एका कामगाराच्या कविता

एका कामगाराच्या कविता

xu_lizhiया कविता चीनमधील फॉक्सकॉन कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका स्थलांतरित कामगार जू लिझीने लिहिल्या आहेत. लिझीने ३० सप्टेंबर २०१४ रोजी आत्महत्या केली. परंतु लिझीचा मृत्यू म्हणजे आत्महत्या नव्हती तर एका तरुणापासून त्याची स्वप्ने आणि इच्छाशक्ती हिसकावून या नफेखोर व्यवस्थेने त्याचा जीव घेतला. लिझीच्या कवितेतील एक एक शब्द टाहो फोडून याचा पुरावा देत आहे. ही नफेखोर व्यवस्था माणसावर लादत असलेल्या आणि माणसाला आतून उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या नारकीय जीवनाचे चित्र लिझीच्या कवितांमधील प्रतिमा उभे करतात.

१. मी लोखंडाचा चंद्र गिळला आहे,

मी लोखंडाचा चंद्र गिळला आहे,xulizhicover-henry
ते त्याला खिळा म्हणतात
मी हा औद्योगिक कचरा,
बेरोजगारीचे दस्तैवज गिळले आहेत,
यंत्रांवर झुकलेले युवा जीवन वेळेआधीच मान टाकते,
मी गर्दी, कोलाहल आणि लाचारी गिळली आहे.
मी गिळले आहेत पायी चालणारे पूल,
गंजलेले आयुष्य,
आता आणखी गिळता येत नाही.
मी जे काही गिळले आहे
ते आता माझ्या गळ्याखाली उतरून
माझ्या पूर्वजांच्या भूमीवर पसरते आहे
एका अपमानजनक कवितेच्या रूपात.
२. एक स्‍क्रू पडतो जमिनीवर

एक स्‍क्रू पडतो जमिनीवर
ओव्हरटाईमच्या या रात्रीत,
सरळ जमिनीच्या दिशेने, उजेड सांडीत
तो कोणाचेही लक्ष वेधून घेणार नाही,
अगदी मागच्या वेळेसारखा,
जेव्हा अशाच एका रात्री,
एक माणूस कोसळला होता जमिनीवर.

स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५