वाचकपीठ

वाचकपीठ

‘स्फुलिंग’चे  अंक  महाराष्ट्रात नक्कीच विचारांची घुसळण सुरू करतील. याचं मुख्य कारण म्हणजे ह्यात आरामखुर्चीत बसून केलेले मार्गदर्शन नाही तर रस्त्यावर उतरून काम  करणाऱ्या कार्यकर्त्‍यानी  अनियंत्रित भांडवलशाही, जातीचे प्रश्न व वाढता फासीवाद यांना शोधलेले उत्तर आहे.या सर्व लढाऊ टीमला हार्दिक शुभेच्छा !

आमोद कुलकर्णी, पुणे

माननीय संपादक,

मराठी साहित्याच्या वैचारिकतेचा परीघ दिवसेंदिवस आक्रसत असतानाच्या आणि एकंदरीतच महाराष्ट्रातील राजकीय-सामाजिक जीवनावर फासिवादाचे मळभ दाटून आलेले असतानाच्या  काळात ‘स्फुलिंग’च्या रुपात आशेचा नवीन किरण बघावयास मिळत आहे, ही नक्कीच दिलासा देणारी गोष्ट आहे. खास करून युवकांच्या अपेक्षा आणि आकांक्षांना भांडवली संकटामुळे जे जबर धक्के बसले आहेत त्यामागचे ‘स्फुलिंग’ इतके सविस्तर विश्लेषण दुसऱ्या कुठल्याही मासिकामध्ये आलेले नाही. विषयांचे वैविध्य आणि त्यांची जनवादी दृष्टीकोनातून केली गेलेली मांडणी हे ‘स्फुलिंग’चे बलस्थान आहे. भांडवली अजगराचा विळखा समाजाभोवती अधिकाधिक घट्ट होत असताना समाजाला एका नवीन प्रबोधन पर्वाच्या दिशेने उद्युक्त करण्याच्या दृष्टीने, येणाऱ्या दिवसांमध्ये मराठी वाचकांमध्ये ‘स्फुलिंग’चा प्रसार महत्वाचा ठरणार आहे. त्यासाठी ‘स्फुलिंग’च्या सर्व टीम ला शुभेच्छा!

संतोष पाटिल, पुणे

‘स्‍फुलिंग’चा पहिला अंक आवडला. कोणत्याही जाहिरातीशिवाय अंक प्रकाशित करण्याचा प्रयत्न महत्त्वाचा आहे. त्याबद्दल अभिनंदन. मात्र पुढच्या अंकांसाठी काही सूचना देऊ इच्छितो. लेख माहितीपूर्ण आहेत, परंतु मांडणी आणि शैली काहीशी बोजड आहे, ती अधिक सुबोध व्हावी. सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी मानून अंक प्रसिद्ध केला जात असल्यामुळे लेखन तळागाळातल्या माणसालाही समजेल इतके सुबोध करण्याचा प्रयत्न करावा. आजची परिस्थिती गुंतागुंतीची आहे, परंतु त्या परिस्थितीचे भान करून देणारे लिखाण गुंतागुंतीचे होऊ नये. लिखाणामध्ये टोकाची नकारात्मकता आहे. आजच्या परिस्थितीत ती तशी असणे स्वाभाविक आहे, परंतु निव्वळ नकारात्मकता असू नये, याची दक्षता घ्यावी. लेख वेगवेगळ्या लेखकांनी लिहिलेले असूनही त्यांमध्ये एकच सूर जाणवतो. त्याबाबत विचार व्हावा. आशयाबरोबरच रूपामध्येदेखील वैविध्य जेवढे जास्त असेल तेवढा अंक अधिक वाचनीय होईल. शुभेच्छा!

नागेश भारत धुर्वे, मालाड, मुंबई.

स्फुलिंग अंक २ एप्रिल २०१५