कॉर्पारेट भांडवली प्रसारमाध्यमांचे वर्चस्व आणि क्रांतिकारी वैकल्पिक प्रसारमाध्यमांसमोरील आव्हाने

कॉर्पारेट भांडवली प्रसारमाध्यमांचे वर्चस्व आणि क्रांतिकारी वैकल्पिक प्रसारमाध्यमांसमोरील आव्हाने

भांडवलशाही ह्या अगोदरच्या सर्व शोषण व्यवस्थांच्या तुलनेत अनेक अर्थांनी भिन्न आहे. आर्थिक आणि राजकीय पातळीवरील सगळ्या वेगळेपणाबरोबरच एक मोठा फरक हा आहे की भांडवलशाही अंतर्गत शोषक-उत्पीडक वर्गांची सत्ता एकतर्फी प्रभुत्वावर नव्हे तर वर्चस्वावर आधारलेली असते. प्रभुत्व आणि वर्चस्व ह्यातील फरक आंतोनिओ ग्राम्शी यांनी स्पष्ट केला होता; प्रभुत्वावर आधारित सत्ता शासित जनतेकडून ‘सहमती’ घेत नाही आणि ती तिची वैधता कुठल्याश्या दिव्य शक्तीच्या माध्यमातून स्थापित करते. उदाहरणार्थ, सामंती समाज आणि त्या पूर्वीच्या प्राक्भांडवली समाजांमध्ये सत्ताधारी वर्गांच्या सत्तेचे वैधीकरण ईश्वर-प्रदत्त होते; राजा किंवा सामंत हा ईश्वराची सावली मानला जायचा आणि त्यांच्या मुखातून प्रत्यक्ष ईश्वर बोलत असे! परंतु भांडवलदार वर्गाने जेव्हा सामंतशाहीच्या विरोधात संघर्ष सुरू केला तेव्हा त्याने मानवकेंद्रित समाज, सेक्युलरिजम (धर्मनिरपेक्षतेच्या अर्थाने नव्हे तर ‘ऐहिकता’ या अर्थाने), मानवतावाद आदी घोषणांचा उद्घोष केला. बुर्झ्वा विचारांचा जन्म होण्याअगोदरच्या  पुनर्जागरणाच्या काळातदेखील ह्याच विचारांचा बोलबाला होता. त्यानंतर धार्मिक सुधारवादी आंदोलन आणि प्रबोधन काळात ही परंपरा अधिक पुढे गेली आणि व्यापारी प्रवृत्ती सोडून औद्येगिक प्रवृत्ती धारण करू पाहणाऱ्या भांडवली वर्गाने तर्कशीलता आणि विज्ञानाचा झेंडा हाती घेतला. भांडवली विचारवंतांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व ह्या मूल्यांवर आधारलेल्या एका आदर्श समाजाचे स्वप्न पाहिले. पहिल्या टप्प्यातील भांडवली क्रांत्यांनंतर भांडवली वर्गाने ह्या घोषणा अशा प्रकारे अमलात आणल्या की समानता ही न्यायासमोरील औपचारिक समानता बनली, बंधुभाव हा भांडवलदारांमधील बंधुभावापुरता मर्यादित झाला आणि स्वातंत्र्य हे नफा कमावण्याचे आणि आपली श्रमशक्ती विकण्याचे स्वातंत्र्य ह्या मर्यादित अर्थाने तेवढे उरले! निश्चितपणे, प्रबोधनकालीन विचारवंतांच्या क्रांतिकारी विचारातील सामातामूलक समाज हा आदर्शवादी स्वप्नरंजनच होते, पण हे आदर्शवादी समाजाचे स्वप्न विचारांच्या केंद्रस्थानी आणणे हेच मोठे क्रांतिकारी पाऊल होते. १८४८ च्या युरोपियन क्रांतींच्या दरम्यान भांडवली वर्गाचा खोटारडेपणा उघड झाला. परंतु तरीही भांडवली समाज हे सामंती अत्याचारांच्या आणि शोषणाच्या तुलनेत एक प्रगतिशील पाऊल होते. सामंती  आर्थिकेतर शोषणाची जागा आता भांडवली आर्थिक शोषणाने घेतली होती. केवळ औपचारिकपणे का होईना राजकीय स्वातंत्र्य, अभिव्यक्ती आणि संगठित होण्याचा अधिकार जनतेला मिळाला. वाढत्या आर्थिक विषमता असलेल्या नफा केंद्रित व्यवस्थेमध्ये ह्या कायदेशीर समानतेला आणि स्वातंत्र्याला काहीही अर्थ नव्हता, ही गोष्ट अलाहिदा. भांडवली राज्यकर्त्‍याचा हा दावा होता कि ते जनतेच्या सहमतीने राज्य करतात. भांडवली संसदीय लोकशाहीच्या राजकीय रूपात निवडणुकांच्या माध्यमातून सत्ताधाऱ्यांचा निर्णय होणार होता. आता शोषणकर्त्‍याना त्यांच्या सत्तेचे वैधीकरण जनतेच्या मतांच्या आणि निवडणूक प्रक्रियेच्या माध्यमातून करावयाचे होते त्यामुळे जनतेचे मत निर्धारित करण्याला अत्यंत महत्व प्राप्त झाले. भांडवली वर्गाचे राज्य हे कुठल्याही दैवी रुपात प्रकट झालेल्या वैधीकरणावर आधारलेले नसून ते जनतेच्या ‘सहमती’वर आधारलेले होते. येथेच ग्राम्शीने त्याच्या वर्चस्वाच्या (Hegemony) अवधारणेची मांडणी केली आहे. आता शोषण करणाऱ्यांना जनतेची सहमती प्राप्त करावयाची असल्यामुळे त्या सहमतीचे ‘निर्माण कार्य’ महत्वाचे बनले आणि त्याचबरोबर अशा सहमतीची निर्मिती करण्यासाठीच्या उपकरणांचे असणेही महत्वाचे बनले.

