्तोवर त्यांची संख्या २५० वर पोहोचली होती. या कार्टेल आणि ट्रस्ट उद्योगाच्या कोणत्याही शाखेचा ७० ते ८० टक्के हिस्सा आपल्या हातांमध्ये केंद्रित करीत होत्या. त्यांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या एकूण कामागारांच्या ७० ते ७५ टक्के असायची, मात्र या उद्योगांची संख्या एकूण उद्यागांच्या एक  चतुर्थांशच असायची. या संघटना उत्पादन कशा प्रकारे नियंत्रित करीत होत्या हे पाहिले जाऊ शकते. या मोठ्या एकाधिकारी संघटना लहान उद्योगांना सतत नष्ट करीत होत्या. अशा प्रकारे मुक्त स्पर्धेच्या गर्भातूनच एकाधिकाराचा जन्म झाला परंतु त्याने कधीच या स्पर्धेचा अंत केला नाही, उलट त्याने स्पर्धा अधिक तीव्र बनविली. भांडवली समाजात स्पर्धा कधीच संपत नाही. एकाधिकारी आणि गैर एकाधिकारी संघटनांमधील स्पर्धा सतत सुरूच राहते, एकाधिकारी संघटनांमध्ये कधी कच्च्या मालाच्या स्रोतांसाठी आणि बाजारपेठांसाठी स्पर्धा सुरू राहते. एकाच एकाधिकारी संघटनेच्या वेगवेगळ्या उद्योगांमध्येसुद्धा स्पर्धा सुरूच राहते.

२. वित्तीय भांडवलाच्या पायावर एका वित्तीय अल्पतंत्राचा उदय

first world warमुक्त स्पर्धेच्या काळात बँका समाजात निष्क्रिय पडलेले धन एकत्र करायच्या आणि मॅन्युफॅक्चरिंग करणाऱ्या व वाणिज्यिक भांडवलदारांना ते अल्पावधिक ऋणाच्या रूपात देऊन मध्यस्थाची भूमिका पार पाडायच्या. परंतु भांडवलशाही जसजशी मुक्त स्पर्धेतून एकाधिकाराच्या टप्प्यात पोहोचली, तशी बँकांनी आपली भूमिका बदलली. मध्यस्थाच्या भूमिकेपुढे जाऊन त्या सर्वशक्तीमान एकाधिकारी बनल्या. बँकिंग उद्योगात एकाधिकाराने बँकिंग आणि मॅन्युफॅक्चरिंग उद्योगाच्या नात्यात मूलभूत परिवर्तन घडवून आणले. तीव्र होणाऱ्या स्पर्धेने अशी परिस्थिती निर्माण केली जिच्यामुळे बँक भांडवल आणि औद्योगिक भांडवलाच्या विलिनीकरणाची स्थिती निर्माण झाली. बँकांनी आपले भांडवल औद्योगिक घराण्यांना व्याजावर देण्यास सुरुवात केली. सुरुवातीला त्यांची भूमिका साध्या साहाय्यकाची होती. परंतु लवकरच बँका अधिकाधिक नियंत्रणकारी बनू लागल्या. त्याचबरोबर, ही प्रक्रिया नेमकी तिच्या विरुद्धही घडत गेली. तमाम मोठमोठ्या औद्योगिक घराण्यांनी बँका किंवा त्यांचे शेअर विकत घेण्यास सुरुवात केली किंवा आपल्या बँका स्थापित करून बँकिंगच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात भांडवल संचय करण्यासाठी हस्तक्षेप सुरू केला. मॅन्युफॅक्चरिंग स्टॉक बँका मोठ्या प्रमाणात विकत घेऊ लागल्या, व त्याचबरोबर मॅन्युफॅक्चरिंग एकाधिकारी संघटनासुद्धा बँकांचे स्टॉक खरेदी करू लागल्या. अशा प्रकारे एकाधिकारी बँकिंग भांडवल आणि एकाधिकारी मॅन्युफॅक्चरिंग भांडवल हळूहळू विलीन झाले आणि वित्तीय भांडवल अस्तित्त्वात आले आणि बेसुमार वित्तीय भांडवलाचे स्वामी वित्तीय सम्राट बनले. ही विराटकाय वित्तीय घराणी पुढच्या काळात राष्ट्रीय अर्थव्यवस्थांना अधिकाधिक नियंत्रित करू लागली, व साहजिकच लवकरच हे वित्तीय दैत्य प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे राजकीय संरचनेलासुद्धा नियंत्रित करू लागले.