Mediaप्रिेंटिंग प्रेसचा शोध १४४० मध्ये लागला आणि पहिल्यांदा लिखित सामग्रीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन, वितरण आणि प्रसार शक्य झाला, हा काही निव्वळ योगायोग नव्हता.  पहिले वर्तमानपत्र १६०५ मध्ये जर्मनीमध्ये सुरु झाले, हादेखील योगायोग नाही. इतिहासामध्ये अशा युगप्रवर्तक गोष्टींच्या घडण्यामध्ये योगायोगाने काही दशकांचा फरक असू शकतो पण हा फरक शेकडो, हजारो वर्षांचा असू शकत नाही. मानव समाज त्याच प्रश्नांवरती विचार करतो जे प्नश्न त्याच्या काळातील जिवंत प्रश्न असतात. माक्र्सने म्हटल्याप्रमाणे, मनुष्य स्वत: समोर तेच लक्ष्य निर्धारित करतो जे तो प्राप्त करू शकतो. प्रेस आणि वर्तमानपत्र ह्यांची सुरुवात १५ ते १७ व्या शतकाच्या दरम्यान होते तर ही गोष्ट त्या काळाबद्दल बरेच काही सांगून जाते. नव्याने उदयास येत असलेल्या वर्गांनी आणि त्यांच्या वारसदारांनी चर्च आणि सामंतवादाच्या विरोधात जो संघर्ष सुरू केला होता त्यासाठी अशा साधनांचा शोध स्वाभाविक होता; १७ व्या शतकाच्या उत्तरार्धापर्यंत राजकीय पत्रके, पुस्तिका आणि पुस्तकांची संस्कृती युरोपात मजबूत होऊ लागली होती. पहिल्या टप्प्यातील भांडवली लोकशाही क्रांतीच्या नंतरही वर्तमानपत्रे, पुस्तके आणि मुद्रित साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित होत राहिले. त्याच बरोबर नाटक, संगीत आणि अन्य व्यावसायिक कलांचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला.  जेव्हा कलेची ही सर्व माध्यमे सामंत आणि जमीनदारांच्या मैफिलीपुरती बंदिस्त झालेली होती,  अशा सामंती काळाच्या विपरित आता कलेची सर्व माध्यमे पुनरुत्पादन योग्य बनू लागली; १८ व्या शतकाच्या शेवटी आणि १९ व्या शतकाच्या सुरुवातीस फोटोग्राफीचा शोध लागल्यानंतर आणि त्यानंतर काही दशकांच्या अंतराने चलचित्राचा शोध लागल्यानंतर कलात्मक रचनांच्या पुनरुत्पादनात अभूतपूर्व क्रांती घडून आली. विचारांच्या प्रसाराचा वेग अभूतपूर्व असाच होता. ही प्रक्रिया आजही चालूच आहे. ह्या सबंध प्रक्रियेमध्ये भांडवली प्रसारमाध्यमांचा विकास झाला. निश्चितपणे प्रसारमाध्यमे हे सुद्धा वर्ग संघर्षाचे ठिकाण आहे, परंतु स्वाभाविकपणेच ‘ज्या वर्गांच्या हातात भौतिक उत्पादनाच्या साधनांची मालकी असते त्याच वर्गाचे बौद्धिक उत्पादनावरसुद्धा नियंत्रण असते.’

भांडवलशाहीला प्रसारमाध्यमांची गरज होती आणि भांडवलशाही अंतर्गतच व्यापक प्रसारमाध्यमासारखी गोष्ट अस्तित्वात येऊ शकत होती. आपण तांत्रिक पातळीवर कुठल्याही ‘सामंती प्रसारमाध्यम’ किंवा ‘दास प्रसारमाध्यम’ यासारख्या गोष्टीची कल्पनाही करू शकत नाही. भांडवली वर्गाला प्रसारमाध्यमांची गरज ह्यासाठी असते, कारण त्याची सत्ता ही प्रभुत्वावर आधारलेली नसून ती वर्चस्वावर आधारलेली असते. त्यांना आपल्या सत्तेसाठी ‘सहमती’चे उत्पादन आणि पुनरुत्पादन करणे गरजेचे असते. निश्चितपणेच, आजच्या समाजाचे वास्तव सांगून भांडवली वर्ग आपल्या सत्तेसाठीची सहमती निर्माण करू शकत नाही. उघडच आहे की हे साध्य करण्यासाठी त्याला एका आभासी चेतनेची निर्मिती करावी लागते, त्याला जनतेच्या चेतनेमधील प्रतिक्रियावादी शक्यता आणि सिद्धतांना क्रियान्वित करावे लागते, त्याला मिथक हे सामान्य ज्ञानाच्या (Common sense) रूपात स्थापित करावे लागते, त्याला समाजाचे एक खोटे, काल्पनिक चित्र उभे करावे लागते, त्याच्याकडे जनतेला दाखवण्यापेक्षा लपवण्यासाठी जास्त गोष्टी असतात आणि इथेच बुर्झ्वा विचारधारेचे महत्व समोर येते.

Mediaभांडवली वर्ग जनतेला विज्ञान आणि तर्कशीलता फक्त तांत्रिक क्षेत्रांपुरता देऊ करतो, किंवा तेवढ्याच माफक प्रमाणात देऊ शकतो ज्यायोगे त्याचे अस्तित्व धोक्यात येणार नाही. त्यामुळेच एकीकडे विज्ञानाचे शिक्षण दिले जाते तर दुसरीकडे सर्व प्रकारचा रूढीवाद, परंपरावाद, कूपमंडुकता, अंध-राष्ट्रवाद आणि त्याचबरोबर एकूण अवैज्ञानिक आणि अतार्किक विचार विद्यार्थ्‍यांच्या-तरुणांच्या डोक्यामध्ये भरवले जातात. शिक्षण घेणाऱ्या तरुणांसाठी विज्ञान आणि तर्क ह्यांचे महत्व केवळ आणि केवळ प्रयोगशाळेपुरते उरते; भौतिकशास्त्र आणि रसायन शास्त्रांचे उन्नत प्रयोग करणारे विज्ञानाचे विद्यार्थीसुद्धा मुलाखती अगोदर पुट्टूपारथी, बालाजी इत्यादी ठिकाणी आशीर्वाद घेण्यासाठी जातात: वैज्ञानिक उपग्रह बनवल्यानंतर त्याचे प्रक्षेपण करण्याआधी त्याची पूजा करण्यासाठी मंदिरात घेऊन जातात. त्यामुळेच ही व्यवस्था वैज्ञानिक निर्माण न करता विज्ञानाचे कारकून निर्माण करते. अगदी ह्याच प्रकारे प्रसारमाध्यमेसुद्धा काम करतात. जर तुम्ही बातम्या देणाऱ्या वाहिन्या (ज्यांना बातम्या देणारे म्हणणे मूर्खपणा आहे!) बघितल्या तर त्यावर टैरट कार्ड, राशीफळ आणि वास्तूशास्त्रापासून रावणाची ममी आणि सीता जिथे जमिनीमध्ये सामावली ती जमीन सुद्धा दाखवण्यात येते. जर तुम्ही मनोरंजन मालिका एका आठवड्यापेक्षा जास्त काळ बघितल्या तर तुम्ही कदाचित उदात्तता, व्यापकता, असीमता इत्यादी शब्दांचे व्यापक अर्थच विसरून जाल आणि प्रत्येक हिणकस गोष्ट तुम्हाला आवडायला लागेल. जर तुम्ही म्युजिकच्या वाहिन्या किंवा लाइफ़ स्टाइल वाहिन्या बघाल तर त्यावरील रियालिटी शोज बघून तुम्हाला उलटी येऊ शकते (अट केवळ ही आहे की तुमच्यामध्ये मूलभूत मानवी मूल्य जिवंत असायला हवीत). वर्तमापत्रे बघितली तर तुमच्या लक्षात येईल की ज्या गोष्टी बातम्या म्हणून छापण्यात येत आहेत त्या खरे तर बातम्या नाहीतच! ज्या खऱ्या बातम्या असतात त्यांना एक तर वर्तमानपत्रांमध्ये जागाच मिळत नाही आणि जरी मिळाली तरी एखाद्या कोपऱ्यात जागा भरण्यासाठी म्हणून त्या छापण्यात येतात. आजच्या बहुतेक चित्रपटांबद्दल जितके कमी बोलावे तेवढे चांगले. कला समाजाचे सौंदर्यात्मक चित्रण करते. जर हीच कलेची परिभाषा असेल तर अधिकांश चित्रपटांना कलात्मक रचना म्हटले जाऊच शकत नाही, किंबहुना तो सगळा कचराच आहे, आणि ह्या कचऱ्यामधील अर्ध्‍याहून अधिक चित्रपट सेमी-पॉर्नाग्रार्फिक आहेत.