३. माल निर्यातीहून वेगळ्या अशा भांडवलाच्या निर्यातीने असाधारण महत्त्व प्राप्त करणे

मुक्त स्पर्धेच्या काळात मालाची निर्यात हे भांडवलाचे वैशिष्ट्य होते परंतु साम्राज्यवाद येता येता भांडवलाच्या निर्यातीने असाधारण महत्त्व प्राप्त केले. साम्राज्यवादाच्या युगाच्या अगोदर मुक्त स्पर्धेच्या काळातही भांडवलाची निर्यात होत होती परंतु तिला व्यापक रूप प्राप्त झालेले नव्हते. १८६२ मध्ये इंग्लंडद्वारे गुंतविलेले भांडवल ३.६ अरब फ्रँक होते, १८९३ मध्ये ते ४२ अरब फ्रँक झाले आणि पहिले महायुद्ध येता येता ते ७५ ते १०० अरब फ्रँकपर्यंत पोहोचले. हे पाहिले जाऊ शकते की साम्राज्यवादाच्या काळात भांडवलाच्या निर्यातीत अपार वृद्धी होते. भांडवलशाही देशांमध्ये नफा कमाविणाऱ्या सर्वच उद्योगांवर अगोदरच एकाधिकार कायम झाला होता. म्हणूनच आपल्या देशातील कष्टकऱ्यांचे रक्त शोषून कमावलेले भांडवल अशा देशांमध्ये गुंतविण्यात आले जेथे भांडवलाचा अभाव होता आणि श्रम व कच्चा माल स्वस्तात उपलब्ध होता. या देशांमध्ये मजुरीचा दर कमी होता, जमीन आणि कच्चा माल सहज आणि स्वस्तात मिळत होते. या देशांतील कामगारांचे निर्मम शोषण करण्यात आले आणि भांडवलाचे डोंगर उभे करण्यात आले. वित्तीय भांडवलाच्या काळात भांडवलाची निर्यात अगदी स्वाभाविक होती. देशी बाजारपेठा संतृप्ती बिंदूवर पोहोचण्याबरोबरच तसेच देशी अर्थव्यवस्थेत नफ्याचे दर विलक्षण कोसळण्याबरोबरच साम्राज्यवादी देशांच्या भांडवलदारांसाठी भांडवलाची निर्यात हे अधिक उपयुक्त धोरण होते. जागतिक पातळीवर चालू असलेल्या स्पर्धेमध्ये मालाच्या उत्पादनाचा खर्च कमीत कमी ठेवण्यासाठी साम्राज्यवादी देशांच्या भांडवलदार वर्गाला स्वस्तातला स्वस्त श्रम आणि स्वस्तातला स्वस्त कच्चा माल हवा होता. आणि हा त्यांना वसाहतींमध्ये मिळू शकत होता. त्याचबरोबर, आपल्या देशातील वाढत्या कामगार आंदोलनाच्या दबावापासून सुटका करून घेण्यासाठी व आपल्या देशातील कामगार वर्गाला काही सवलती देण्यासाठीसुद्धा ज्या गोष्टीजी गरज होती, ती गोष्ट होती भांडवल निर्यात. अगोदर उन्नत भांडवलदार देश आपल्या देशात उत्पादन करून त्याची विक्री वसाहतींमध्ये करीत होते आणि वसाहती कच्च्या मालाचा पुरवठा करीत होत्या. परंतु आता कच्चा माल साता समुद्रापार नेऊन उत्पादित माल पुन्हा वसाहतींमध्ये नेऊन विकण्याऐवजी भांडवलाची निर्यात करून वसाहतींमध्येच उत्पादन करणे आणि ते जगभरातील बाजारपेठांमध्ये विकणे अधिक सोयीचे होते. लवकरच ही भांडवलाची निर्यात प्रमुख प्रवृत्ती बनली आणि मालाची निर्यात दुय्यम ठरली.

४. आंतरराष्ट्रीय एकाधिकार संघांचे निर्माण आणि त्यांच्यामध्ये जगाचे वाटप

लेनीन यांनी अत्यंत अचूक शब्दांमध्ये ही परिघटना समजावली आहे. भांडवलदारांचे एकाधिकारी संघ, कार्टेल, सिण्डिकेट आणि ट्रस्ट सर्वप्रथम आपल्या देशांतील बाजारपेठांचे आपापसात वाटप करीत होत्या, त्या देशातील उद्योगांना जवळजवळ पूर्णपणे आपल्या कब्जात करून घेत होत्या. परंतु भांडवलशाहीमध्ये देशातील बाजारपेठा आनिवार्यपणे विदेशी बाजाराशी जोडलेल्या असतात. भांडवलशाहीने फार पूर्वीच जागतिक बाजारपेठ तयार केली होती. जसजशी भांडवलाची निर्यात वाढू लागली व मोठमोठ्या एकाधिकार संघांचे विदेशी तसेच वासाहतिक संबंध आणि प्रभावक्षेत्र सर्वच प्रकारे वाढत गेले, तसतशी स्वाभाविकपणे या संघांदरम्यान आंतरराष्ट्रीय समझोत्यांच्या दिशेने आणि आंतरराष्ट्रीय कार्टेलांचे निर्माणाच्या दिशेने परिस्थिती अग्रेसर होत गेली. हा भांडवल तसेच उत्पादनाच्या विश्वव्यापी एकवटण्याचा नवा टप्पा आहे जो अगोदरच्या सर्वच टप्प्यांपेक्षा अधिक उंच होता. या आंतरराष्ट्रीय कार्टेल लहानमोठ्या कंपन्यांना आपल्या अधीन करून घेत होत्या आणि जगाच्या आर्थिक वाटपासाठी आपापसात करार करीत होत्या. स्टँडर्ड ऑईल कंपनी, जनरल इलेक्ट्रिक कंपनी, जनरल मोटर कंपनी इत्यादी अशाच प्रकारचे आंतरराष्ट्रीय संघ तयार झाले होते. lot-10-c-r-w-nevinson-returning-to-the-trenches 1विभिन्न करारांच्या द्वारे जगाचे आर्थिक वाटप केल्यानंतरदेखील आंतरराष्ट्रीय संघांदरम्यानचा संघर्ष काही संपुष्टात येत नाही, उलट तो वाढत जातो. हे संघ म्हणजे साम्राज्यवादाची एक अभिलाक्षणिकता असल्या कारणाने व साम्राज्यवाद म्हणजे भांडवलशाहीचीच अत्युच्च अवस्था असल्यमुळे जोपर्यंत वर्गांचे अस्तित्व आहे तोवर या संघांदरम्यानच्या संघर्षाची प्रकृती आणि या संघर्षांची अंतर्वस्तू कधी बदलत नाही, बदलते ते केवळ त्याचे रूप. साम्राज्यवादाच्या काळात केंद्रीकरण ज्या टोकाला पोहोचले होते, त्या परिस्थितीत भांडवलदारांसमोर नफा कमाविण्यासाठी जगाचे वाटप करण्याऐवजी दुसरा मार्ग शिल्लक राहत नाही. हे वाटप भांडवलाचे प्रमाण आणि शक्तीचे प्रमाण यांच्यानुसार होते व त्यात बदल घडून येताच संघर्ष तीव्र होत जातो आणि राजकीय संघर्षाचे रूप धारण करतो. लेनिन यांच्या शब्दांत, भांडवलशाही संघांच्या दरम्यान असे संबंध निर्माण होतात जे जगाच्या आर्थिक वाटपावर आधारित असतात आणि त्याचबरोबर व त्याच संदर्भात राजकीय संघांच्या दरम्यान, राज्यांच्या दरम्यान काही असे संबंध निर्माण होतात ज्यांचा आधार असतो जगाचे क्षेत्रीय वाटप, वसाहतींसाठी संघर्ष आणि आर्थिक क्षेत्रांसाठी संघर्ष.

५. साम्राज्यवादी शक्तींच्या दरम्यान जगाचे क्षेत्रीय वाटप

साम्राज्यवादाच्या युगात साम्राज्यवादी भांडवलाचा संघर्ष आपल्या अत्युच्च बिंदूवर पोहोचला होता. जर्मनी आणि अन्य युरोपयी देश आणि संयुक्त राज्य अमेरिका ब्रिटिश अधिपत्याला आव्हान देऊ लागले होते. जसजसे या देशांच्या शक्तीचे प्रमाण वाढत गेले तसतसा हा संघर्ष अधिकाधिक तीव्र होऊ लागला. पहिले महायुद्ध येता येता उभ्या जगाचे वाटप युरोपीय साम्राज्यवादी देशांच्या दरम्यान पूर्ण झाले होते. आकडे काढून पाहिले तर हे स्पष्ट होते. १८७६ पर्यंत युरोपीय वासाहतिक शक्तींचे अधिपत्य आफ्रिकेच्या केवळ १०.८ टक्के क्षेत्रावर होते तेच १९०० येता येता ९०.४ टक्के क्षेत्रावर अधिपत्य कायम करण्यात आले होते.पोलिनेशियाच्या ५७ टक्के क्षेत्रावर १८७६ पर्यंत अधिपत्य कायम झाले होते ते १९०० पर्यंत ९९ टक्क्यांपर्यंत गेले होते. एशियाच्या ५७ टक्के क्षेत्रावर वासाहतिक शक्तींनी आपला कब्जा केलेला होता. ऑस्ट्रेलियाचे पूर्ण वासाहतिकरण अगोदरच झालेले होते. अशा प्रकारे एकूण जगाचे विभाजन साम्राज्यवादाच्या काळात पूर्ण झाले होते आणि आता केवळ त्याचे पुनर्विभाजनच शक्य होते. ही परिघटना लेनिन यांनी पुढील शब्दांत स्पष्ट केली आहे, ‘‘भांडवलशाही देशांच्या वासाहतिक धोरणाने आपल्या पृथ्वीवर अनधिकृत प्रदेशांवर अधिपत्य स्थापित करण्याचे काम पूर्ण केले आहे. प्रथमच जग पूर्णपणे वाटले गेले आहे आणि म्हणूनच भविष्यात तिचे केवळ पुनर्विभाजनच शक्य आहे. म्हणजेच, आता हे शक्य नाही की असा कोणताही प्रदेश ज्याचा कोणी मालक नाही, कोण्या मालकाच्या ताब्यात जाऊ शकेल, उलट आता एकच होऊ शकते की एक मालक दुसऱ्या मालकाच्या हाती जाऊ शकतो. म्हणजेच एका साम्राज्यवादी युद्धासाठी पूर्वपिठिका तयार झालेली होती.’’