भांडवली प्रसारमाध्यमे ह्या सर्व माध्यमांमार्फत एक तर मेंदूची विचार करण्याची सवय संपवून टाकतात आणि त्याला हलक्या नशेत ठेवतात किंवा ते आपल्याला केवळ त्याच गोष्टींवर विचार करण्यास भाग पाडतात ज्यावर शासक वर्ग आपल्याला विचार करू देऊ इच्छितो. निश्चितपणे, काही चांगले टिव्ही कार्यक्रम, वर्तमानपत्रामधील आलेख आणि चित्रपट येतात. परंतु त्यांची संख्या अगदीच नगण्य असते आणि सांस्कृतिक पतनशीलतेच्या वातावरणात ते कुठे गायब होऊन जातात कळतही नाही.

वास्तविक पाहता भांडवली प्रसारमाध्यमे भांडवली वर्गाचा विश्वदृष्टीकोन, त्याची विचारधारा आणि संस्कृती ह्यांचे प्रभुत्व जनतेच्या मेंदूवर प्रस्थापित करण्याचे काम इमाने-इतबारे  करत असतात. परंतु हे काम प्रसारमाध्यमे यांत्रिक पद्धतीने करत नाहीत तर अत्यंत जटील आणि संश्लिष्ट पद्धतीने करतात. ही प्रक्रिया अंतर्विरोधी आणि विरोधाभासांनी भरलेली असते. ह्या संपूर्ण प्रक्रियेमधून प्रसारमाध्यमे जनतेला आजूबाजूच्या घटनांकडे बघण्याचा एक दृष्टीकोन देतात. हा दृष्टीकोन वेगवेगळ्या घटनांकडे बघण्याची व्याख्यात्मक चौकट असतो. ही व्याख्यात्मक चौकट जनतेला आलोचनात्मकतेपासून दूर घेऊन जाते आणि त्या ऐवजी तिच्या विचारांमध्ये आभासी आलोचनात्मकता भिनवते. ही परिस्थिती वास्तवाची परिवर्तनात्मक टीका प्रस्तुत करण्याच्या क्षमतेपासून जनतेला दूर घेऊन जाते. असे नाही की भांडवली प्रसारमाध्यमे भांडवली समाजातील नग्न सत्य आणि बर्बर यथार्थ बिलकुल  चित्रित करत नाहीत. परंतु ह्या गोष्टींचे चित्रण करत असताना ते जनतेसमोर एक आभासी, नपुसक आणि पराजयवादी आलोचना प्रस्तुत करतात. कित्येक वेळी जेव्हा व्यवस्थेची कोणतीही आलोचना करता येत नाही त्यावेळी प्रसार माध्यमे व्यवस्थेची आभासी आलोचना प्रस्तुत करतात. नोम चॉम्स्की यांनी म्हटल्याप्रमाणे – जनतेच्या मेंदूला नियंत्रित करण्यासाठी शासक वर्ग वाद-विवादासाठी मर्यादित आणि अप्रभावी स्पेस उपलब्ध करून देतो, परंतु त्या स्पेसमध्ये तो खूपच जिवंत वाद-विवाद आयोजित करतो. उघडच आहे की अशा वाद-विवादांनी व्यवस्थेसमोर कुठलाही धोका उत्पन्न होत नाही, किंबहुना तिचे वर्चस्व अधिकच प्रस्थापित होते. ह्या सबंध प्रक्रियेमध्ये भांडवली प्रसारमाध्यमे भांडवली मिथके आणि पूर्वग्रहांना सामान्य ज्ञानाच्या (Common sense) रूपात प्रस्थापित करतात आणि त्याबरोबरच भांडवली शासन व्यवस्थेला तिच्या एकूण विकृतींसह सर्वाधिक नैसर्गिक आणि उपयुक्त घोषित करतात.

हे सत्य आहे की, भांडवली प्रसार माध्यमे त्यांच्या ह्या कार्यात नेहमीच यशस्वी होत नाहीत. भांडवली समाजात आर्थिक संकट, बेरोजगारी, श्रीमंत आणि गरीब ह्यांच्यामधील वाढती आर्थिक दरी ह्यामुळे प्रसारमाध्यमांच्या ‘सहमती’ निर्माण करण्यासाठीची प्रणाली बिघडते. भांडवली प्रसारमाध्यमांकडून भांडवली व्यवस्थेची तळी उचलून धरणे अधिकच उपहासात्मक आणि विकृत वाटू लागते. प्रसारमाध्यमांमध्ये बसलेले भांडवली वर्गाचे ‘थिंक टैंक’ जो संदेश जनतेमध्ये पोहचवू इच्छितात त्या पद्धतीने संदेश पोहचू शकत नाहीत: जनता त्यांना वेगळ्याच पद्धतीने ग्रहण करू लागते आणि त्यातून ती शासक वर्गाला अभिप्रेत नसलेला अर्थ काढू लागते.

पण निश्चितपणे आपण भांडवली प्रसारमाध्यमांचे भयंकर परिणाम आणि त्यांच्या विचारधारात्मक वर्चस्वाचा प्रतिकार करण्यासाठी भांडवली व्यवस्था संकटग्रस्त होण्याची वाट बघू शकत नाही. त्यामुळेच, आपल्याला त्यांच्या वर्चस्वाच्या धर्तीवर आपले प्रति-वर्चस्व निर्माण करावे लागेल; आपल्याला प्रभुत्वशाली भांडवली प्रसारमाध्यमांच्या धर्तीवर क्रांतिकारी पर्यायी प्रसारमाध्यमे उभी करावी लागतील; आपल्याला भांडवली प्रसारमाध्यमांकडून जनतेमध्ये पसरवल्या जात असलेल्या बुर्झ्वा व्याख्यात्मक चौकटीला पर्याय म्हणून देश-जग, समाज, संस्कृती आणि अन्य प्रत्येक विषयाच्या योग्य विश्लेषणासाठी एक क्रांतिकारी वैज्ञानिक व्याख्यात्मक चौकट तयार करावी लागेल; निश्चितपणे अशा प्रकारची क्रांतिकारी पर्यायी प्रसारमाध्यमे विराट अशा भांडवली प्रसार-तंत्राइतकी विराट आणि मोठ्या भांडवलाची गुंतवणूक असलेली नसतील, आणि ती तशी असण्याची गरजही नाही. आपण कॉर्पारेट प्रसारमाध्यमांच्या भांडवलाच्या शक्तीचा सामना आपल्या स्वयंसेवक आणि कार्यकर्त्‍याच्या जोरावर करू शकतो. आपल्याकडे अशे हजारो  प्रतिबद्ध तरुण रंगकर्मी, संगीतकार, नाटककार, कवी, लेखक, कथाकार, पत्रकार, अभिनेते इत्यादी तयार झाले पाहिजेत, जे जनतेच्या गरजेच्या बातम्या, संस्कृती, गीत, नाटक, कथा, कविता, कादंबऱ्या उपलब्ध करून देऊ शकतील; जे जनतेला आजच्या जगातील सत्याशी अवगत करतील आणि त्याच बरोबर ह्या अमानवीय जगाच्या पर्यायाच्या निर्मितीसाठी प्रेरित, प्रोत्साहित करतील; जे त्यांना नवीन जगाचे स्वप्न आणि त्याला साकार करण्यासाठीची दृष्टी देतील. कुठे आहेत आज असे कलाकार? कुठे आहेत आज असे लेखक आणि पत्रकार? आपल्याला हवी आहेत अशी जास्तीत जास्त वर्तमानपत्रे जी देशाच्या विभिन्न भागांमध्ये जनतेशी तिच्या भाषेत संवाद स्थापित करू शकतील आणि जी बातम्यांची व्याख्या बदलून टाकू शकतील; आपल्याला हवे आहेत