अशा प्रकारे आपण पाहिले की साम्राज्यवादाचे अंतर्विरोध तीव्रतर होत जातात आणि शेवटी साम्राज्यवादी युद्धांना जन्म देतातच देतात. पहिले महायुद्ध हे साम्राज्यवादी युद्ध होते आणि साम्राज्यवादाचे तीव्र होणारे अंतर्विरोध टोकाला जाण्याची ती अभिव्यक्ती होती. हे कोणत्याही शासकांच्या षड्यंत्रामुळे किंवा एखाद्या राजकुमाराच्या हत्येमुळे झाले असे मानणे अनैतिहासिक  ठरेल. फार पूर्वीपासूनच साम्राज्यवादी युद्धाची शक्यता निर्माण होऊ लागली होती. १९१० येता येता हे स्पष्ट झाले होते की जग ज्वालामुखीच्या तोंडावर आहे. जगाचे पुनर्विभाजन आता युद्धाद्वारेच होऊ शकत होते. १८७६ ते १९१४ दरम्यान फ्रान्स आणि जर्मनी मोठ्या भांडवलदार शक्तींच्या रूपात जगासमोर आल्या होत्या आणि जसजशी त्यांची शक्ती वाढत गेली तसतसा वसाहतींसाठी संघर्ष तीव्र होत गेला. अखेर वसाहती भांडवलशाही देशांसाठी इतक्या महत्त्वाच्या का होत्या हेदेखील समजून घेणे गरजेचे आहे. प्रथम, वसाहती साम्राज्यवादी देशांसाठी कच्च्या मालाचा सर्वाधिक महत्त्वपूर्ण स्रोत होत्या. मक्‍त्‍तेदारीने मोठ्या प्रमाणावर उत्पादनास जन्म दिल्यामुळे उत्पादनाचे प्रमाण वाढत जाण्याबरोबरच कच्च्या मालाची गरज अधिकाधिक वाढत गेली आणि त्यांच्या निरनिराळ्या स्रोतांवर कब्जा मिळविणे महत्त्वपूर्ण बनले. दुसरे, वसाहतींमध्ये एकाधिकारी संघटना साम्राज्यवादी देशांतील कामगारांचे निर्मम शोषण करू शकत होत्या. तिसरे, एकाधिकारी संघटनांसाठी वसाहती म्हणजे सर्वाधिक लाभदायक बाजारपेठा होत्या. चौथे, आपले जागतिक प्रभुत्व कायम करण्यासाठी साम्राज्यवादी वसाहतींना आपले आधारक्षेत्र मानत होते, युद्धासाठी वसाहतींतून सैनिक भरती केले जाऊ शकत होते, वसाहतींतील जनतेवर मोठ्या प्रमाणात कर लादून युद्धासाठी संसाधने गोळा केली जाऊ शकत होती. पाचवे, साम्राज्यवादी वसाहतींमध्ये भयंकर लूट करून आपल्या देशातील कामगार वर्गाचा क्रोध काही प्रमाणात शांत करू शकत होते. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस ब्रिटनचा एक वित्तीय सम्राट सेसील रोड्स याने एकीकडे साम्राज्यवादाचे समर्थन करताना म्हटले होते, ‘‘युनायटेड किंगडमच्या ४ कोटी जनतेला रक्तपातपूर्ण गृहयुद्धापासून वाचविण्यासाठी आपल्याला – वासाहतिक राजनीतिज्ञांना – येथील अतिरिक्त जनतेच्या वसनासाठी व येथील कारखाने तसेच उत्पादनाच्या विक्रीसाठी नव्या बाजारपेठा पुरविण्याकरिता नवे प्रदेश मिळवावे लागतील. मी नेहमीच म्हटल्याप्रमाणे साम्राज्य म्हणजे पोटापाण्याचा प्रश्न आहे. जर तुम्ही गृहयुद्धापासून स्वत:ला वाचवू इच्छित असाल तर तुम्हांला साम्राज्यवादी व्हावेच लागेल.’’ साम्राज्यवाद्यांसाठी वसाहती किती महत्त्वाच्या बनल्या होत्या ते या वक्तव्यावरून स्पष्टपणे पाहिले जाऊ शकते. साम्राज्यवादी शक्तींच्या विकासाबरोबरच साम्राज्यवादी युद्ध अपरिहार्य बनले होते. १८७६ ते १९१४ दरम्यान ब्रिटनच्या वसाहतींचे क्षेत्रफळ २२५ लाख वर्ग किलोमीटरवरून वाढून ३३५ लाख वर्गकिलोमीटर झाले होते. फ्रान्सच्या वसाहतींचे क्षेत्रफळ ६० लाख वर्गकिलोमीटरवरून वाढून १०६ वर्गकिलोमीटर झाले होते. जर्मनी, ज्याच्यापाशी अगोदर कोणत्याच वसाहती नव्हत्या त्याने १९१४ पर्यंत २९ लाख वर्गकिलोमीटर क्षेत्रफळावर कब्जा केलेला होता. संयुक्त राज्य अमेरिका आणि जपानसुद्धा सतत शक्तीशाली बनत होते. जपानने १९०४-०५ मध्ये रशियाला जोरदार मात दिलेली होती. ऑटोमन साम्राज्याचे विघटन होत होते आणि बाल्कन राज्यांकडे पाहून सारे साम्राज्यवादी जिभल्या चाटत होते. साम्राज्यवादी देशांसाठीसुद्धा हे स्पष्ट झालेले होते की युद्ध आता फार दूर नाही. सर्वच साम्राज्यवादी देश आपली सैन्यशक्ती १८९० पासूनच वाढवू लागले होते. ब्रिटनचा सैनिकी खर्च १८८७ मध्ये ३२ मिलियन पाउण्ड होता तो १८९४ साली ४४ मिलियन पाउण्ड झाला आणि १९१३ साली ७७ मिलियन पाउण्डपर्यंत जाऊन पोहोचला. जर्मनीचा सैनिकी खर्च १८९५ मध्ये ९० मिलियन मार्क होता तो १९१३ येता येता ४०० मिलियन मार्कवर गेला. शस्त्र उद्योगाचा ७० टक्क्यांहून ज्यादा हिस्सा एकाधिकारी संघटनांच्या हाती होता. युद्धाचे संकेत मिळालेले होते. जुलै ऑगस्ट १९१४ मध्ये साम्राज्यवादी अंतर्विरोध उघडपणे समोर आले आणि महायुद्धाला सुरुवात झाली. आपण आतापर्यंत हे पाहिलेलेच आहे की या युद्धाची ऐतिहासिक कारणे भांडवलशाहीच्या साम्राज्यवादातील संक्रमाणात निहित आहेत. दोन्ही साम्राज्यवादी गट कशा प्रकारच्या समझोत्यांद्वारे अस्तित्त्वात आले, युद्धादरम्यान शक्ती संतुलन कशा प्रकारे बदलत राहिले आणि युद्धानंतर कशाकशा प्रकारे ‘‘शांतता करार’’ झाले हा एका वेगळ्या लेखाचा विषय होऊ शकतो. युद्धाचे वर्णन करणे हा येथे आपला उद्देश नसून आपल्याला युद्धाच्या ऐतिहासिक कारणापुरतेच लेखाला मर्यादित ठेवायचे आहे.

पहिल्या महायुद्धाच्या काळात साम्राज्यवादी गटांमधील संधीसाधू आणि संशोधनवाद्यांचे चारित्र्यदेखील उघडे पडले होते. त्यांचे नेतृत्त्व दुसऱ्या इंटरनॅशनलचा नेता काउत्स्की करीत होता. १९१२ मध्ये बैसेल (स्विट्झरलँड) मध्ये दुसऱ्या इंटरनॅशनलच्या एका काँग्रेसमध्ये एक घोषणापत्र प्रसिद्ध करण्यात आले होते. त्यामध्ये, साम्राज्यवादी युद्ध भडकले तर समाजवाद्यांनी युद्धजन्य आर्थिक आणि राजकीय संकटाचा लाभ घेऊन समाजवादी क्रांतीचा संघर्ष तीव्र केला पाहिजे, यावर जोर देण्यात आला होता. त्यावेळी दुसऱ्या इंटरनॅशनलच्या काउत्स्की, वानडरवेल्डे आदी नेत्यांनी काँग्रेसमध्ये या युद्धविरोधी घोषणापत्राचे समर्थन केले होते. परंतु साम्राज्यवादी युद्ध भडकताच या नेत्यांनी सर्वहारा वर्गाशी गद्दारी करून आपल्या देशाच्या भांडवलशहा सरकारांच्या साम्राज्यवादी धोरणाचे खुलेआम समर्थन केले आणि साम्राज्यवादी युद्धाला पितृभूमीच्या रक्षणार्थ लढले जाणारे युद्ध ठरविले. यामुळे लवकरच दुसऱ्या इंटरनॅशनलचे पतन झाले. रशियामध्ये बोल्शेविक पार्टीने लेनिन यांच्या नेतृत्त्वाखाली योग्य धोरण स्वीकारून युद्धजन्य संकटाचा लाभ घेऊन साम्राज्यवादी युद्धाला गृहयुद्धात बदलण्याची घोषणा केली आणि रशियाची महान ऑक्टोबर क्रांती संपन्न झाली. लेनिन यांनी हे सिद्ध केले की साम्राज्यवादी युद्ध क्रांतिकारी परिस्थितीसुद्धा निर्माण करते आणि जर सर्वहारा वर्गापाशी त्याचे नेतृत्व करणारी संघटित, तावून सुलाखून निघालेली आणि क्रांतीच्या विज्ञानाची सुसंगत जाण बाळगणारी एक पार्टी असेल तर क्रांतिकारी परिस्थितींचा लाभ घेऊन साम्राज्यवादाच्या संघटित शक्तींना पराजित करता येते.