असे नाटक-संघ जे शहरातील झोपडपट्टी आणि निम्न-मध्यमवर्गीय वसाहतींपासून कॉलेज, रेल्वे स्टेशन, बस स्थानकांपर्यंत जनतेच्या जगण्याशी जोडलेल्या प्रश्नांच्या वास्तवाचा पर्दाफाश करणारी नाटके दाखवू शकतील; आपल्याला हवे आहेत असे गायक आणि संगीतकार जे देशाच्या कानाकोपऱ्यात विद्रोहाचे राग भरतील आणि लोकांची चेतना जागवतील; आपल्याला हवे आहेत असे चित्रपटकर्मी जे पडद्यवर आजच्या कष्टकरी जनतेच्या जगण्याची शोकांतिका अश्या पद्धतीने सांगू शकतील की लोक त्यांच्या सवयींच्या गुलामगिरीतून जागे होतील आणि अन्यायाविरुद्ध उभे ङ्खाकतील; कुठे आहेत असे तरुण नाटककार, संगीतकार, गायक आणि चित्रपटकार? आपल्याला अजूनही बरेच काही हवे आहे; जोपर्यंत भांडवली लोकशाही आपल्याला ठराविक मर्यादेपर्यंत स्पेस देत आहे तोपर्यंत आपल्याला आपली स्वत:ची टिव्ही वाहिनी आणि रेडिओ वाहिनी सुरू केली पाहिजे. आपल्याकडे फिरते पुस्तकप्रदर्शन भरवण्यासाठी अनेक वाहने हवीत. आणि सर्वात महत्वाचे,  हा सर्व पसारा सांभाळण्यासाठी, भांडवलदारांचा पैसा आणि वेतनधारी लोक नकोत तर, हजारोंच्या संख्येने समर्पित आणि प्रतिबद्ध अश्या क्रांतिकारी कार्यकर्त्‍याची फौज हवी! तरच अशी पर्यायी प्रसामाध्यमे उभी राहू शकतात, जी भांडवली प्रसारमाध्यमांच्या धर्तीवर समाजात स्वत:चे स्थान निर्माण करू शकतील, आपली भूमिका पोहचवू शकतील आणि एका क्रांतिकारी प्रति-वर्चस्वाचे निर्माण करू शकतील. तेव्हाच आपण सध्याच्या भांडवली प्रसारमाध्यमांच्या विकृत खोटारडेपणाचा सामना करू शकू; तेव्हाच आपण भांडवली प्रसारामाध्यामांद्वारे पसरवण्यात येत असलेल्या विकृत संस्कृतीच्या विरोधात क्रांतिकारी जनसंस्कृतीची मशाल पेटवू शकू. जोपर्यंत आपण हे सर्व करणार नाही तोपर्यंत आपण सर्वार्थाने परिवर्तनकारी आणि क्रांतिकारी असा प्रकल्प उभा करू शकणार नाही.

२१व्या शतकाच्या क्रांतींच्या अजेंड्यावर संस्कृतीचा प्रश्न अग्रक्रमात असणार आहे. कारण आजच्या भांडवली वर्गाने संस्कृती आणि प्रसारमाध्यमांचा उपयोग आपल्या वर्गसत्तेचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला आहे. आपल्याला त्या वर्चस्वाला आव्हान द्यावे लागेल. त्यासाठी एका नवीन क्रांतिकारी पुनर्जागरण आणि प्रबोधन-पर्वाची गरज आहे. आणि निश्चितपणे, अशा क्रांतिकारी पुनर्जागरण आणि प्रबोधन-पर्वाच्या निर्मितीसाठी आपल्याला गरज आहे ती आपल्या क्रांतिकारी पर्यायी प्रसारमाध्यमांची!

विद्यार्थी युवकांचे पत्र ‘मुक्तिकामी छात्रों-युवाओं का आह्वान’  मधून साभार – अनुवाद अमित शिंदे

स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५