भांडवलशाहीतून उत्पन्न झालेल्या संकटांपासून सुटका करून घेण्यासाठी आणि आपले जागतिक प्रभुत्व कायम करण्यासाठी साम्राज्यवादी नेहमीच कष्टकरी जनतेवर युद्ध लादत असतात. दुसरे महायुद्धसुद्धा केवळ हिटलरची इच्छा आणि यहुद्यांबद्दलच्या तिरस्कारातून जन्माला आले होते असे मानणे अनैतिहासिक ठरेल. दुसरे महायुद्धसुद्धा साम्राज्यवादातील अंतर्विरोध भडकण्याचा परिणाम होता. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाला आणि त्याला कडक दंड ठोठावण्यात आले होते. त्यानंतरदेखील जर्मनीमध्ये औद्योगिक उत्पादनाने १९२७ येता येता पूर्वीसारखाच वेग पकडला होता. युद्धानंतर आलेल्या तेजीने भांडवलशाहीला मोकळा श्वास घेण्यास थोडी फुरसत दिली. परंतु भांडवलशाहीत संकट निर्माण होणे अटळ आहे आणि १९२०-३०ची महामंदी पुन्हा भांडवलशाहीचे दार ठोठावू लागली. ही मंदी इतिहासातील सर्वांत भयंकर मंदी ठरली. तिच्यातून सुटका करून घेण्यासाठी साम्राज्यवाद्यांना आणखी एका भीषण युद्धाची गरज होती. जपान आणि जर्मनीचा औद्योगिक विकास मोठ्या प्रमाणात झालेला होता. जपान पहिल्या महायुद्धातील विजयी गटासोबत होता परंतु त्याला विशेष काही प्राप्त झाले नव्हते. मंदीच्या काळात नफा आंत्यंतिक संकुचित झाल्यामुळे आणि कामगार आंदोलन दाबून टाकण्यासाठी जर्मनीला हिटलरसारख्या राक्षसाचीच गरज होती. नफ्याची हाव पुन्हा एकदा जगाला विनाशाकडे घेऊन चालली होती. जर्मनी, इटाली, अमेरिका, जपान इत्यादींच्या शक्तीचे प्रमाण सतत वाढत चालले होते आणि जगाच्या पुनर्विभाजनाचा प्रश्न पुन्हा एकदा समोर उभा ठाकला होता. आर्थिक संकटातून सुटका करून घेण्यासाठी आणि जगावर प्रभुत्व स्थापित करण्यासाठी साम्राज्यवाद्यांमध्ये आणखी एक भीषण युद्ध अपरिहार्य होते आणि १९३९ साली ते भडकले.

लेनिन यांनी साम्राज्यवादाला मरणासन्न भांडवलशाही म्हटले होते. त्यांनी म्हटले होते की साम्राज्यवाद सर्वहारा क्रांतीची पूर्वसंध्या आहे. आज ज्या युगात आपण राहतो आहोत तेदेखील साम्राज्यवादाचेच युग आहे. आपल्या रूपातील तमाम बदलांनंतरही साम्राज्यवादाची अंतर्वस्तू आजही तीच आहे. सांप्रत काळात साम्राज्यवाद पूर्वीपेक्षाही अधिक अशक्त बनलेला आहे. गेल्या शतकातील साम्राज्यवादाने दोन महायुद्धांसह अनेक लहानमोठ्या युद्धांना जन्म दिला. दोन मोठ्या महायुद्धांत साम्राज्यवाद्यांनादेखील भयंकर नुकसान सोसावे लागले. आज साम्राज्यवादी देशांच्या अर्थव्यवस्था एकमेकांचा आधार घेऊन उभ्या आहेत व हे लक्षात घेता आज तिसऱ्या महायुद्धाची शक्यता अत्यल्प आहे. याची अनेक कारणे आहेत. एक कारण म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर साम्राज्यवादाच्या कार्यशैलीमध्ये अनेक परिवर्तने आलेली आहेत. या परिवर्तनांतील सर्वाधिक महत्त्वाचे म्हणजे जगाचे अवासाहतिकरण. आता जग पुन्हा त्या दिशेने उलटे जाऊ शकत नाही जेव्हा आफ्रिका, एशिया आणि लॅटिन अमेरिकेचे तमाम देश साम्राज्यवादी शक्तींच्या पूर्ण वसाहती आणि गुलाम होते. आजसुद्धा साम्राज्यवादी लुटीचा दाब याच महाद्विपांच्या उत्तर वासाहतिक देशांवरच जास्त आहे परंतु हेदेखिल सत्य आहे की या उत्तर वासाहतिक देशांचा शासक भांडवलदार वर्ग आपली राजकीय स्वतंत्रता टिकवून ठेवीत असतो. हा वास्तविक साम्राज्यवादाचा कनिष्ठ भागीदार बनून त्याच्याशी सौदे आणि मोलभाव करीत असतो. त्याच्यापाशी एक विशालकाय बाजारपेठ, एक विशालकाय स्वस्त श्रमशक्ती आणि कच्च्या मालाचे भंडार आहे, तर दुसरीकडे त्याला स्पर्धेत टिकून राहण्यासाठी भांडवल आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. त्याचबरोबर साम्राज्यवादी देशांतील संकटग्रस्त भांडवलदार वर्गाला नव्या बाजारपेठांची आणि भांडवलाच्या आधिक्यापासून सुटका करून घेण्यासाठी गुंतवणुकीच्या नव्या संधींची आवश्यकता आहे. या नव्या स्थितीने जागतिक भांडवलशाहीची आंतरिक समीकरणे बदललेली आहेत. आज महायुद्ध भडकण्याची शक्यता कमी आहे. तशा प्रकारे जगभरातील शक्तींचे धृवीकरण होणे फारच मुश्कील आहे. म्हणूनच लहान रूपातील क्षेत्रीय युद्धांच्या (रीजनल थिएटर्स ऑफ वॉर) मंचावर साम्राज्यवादी आपले अंतर्विरोध सोडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जी क्षेत्रे जागतिक भांडवलशाहीसाठी आर्थिक, राजकीय, सामरिक आणि राजकीय दृष्टीने विशेष महत्त्वाची आहेत त्याच क्षेत्रांमध्ये क्षेत्रीय युद्धे होणार हे सांगण्याची गरज नाही. म्हणूनच पश्चिम एशिया आणि युक्रेन आज अशा दोन क्षेत्रीय युद्धांचे मंच बनले आहेत जेथे साम्राज्यवादी अंतर्विरोध गुरफटलेले आहेत. साम्राज्यवाद्यांमधील युद्धे अन्य रूपदेखील धारण करीत आहेत, उदाहरणार्थ, मुद्रा युद्ध. त्याचबरोबर आणखी एका कारणास्तव आज महायुद्ध भडकण्याची शक्यता कमी आहे आणि ते म्हणजे आण्विक डेटेरेंटचे अस्तित्त्व. निश्चितच असे कोणतेही सामरिक कारण स्वत:हून निर्धारक भूमिका पार पाडू शकत नाही. परंतु साम्राज्यवादाची एकूण संरचना आणि त्याच्या कार्यप्रणालीमध्ये आलेल्या बदलांच्या संदर्भात त्याचीसुद्धा एक भूमिका निश्चितच आहे. आजचे साम्राज्यवादी जग पूर्वीच्या तुलनेत कितीतरी अधिक तीव्र प्रतिस्पर्धेचे साक्षीदार बनते आहे. पैक्स ब्रिटानिकासारखा काळ पुन्हा कधी येऊ शकत नाही, ते साम्राज्यवादाच्या एका विशिष्ट टप्प्यातच शक्य होते. सोवियत संघाच्या विघटनानंतर काही काळ पॅक्स अमेरिकानासदृश परिस्थितीचा भ्रम निर्माण झाला होता, व कित्येक माक्र्सवादी त्याचे बळी ठरले होते. परंतु हा भ्रम २००० च्या पहिल्या दशकातच नष्ट झाला. आज आपण अमेरिकेच्या आर्थिक शक्तीच्या उताराचे साक्षीदर आहोत आणि अन्य साम्राज्यवादी शक्तींचा उदय आणि उभारसुद्धा पाहत आहोत, जे अमेरिकेच्या साम्राज्यवादी वर्चस्वाशी गरजेनुसार सौदे करतात आणि कधी त्या वर्चस्वाला आव्हानही देतात. अशा काळात तिसऱ्या महायुद्धाची शक्यता कमीच दिसते आहे.

4337680_f520परंतु याचा अर्थ असा बिलकुल नाही की साम्राज्यवादाच्या अस्तित्त्वासाठी युद्ध आवश्यक नाही. आजसुद्धा साम्राज्यवादाचा अर्थ युद्ध हाच आहे. अगोदर उल्लेख केल्याप्रमाणे, सध्या अरब जग साम्राज्यवादी युद्धांचा रंगमंच बनला आहे. युक्रेन विवादसुद्धा साम्राज्यवादी देशांमधील संघर्षाचीच अभिव्यक्ती आहे. अफगाणीस्तान आणि इराकवर यापूर्वीच साम्राज्यवादी युद्धे लादली गेली आहेत. आज साम्राज्यवाद १९३०नंतरच्या महामंदीनंतरच्या सर्वात मोठ्या मंदीशी झुंज देत आहे. स्वत:च्या आर्थिक आणि राजकीय संकटांतून सुटका करून घेण्यासाठी आजसुद्धा साम्राज्यवादी देश युद्धांचाच आश्रय घेत आहेत. आजचा साम्राज्यवाद सट्टेबाज भांडवलाचे अधिपत्य असलेल्या अस्थिर- अराजक जागतिक अर्थव्यवस्थेवर उभा आहे ज्याचा पाया पोकळ झालेला आहे आणि तो आपल्या जडत्वाच्या बळावरच टिकून आहे. जोपर्यंत त्याचा विनाश होत नाही तोपर्यंत तो मानवसमाजासाठी एक धोका म्हणून तसाच राहील आणि मानवतेवर युद्ध लादत राहील आणि त्याचबरोबर पर्यावरणाचासुद्धा भयंकर नाश करीत राहील. परंतु तो आपल्या गतीने आपोआप नष्ट होणार नाही. माओ यांनी म्हटल्याप्रमाणे, ‘‘साम्राज्यवाद खतरनाक आहे असे आपण म्हणतो त्यावेळी आपला अर्थ हा असतो की त्याचे चारित्र्य कधीच बदलू शकत नाही. साम्राज्यवादी त्यांचा विनाश होईपर्यंत ना शस्त्र खाली ठेवणार आहेत, ना स्वत:हून बौद्ध बनणार आहेत.’’

पहिल्या महायुद्धाच्या विभीषिकेला शंभर वर्ष पूर्ण होण्याच्या समयी पुन्हा एकवार स्वत:ला स्मरण करून देण्याची गरज आहे की भांडवलशाही नावाच्या नफेखोर आणि नासलेल्या नरभक्षी व्यवस्थेने नफ्यासाठी कित्येक लोकांचे नरबळी दिलेले आहेत आणि आजही सतत देत आहे. पॅलेस्टाइनपासून इराक, सिरिया, लेबेनॉन, युक्रेन, आप्रिेâकेच्या तमाम देशांमध्ये हजारो निर्दोष नागरिकांचे बळी कशासाठी दिले जात आहेत? केवळ साम्राज्यवादी धनपशुंचा नफा टिकवून ठेवण्यासाठी. साम्राज्यवादी भांडवलशाहीचा एक एक दिवस आपल्यासाठी जड जात आहे. त्याला फार पूर्वीच इतिहासाच्या कचरापेटीत फेकून दिले पाहिजे होते. आजसुद्धा जर आपण हे समजून घेतले नाही आणि लुटारू निजामांना समूळ नष्ट करण्यासाठी एकजूट झालो नाही तर उद्या फार उशीर झालेला असेल.

स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५